Site icon InMarathi

….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो!

gautam buddha inmarathi

motivator india

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : तुषार दामगूडे 

===

आजच्या दिवसातील आपलं कामकाज आटोपुन सुर्यदेव अस्ताला चालला होता आणि मी मात्र त्या संधिप्रकाशात माझ्या विजयाच्या खुणा पहात दमदार पाऊले टाकत पुढे चाललो होतो.

त्या विस्तिर्ण मैदानावर एकटाच झपाझप पुढे चालत चालत, माझे अंगरक्षक मी जाणिवपुर्वक मागेच थांबवले होते. मला आज कुणाचा व्यत्यय नको होता.

माझ्या प्रचंड अशा विजयाचा आनंद मला एकट्यालाच घ्यायचा होता. कित्येक वर्षांची तयारी आणि योजना आज साकार होऊन फळाला आली होती.

अगदी चारच दिवसांपुर्वी कलींगाच्या प्रदेशातील काळ्या मातीचे हे मैदान आपल्या अंगाखांद्यावर हिरवे तृणांकुर मिरवत मिरवत खुशिने डौलत होतं,

पण आज मात्र ते विचित्र भासत होते कदाचित रक्तवर्णामधे ते न्हाऊन गेल होतं म्हणुन की  काय…पण ते मला आज कसं तरीच भकास दिसत होतं.

 

 

===

===

मी तिथल्याच एका पाषाणावर चढुन चोहोबाजुला नजर फ़िरवली. सर्वत्र मानवी हाडामांसाचा चिखल झालेला होता आणि त्याभोवती कोल्हीकुत्री आशेने घुटमळत होती.

मध्येच एखादा धाडसी कोल्हा हात, पाय, मानवी मुंडक्यांच्या त्या राशी मधुन एखादा लचका तोडुन नेत होता. मानवी शरीरांच्या त्या राशी मध्ये कुणाचा अवयव कुठला हे ओळखु येत नव्हतं.

कोणी अर्धमेला वेदनेने व्हिव्हळत होता, तर कोणी पडल्या पडल्या जखमांकडे दुर्लक्ष करत पाण्यासाठी आक्रोश करत होता, परंतु पाणी पाजायला जिवंत किंवा हातापायाने धड होतं तरी कोण?

जे काही थोडके सुदैवाने जिवंत होते ते तर “जेते” होते, ते का पाजतिल “पराभुतांना” पाणी?

मी आणखी दुरवर नजर टाकली, माझ्या तंबुवर आमच्या दैदिप्यमान वंशाचे रेशमी धाग्याने साकारलेले झेप घेण्याच्या पवित्र्यातील वनराजाचे मानचिन्ह हवेच्या झोताबरोबर हेलकावे खात होतं………

आणि कधी नव्हे ते माझे मनही हेलकावे घेऊ लागलं होत. आज अस्ताला चाललेला सहस्त्ररश्मी अधिक लालबुंद आहे की, माझ्या पायाखाली असलेली जमिन अधिक लालबुंद आहे हे मलाही सांगता आलं नसतं.

एवढं प्रचंड युद्ध घडवुन आणणारा “मी” होतो. आतुन भेलकांडत चाललेला मी होतो.

आज खरेतर प्रत्येक विजयानंतर चढणारी ती विशिष्ट विजयाची धुंदी नेहमीप्रमाणे मला चढायला हवी होती, पण आजमात्र ती धुंदी चढणे तर दुर पण विजयाची मगाशी चढलेली नशा उतरत चालली होती.

अस का व्हावं बरं? हे सगळं तर मलाच हव होत ना? आमच्या कुलाला साजेसा राज्यविस्तार मलाच करायचा होता ना? मलाच तर अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करायचा होता ना?

राज्याच्या खजिन्यात अधिकाधिक संपत्ती जमा करायची होती ना ? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बालपणी मी पाहिलेलं स्वप्न मलाच पुर्ण करायच होतं ना?

त्या साठीच तर मी हे होमकुंड पेटवलं होतं ना?

मग आता तर माझ्या नुसत्या “अशोक” या नावापुढे “सम्राट अशोक” ही बिरुदावली लागलेला दिवस पाहण्याचा तो दिवस मी सर्व शक्ती पणाला लावुन साकार केला होता.

माझ्या अथक कष्टाने, निर्दयतेने, युक्तिने, कठोर शासनाने, साम, दाम, दंड, भेदाने माझं स्वप्न पुर्ण झालं होतं. आता आता तर मी “सम्राट अशोक” या नावाने ओळखला जाऊ लागलो होतो.

पण मला आनंद का होत नव्हता? माझ्या मनाला आता काय डाचत होतं? आणखी कशाची तहान मला लागली होती ?………..हे सगळं मी कशासाठी घडवुन आणलं होत?

 

 

” सम्राट ” नावाची तिन अक्षरं माझ्या नावापुढे जोडली जावीत म्हणुन? माझ्या कडे आधीच असलेल्या अमाप संपत्तीत अधिक थोडी भर घालता यावी म्हणुन की,

याआधीही जिंकलेल्या प्रदेशातील व आजवर पाय न लागलेल्या जमिनी प्रमाणेच माझ्या पावलांना चालायला अधिक प्रदेश असावा म्हणुन(?).

पण या सगळ्यासाठी फ़ारच मोठी किंमत मोजावी लागली होती.अगदी माझ्या कल्पनेबाहेरची. इतका विध्वंस मी कल्पिलेला नव्हता. खरंच? खरंतर हे सगळं मला आधीच कळायला हवं होत.

मी काही लुटुपुटीचे खेळ खेळत नव्हतो. मानवी देहांच्या समिधा अर्पण कराव्या लागणारा हा युद्धांचा यज्ञकुंड मीच तर पेटविला होता आणि आता त्या आगीची धग मला जाणवु लागली होती.

त्या तिथे ढिगाऱ्यात तुटुन पडलेला तो पुष्ठ हात माझा परममित्र विरधवलचा तर नसेल? त्या हाताने कित्येकवेळा मला धीर दिला होता.

त्या तिथे धुळीत पडलेलं नरमुंड माझ्या शुरवीर आणि हितचिंतक असलेल्या सुबाहुचे तर नव्हते ना? हो ते त्याचेच विच्छिन्न झालेले मुखकमल होते.

या मुखकमलातुन कित्येकवेळा माझ्या हिताचे चार बोल बाहेर पडले होते. त्या मानवी शरीरांच्या प्रचंड राशीत कितीतरी चेहरे, हात आणि देह मला ओळखीचे दिसु लागले होते.

एका वेगळ्याच कैफ़ात माझ्या हातुन फ़ार मोठी चुक घडली होती. सिंदुर भरण्यासाठी कपाळाकडे जात असलेले लक्षावधी हात आज मी अजाणतेपणी कलम करुन टाकले होते.

लहान बालकांना बाहुत भरुन त्यांच्या कपाळाची चुंबन घेणारी मुखकमल आज इथे धुळीत पडली होती.

वृद्ध मात्यापित्यांच्या वृद्धापकाळाचा आधार असलेले खांदे आज इथे रक्तात भिजुन, तुटुन छिन्नविछिन्न होऊन पडले होते अगदी बेवारसपणे कुणाच्या तरी पायदळी तुडवले जाण्यासाठी आणि कोल्ह्या कुत्र्यांचे भक्ष्य होण्यासाठी.

मी फ़क्त लक्षावधी सैनिकांच्या जीवनाचा अंत केला नव्हता, तर त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या त्यांच्या कुटुंबाचाही अंत केला होता. लाखो स्वप्न,आशा, आकांक्षा उध्वस्त करुन टाकली होती.

कशासाठी? तर फ़क्त “सम्राट”या तिन अक्षरांच्या बिरुदावलीसाठी!

जमेपेक्षा खर्चच अधिक झाला होता. अशोकाने आजवर एकही सौदा तोट्यातला केला नव्हता. कुठ फ़ेडणार होतो मी हे अक्षम्य पाप? कोण देउ शकेल मला यातुन मुक्तता?

मी राजा म्हणुन जन्मलो होतो, माझी मानसिकता कुठल्या ऐऱ्यागैऱ्या साधु किंवा मुनिला कधीच कळणार नव्हती.

ज्यांना राजा म्हणजे काय हेच माहित नाही तो भिक्षुक मला समजुन घेऊन कुठले मार्गदर्शन करणार होता ? कोण दाखवु शकेल मला अंतिम सुखाचा आणि शाश्वत शांतिचा मार्ग?

कोण समजु शकेल एका राजाला? प्रश्न प्रश्न आणि असंख्य प्रश्न …….

 

 

अचानक माझ्या अंतः करणातुन एक गुंजारव होऊ लागला “सिद्धार्थ””सिद्धार्थ””सिद्धार्थ” ! कोण बोलतंय हे? अरे कोण आहे तिकडे ? …… मला मार्ग सापडला होता!

एका राजाला समजण्यासाठी एक राजाच हवा. उत्तर माझ्या पुढे फेर धरुन नृत्य करत होतं. हा तोच होता जो मला आत्ता या क्षणी हवा होता.

“सिद्धार्थ”म्हणुन एका राजघराण्यात जन्म घेऊन राजवस्त्रांचा त्याग करणारा, भगवी वस्त्रे धारण करणारा, अगदी “सिद्धार्थ” या नावाचाही त्याग करुन “गौतम” नाव धारण करणारा.

शांततेचा संदेश देणारा हा दैवीपुरुष मला या सम्राट अशोकाला समजुन घेऊ शकत होता. बस्स, माझा निर्णय पक्का झाला होता.

मला ही बिरुदावली, लौकिक, संपत्ती काहीही नको होतं. भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांनी मला एक हत्यारा म्हणुन ओळखावं यापेक्षा मी माझा इतिहास वर्तमान पुसून स्वतःचा आत्मघात करने बेहतर होत.

मी आता माझ्या अनुयायांसह “गौतमांना” शरण जाणार होतो. त्यांच्या चरणी लोटांगण घालणार होतो ते फ़क्त “अशोक” म्हणुन, ना की “सम्राट अशोक” म्हणुन.

“बुद्धं शरणंम गच्छामी” !!!!!!!!!!!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version