Site icon InMarathi

इस्रायल – ज्यु लोकांच्या हक्काच्या भूमीचा इतिहास : भाग १

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – आदित्य कोरडे 

हा संक्षिप्त इतिहास आहे जन्मापासून सतत संघर्षरत असलेल्या एका चिमुकल्या देशाचा. १४०० वर्षांचा प्रसवकाळ आणि दुसऱ्या महायुद्धातल्या नरसंहाराच्या/ वंशविच्छेदाच्या कळा सोसून जन्माला आलेल्या आणि जन्मत:च आजूबाजूला त्याच्या नरडीला नख लावायला टपून बसलेल्या अरबी लांडग्यांच्या छाताडावर पाय देऊन गेली.

 

 

सतत ६९ वर्ष ताठ मानेने जगणाऱ्या मानव समूहाचा, त्यांच्या विजीगिषु वृत्तीचा, बलिदानाचा, शौर्याचा आणि त्यांच्या ‘मोसाद‘ नावाच्या शक्तिशाली आणि सुप्रसिद्ध/कुप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेचा.

विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूत पूर्व असे होते. मानवी संस्कृतीच्या-सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने तर जगाची घडीच बदलून गेली. (दुसरे महायुद्ध खरेतर पहिल्याचेच extension होते म्हणतात). ह्या दुसऱ्या महायुद्धामुळेच जगभर विखुरलेल्या यहुदी लोकांना १४००-१५०० वर्षांच्या संघर्षमय वणवणीनंतर आणि अनन्वित अत्याचार, उपेक्षा आणि अवहेलना सोसल्यानंतर स्वत:चा देश मिळाला त्याचीच हि कहाणी!

 

 

===

( संदर्भ: १.Mossad: The Greatest Missions of the Israeli Secret Service  Michael Bar-Zohar, Nissim Mishal

२. Gideon’s Spies: The Secret History of the Mossad (Updated) by Gordon Thomas

. Israel’s Secret Wars: A History of Israel’s Intelligence Services by Ian BlackBenny Morris

४. Mossad: The Untold Stories of Israel’s Most Effective Secret Service by Mike Livingston

आणि यु ट्यूब वरील अनेक documentaries)

इस्रायल : प्राचीन इतिहास, आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी

इस्रायल ह्या देशाच्या पुन:स्थापनेच्या आधीपासून, म्हणजे खूप आधीपासून ‘इस्रायल’ हा शब्द, हि संकल्पना आणि त्याचे पुरस्कर्ते/ पाईक म्हणजे ‘ज्यू’ (यहुदी) हे सर्व जगाला माहिती आहेत.

अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांना निग्रो म्हणणे जसे गैर आहे (ते तर हि शिवीच मानतात ) तसेच काहीसे ज्यू ह्या शब्दाचे आहे, म्हणून आपण इथून पुढे त्यांचा उल्लेख यहुदी असाच करणे श्रेयस्कर.

दुसऱ्या महायुद्धानंतर जरी ते सर्व जगभर चर्चेत आले असले आणि त्यांच्या प्रश्नांची जाणिव युरोप बाहेरच्या जगाला प्रकर्षाने झाली असली, तरी हे यहुदी लोक आणि त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती चांगलीच म्हणजे जवळपास ४०००-४५०० वर्षे जुनी आहे.

त्यांचा धर्म एकेश्वरवादी धर्मात सगळ्यात जुना. बायबल च्या जुन्या कराराप्रमाणे- बुक ऑफ जेनेसिस मधील उल्लेखाप्रमाणे यहुदी लोकांचा इतिहास त्यांचा मूळ पुरुष अब्राहम पासून सुरु होतो. तेव्हा अरबस्तानातल्या ‘उर’ नावाच्या वाळवंटी प्रदेशात अनेक भटक्या टोळ्या राहत होत्या त्यातल्याच एका टोळीचा मुखिया म्हणजे अब्राहम.

 

 

हा अब्राहम, नोवाच्या (जलप्रलयातून मानव आणि प्राणी वाचवणारा-त्यांचा मनु) १०व्या पिढीतला वंशज… ईश्वराने त्याला ह्या सर्व भटक्या टोळ्यांना एकत्र करून ‘केनान’ ह्या समृद्ध प्रांतात जाऊन राहण्याचा आदेश दिला.

त्याप्रमाणे अब्राहमने येतील तेवढे टोळीवाले लोक आणि स्वत:चा कुटुंब कबिला घेतला आणि केनान इथे राहायला आला. अब्राहमच्या दोन बायका- सारा आणि हागार, त्यापासून त्याला २ मुले झाली. इस्माईल आणि इसाक.

 

 

हा इसाक तोच, ज्याला मारायचा / बळी द्यायचा आदेश ईश्वराने त्याला दिला होता. अब्राहमची परीक्षा पाहण्यासाठी. ह्या इसाकचा मुलगा जेकब. जेकबला त्याच्या चार बायकांपासून (लेह, झील्पा, बिल्हाह आणि रेचेल) एकूण १२ मुलं झाली. त्यांची नावे अशी – रुबेन, सिमोन, लेवी, जूडाह, झेबुलीन, दिना, गाड, अशार, दान, नाफ्ताली, जोसेफ, बेन्जामिन.

ह्यांच्या बापाला म्हणजे जेकबला प्रत्यक्ष ईश्वराने इस्रायल हे नाव दिले होते. त्यामुळे तो सर्व यहुदीचा राष्ट्रपिता ठरतो. तर त्याचे हे १२ पुत्र आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेली प्रजा म्हणजेच आजचे यहुदी.

आपले जसे गोत्र असते तसे ह्या १२ जणांच्या नावाने यहुदी लोकांची १२ घराणी/ गोत्र किंवा टोळ्या आहेत. पण सगळे अब्राहमचे आणि जेकबचेच वंशज असल्याने सगळे यहुदी हे स्वत:ला इस्रायली मानतात. (एक लक्षात ठेवायचे कि हा खरोखर इतिहास नसून दंतकथा/ पुराणकथा असू शकतात. त्यात सत्याचा अंश फार थोडा किंवा अजिबात नसूही शकतो, पण सश्रद्ध यहुदी मात्र हाच खरा इतिहास आहे असे मानतो.)

 

 

तर हे यहुदी लोक केनान प्रांतात इ.सं. पूर्व २० व्या शतकात आले. ते इ.सं. पूर्व १५-१६ शतकापर्यंत तेथेच सुखेनैव पशुपालन, शेती आणि व्यापार करत राहिले. पण केनन प्रांतात फार मोठा दुष्काळ पडल्याने त्यांना नाईलाजाने नाईलच्या खोऱ्यातल्या गोशान ह्या प्रांती येऊन वस्ती करावी लागली.

त्याकाळी हा प्रांत इजिप्तच्या फारो राजांच्या अमलाखाली येत होता. त्याने ह्या यहुदी लोकांना राहायची, व्यापार उदीम करायची परवानगी दिली. आपल्यातल्या एकी आणि उद्यमी स्वभावाने यहुदी लवकरच संपन्न जमात बनले, पण त्यामुळेच मत्सरग्रस्त होऊन इजिप्तच्या राजे लोकांनी त्यांना गुलाम बनवले व त्यांना मोठी मोठी मंदिर आणि थडगी (पिरामिड्स) बनवायच्या कामाला गुलाम म्हणून जुंपलं.

 

 

असे हाल ज्यू लोकांनी थोडे थोडके नाही तर ४०० वर्ष काढले. आपल्या लोकांचे हे हाल न बघवून ईश्वराने त्यांच्यातून एक मोझेस नावाचा माणूस निवडला आणि त्याने, ईश्वराने दिलेल्या आदेशाप्रमाणे बंड करून सर्व यहुदीना इजिप्त मधून बाहेर काढलं आणि त्यांना घेऊन तो बराच मोठा आणि खडतर प्रवास करत लाल समुद्राकाठच्या सायनाई प्रांती आला

इथेच त्याला सायनाई च्या पर्वतावर ईश्वराचा पुढचा आदेश तसेच १० आज्ञा (१० commandments) मिळाल्या आणि मग तो सर्व यहुदीना घेऊन तो परत मजल दरमजल करत केनान प्रांती आला. हि सगळी गोष्ट फार रंजक आहे आणि ह्यावर खूप चांगले चित्रपट हि बनले आहेत (10 commandments, Prince of Egypt, Gods and kings वगैरे) जिज्ञासूंनी ते जरूर पाहावेत.

 

 

असो तर अशा प्रकारे यहुदी परत त्यांच्या अब्राहमने वसवलेल्या भूमीत पोहोचले. पण मध्ये अनेक शतकांचा काळ गेला होता आणि हा केंनान प्रांत आता परत अनेक रानटी बर्बर टोळ्यांच्या हाती गेला होता. सततच्या संघर्षाने थकल्या भागल्या मोझेसने आपल्या कार्याची धुरा जोशुआ ह्या आपल्या शिष्यवर सोपवली व स्वत: निजधामाला गेला.

अनेक वर्षे संघर्ष, प्रवास, संकटांचा समान करावा लागल्याने यहुदी लोक जरी भटकेपणाला वैतागले असले, तरी त्यांना एकीचे महत्व चांगलेच कळून चुकले होते. आता त्यांना अधिक प्रवास करायचा नव्हता. जोशुआच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वत:च्या पूण्यभूसाठी लढा देऊन केनानचा बराचसा भाग परत मिळवला. हाच तो आजचा इस्रायल मध्ये असलेला प्रांत.

 

अशा प्रकारे ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ देत यहुदी लोकांनी कायमच ह्या भूमीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यानंतरची जवळपास २०० वर्ष शांततेची सुख समृद्धीची, शेती, व्यापार, उद्योग, कला ह्यांच्या भरभराटीची होती.

पण त्याच बरोबर आलेल्या स्थैर्य आणि संपन्नतेमुळे यहुद्यामधली एकी कमी कमी होऊन त्यांच्यात गट तट पडू लागले. त्यांच्या समाजरचनेत एक प्रकारचा विस्कळीतपणा आला.

अशात एजीयन समुद्रातल्या क्रीट ह्या बेटावरून काही लोक केनन मध्ये आले. हे लोक लढाऊ वृत्तीचे होते आणि त्यांनी आताशा बऱ्याच विस्कळीत आणि भोंगळ झालेल्या यहुदी लोकाच्या भूमीवर कब्जा मिळवला. अर्थात यहुदी लोकांनी प्रतिकार केला, पण त्यांच्यात ती पूर्वीची धार एकी आता राहिली नसल्याने त्यांच्या केनान प्रांता मधील काही भूभाग गेला तो गेलाच.

 

हाच तो आजचा गाझाचा प्रांत आणि हे लोक म्हणजे फिलीस्तिनी लोक. म्हणूनच त्या प्रांताला नंतरच्या काळात पॅलेस्टाईन म्हणून ओळखले जाऊ लागाले.

 

 

शांततेचा, भरभराटीचा काळ संपून परत एकदा संघर्ष, युद्ध, वाताहत ज्यूंच्या नशिबी आले. त्यांचा आणि ह्या फिलीस्तिनी लोकांच्या संघर्षातच किंग साउल, डेव्हिड (डेव्हिड आणि गोलीअथ ह्या गोष्टी मधला) किंग सोलोमन असे अनेक महान राजे, नेते यहुदी लोकाना लाभले.

पण यहुदी लोकाचा काळ विपरीत होता हेच खरं, त्यांचा आणि फिलीस्तिनी लोकांचा संघर्ष अजून चालूच होता पण मध्येच असिरीयन राजवटीने त्यांच्या प्रांतावर हल्ला करून ज्यू आणि फिलीस्तिनी दोघांनाही गुलाम करून टाकले.

इ.स. पूर्व ७४० ते ७२२ मध्ये आपली केनान ही प्राणप्रिय पुण्यभूमी पारतंत्र्यात गेलेली यहुदी लोकांना पहावी लागली आणि ह्यावेळी ती त्यांना परत मिळवण्यासाठी थोडी थोडकी नाही, तर तब्बल २७०० वर्षे संघर्ष करावा लागणार होता.

 

 

असिरीयनानंतर, बाबिलोनियन, पर्शिअन, रोमन, बायाझंटाइन अशा राजवटींच्या ताब्यात केंनन प्रांत जात राहिला आणि यहुदी लोक त्या त्या सत्तेचे मंडलिक म्हणूण तिथे तग धरून होते. त्यांनी स्वत:चा धर्म, स्वत:चे वेगळेपण, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ह्य १००० वर्षात सोडले नाही हे विशेष, पण इ.स. ६००-७०० मध्ये काळ अधिक विपरीत होणार होता.

इ.स. ६५०-७०० मध्ये हा सगळा प्रांत अरबी मुस्लीम सत्तेच्या हाती गेला आणि त्यांनी तिथल्या प्रजेचे सक्तीने धर्मांतर सुरु केले. त्यातच हे सगळे फिलीस्तिनी मुसलमान झाले, आता मात्र यहुदी लोकांना तेथे राहणे शक्यच नव्हते, ते आपापले चंबू गबाळे घेऊन वाट फुटेल तिकडे पळाले.

त्यांनी युरोपातल्या इंग्लंड, फ्रांस जर्मनी पोलंड रशिया नॉर्वे अशा निरनिराळ्या देशात आश्रय घेतला. मुख्यत्वे करून ह्या देशात त्यांनी आश्रय घेतल्यामुळे तिथे ते जास्त प्रमाणात सापडतात, पण तसे पाहू जाता यहुदी लोक सर्व जगभर पसरले.

 

 

आज साधारण १५० देशांमध्ये विस्थापित यहुदी वस्ती करून असलेले सापडतात. ह्यात भारतही येतो. भारतामध्येही केरळच्या किनाऱ्यावर ते ह्याच सुमारास आले. भारतामध्ये आजही हे यहुदी अत्यंत थोड्यासंख्येने असले तरी आपले स्वतंत्र अतित्व टिकवून आहेत.

विशेष म्हणजे असमानता, जातीप्रथा, शोषण, धार्मिक द्वेष ह्यांनी बजबजलेल्या भारताने ह्या यहुदी लोकांना कधीही त्रास दिला नाही. त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक रितीरिवाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही.

अर्थात यहुदी लोकांनीही इथे राहताना कधी इथल्या लोकांशी प्रतारणा केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या चांगुलपणाचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न केला नाही. कोकणातही हे यहुदी लोक आले आणि वसले त्यांना आपण शनवार तेली म्हणून ओळखतो. भारतीय यहुदी स्वत:ला बेने इस्रायली म्हणतात.

 

 

बेने म्हणजे पुत्र – इस्रायलचे पुत्र. रुबी मायर्स (पडद्यावरचे नाव सुलोचना), नादिरा, डेव्हिड चेउलकर (बूट पोलिश, अभिमान सारख्या अनेक चित्रपटात काम केलेला चरित्र अभिनेता फक्त डेव्हिड म्हणून प्रसिद्ध), ले. ज. जेकब, डेव्हिड ससून, इस्टर विक्टोरिया (पहिली मिस इंडिया), रणजीत चोधरी (बातो बातो में मधला टीना मुनीम (nancy) चा वायोलिनवादक भाऊ), अनिश कपूर (प्रसिद्ध शिल्पकार)असे अनेक भारतीय यहुदी प्रसिद्ध आहेत. ही यादी खूप मोठी आहे. फक्त वानगी दाखल हि सर्वपरिचित काही नावं.- (संदर्भ ‘उत्तम-मध्यम’ ले. श्री. बा. जोशी)

असेच दुसरे धार्मिक निर्वासित ज्यांना भारताने उदार आश्रय दिला ते म्हणजे पारशी लोक. आज तर जगातल्या एकूण शिल्लक पारश्यांपैकी ९०% पारशी भारतात राहतात. भारताच्या उद्योग, कला, राजकारण, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. असो…

इथे थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचे म्हणजे – १९४८ साली जेव्हा इस्रायल ह्या देशाची निर्मिती झाली किंवा यहुदी लोकांनी ती केली. तेव्हा जगभरातून सर्व यहुदी लोकांना तिथे येऊन राहण्याचे आवाहन केले गेले आणि इतर जगाप्रमाणे भारतातूनही बहुसंख्येने यहुदी लोक तिकडे गेले, पण शेकडो वर्ष, पिढ्यान पिढ्या भारतात राहिलेले हे यहुदी लोकच फक्त असे होते जे भारताच्या, आपल्या मायभूमीच्या आठवणीने व्याकूळ होत असत.

 

 

इतर देशातून आलेल्या यहुदी लोकांना त्या त्या देशातून तुच्छतेचीच वागणूक मिळालेली असल्याने त्यांचे तसे नव्हते. एवढेच नाहीतर भारतातून गेलेल्या ह्या यहुदी लोकांना सुरुवातीला भेदभावाला सामोरे जावे लागले त्यांना हीन लेखले गेले.

ते गोरे नसल्यामुळे, श्रेष्ठतर अशा युरोपातून (मार खाऊन, अपमानाचे जिणे सोडून का होईना) आलेले नसल्यामुळे त्यांना इतर युरोपीय यहुदी लोकांपेक्षा दुय्यम हीन लेखले गेले त्यामुळे ते अधिकच व्याकूळ होत.

अशी हीन वागणूक त्यांना भारतात कधीच मिळाली नव्हती आणि इस्रायल मध्ये तर त्यांच्या हक्काच्या भूमीत त्यांना आमंत्रण देऊन बोलावून असे अपमानास्पद वर्तन केले जात होते. अर्थात पुढे परिस्थिती निवळली.

१९६२-६४ दरम्यान भारतीय यहुद्यांनी इस्रायल मध्ये स्वत:च्या हक्कांसाठी आंदोलन हि केले होते. रूपेण रेमण्ड हे असेच एक भारतातून इस्रायल ला गेलेले यहुदी. ते म्हणतात कि

इतर यहुदी ज्या देशातून आलेले होते तेथे त्यांना फार अपमानास्पद वागणूक मिळालेली असल्याने त्यांना त्या त्या देशांचे स्मरणही करणे आवडत नसे, पण भारतीय यहुदी मात्र आपल्या भारताच्या आठवणीने व्याकूळ होत असतं, इस्रायल हि आमची पितृभूमी असेल आता कर्मभूमीही बनेल पण आमची मातृभूमी हि कायम भारतच असेल.

 

– ( संदर्भ “अल्पसंख्यांक वाद – मुजफ्फर हुसेन, अनुवाद- डॉ. रवी पागनीस )

 

आधुनिक जगात सभ्यतेचा आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्लंड जर्मनी फ्रांस आदी राष्ट्रांमध्ये यहुदी लोकांना कायम छळाला, द्वेषाला, अवहेलनेला सामोरे जावे लागले आहे.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी छळ केला म्हणजे फक्त हिटलर आणि नाझी-जर्मनच यहुदी लोकांचा द्वेष करायचे असे नाही, अगदी शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ वेनिस मधला शायलॉक हा टिपिकल यहुदी म्हणजे त्या काळातील समाजच्या धारणेप्रमाणे दुष्ट, क्रूर, कावेबाज, पाताळयंत्री असा दाखवला आहे. अर्थात ह्याला काही अंशी यहुदीही जबाबदार आहेत.

ते जिथे जातील तिथे आपले स्वतंत्र अस्तित्व, धार्मिक आणि सामजिक वेगळे पण जपत, तिथल्या स्थानिक रूढी, परंपरा, धर्म ह्यांच्याशी संपर्क ठेवत नसतं. सगळे यहुदी एकत्र, वेगळे, शहराजवळ, गावकुसाबाहेर वस्ती करून राहत- त्यालाच घेटो म्हणतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रथा परंपरा पाळणे सोपे जात असले, तरी ते समाजापासून मुख्य प्रवाहापासून फटकूनच असत. त्यातून मध्ययुगात युरोपात सगळी कडे ख्रिस्ती धर्माचा बोलबाला होता.

येशू ख्रिस्त हा जन्माने यहुदीच पण त्याने स्थापन केलेल्या ख्रिस्ती धर्माबद्दल आणि येशू बद्दल कधीही कोणतीही सहानुभूती किंवा आदरभाव यहुदी लोकांनी कधी दाखवला नाही. येशूला सुळावर एका यहुद्याच्या द्रोहामुळेच जावे लागले ह्याचा राग हि तत्कालीन ख्रिस्ती लोकांच्या मनात होताच. त्यामुळे बहुसंख्य यहुदी जे युरोपातून राहत होते ते कायम अवहेलना, निंदा, द्वेष, क्रौर्य ह्यांचे बळी ठरले आहेत.

खरेतर यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तिन्ही अब्राहामिक धर्म म्हणजे ईश्वराचे द्वैतत्व, त्याचे प्रेषित, देवदूत, सैतान,सर्व मानव आदम आणि इवची अपत्ये इ. संकल्पना मानणारे ह्यात यहुदी हा वयाने सगळ्यात वडील, पण संख्येने सगळ्यात लहान तर इस्लाम वयाने सगळ्यात तरुण, पण ह्या तीन भावंडात कधीही सख्य नांदले नाही. युरोपचा अख्खा इतिहास तर ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मातल्या झगड्याने रक्तरंजित झालेला आहे….असो तो वेगळा इतिहास आहे.

क्रमश:

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version