Site icon InMarathi

फाळणीचा जिवंत दाह : शीख भाऊ – मुस्लिम बहीण : डोळ्यांच्या कडा पाणावतील असा प्रसंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१९४७ साली मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र हवं म्हणून भारत-पाकिस्तानच्या फाळणीचा निर्णय घेतला गेला, पण वेगवेगळ्या स्तरांवर या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. फाळणीचा हा निर्णय न पटल्याचं दुःख आजही अनेकजण व्यक्त करतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गीतरामायणातील ‘दैवजात दुःखे भरता’ या गाण्यातली एक ओळ आहे, ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ’. फाळणीमुळे आपल्याच जवळच्या माणसांपासून दुरावलेले अनेकजण या ओळीचा अर्थ अक्षरश: जगले.

या घटनेमुळे अनेक प्रेमी युगुलं दुरावली. त्यांचं, त्यांच्या विरहाचं चित्रण करणारे सिनेमे आले. याच फाळणीमुळे आपल्याला प्रिय असलेल्या आपल्या भावंडांपासूनही अनेक जणांची अनिश्चित काळासाठी ताटातूट झाली.

 

 

त्यावेळी त्यांच्यावर ओढावलेलं दुःख वर्षानुवर्षे मनात ताजं राहूनही तसंच जगत राहणं म्हणजे काय याची कल्पना आपल्याला करता येऊ शकत नाही, पण सुदैवाने आणि अनपेक्षितपणे त्यातल्या काही जणांच्या नशिबी आपल्या भारत आणि पाकिस्तानातल्या प्रिय व्यक्तींच्या पुनर्भेटीचा योग येतोय.

फाळणीच्या वेळी एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या भारतात राहणाऱ्या एका शीख भावाची आणि पाकिस्तानात राहणाऱ्या त्याच्या मुस्लिम बहिणीची कैक वर्षांनी कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे पुनर्भेट झाली आहे. त्यांच्या या हृद्य भेटीच्या प्रसंगाचा व्हिडियो पाहून कुणाच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील.

 

 

२०१९ साली सुदैवाने कर्तारपूर कॉरिडॉर खुला केला गेला आणि भारतातून पाकिस्तानातील कर्तारपूरमधल्या गुरुद्वारा दरबार साहिब पर्यंत व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली गेली. फाळणीमुळे वेगळ्या झालेल्या अशा अनेक कुटुंबांना आपल्या प्रियजनांना भेटणं आता शक्य होणार आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला १९४७ साली फाळणीमुळे वेगळ्या झालेल्या दोन भावांच्या तब्बल ७४ वर्षांनंतर झालेल्या पुनर्भेटीची बातमी समोर आली होती. अशाच प्रकारची आणखी एकी बातमी इतक्यातच समोर आली आहे. तब्बल ७५ वर्षांनी शीख भाऊ आणि मुस्लिम बहिणीची पुनर्भेट झाली आहे.

या बंधू-भगिनींच्या भेटीमागची कहाणी :

या मुस्लिम बहिणीचं नाव मुमताज बीबी असून ती मुळात शीख कुटुंबात जन्माला आली होती. ‘डॉन न्यूजपेपर’, वन इंडियाच्या वृत्तानुसार एका हिंसक जमावाने तिच्या आईला मारलं तेव्हा तिच्या आईच्या प्रेतापाशी ही तान्ही मुमताज पडलेली होती.

 

blogs.tribune.com.pk

 

मुहम्मद इक्बाल आणि त्यांची पत्नी अल्लाह राखी यांनी या तान्ह्या मुमताजला वाचवलं आणि तिला दत्तक घेतलं. आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी तिचा सांभाळ केला आणि तिचं नाव मुमताज ठेवलं.

आपण तिला दत्तक घेतलंय हे तिला कधीच सांगायचं नाही असं त्या दोघांनी ठरवलं, मात्र दोन वर्षांपूर्वी इक्बाल यांची तब्येत अचानक खालावली तेव्हा मुमताजला सत्य सांगण्यापासून स्वतःला रोखणं त्यांना शक्य झालं नाही. ती त्यांची खरी मुलगी नाही आणि एका शीख कुटुंबाची सदस्य आहे असं इक्बाल यांनी तिला सांगितलं.

इक्बाल यांच्या मृत्यूनंतर मुमताज आणि त्यांचा मुलगा शाहबाझ यांनी सोशल मीडियावर मुमताज यांच्या मूळ कुटुंबाला शोधायला सुरुवात केली.

मुमताजच्या खऱ्या वडिलांचं नाव आणि मूळचं घर सोडावं लागल्यानंतर भारतातल्या पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील सिद्राना या गावात जिथे ते स्थायिक झाले होते त्याविषयी त्यांना माहिती होती.

सोशल मीडियाद्वारे ही दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या संपर्कात आली आणि त्यांनी भेटायचं ठरवलं. त्यानंतर मुमताज यांचे भाऊ गुरूमीत सिंग, नरेंद्र सिंग आणि अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबातले इतर काही सदस्य कर्तारपूरमधल्या गुरुद्वारा दरबार साहिब इथे पोहोचले.

मुमताज या देखील त्यांच्या कुटुंबासोबत तिथे पोहोचल्या आणि तब्बल ७५ वर्षांनी आपल्या भावांना भेटल्या. कर्तारपूर कॉरिडॉर पाकिस्तानातील गुरुद्वार दरबार साहिब आणि भारतातल्या पंजाब राज्यातील गुरदासपूर जिल्ह्यातील देरा बाबा नानक समाधी यांना जोडतो.

चंदिगढस्थित पत्रकार मान अमन सिंग छिना यांनी या भावा बहिणीच्या दशकानुदशकं वाट पाहून झालेल्या, मन हेलावून टाकणाऱ्या पुनर्भेटीविषयी ट्विट केलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, “कर्तारपूर कॉरिडॉरच्या सगळ्यात मोठ्या फायद्यांपैकी एक फायदा असा की त्यामुळे १९४७ पासून एकमेकांपासून दीर्घकाळ दुरावलेल्या भावंडांना एकमेकांना भेटणं शक्य होतंय. एका भारतीय भावाचा आणि त्याच्या पाकिस्तानी बहिणीचा कर्तारपूरमधल्या भेटीचा व्हिडियो नुकताच पहिला. डोळे पाणावले.”

त्यांचं हे ट्विट रिट्विट करून अनेकांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकांना हा व्हिडियो पाहून आपले अश्रू आवरता आले नाहीत.

ऋषी सेठ नावाच्या एका युजरने मान अमन सिंग छिना यांचं ट्विट रिट्विट करत लिहिलंय, “या दोघांची जास्तीत जास्त वेळा आणि त्यांची इच्छा असेल तितक्या जास्त वेळा भेट व्हावी अशी मी आशा करतो. अमृतसरपासून लाहोर केवळ एका तासाच्या ड्राइव्हवर आहे.”

तर एपी सिंग या युजरने रिट्विट केलंय, “अशा भेटी डोळ्यांत पाणी आणण्याबरोबरच अत्यंत घाईघाईने झालेली फाळणी ज्याला जबाबदार आहे त्या मनुष्याच्या शोकांतिकेची व्याप्तीही लक्षात आणून देतात.”

अकिफसईद६५ या युजरने या संदर्भात रिट्विट केलंय, “हे खरंच भावूक करणारं आहे. कर्तारपूर वेगळ्या झालेल्या नातेवाईकांच्याही पलीकडे जातं. एका सामान्य भारतीयाने बनवलेले व्लॉग्ज इतक्यातच पाहीले. भेटीदरम्यान आणि भेटीनंतर हृदयस्पर्शी भावना आणि व्ह्यूज होते. माणसांचा माणसांशी अधिकाधिक संपर्क होण्याची आपल्याला गरज आहे.”

 

 

या भेटीचा प्रसंग पाहून भावूक होत आणखीही काही जणांनी पत्रकार छिना यांचं ट्विट शेअर करत याविषयी रिट्विट केलं आहे.

फाळणीचा निर्णय एका मोठ्या स्तरावर घेण्यात आला. काहीएक विचार करून घेण्यात आला. पण यामुळे अनेकांच्या आयुष्याची उलथापालथ झाली.

आपली काहीही चूक नसताना फाळणीमुळे लोकांच्या वाट्याला तीव्र दुःख आलं. देवही एकेकाची किती परीक्षा बघतो असं वाटायला लावणाऱ्या यातना त्यांनी भोगल्या.

त्यांचं हे दुःख भरून न निघणारं आहे. पण आता खुल्या झालेल्या कर्तारपूर कॉरिडॉरमुळे अशी ताटातूट झालेल्या सगळ्याच लोकांना आशेचा किरण दिसावा आणि त्यांची पुनर्भेट व्हावी हीच मनोमन इच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version