…आणि शत्रूंच्या नाकावर टिच्चून इस्रायलने आपले स्वातंत्र्य मिळवले : इस्रायल- संक्षिप्त इतिहास-३
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मागील भागाची लिंक : युरोपातील यहुदी विरोधी लाट आणि झायोनिस्ट विचारधारेचा उगम : इस्रायल- संक्षिप्त इतिहास २
लेखक – आदित्य कोरडे
—
१८८१ मध्ये जेव्हा पहिली आलीया सुरु झाली तेव्हा पॅलेस्टाइन मध्ये यहुद्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ४% होते, ते झपाट्याने वाढून १९३९ साली जेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा ते ३०% झालेले होते.
ह्यावरून किती झपाट्याने यहुदी तेथे आले ते आपण समजू शकतो. अर्थात ह्यामुळे अरबी राष्ट्रात संताप धुमसू लागला होता, पण इंग्रज तेथे पक्के पाय रोवून असल्याने अरबांना फार काही करता येत नव्हते.
ह्याच सुमारास तेथे तेल मिळू लागल्याने अर्थात साऱ्या विकसित जगाचेच लक्ष तिकडे गेलं. यहुदी भरपूर संख्येने असले तरी निर्वासित होते आणि दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर तर ह्या प्रदेशाला तेलामुळे साहजिक महत्व आलं.
अरबांना चुचकारून तेल उत्खननाचे ठेके मिळवण्यासाठी आता इंग्रजांना आपले धोरण बदलणे भाग पडले. त्यांनी यहुद्यांच्या तिकडे येण्याच्या संख्येवर मर्यादा घातली. इकडे युरोपातली राष्ट्र नाझी जर्मनी पुढे धडाधड कोसळून पडत होती आणि त्या त्या राष्ट्रांमध्ये असलेले यहुदी जर्मनीच्या भक्ष्य स्थानी. लवकरच खाडी पलीकडचा इंग्लंड हा एकाच देश उरला जो अजून जर्मनीशी लढत होता आणि एकंदरीत १९४०-४१ मध्ये त्याची अवस्था फार चांगली नव्हती.
अशात त्यांनी युरोपातून पॅलेस्टाइन मध्ये येणाऱ्या यहुद्यांच्या संख्येवर मर्यादा घातली, सगळ्यांना दूर अमेरिकेत जाणे शक्य नव्हते. असे लक्षावधी दुर्दैवी यहुदी लोक नाझी जर्मनांच्या कचाट्यात सापडले.
ह्या गदारोळात जवळपास ६० लाख यहुदी जर्मनीच्या फक्त छळ छावण्यात सापडून मारले गेले. नाझी जर्मनी जसा ह्याचा दोषी आहे तसेच ह्या पापाचा काही भार इंग्लंडला हि उचलावा लागणार (आणि काही अरबांना…)
नाझी लोक यहुद्यांचे काय करतात हे पोलंड मध्ये जवळून पाहिलेला आणि जीव मुठीत घेऊन तिथून वेळीच पळून आलेला एक तरुण डेव्हिड बेन गुरियन हे सगळे पाहून अस्वस्थ होत होता.
तेलासाठी इंग्रजांनी अरबांची मनधरणी करायला सुरुवात केल्या पासून अरबांचे मनोधैर्य वाढीला लागले होते. त्यांनी आता निर्वासित याहुद्यांच्या वस्त्यांवर हल्ले, जाळपोळ लुटालूट सुरु केली. युरोपातून पळून आलेली यहुदी लोकांनी भरलेली जहाजं इंग्रज बंदरात अडवत, त्यातील लोकांना उतरू देत नसत.
पण हे अरब त्यावर हल्ला करत, बरं जहाज खोल समुद्रात नेऊन उभी करावी तर युद्ध सुरु होते, अख्खे जहाजाच रसातळाला जायची भीती होती. अशात आपण फक्त गप्प बसून भागणार नाही हे गुरीयनने ओळखले त्याने ‘हगाना’ हि यहुदी निर्वासितांची रक्षा करणारी लष्करी संस्था स्थापन केली.
हे लोक अरब हल्लेखोरापासून यहुदी वस्त्यांचे रक्षण करणे, बंदरात उभे असलेल्या यहुदी निर्वासितांचे रक्षण करणे, त्यांना गुपचूप जहाजावरून काढून सुरक्षित स्थळी पोहोचवणे अशी कामे करत. सुरुवातीला लहान असलेली हि संस्था पुढे चांगलीच फोफावली. ह्यात युरोपातून पळून आलेले आणि तिथे लष्करी प्रशिक्षण घेतलेले लोक हि होते.
त्यांना पैसा अमेरिकेतले सधन आणि सुरक्षित असलेले यहुदी पुरवत असतं. १९१८ साली फक्त पॅलेस्टाइनच्या फाळणीचा प्रस्ताव संसदेत मंजूर करून पुढे २०-२२ वर्षं फक्त चालढकल करत बसलेले इंग्रज आपली फारशी मदत करणार नाहीत हे गुरियन यांनी ओळखले. अरब मागास असंघटीत होते आणि तसे हगना पुढे कच्चे होते.
खरे आव्हान इंग्रजांचे असणार होते म्हणून मग त्यांनी हळूहळू आपला मोहरा इंग्रजाकडे वळवायला सुरुवात केली. हगाना चे लोक आता ब्रिटीश लष्करी तळांना लक्ष्य करू लागले, त्यापायी ब्रिटीशांना आपल्या तिथे तैनात करायच्या लष्करी शिबंदीत वाढ करावी लागली. ऐन युद्ध चालू असताना इथे त्यांचे जवळपास १ लाख सैन्य अडकून पडले होते. ह्याचा फार मोठा बोजा त्यांच्या तिजोरीवर पडत होता. अखेरीस युद्ध संपले पण तरीही ब्रिटिशांना इथून सैन्य काही काढून घेता येईना.
आता हगाना अधिकच आक्रमक झाली होती शिवाय दुसरे महायुद्ध संपल्याने अमेरिकेतून शस्त्रास्त्रांची मिळणारी मदत आता निर्धोक पणे त्यांच्या हाती पडू लागली. जर्मनीने यहुद्यांवर केलेले अत्याचार जगाने बघितल्यामुळे यहुद्यांबद्दल सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे हगाना चा कठोर उपायांनी बंदोबस्त करणे अवघड जात होते.
तशात आता पूर्वेकडचे भारत, श्रीलंका, सिंगापूर इथल्या वसाहती सोडून देऊन त्यांना स्वतंत्र करायचेही इंग्रजांनी ठरवले होते. अशावेळी फार उशीर न करता हे जवळपास ३० वर्षे भिजत पडलेलं आणि आताशा भलतच अवजड झालेले घोंगडं त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या गळ्यात टाकलं आणि आपण तिथला बाडबिस्तरा गुंडाळला.
जगाचा भार आपल्या शिरावर घेऊन जिथे तिथे नाक खुपसण्याची (आणि बऱ्याचदा ते कापून घेण्याची) अनिवार हौस (पक्षी खाज) असलेला अमेरिका आता मध्ये आला. त्याने लगेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या भात्यातून पहिला तीर मारला तो १९१८ पासून फक्त कागदावर असलेला फाळणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्याचा. तशी औपचारिक घोषणा झाली आणि कार्यवाहीही सुरु झाली.
हा पहिलाच तीर अरबी मधमाशांच्या पोळ्यावर लागला आणि अरबी माशा चवताळून उठल्या. अरबी निदर्शकांचा नेता शेख साबरी ह्याने हि फाळणी रद्द करण्यची जोरदार मागणी केलीच, शिवाय यहुद्यांना हा भूभाग सोडून जाण्याची अन्यथा सगळ्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली.
झालं यादवी माजायला एवढे कारण पुरेसं होतं, पण यहुदी आपल्याला जड जातायत हे पाहून त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला फाळणी रद्द करा, नाहीतर तेल पुरवठा बंद करू म्हणून दम दिला. हि मात्रा लागू पडणार असे दिसू लागले. गुरियन ह्यांच्या पोटात गोळा आला.
असिरीयान राजवटीच्या ताब्यात आपली भूमी गेल्यापासून २७०० वर्ष यहुदी रानोमाळ भटकत होते आता अगदी हातातोंडाशी आलेला घास जातो कि काय असे त्यांना वाटू लागले. काहीतरी तातडीने करणे गरजेचे होते.
गुरियन हा जात्याच कणखर स्वभावाचा आणि निर्णय घेताना न डगमगणारा नेता होता. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने फाळणी रद्द करण्याच्या आधीच म्हणजे १४ मे १९४८ रोजी संध्याकाळी इस्रायल ह्या देशाच्या स्थापनेची घोषणा करून टाकली.
हा जगाला मोठाच धक्का होता. धक्का ओसरल्यावर अरब गप्प बसणारा नाहीत, ते हल्ला करतील हे गृहीत धरून आधीच त्याची व्यूह रचना आखली जात होती, त्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी स्वत:ला नवीन इस्रायल देशाचे पंतप्रधान म्हणून जाहीर करून टाकले आणि लगेच सूत्र हातीही घेतली. इकडे अमेरिकेत मोठा पेच प्रसंग उभा राहिला.
अरबांनी हल्ला केल्यावर काही भलतं सलतं झालं तर अमेरिकेची नाचक्की होणार होती. शिवाय यहुद्यांची त्यांच्या निर्वासितांची सोय ही पहावी लागणार होती. त्यांना असे वाऱ्यावर सोडता येणार नव्हते.
अनेक यहुदी शास्त्रज्ञ, व्यापारी उद्योजक कलावंत अमेरिकेत होते आणि त्यांची लॉबी चांगलीच प्रभावशाली होती तिचा दबाव हि होताच. त्यामुळे घाई घाई ने त्यांनी इस्रायलला मान्यता देऊन टाकली. अमेरिकेने मान्यता दिल्यावर अमेरिकेच्या गोटातले इतर देशही मान्यता देणार हे उघड होते. पण त्याने काय होणार! अरबांनी आक्रमण केलेच.
पश्चिमेकडून इजिप्त तर पूर्वेकडून सौदी अरेबिया, जोर्डन, इराक, लेबनान, सिरीया ह्यांनी संयुक्तपणे आक्रमण केलं. अरबांनी केलेल्या ह्या आक्रमणात ३० हजार सैनिक, १५० च्यावर तोफा, १८० रणगाडे, तर साधारण ५०-६० लढाऊ विमानं सामील झाली होती आणि इस्रायल कडे होत्या ५ तोफा , रायफल्स आणि काही मशीन गन्स. सैनिक होते २६००० च्या आसपास.
ह्या संघर्षात इस्रायाचा निभाव लागण कठीण होत आणि “आमच्या कडे अस्त्र शस्त्र कमी असली तरी देशभक्ती आहे आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करायची आमची तयारी आहे.” वगैरे असली वाक्य नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्यात शोभतात, प्रत्यक्ष व्यवहारात त्यांचा तितका उपयोग नसतो.
अरबी सैनिक कमी शूर किंवा कमी देशभक्त होते असे म्हणणे वेडे पणाचे होईल नाही का?! पण इस्रायल कडे एक फार महत्वाची गोष्ट होती जी अरब राष्ट्राकडे नव्हती…आजही तितकी कार्यक्षम नाही ती म्हणजे प्रभावी गुप्तचर यंत्रणा.
संयुक्त राष्ट्र संघाने केलेली फाळणी, ह्यातला निळ्या रंगाचा भाग इस्रायल असणार होता.
डेव्हिड बेन गुरियन आणि इस्रायलचा राष्ट्र ध्वज
शिन बेत
इस्रायलच्या स्थापनेच्या हि आधी पासूनच्या काळातली शिन बेत हि गुप्तचर यंत्रणा होती. ब्रिटीशांशी गनिमी युद्ध खेळताना हगानाला महत्वाची माहिती पुरवणे, इंग्रज सैनिकांची दिशाभूल करणे, चोरून माणसे, लष्करी साहित्य रसद इकडून तिकडे पोहोचवणे, अशा महत्वाच्या कामासाठी हगानामाधुनच काही अनुभवी मनसे वेगळी करून शिन बेत स्थापिली होती.
शिन बेत ने ह्या पहिल्याच युद्धात फार मोलाची कामगिरी पार पडली. सैन्यात घातपाती कारवाया पार पाडणे, संदेश वाहन बंद पाडणे किंवा चुकीचे संदेश प्रसारित करून दिशाभूल करणे, अशा कारवाया करून त्यांनी अरबी हल्ला लांबवला त्याचा प्रभाव कमी केला शिवाय त्यांच्या महत्वाच्या मोहिमांची हालचालींची खबरबात इस्रायली सैन्याला दिली.
त्यांच्या २ मोठ्या कामगिऱ्या म्हणजे लीनो नावाचे जहाज जे इटलीहून ८००० रायफली घेऊन जोर्डनला निघाले होते ते जहाज भर समुद्रात बुडवले. पण त्याआधी त्यावरच्या रायफली काढून घेतल्या आणि इटलीनेच इजिप्तला ४ लढाऊ विमाने विकली होती ती त्यांच्या हाती पडण्याआधीच नष्ट केली.
ह्यामुळे अरबी सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला. तयारी करायला, मदत मिळवायला हवा असलेला महत्वाचा वेळ इस्रायला मिळाला. त्यांनी धनिक अमेरिकन यहुद्यांकडून पैसा गोळा केला. ह्या पैशाच्या आधारावर अधिक शस्त्र सरंजाम विकत घेतला.
आता इस्रायलची बचाव सोडून आक्रमक व्हायची पाळी होती. त्यांनी जोरदार हल्ला चढवत संयुक्त अरबी सैन्याला पिटाळून तर लावलच, पण पुढे जाऊन त्यांच्या प्रदेशावरही हल्ला केला. त्यांच्या ह्या झंझावातापुढे अरब राष्ट्र हबकून गेली. त्यांच्या आक्रमणाचा कणाच मोडला.
१६ मे १९४८ ला सुरु झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ ला संपलं तेव्हा पूर्वी पॅलेस्टाइन च्या फाळणीत ५५% भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८०% भूमीचं मालक होतं. आज ७० वर्षे होत आली तरी हा भूभाग इस्रायालींनी कधीही सोडला नाही. ते तो सोडणारही नाहीत.
हिटलर आणि त्याच्या नाझी समर्थकांनी जवळपास ६० लाख यहुदी छळ छावण्यात मारले. इस्रायल जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्याची लोकसंख्या होती ८ लाख जेमतेम. सैन्य संख्या होती ३० हजार. पण त्यांनी किडा मुंगी सारखं छळछावणीत असो वा रणांगण प्रतिकार न करता मरण्याऐवजी शत्रूशी प्रतिकार करायचे ठरवले.
किडा मुंगी सारख किंवा शेळ्या मेंढ्यासारख यहुद्यांना मारलं आणि ह्या यहुद्यांनी फारसा प्रतिकार केला नाही. गुपचूप मृत्यू स्वीकारला ह्याचे वैषम्य, लाज त्यांना वाटत असे.
(आपण देखिल ह्याचे काही जुने विडीयो यु ट्यूब वर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुल, अगदी तान्ही बाळ ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गॅस चेंबर मध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वाड समोर उभे केले जात असलेले दिसते, आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्या पैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही!
मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही? लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.
पण हे यहुदी! हि तर माणसं होती! मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली? ते पण आपल्या म्हाताऱ्या आई वडील बायको ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले.)
पुन्हा कधी हि अशी वेळ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या यहुद्यावर येणार नाही. आम्ही ती येऊ देणार नाही. आम्ही जगाच्या चांगुलपणाच्या आणि न्यायीपणाच्या भरवशावर राहणार नाही
असे गुरियन यांनी एके ठिकाणी म्हटले होते. आजपर्यंत तरी त्यांनी आणि इस्रायल ने आपले म्हणणे खरे करून दाखवले आहे.
मी काही वर्षापूर्वी म्हणजे नक्की सांगायचे तर २००५ सालच्या नोव्हेंबर मध्ये दिल्लीला जवाहरलाल युनिवर्सिटीत गेलो होतो. तिथे मला इस्रायलची निंदा, नुसती निंदा नाही तर गलिच्छ शब्दात नालस्ती करणारे आणि फिलीस्तिनी संघर्ष, गाझा, P.L.O.बद्दल गळे काढणारे पोस्टर्स भिंती भिंतीवर लागलेले दिसले.
निमित्त होते यासार अराफात ह्याच्या पहिल्या पुण्यातिथीचे.(११ नोव्हे.) ह्याचा युनिवर्सिटीशी काय संबंध असा प्रश्न मला तेव्हा पडला होता, पण तेव्हा मला इस्रायल आणि एकंदर ह्या एकूण संघर्षा बद्दल काहीच माहिती नव्हतं. पण तिथे J.N.U. मध्ये यासार अराफात चे खालील वाक्य भिंती भिंतीवर छापलं होतं
Peace for us means the destruction of Israel. We are preparing for an all-out war, a war which will last for generations.
इस्रायलचा, तिथल्या यहुद्यांचा सर्वनाश हेच ज्याचं जीवनध्येय आहे, त्या लोकांचे फोटो J.N.U.मध्ये काय करत होते? हा प्रश्न पडल्याने मी ह्या विषयाकडे वळलो. ह्या मध्ये अरबांची बाजू मांडणारी, प्रभावी पणे मांडणारी पुस्तकं फारशी नाहीत किंवा ती मला सापडली नाहीत. पण J.N.U. मध्ये फोटो-पोस्टर्स लावण्याऐवजी त्यांच्या समर्थकांनी ती लिहिली- छापली तर अधिक बरे होईल असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आणखी एक, ज्या अरब राष्ट्रांशी जन्मापासून उभा दावा इस्रायलचा आहे तिथे गेली सतत ७० वर्षे लोकशाही – खरीखुरी लोकशाही नांदते आहे. अरब राष्ट्रांचे काय! इस्रायल हे अरबी लांडग्यांच्या घोळक्यात सापडलेले एक दुर्बळ कोकरू नक्कीच नाही.
पण त्यांच्या करता हा संघर्ष जीवन मरणाचा, अस्तित्वाचा संघर्ष आहे हेही आपण विसरून चालणार नाही. ते तर विसरत नाहीच. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे पाहताना हा पैलू लक्षात घेणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे आपण इस्रायलची स्थापना कशी झाली त्याचा थोडक्यात आढावा घेतला. हा कदाचित थोडा लांबला असे वाटले असेल पण ह्यातल्या बऱ्याच संज्ञा आणि संकल्पना आणि महत्वाचे म्हणजे घटना अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून एवढे पाल्हाळ.
क्रमश:
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.