' विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याचा साखरपुडा चक्क जेलमध्ये झाला होता – InMarathi

विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याचा साखरपुडा चक्क जेलमध्ये झाला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गोष्ट आहे आणीबाणी नंतरची, महाराष्ट्राचे अवघे राजकीय विश्व ढवळून निघाले होते. कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर.अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.

वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रिपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र कोणालाही ठाऊक नसताना दिल्ली हायकमांडच्या आदेशावरुन फारसं चर्चेत नसणारं नाव थेट मुख्यमंत्री पदासाठी निवडलं गेलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव जास्त परिचितही नव्हत पण ‘हायकमांड’ इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं.

 

babasaheb bhosle IM

 

२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ या अल्पकालीन मुख्यमंत्रिपदाची धुरा बाबासाहेब भोसले यांनी सांभाळली होती. आता प्रसिद्धीपासून दूर राहणार्‍या या अवलिया व्यक्तिमत्वाची ओळख सर्वांना व्हायलाच हवी.

हे भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता. आणि ते मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले. काय होता तो किस्सा?

झाले असे की सातारच्या तारळे गावचे अनंतराव भोसले हे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. बाबासाहेब त्यांचे सुपुत्र. अगदी तरुण वयातच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात त्यांनी काम केले.

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात अनेक नेत्यांची धरपकड ब्रिटीश सरकारने केली, त्यात बाबासाहेब भोसले यांनाही दीड वर्षाचा तुरुंगवास झाला व त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. तिथेच त्यांचा परिचय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्यासोबत झाला.

दरम्यान तुळशीदास आपली कन्या कलावती हिच्यासाठी वरसंशोधन करत होते.त्यांना बाबासाहेब आपल्या लेकीसाठी योग्य वाटले.

आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरुंगाधिकाऱ्यांच्या निगराणीत येरवडा येथे पार पडला.

 

yerwada jail IM

 

भारत स्वतंत्र झाल्यावर ते १९४८ मध्ये लंडनला उच्चशिक्षणासाठी गेले. १९५१ मध्ये तिथून परतल्यावर त्यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली. पुढे ते उच्च न्यायालयात वकिली करू लागले. स्वातंत्र्य चळवळीपासूनच ते काँग्रेसशी जोडले गेलेले होते. वकिली करत असताना काही काळ ते महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव देखील झाले.

१९८० मध्ये ते कुर्ला उपनगराच्या नेहरूनगर मतदारसंघातून आमदार बनले आणि बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागली. अंतुले यांना खुर्ची सोडावी लागल्यानंतर महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री हा मराठा असावा अशी खुद्द इंदिरा गांधी यांची इच्छा होती.

साताऱ्याचे अभयसिंह राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव घोषित झाल असावं, अशी चर्चा त्या काळात व्हायची. राजकारणात ‘लाईटवेट’ समजले जाणारे बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्री होणं हा एक चमत्कारच मानला जात होता.

बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य चळवळीतून आलेले होते, त्यांची प्रतिमा स्वच्छ होती, त्यांनी कधीही मुख्यमंत्री पदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं ऐकिवात नव्हतं, ते उच्चविद्याविभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या देखील त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या, बाबासाहेब भोसलेंच्या नावाला कुणीच विरोध केला नाही.

उलट बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या नियंत्रणात राहतील असं बहुतेक नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं.

 

babasaheb bhosle 2 IM

 

भोसलेंच्या दिलखुलास स्वभावामुळे अनेकांचे गैरसमज व्हायचे आणि काही लोक त्यांना गांभीर्याने घेत नसत. काही लोकांना वाटायचं की भोसले हे विनोदवीर आहेत. ते गंमत करतात, त्यांना काय कळतं, अशी काही लोकांची धारणा होती? पण त्यांना या सर्व गोष्टी कळायच्या.

त्यांच्याविषयी आणखी एक किस्सा फेमस होता, मुख्यमंत्री झाल्यावर एक ८० वर्षांचे गृहस्थ त्यांच्याकडे आले. त्या गृहस्थांचा सहकार क्षेत्रात दबदबा होता. त्यांना विधान परिषदेची आमदारकी पाहिजे होती म्हणून ते भोसलेंना भेटायला गेले.

भोसले दिसल्याबरोबर त्यांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा भोसले त्यांना म्हणाले, “आज आमदारकी पाहिजे म्हणून आज तुम्ही माझे पाय धरत आहात. उद्या माझे दिवस फिरल्यावर तुम्ही माझे पाय ओढायला कमी करणार नाहीत. तेव्हा ही नाटकं करू नका आणि भविष्यात तसे तमाशे करू नका’.”

भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना नियंत्रित करणं आपल्या डाव्या हाताचा मळ असेल, असं अंतुलेंना वाटायचं. पण ते इतकेही साधे नव्हते. ‘वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा’ असं त्यांचं धोरण होतं. त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जितकी जाणीव होती, त्याहून अधिक स्वतःच्या क्षमतांची जाणीव त्यांना होती,” असे राजकीय जाणकार सांगतात.

अचानकपणे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल होतं, असं नाही. अंतर्गत बंडाळीशी त्यांना संघर्ष करावा लागला होता. एकदा त्यांच्याकडे शुगर लॉबीतल्या आमदारांचं शिष्टमंडळ आलं होतं.

साखर उद्योगाशी निगडित असलेले हे १०-१५ आमदार त्यांना म्हणाले आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्या आमदारांच्या बोलण्यातला अर्थ त्यांना लगेच कळला आणि ते तात्काळ म्हणाले की माझ्या बाजूने विधानसभेतील २८८ पैकी २८७ आमदार उभे राहिले आणि इंदिरा गांधी नसल्या तर या पाठिंब्याला काही अर्थ नाही.

 

Indira Gandhi

 

जर माझ्याविरोधात २८७ आमदार झाले आणि इंदिरा गांधी माझ्या पाठीशी असल्या तरी या लोकांच्या बंडाला काही अर्थ उरत नाही.

भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याविरोधात बंड झालं होतं. पण ‘हायकमांड’चा आदेश आल्यावर हे बंड थंड झालं. त्यावर भोसलेंनी प्रतिक्रिया दिली ‘बंडोबा थंडोबा झाले.’ तेव्हापासून आतापर्यंत कोणताही बंडखोर नेता जर शांत झाला तर हाच वाक्प्रचार वापरला जातो,

भोसलेंना फक्त त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागला असं नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.

एका बाजूला शरद पवारांसारखा विरोधी पक्षनेता, दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंड, तिसऱ्या बाजूला दत्ता सामंत यांचा गिरणी कामगार संप. या सर्व आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला.

 

datta samant IM

 

बाबासाहेब भोसलेंनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची यादी मोठी नसली तरी काही निर्णय जनसामान्याच्या जिव्हाळ्याचे होते. दहावी पर्यंतच्या मुलींनी मोफत शिक्षण असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना, मासेमारांसाठी विमा योजना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ, दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केलेले प्रयत्न, अमरावती विद्यापीठाला परवानगी त्यांच्याच काळात मिळाली.

चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना, हे निर्णय त्यांच्याच काळात झाले. पंढरपूरच्या विठोबाला बडव्यांच्या ‘कचाट्यातून’ सोडवणारा पंढरपूर देवस्थान कायदा हा देखील त्यांच्याच कारकीर्दीतला होता.

भोसले यांच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहरे होते. विलासराव देशमुख, रजनी सातव आणि श्रीकांत जिचकार हे त्यांच्याच मंत्रिमंडळात होते. विलासराव पुढे मुख्यमंत्री झाले, श्रीकांत जिचकार यांनी त्यांच्या विद्वत्तेची भुरळ अवघ्या राज्याला घातली होती. रजनी सातव या महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या.

नेत्यांच्या भाष्यापेक्षा त्यांचे निर्णय आणि कृती लक्षात राहायला हवी. भोसले यांचे विनोद, कोट्या अनेकांच्या लक्षात आहेत. पण त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामं किती जणांच्या लक्षात आहेत? त्यांचं भाषण उत्तम होतं, पण पक्षातल्या आमदारांवर ते नियंत्रण ठेवण्यात कमी पडले.

सगळ्या घटकांना सामावून घेणं प्रसंगी त्यांच्यावर मात करणं हे त्यांना जमलं नाही. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले.

 

vasantdada patil IM

 

मुख्यमंत्रिपद गेल्यावरही त्यांनी केलेलं वक्तव्य अजूनही बहुतेकांच्या लक्षात आहे. “ते म्हणाले, माझं मुख्यमंत्रिपद काढून घेण्यात आलं. पण आता माझ्या नावामागे माजी मुख्यमंत्री हे पद कायमचं लागलं आहे. ते मात्र कुणीही काढून घेऊ शकत नाही,”

भोसले यांनी पुढे काँग्रेसला रामराम ठोकला आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश घेतला.

कधी काळी ‘काँग्रेसचा इतिहास’ हे पुस्तक लिहिणाऱ्या भोसलेंचं नाव शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसच्या इतिहासातून पुसलं गेलं आणि जनसामान्यांच्या आठवणीतही धूसर होत गेल…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?