Site icon InMarathi

तुम्ही पुणेकर असो वा नसो, गुडलक कॅफे म्हणजे आजही कित्येकांचा जीव की प्राण!

cafe goodluck featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतात खवय्यांची काही कमी नाहीये आणि भारतात जेवढे खवय्ये किंवा खाद्यरसिक आहेत त्यातील बहुतांश लोकं पुण्यात आहेत असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.

पुणेकरांनी ज्याप्रकारे वैशाली-रुपालीला डोक्यावर मिरवून आपल्या रोजच्या खाद्यशैलीचा भाग बनवले अगदी त्याचप्रमाणे एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीला आपलंसं केलं. ती खाद्यसंस्कृती म्हणजे ‘इराणी कॅफे पद्धती’.

गेली अनेक वर्षे सर्व नव्याने सुरू होणाऱ्या कॅफेजच्या तोंडावर टिच्चून आजही दिमाखात उभे असलेले इतिहासाची साक्ष देणारे इराणी पद्धतीचे कॅफे म्हणजे ‘गुडलक कॅफे’.

 

 

जसं इडली-डोसे खायचे असेल तर आपण एक मस्त उडपी हॉटेल शोधतो तसं पुणेकर त्याची सकाळचं प्रसन्न व्हावी म्हणून गुडलकला भेट देतो.

आता हे गुडलक नक्की प्रकरण काय? ते कधी सुरू झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात.. चला तर मग.

१९३५ ते आता २०२२ गुडलक इज गुडलक :

ते साल होतं १९३२ आणि पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील प्राईम लोकेशनला नारायण सेठ नावाच्या व्यक्तीने एक छोटी जागा विकत घेतली कालांतराने हाजी हुसेन अली यक्षी यांची नजर त्या जागेवर पडली आणि त्यांनी ती जागा नारायण सेठकडून विकत घेतली.

१९३५ मध्ये हाजी हुसेन अली यांनी येथे एक फूड जॉइंट स्थापित केला ज्याने त्यावेळी अनेक पुणेकरांच्या चवींची यथेच्छ पूर्तता केली. त्यावेळी कॅफेमध्ये प्रवेश करताच आजूबाजूच्या परिसरात पसरलेल्या चवदार खाद्यपदार्थांचा सुगंध यायचा.

तेव्हापासूनच गरम चहासह बन मस्का हा सकाळच्या व्यायामानंतर आलेल्या निष्ठावंत विद्यार्थी आणि नागरिकांचा सर्वात आवडता पदार्थ झाला. अंड्याच्या विविध पदार्थांसाठीदेखील ही जागा त्यावेळी ओळखली जाऊ लागली. पुढे अल्पावधीतच या रेस्टॉरंटने पुणेकरांचे लक्ष वेधले.

 

 

१९८९ मध्ये हाजी हुसेन अली यांचे निधन झाल्यावर त्यांचे भाऊ कासिम यांनी रेस्टॉरंटचा ताबा घेतला. हाजी हुसेन अली यांचा मुलगा घासेम लहानपणापासून रेस्टॉरंटमध्ये काम करू लागला आणि या रेस्टॉरंट कॅफेमध्ये बदलू लागलं.

२००१ मध्ये घासेम यांनी कॅफे हाती घेतले आणि चेहरा मोहरा बदलायचे ठरवले. इतर हॉटेल्स सारखा एकसुरीपणा तोडणे ही काळाची गरज होती आणि म्हणून त्यांनी तवा आणि तंदुरीच्या विविध डिशेस आणल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२००४ पर्यंत तरुणाई या कॅफेला भेट देण्यासाठी टाळाटाळ करत होती पण या सुधारित मेनूमुळे परिस्थिती बदलली. तरुणाई सकाळ-संध्याकाळ ‘गुडलक’मध्ये गर्दी करू लागली. एक उत्तम रेस्टॉरंट आणि एक दर्जेदार कॅफे अशी सांगड घालून ‘गुडलक कॅफे’ चर्चेत येऊ लागले.

विविध साहित्यिकांच्या, कलाकारांच्या गप्पांचा फड रंगू लागला. ऑम्लेट आणि तळलेले अंडी, टोस्ट आणि बन ऑम्लेटवर मऊ आणि फ्लफी स्क्रॅम्बल्ड अंडी एवढंच नव्हे तर येथील पंचतारांकित दर्जेदार चॉकलेट मूस कॅरॅमल पुडिंग आणि कुल्फी यांसारख्या इतर मिष्टान्नांसह सर्व गोष्टी इथे मिळू लागल्या.

 

 

मसालेदार भेजा मसाला किंवा भेजा चटणीदेखील नॉनव्हेज पुणेकरांमध्ये गाजू लागली.

गुडलक आणि बनमस्का : मैत्रीचे एक समीकरणच :

बीएमसीसी, फर्ग्युसन, सिंबॉयसिस आणि काही अंतरावर असणारे गरवारे कॉलेज येथील यूथसाठी गुडलक हँग आऊट करण्याची जागा झालीये. एरव्ही सर्वच बाबतीत फास्ट आणि वेगवान झालेली तरुण पिढी गुडलकच्या बाहेर आपला नंबर येईपर्यंत रांगेत अर्धा-अर्धा तास आनंदाने थांबायला तयार असते.

गुडलक कॅफे आजही ओळखला जातो तो बन-मस्का साठी.आता वास्तविकता बन-मस्का तसा साधा पदार्थ म्हणजे एक बन पाव आणि त्याला लावलेले लोणी-बटर.

गुडलक कॅफेमध्ये या बन-मस्काला एक राजेशाही रूप मिळतं. तिथला सदा सर्वकाळ ताजा असणारा लुसलुशीत पाव आणि त्यावर मनसोक्त लावलेला तो मस्का हे अनेकांसाठी आजही ‘स्वर्गसुख’ आहे!

 

कलाकारांचे मोस्ट फेव्हरेट ‘गुडलक’ :

पुणे ही कलाकारांची, साहित्यिकांची आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांना भरभरून दाद देणाऱ्या रसिकांची नगरी. आजही गुडलक कॅफे हे अनेक कलाकारांसाठी मोस्ट फेव्हरेट ठिकाण म्हणून ओळखले जाते.

सर्व कलाकारांची गुडलकला पहिली पसंती असते. देवानंद, गुरुदत्त, रेहमान, नाना पाटेकर, डेविड धवन, राज कपूर सारखे मोठे कलाकारांची खास पसंती गुडलकला होती.

प्रभात रोडला असणारे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे देखील याचे विशेष कारण.अनेक मराठी चित्रपटाच्या फस्ट मिटींग्स इथेच होतात कारण कदाचित नवीन प्रोजेक्ट्स साठीसुद्धा ‘गुडलक’ची गरज भासत असावी.

‘गुडलक’ने पुण्याची स्थित्यंतरे पहिली आहे. १९६१ चा पानशेतच्या पुराच्या वेळेस गुडलक पाण्यात बुडाले होते. काही वर्षांपूर्वी आलेला स्वाईन फ्लू असेल किंवा कोरोना असेल या सर्वांचा सामना करून हे कॅफे पुणेकरांच्या सेवेत दमदार उभे आहे.

 

 

या रेस्टॉरंट सोबतच अजूनही काही इराणी कॅफे त्या वेळेस होते मात्र काळाच्या ओघात अनेक कॅफे बंद पडले. तरी देखील आजतागायत गूडलक कॅफे हा दिमाखदारपणे उभा आहे.

गुडलक रेस्टॉरंट, डेक्कन जिमखाना येथील या कॅफेचा ७० वर्षांपासून त्यावेळेसचा मेन्यू बन मस्का, ऑम्लेट, सुप्रसिद्ध चहा आणि मोजक्या नॉन व्हेज डिशेस आजही कायम आहे.

येथील इराणी चहाची रेसिपी ही इतर चहापेक्षा वेगळी असते कदाचित म्हणूनच हा कॅफे फक्त कॅफे नसून पुणेकरांसाठी एक ‘गुडलक’च आहे असं म्हणावं लागेल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version