सैन्यात भरती झालेल्या पहिल्या महिलेच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“कुणी कुणासाठी काही करत नाही. मी स्वत:च्या बळावर ध्येय साध्य केले आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी तीनदा शाबासकी देऊन पाठ थोपटली. राष्ट्रपती म्हणाल्या, मला तुझा अभिमान वाटतो.” हे उद्गार आहेत भारतीय सेनेत पहिल्या ‘महिला’ जवान होण्याचे स्वप्न बघणार्या आणि ते पूर्ण करणार्या ‘शांति तिग्गा’ यांचे.
आज जग मंगळावर पोचले आहे कदाचित त्याही पुढे पण या जगाचा हिस्सा असलेल्या स्त्री जमातीची कथा अजूनही ‘अहिल्या, द्रौपदी,सीता’ यांच्या कोशातून बाहेर यायला तयार नाही. अर्थात शांती तिग्गा सारखी एखादी शलाका अचानक चमकून जाते आणि काही काल आकाशात तिचे आंतरिक जिद्दीचे तेज तळपत राहते.
कोण होत्या या शांती तिग्गा? असे काय मिळवले होते त्यांनी? काय आहे त्यांची आणि आजही ‘manage’ केल्या जाणार्या व्यवस्थेची कहाणी? चला जाणून घेऊ!
देशातील अधिकाधिक महिला अडथळे आणि स्टिरियोटाइप तोडत असताना, पहिले पाऊल टाकण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी पाऊल उचलणार्या काही महिला आहेत ज्यांमध्ये शांती तिग्गा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
पश्चिम बंगाल च्या जलपायगुडी जिल्ह्यातील उत्तर मीमावाडी गावात तिचा जन्म झाला. वडील शेतकरी होते. ४ भाऊ आणि ३ बहिणींचे पालनपोषण करणे त्यांना खूप जड जात होते. शांतीला शिकायचे असूनही ८ वी नंतर शिकता आले नाही. १५ व्या वर्षी आईवडिलांनी बळजबरीने लग्न लावून दिले. १६व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. नवर्यानेही शिकू दिले नाही. तेव्हा ती लपून छपून शिकू लागली.
खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत ती एका नर्सिंग होममध्ये रात्रीची नोकरी करु लागली. तिला दिवसा घर सांभाळून रात्री ड्युटी करावी लागत असे. २००५ पर्यंत हीच परिस्थिति होती. तोपर्यंत ती दोन मुलांची आई झाली होती.
२००५ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले आणि परिस्थिती आणखी बिघडली. तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याशी नाते तोडले. त्यातही जमेची बाजू ही की तिला तिच्या पतीच्या जागी रेल्वे मध्ये नोकरी मिळाली. जबाबदारी आणि संघर्ष यांचीच सोबत होती.
दोन्ही मुलांना घरी एकटे सोडून रेल्वेची १२ तासांची ड्यूटी करावी लागे. शांतिने मात्र कधीच हार मनाली नाही. आपली जबाबदारी सांभाळत ती २०१० मध्ये १० ची परीक्षा पास झाली.
दरम्यान रेल्वे इंजिनिअर युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किशोर यांच्याशी तिची ओळख झाली. त्यांनी तिला टेरिटोरिअल आर्मी बाबत सांगितले. ते ऐकून तिची लहानपणीची इच्छा पुन्हा जागृत झाली, सर्वसाधारण महिलांपेक्षा काही वेगळे करण्याची इच्छा!
त्यामुळे रेल्वेची ड्युटी आणि घराची जबाबदारी सांभाळून तिने टेरिटरिअल आर्मीत भरती होण्याची तयारी सुरू केली.’ सैन्यात जाण्यासाठी रेल्वेत १२ तास नोकरी करूनही ती व्यायाम करीत असे. कधी रात्री आठ वाजतादेखील ती धावण्यासाठी जात असे.
रिक्रूटमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान दीड किलोमीटर ते ५० किलोमीटर अशा प्रत्येक धावण्याच्या स्पध्रेत ती सर्वप्रथम आली होती. क्लाइंबिंग जम्पिंग सारख्या कसरतीही तिने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. तिचे सहकारी म्हणत की, “ती कशी इतकी पळू शकते?, आधी पळेल आणि नंतर रडत बसेल.” पण शांतीने पहिल्याच प्रशिक्षणात स्वत:ला सिद्ध केले.
रोज सकाळी चार वाजता उठून पाच वाजता ती पीटीसाठी जात असे आणि साडेसात वाजता परत येत. पुन्हा ८ वाजता प्रशिक्षण, त्यानंतर संध्याकाळी ४ वाजल्यापासून फिटनेससाठी व्हॉलीबॉल, फूटबॉल आदी खेळून रात्री उशिरा झोपून पुन्हा सकाळी लवकर उठणे हा तिचा नित्यक्रम होता.
—
- भारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय!
- बंदी घालण्याऐवजी सेनेच्या जवानांना दारू स्वस्त दरात देतात, कारण…
—
टेरिटोरिअल आर्मीत असलेल्या शांतीने आयुष्यभर सैन्यातच राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणायची की, “युद्ध सुरू झाले तर मी मागे हटणार नाही. देशासाठी बलिदान देण्यासही मी तयार आहे.”
महिनाभर चाललेल्या या प्रशिक्षणातील प्रत्येक स्पर्धेत तिने आपल्या सहकारी १९९ पुरुष सैनिकांना मागे टाकले होते. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा रेल्वेत रूजू झाली. परंतु युद्ध किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सैनिक म्हणून कर्तव्य निभावण्यासाठी ती सज्ज होती. शांती रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असताना पण देशसेवेसाठी टेरिटोरिअल आर्मीत भरती झाली होती.
३५ वर्षांची ही आदिवासी महिला चिकाटीचा आदर्श होती. हिरव्या वर्दीबरोबरच तिच्या चेहर्यावरील आत्मविश्वासही जबरदस्त होता. शारीरिक चाचणी, कवायत आणि फायरिंगमधील तिच्या एकूण कामगिरीच्या आधारे तिग्गाने ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ हा किताब पटकावला होता.
तिच्या या असामान्य कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तिचा गौरवही करण्यात आला होता.
२०११ मध्ये, टेरिटोरियल आर्मी (TA) रेल्वेबद्दल प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने ९६९ रेल्वे अभियंता रेजिमेंटसाठी साइन अप केले आणि वयाच्या ३५ व्या वर्षी तिची भारतीय सैन्यात भरती झाली.
दुर्दैवाने, २०१३ मध्ये तिच्या आयुष्याला एक दुःखद वळण मिळाले, जेव्हा तिचे अज्ञात गुन्हेगारांनी अपहरण केले होते. काही दिवसांनी ती डोळ्यावर पट्टी बांधलेली आणि रेल्वे ट्रॅकजवळ बांधलेली आढळली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तिला हॉस्पिटलच्या केबिनबाहेर सुरक्षा पुरवण्यात आली होती. अत्याचार करणाऱ्यांनी तिला इजा केली नसल्याचे तिने सांगितले होते. घटनेच्या आठवडाभरानंतर ती हॉस्पिटलच्या केबिन टॉयलेट मध्ये धक्कादायक रित्या लटकलेल्या अवस्थेत आढळली.
तिच्या कुटुंबीयांनी तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करून त्यासाठी तपास करण्याचा आग्रह धरला. पण तपासात काहीच निष्पन्न झाले नाही आणि तिचा गूढ मृत्यू ‘आत्महत्या’ म्हणून ठरवला गेला.
इतकेच नाही तर सैन्यात नोकरी लावण्यासाठी तिने लोकांकडून पैसे घेतले होते आणि त्या लोकांच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असा तिच्यावर आरोप करण्यात आला.
अशा प्रकारे, भारताच्या एका धाडसी मुलीच्या प्रेरणादायी जीवनाचा अंत झाला. यातील काय खरे आणि काय खोटे हे जरी अज्ञात राहिले तरी आपल्या जिद्दीने स्थलसेनेची पहिली भारतीय महिला सैनिक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणारी शांती तिग्गा आपल्या अंतःकरणात जिवंत राहिल हे एक ज्वलंत उदाहरण म्हणून, संकटे आणि संकटांना तोंड देऊनही आपण काय साध्य करू शकतो याचा मार्ग दाखवण्यासाठी!!!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.