Site icon InMarathi

‘मँगो डिप्लोमसी’ – मुघलांपासून मोदींपर्यंत, राजकारणात ‘गोडवा’ आणण्यासाठी आंब्याचा असाही वापर केला गेलाय

narendra modi mamta im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आंबा हा फळांचा राजा आहे. पण या राज्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत किंवा अनेक महत्वाच्या प्रसंगात राजाइतकीच महत्वपुर्ण कामगिरी बजावलीय असं तुम्हाला सांगितलं तर?…

आंबा विकत घेण्याची, खाण्याची पद्धत वेगळी असली तरी आंबा हा या तीन महिन्यात घरोघरी जातो हे नक्की. इतकंच नाही तर, आंबा हा उच्चस्तरीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बैठकीचा सुद्धा भाग असतो हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. कित्येक राजकीय प्रश्न हे दोन व्यक्तींच्या बैठकीत आंब्याचा आस्वाद घेत सुटले आहे आपल्या इतिहासात नोंद आहे.

 

 

वर्ष भरात केवळ तीन ते चार महिने मिळणारं हे फळ म्हणजे प्रत्येक घरात येणारा जणू एक पाहुणा असतो. तो दरवर्षी आपल्या पेटीत बसून घरी येतो. घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मनसोक्त आनंद देतो पाऊस पडायला सुरुवात झाली की पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी निघून जातो.

सोशल मीडिया, ऑनलाईन पेमेंट पद्धती यामुळे आंब्याच्या विक्रीची पद्धत ही दिवसेंदिवस हायटेक होत असल्याचं यावर्षी प्रकर्षाने जाणवलं. “ऑनलाईन ऑर्डर करा, घरपोच पेटी मिळेल” हे यावर्षी आंबा खरेदी विक्रीसाठी सुद्धा घडलं आणि प्रत्येकाने आंब्याचा मनमुराद आनंद लुटला.

एरव्ही केवळ चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या फळाने राजकारणातही आपली मोहोर उमटवली आहे. कोणत्या होत्या या प्रसिद्ध ‘आंबा भेट’? ज्याने बरेच पेचप्रसंग सोडवले आहेत? जाणून घेऊयात.

१. औरंगजेब आणि पर्शियाचा शाह अब्बास:

आंबा हे औरंगजेब, जहांगीर आणि शहाजहान या मुघल साम्राज्यातील राजाचं आवडीचं फळ होतं. अरबी लोक हे आज जरी पेंडखजुर हे जास्त आवडीने खात असले तरी १७ व्या शतकात आंबा हेच त्यांचं आवडीचं फळ असल्याचं सांगितलं जातं.

औरंगजेबने तर ‘आंबा’ हे फळ आजच्या ‘रुपये’ या चलनाप्रमाणे वापरण्याची प्रथा सुरू केली होती. पर्शियाच्या शाह अब्बासने जेव्हा स्वतःला मुघलांचा नवा ‘सम्राट’ म्हणून घोषित करण्याचा चंग बांधला होता तेव्हा त्याला हा हट्ट सोडण्यासाठी औरंगजेबने त्याला काही आंबे देऊन हा हट्ट सोडण्यास भाग पाडलं होतं.

 

 

बल्कन देशाच्या राजाने औरंगजेबला शांतता प्रस्ताव पाठवतांना २०० उंटांवरून आंबे पाठवले होते अशी एका अरबी पुस्तकात नोंद आहे. १७ व्या शतकात मुघल राजांनी भारतात आंब्याच्या आकाराचं एक रत्नजडित भांडं सुद्धा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात बघायला मिळतं.

२. पंडित नेहरूंच्या राजकीय भेटी:

जन्मतः अलाहाबादचे असलेल्या जवाहरलाल नेहरू यांचं पेरू हे आवडतं फळ होतं. पण, कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटतांना ते आपल्यासोबत ‘राजकीय शिष्टाचार’ म्हणून नेहमी आंबा सोबत न्यायचे. १९५० च्या दशकात भारत भेटीवर आलेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्यांना तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी आपल्या भेटीत आंबा खाऊ घातल्याची माहिती, फोटो उपलब्ध आहेत.

 

 

पंडित नेहरू जेव्हा इतर देशांमध्ये जायचे तेव्हा सुद्धा ते आपल्यासोबत आंबा हेच भेटवस्तू म्हणून न्यायचे. ज्या वर्षी इतर देशात जाण्याचा योग नसायचा तेव्हा पंडित नेहरू हे त्या काळात उपलब्ध असलेल्या कुरियर सेवेचा वापर करून इतर देशात आंबे पाठवायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

३. अर्शद हुसेन आणि माओ-झे-डाँग:

ऑगस्ट १९६८ मध्ये पाकिस्तानच्या अर्शद हुसेन या परराष्ट्र मंत्र्याने चीनचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या माओ-झे-डाँग यांना पाकिस्तानी आंब्याची पेटी भेट केल्याची घटना बरीच गाजली होती.

माओ-झे-डाँगने या पेटीतील आंब्यांना स्पर्श देखील न करता आपल्या नोकरांना ते आंबे खायला दिल्याची बातमी सुद्धा प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केली होती. हे त्याने जनतेच्या प्रेमापोटी केलं होतं अशी सारवासारव नंतर करण्यात आली होती.

 

 

आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीची चर्चा ही ‘मँगो फिव्हर’ या नावाने झाली होती.

४. झिया उल हक आणि इंदिरा गांधी भेट:

१९८१ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झिया उल हक यांनी दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी ‘अन्वर रतौल’ या प्रकारातील आंब्याची पेटी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींना पाठवल्याची माहिती उपलब्ध आहे. पाकिस्तान मध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा आंबा भारतातील उत्तरप्रदेशात ‘रतौल’ नावाने पिकवला आणि ओळखला जातो.

रतौल हे उत्तरप्रदेशातील एका गावाचं नाव आहे. त्यावरूनच या आंब्याला हे नाव पडलं आणि तरीही पाकिस्तानी लोक या आंब्याला त्यांच्या देशातच पिकणारा आंबा म्हणतात हे यातून त्यांच्या विचारसरणीचा प्रत्यय येतो.

 

 

इंदिरा गांधींना पाठवलेल्या आंब्याचं त्यांनी पुढे काय केलं ? याची माहिती कुठेही जाहीर करण्यात आली नव्हती.

५. डॉक्टर मनमोहन सिंग आणि जॉर्ज बुश:

२००६ मध्ये अमिरेकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे भारतात आले होते. दिल्लीत होऊ घातलेल्या त्यांच्या आणि भारतीय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या भेटीत भारतीय आंबा खाण्याची इच्छा जॉर्ज बुश यांनी व्यक्त केली होती.

 

 

भारतीय आंब्यांवर त्यावेळी वीस वर्षांपासून अमेरिकेत निर्यात बंदी होती. असं सांगितलं जातं की, या बैठकीत भारतीय आंब्याची चव चाखल्यानंतर जॉर्ज बुश यांनी त्वरित आंब्यांवरील निर्यातबंदी उठवली होती. जॉर्ज बुश यांच्या या भारत भेटीनंतर भारताची शान असलेल्या हापूस आणि केशर आंब्याची पहिली पेटी वॉशिंग्टन येथे पोहोचली होती. अमेरिकेत सुरू झालेल्या आंबा निर्यातीमुळे भारतीय शेतकऱ्यांना तर फायदा झालाच, शिवाय भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त कृषी संशोधनाला चालना मिळाली.

६. नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी:

१९८० मध्ये सुरू केलेली पाकिस्तानी आंबे इतर देशात भेट पाठवण्याची नवाज शरीफने सुद्धा चालू ठेवली होती. २०१५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवाज शरीफने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० किलो आंब्याची भेट पाठवली होती.

इतकंच नाही तर, पाकिस्तानने भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाने सुद्धा १५ किलो आंबे पाठवले होते. पाकिस्तानने भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि  अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा १० किलो आंब्याची पेटी पाठवली होती.

 

 

भारताने आंबा या फळाचा आदर करत या भेटींचा नेहमीच स्वीकार केला. पण, त्यावर कधीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

७. शेख हसीना यांनी पाठवलेली भेट:

मार्च २०२१ मध्ये भारताने जगभरात कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त लसीचा शोध लावला आणि इतर देशांप्रमाणे बांग्लादेशला सुद्धा लस पाठवली होती. बांग्लादेशच्या पंतप्रधान  शेख हसीना यांनी याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी भारतात २६०० किलो आंब्यांची भेट पाठवली होती. ही भेट त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने पाठवली होती. त्याशिवाय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यानावे सुद्धा त्यांनी आंबे पाठवले होते.

 

 

बांग्लादेश मधून आलेल्या ‘हरभंगा’ या आंब्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांनी शेख हसीना यांना पत्र लिहून कौतुक केलं होतं. ममता बॅनर्जी यांनी हे बांग्लादेशी आंबे आपल्या सर्व सहकाऱ्यांना वाटल्याचं ट्विट करून सांगितलं होतं.

८. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी:

२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी सर्वप्रथम तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना बंगालचे प्रसिद्ध ‘हिमसागर’, ‘माल्डा’ आणि ‘लक्ष्मणभोग’ हे आंबे भेट म्हणून पाठवले होते. जून २०२१ मध्ये देखील त्यांनी ही प्रथा सुरू ठेवली जेव्हा भारतीय जनता पार्टीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

 

 

भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमानंतरही ममता बॅनर्जी यांना हरवण्यास असमर्थ ठरले होते. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना आंब्याची पेटी भेट पाठवून
निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान निर्माण झालेली कटूता कमी करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला होता.

आंबा हा आज सर्वत्र सहज उपलब्ध होत असला तरी रोजंदारीवर काम करणारा समाजातील एक वर्ग आजही हे श्रीमंती फळ विकत घेऊ शकत नाहीत ही वसुस्थिती आहे. भेट म्हणून आलेले अतिरिक्त आंबे हे अति श्रीमंत लोकांनी, राजकीय नेत्यांनी गोर गरिबांना वाटून त्यांनाही चांगलं जगण्याचं ट्रेलर दाखवावं अशी इच्छा आपण व्यक्त करू शकतो. असं खरंच झालं तर ही जगातील सर्वात सुंदर ‘आंबा भेट’ असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version