Site icon InMarathi

चमत्कारी बाबांच्या आशीर्वादाचा “हात” इंदिरा गांधींनी काँग्रेसचं चिन्ह म्हणून वापरला?

indira gandhi devrah baba feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या राजकीय पक्षांचं ‘पक्ष चिन्ह’ हे त्यांच्या विचारसरणीचं प्रतीक मानलं जातं. भाजपाचं ‘कमळ’ हे राजकीय चिन्ह त्यांच्या मनात तळागाळातील लोकांचं असलेलं महत्व सांगत असावं, तर सध्या लोकप्रिय होत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’चं ‘झाडू’ हे राजकीय चिन्ह त्यांच्यातील साधेपणा आणि नको त्या गोष्टींची सफाई करण्याची वृत्ती दर्शवत असावं.

कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्हाला मान्यता जरी निवडणूक आयोग देत असलं तरीही हे चिन्ह ठरवत असतांना हे पक्ष ‘झेंडा’ सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ‘मार्केटिंग एजन्सी’ची मदत घेत असावेत असा एक अंदाज आहे, पण प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसे ‘काँग्रेस’ पक्षाचं पक्षचिन्ह हे सर्वांना अपवाद आहे.

देशभरात सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई करणाऱ्या काँग्रेस पक्षाने ‘पंजा’हे आपलं पक्षचिन्ह हे इंदिरा गांधी यांना भेटलेल्या एका ‘बाबाजींच्या’ प्रेरणेनं ठेवलं आहे हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

कोण होते हे बाबा? ज्यांनी इंदिरा गांधी सारख्या मुत्सद्दी राजकारणी व्यक्तीचं मन परिवर्तन केलं होतं? जाणून घेऊया.

 

 

उत्तरप्रदेश मधील देवरिया जिल्ह्यात ‘देवराह बाबा’ रहायचे. या चमत्कारी साधूला हे नाव त्याच गावाने दिल्याचं सांगितलं जातं.

या बाबांना ‘सगळ्यातलं सगळंच कळायचं’ अशी गावकऱ्यांची, राजकारणातील विविध लोकांची, व्यवसाय करणाऱ्या लोकांची मान्यता होती. भारतीय आणि परदेशी नागरिक त्यांना आपल्या प्रश्नांवर तोडगा मिळवण्यासाठी भेटायचे.

स्वभावाने शांत असलेल्या या योग प्रशिक्षकाला त्यांच्या ध्यानधारणेच्या दिनचर्येमुळे लोकांनी त्यांना ‘सिद्ध संत’ अशी पदवी दिली होती. हे बाबा २०० वर्ष जगले होते असं त्यांचे अनुयायी मानतात.

‘प्लुविनी सिद्धी’ प्राप्त केलेले हे बाबा आयुष्यभर पायीच चालले. कोणत्याही वाहनात कधीच न बसलेले हे बाबा दरवर्षी ते प्रयाग पदयात्रेला जायचे.

 

 

बाबा पाण्यावरून सुद्धा चालायचे आणि ‘वृंदावन’ येथे गेल्यावर ते श्वसन न करता पाण्याखाली काही मिनिटं रहायचे असे तिथले गावकरी सांगतात.

‘देवराह’ बाबांनी कधीच आपण ‘चमत्कारी बाबा’ असल्याचा दावा केला नव्हता. ते केवळ सर्वांचं मंगल होवो अशी इच्छा व्यक्त करायचे आणि तसं घडायचं. ‘लोकांचं मन वाचू शकणारे बाबा’ अशी देखील त्यांची ख्याती झालेली होती.

इंदिरा गांधींची भेट:

१९८० च्या दशकात ‘देवराह बाबां’ची लोकप्रियता सतत वाढत होती. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात ‘आणीबाणी’ जाहीर केली होती. आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती आणि यामध्ये इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला होता.

‘राज नारायण’ या स्वातंत्र्यसेनानी व्यक्तीने इंदिरा गांधींना त्यांचा ‘गड’ मानल्या जाणाऱ्या ‘रायबरेली’ मध्ये हरवलं होतं. इंदिरा गांधींना हा पराभव अर्थातच पचनी पडला नव्हता.

 

 

 

आपला पक्ष, आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत होत्या, पण मानसिकरित्या त्या खचून गेल्या होत्या. या नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ‘देवराह’ बाबांची भेट घ्यावी असा सल्ला काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना दिला.

इंदिरा गांधी स्वतः ‘देवराह बाबां’च्या दर्शनासाठी गेल्या आणि त्यांनी बाबांना आपल्या मनातील व्यथा सांगितली. १९८० या वर्षी परत लोकसभा निवडणुका होणार होत्या.

इंदिरा गांधी जेव्हा बाबांना भेटल्या तेव्हा कॉंग्रेस पक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत होता. इंदिरा गांधी जेव्हा बाबांना भेटून देवरिया गावातून बाहेर पडत होत्या, तेव्हा बाबांनी हात उंच करून त्यांना आशीर्वाद दिला होता.

दिल्लीत परतल्यावर देखील इंदिरा गांधी यांच्या डोळ्यासमोरून हा क्षण जात नव्हता. काँग्रेस पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी मोठा बदल करणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. पक्ष चिन्ह बदलण्यापासून ही सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलं.

काँग्रेस पक्षाच्या नवीन पक्ष चिन्हाची चर्चा सुरू असतांना इंदिरा गांधी यांनी घोषणा केली की, “बाबाजींचा आशीर्वादरुपी ‘पंजा’ हे आपलं पुढचं पक्षचिन्ह असेल.”

 

 

काँग्रेस पक्षाचं पक्षचिन्ह हे तोपर्यंत ‘गाय आणि वासरू’ हे होतं. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्षचिन्ह रातोरात बदलण्यात आलं. नव्याने पक्षाचं ‘कॅम्पेनिंग’ करण्यात आलं.

आजच्या सारखा त्या काळात सोशल मीडिया नसल्याने या बदलावर जास्त चर्चा झाली नाही आणि हा बदल भारतीय जनतेने त्याच्या कारणाची चिकित्सा न करता मान्य केला.

१९८० या वर्षी झालेली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा बहुमताने विजय झाला. इंदिरा गांधी या पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या आणि ‘पंजा’ हेच इथून पुढे काँग्रेस पक्षाचं अधिकृत चिन्ह असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

असं सांगितलं जातं की, १९११ मध्ये इंग्लंडचा राजा ‘जॉर्ज पंचम’ याने सुद्धा ‘देवारहा बाबां’ची भेट घेतली होती. बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुलायम सिंह यादव, जगन्नाथ मिश्र, मदनमोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसादही त्यांना वारंवार भेट द्यायचे.

 

 

उत्तरप्रदेशातील मईल गावात असलेला चार खांबांवर उभा असलेलं त्यांचं आसन हाच त्यांचा महाल होता. ते उंचावर बसायचे, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे आणि लोक खाली बसून त्यांचा आशीर्वाद घ्यायचे.

वर्षातील ८ महिने ‘देवराह’ मईल गावात रहायचे. १९ जून १९९० रोजी देवराह बाबांनी देहत्याग केला असं सांगितलं जातं. अर्थात, त्यांच्या आशीर्वादामुळेच पक्षाने ‘पंजा’ हे चिन्ह वापरलं ही गोष्ट केवळ ऐकीव माहितीवर आहे. याबाबतीत अजून अनेक कथा सांगितल्या जातात, पण इंदिरा गांधी देवराह बाबांच्या भक्त होत्या हे नक्की….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version