Site icon InMarathi

Mumbai Indians ची पुढील वाटचाल कशी असेल? कॅप्टन रोहित शर्माची भूमिका स्पष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत एकूणच अनेक नव्या गोष्टी बघायला मिळतील अशी ठरली. अगदी खेळाडूंच्या लिलावापासून मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आणि एकामागून एक अनपेक्षित गोष्टी घडत गेल्या असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

या अनपेक्षित गोष्टींमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे सुरुवातीच्याच सलग ८ सामन्यात झालेले पराभव सुद्धा होते. एकूणच लिलावात सुद्धा मुंबई इंडियन्सने योग्य स्ट्रॅटेजीचा वापर केला नाही, संघबांधणी नीट झाली नाही, या गोष्टींच्याही चर्चा रंगल्या.

 

 

ईशान किशनला १५ कोटी रुपयांची किंमत देऊन विकत घेणं असो, किंवा पोलार्डला रिटेन करणं. बोल्ट आणि हार्दिक पंड्यासारख्या भरवशाच्या खेळाडूंना सोडून देणं असो, किंवा अर्जुनला सलग तिसऱ्या वर्षी संघात घेऊन एकही सामना न खेळवणं असो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या मुद्द्यांवर चाहत्यांपासून तज्ज्ञांपर्यंत आणि माजी खेळाडूंपासून सध्याच्या खेळाडूंपर्यंत अनेकांनी मतप्रदर्शन केलं. टीम डेविडसारख्या खेळाडूला पुरेसे सामने खेळायला मिळाले नाहीत हादेखील मुद्दा चर्चिला गेला. आयपीएलचा शेवट करताना मात्र मुंबईच्या संघाला काहीसा टेम्पो मिळाल्याचं दिसलं आणि चाहते मंडळी सुखावली.

मात्र ‘लवकरात लवकर विसरून जावा’ असा हा मौसम संपवल्यानंतर यापुढे मुंबई इंडियन्सचं भविष्य नेमकं कसं असेल? याविषयी चर्चांना उधाण आलं. यावर स्वतः कर्णधार रोहित शर्माने व्यक्त होण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

 

 

नेमका काय म्हणतोय मुंबई इंडियन्सचा हा कर्णधार? चला जाणून घेऊया.

या तिघांचं काय होणार…

मुंबई इंडियन्सच्या संघाने एकूणच खराब कामगिरी केली असली, तरी काही खेळाडूंनी फारच निराशा केली असल्याचं पाहायला मिळालं. या यादीत सगळ्यात आधी पोलार्डचं नाव घ्यायला हवं.

एक सिनियर खेळाडू आणि मॅच विनर म्हणून मेगा ऑक्शनच्या आधी त्याला संघात रिटेन तर केलं गेलं, मात्र त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करण्यात तो अपयशी राहिला. गेली अनेक वर्षं मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी करणारा पोलार्ड यंदा फारच अपयशी ठरला.

जेमतेम दीडशेच्या आसपास धावा करणाऱ्या पोलार्डला एकही सामना जिंकवून देणं शक्य झालं नाही. अखेरच्या काही सामन्यांमध्ये त्याला संघातून सुद्धा वगळण्यात आलं.

टायमल मिल्स हा डावखुरा गोलंदाज सुद्धा या यादीत समाविष्ट होईल. बोल्टसारखा तिखट गोलंदाज सोडून मुंबई इंडियन्सने मिल्सला गळाला लावलं, मात्र तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पाच सामन्यात अवघ्या ६ विकेट्स घेणाऱ्या मिल्सवर फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवला होता.

 

 

११ च्या इकॉनॉमी रेटने त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यात आली. पुढे जायबंदी होऊन त्याला आयपीएलची स्पर्धा अर्ध्यातच सोडावी लागली. त्यावेळी त्याला मुद्दाम बाहेर करण्यात आली असल्याच्या चर्चा सुद्धा सोशल मीडिया आणि कट्ट्यांवर रंगल्या होत्या. यात तथ्य नसलं, तरी मिल्सची वाईट कामगिरी अधोरेखित करण्यासाठी मात्र हे पुरेसं होतं.

रमणदीप सिंग हा याच यादीतील आणखी एक महत्त्वाचा खेळाडू. भारताचा तरुण अष्टपैलू रमणदीप याला खास छाप पाडता आली नाही. फलंदाजीची चांगली संधी मिळूनही मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला.

यंदा आयपीएलमध्ये सहभागी न झालेला जोफ्रा आर्चर पुढच्या वर्षी संघाचा भाग असेल. याशिवाय सूर्यकुमार यादव परतलेला असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीच्या लिलावाआधी या तिघांनाही संघातून डच्चू दिलेला असल्यास अनेकांना आश्चर्य वाटणार नाही.

भविष्यातील हिरे…

पोलार्ड पुढच्या वर्षी मुंबई संघाचा भाग असेल की नाही, याविषयी आत्ताच ठोस काही सांगता येत नसलं, तरी पस्तिशी गाठलेला पोलार्ड फार काळ खेळणार नाही हे मात्र नक्की! अशा स्थितीत येत्या काळात त्याचा बदली खेळाडू शोधणं मुंबईसाठी गरजेचं आहे.

टीम डेविड आणि डिवॉल्ड ब्रेव्हिस या ताज्या दमाच्या खेळाडूंकडे याच नजरेतून पाहिलं जात आहे. युवा विश्वचषकात खास छाप पडणारा आणि एबी डिव्हिलयर्स सारखी दमदार फलंदाजी करत असल्याने त्याच्याच नावाने, म्हणजेच ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डिवॉल्ड एक चांगला खेळाडू आहे.

 

 

ऐन विशीत असलेला हा खेळाडू पुढची १० वर्षं तरी मुंबईकडून खेळताना दिसू शकतो. म्हणजेच मुंबई इंडियन्सचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रोहित आणि पोलार्डसारखी बंदी मंडळी अपयशी ठरत असताना, टिळक वर्मा, ब्रेव्हिस आणि अखेरच्या काही सामन्यांमध्ये संधी मिळाल्यानंतर टीम डेविड चांगली कामगिरी करताना दिसले.

हे मुंबई इंडियन्सचे भविष्यातील हिरे ठरतील यात काहीच शंका नाही. गोलंदाजी काहीशी कमजोर बाब वाटत असताना, उत्तम युवा फलंदाज मिळणं हा मुंबईचा प्लस पॉईंट ठरला आहे.

रोहित म्हणतो की…

मुंबई इंडियन्ससाठी हा सिझन अगदीच वाईट ठरला. पहिल्या ८ सामन्यात पराभव आणि त्यामुळे झालेली नाचक्की, चाहत्यांसह सगळ्यांनीच उडवलेली खिल्ली अशा बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागलं. मात्र शेवट फारच वाईट ठरला नाही. अखेरच्या काही सामन्यात संघाने चांगली कामगिरी केलेली दिसली.

 

 

स्पर्धेतून बाहेर पडल्याच्या स्थितीत अखेरच्या काही सामन्यांमध्ये काही नवे खेळाडू मैदानावर आलेले दिसले. अर्जुन तेंडुलकरला यंदाही संधी मिळाली नाही, मात्र मुंबईला काही नवे हिरे गवसले. “आम्हाला अखेरच्या काही सामन्यांमध्ये नव्या खेळाडूंना संधी द्यायची होती, जेणेकरून हा सिझन संपण्यापूर्वी पुढच्या वर्षासाठी खेळाडूंचा विचार सुरु करता येईल.”

भविष्याचा विचार करून काही निर्णय घेण्यात आले. काही गोलंदाजांना मुद्दाम कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायला लावली गेली. अखेरच्या सामन्यापूर्वी याविषयी बोलताना शेवट चांगला करण्याचा प्रयत्न करू असं रोहितने म्हटलं होतं. मुंबईच्या संघाने ते करून दाखवलं.

कप्तान रोहितच्या म्हणण्याप्रमाणे हा सिझन लवकर विसरून जावा असा ठरला. मात्र यावर्षी हाती लागलेल्या सकारात्मक बाबी हाताशी घेऊन मुंबईचा संघ पुढील वाटचाल करेल अशी त्यांच्ग्या चाहत्यांना अपेक्षा नक्कीच आहेत.

 

 

पुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आयपीएलमध्ये फार चमक दाखवू न शकलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा लवकरात लवकर फॉर्मात यावा आणि त्याने भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करून दाखवावी यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा…

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version