आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
बाजीराव पेशवे म्हणजे मराठा साम्राज्यातील एक महान सेनापती… त्यांनी १७२० सालापासून आपल्या मृत्यूपर्यंत चौथे मराठा छत्रपती शाहू महाराज यांची पेशव्याच्या (प्रधानमंत्री) रुपात सेवा केली.
बाजीरावांनी आपल्या कार्यकाळात मराठा साम्राज्याला एका मोठ्या उंचीवर नेले होते.
आपल्या २० वर्षाच्या लहानग्या पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत. ही गोष्ट त्यांच्या महानतेचा दाखला देते.
बाजीरावांचे प्रारंभिक जीवन
बाजीरावांचा जन्म कोकणस्थ चितपावन ब्राम्हण वंशाच्या कुटुंबामध्ये १८ ऑगस्ट १७०० मध्ये झाला होता.
त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ, छत्रपती शाहू यांचे प्रथम पेशवे (प्रधानमंत्री) होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. बाजीरावांच्या छोट्या भावाचे नाव चिमाजी अप्पा होते. बाजीराव लहान असतानाचा आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमेवर जात असत.
१७२० मध्ये बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. तेव्हा शाहू महाराजांनी २० वर्षाच्या बाजीरावांना पेशवे (प्रधानमंत्री) म्हणून नियुक्त केले. बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा भारतभर डंका वाजवला.
दिल्लीच्या तख्तावर मराठा ध्वज फडकवणे हे बाजीरावांचे ध्येय होते.
लहान वयातच बाजीरावांना मिळाले ‘पेशवे’ पद
जेव्हा बाजीरावांना पेशवे (प्रधानमंत्री) बनवले गेले, तेव्हा छत्रपती शाहू महाराज साताऱ्यामध्ये आपल्या महालातूनच राज्यकारभार सांभाळत. राज्याच्या रक्षणाची खरी जबाबदारी पेशव्यांच्या हाती होती.
बाजीरावांना तरुण असतानाच पेशवे म्हणून नियुक्त केल्यामुळे नारो राम मंत्री, आनंद राम सोमंत आणि श्रीपत राय, असे वरिष्ठ मंत्री बाजीरावांचा मत्सर करत असत.
दक्षिणेत मोघल सुभेदार निजाम-ऊल-मुल्क असफजाह आपले स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित करू इच्छित होता. त्याकरिता तो मराठा अधिकाऱ्यांना आव्हान देऊ लागला.
निजामांच्या विरोधात मोहीम
२७ ऑगस्ट १७२७ मध्ये बाजीरावांनी निजामांच्या विरोधात मोहीम उघडली. त्यांनी हल्ला करून निजामाचे जालना, बुरहानपुर आणि खानदेश उध्वस्त केले. जेव्हा बाजीराव पुण्यापासून दूर होते तेव्हा निजामाने पुण्यावर आक्रमण केले. जेथे दुसरे संभाजी कारभार पाहत होते.
२८ फेब्रुवारी १७२८ मध्ये बाजीराव आणि निजामाचे सैन्य पल्खेडच्या लढाईमध्ये एकमेकांसमोर आले. निजाम पराभूत झाला आणि त्याला करार करणे भाग पडले. या करारानुसार मराठ्यांनी दक्षिनेणेमधून कर वसूल करण्याचा हक्क मिळवला.
१७२८ मध्ये बाजीरावांनी आपले बस्तान सासवड वरून पुणे येथे हलवले. या छोट्या शहराचे एका महानगरामध्ये रुपांतर केले गेले.
बाजीरावांनी मुठा नदीच्या किनाऱ्यावर शनिवारवाडा तयार करण्यास सुरुवात केली. १७३० मध्ये हा वाडा बांधून पूर्ण झाला. पेशवे तिथूनच संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवत असत.
माळव्याची विजयी मोहीम
१७२३ मध्ये बाजीरावांनी माळवाच्या दक्षिणी भागांमध्ये मोहीम सुरु करण्याची योजना बनवली. मराठा मंत्री माळव्याच्या कित्येक भागांमधून कर वसूल करण्यात यशस्वी झाले होते.
मराठा साम्राज्याचा विरोध करण्यासाठी मोघल बादशाहाने गिरधर बहादूरला माळव्याचा शासक म्हणून नियुक्त केले.
निजामाला पराभूत केल्यानंतर बाजीरावांचे लक्ष माळव्यावर होते. ऑक्टोबर १७२८ मध्ये बाजीराव आपले छोटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एक विशाल सेना घेऊन माळव्याकडे कूच करू लागले.
–
- छत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी
- हॉटसन गोगटे – इतिहासात लुप्त झालेला एक मराठी क्रांतिकारक!!
–
चिमाजींच्या सैन्याने अमझेराच्या लढाईमध्ये मोघलांना पराभूत केले. या लढाईत गिरधर बहादुर आणि त्याचा सेनापती दया बहादुर ठार झाला. पुढे चिमाजींनी उज्जैनकडे सुद्धा कूच केली. परंतु रसद कमी पडल्याने त्यांना करार करावा लागला.
१७२९ पर्यंत मराठा सैन्य सध्याच्या राजस्थानपर्यंत पोहोचले होते.
बुंदेलखंड मोहीम
बुंदेलखंडात छत्रसाल याने मोघल साम्राज्याच्या विरोधात उठाव केला आणि आपले स्वतंत्र साम्राज्य स्थापित केले.
डिसेंबर १७२८ मध्ये मोहम्मद खानच्या नेतृत्वाखाली मोघलांनी छत्रसालला हरवून त्याच्या कुटुंबियांना कैद केले. छत्रसालने बाजीरावांकडे मदत मागितली. त्यावेळी बाजीराव माळवा मोहिमेमध्ये व्यस्त होते.
शेवटी मार्च १७२९ मध्ये पेशव्यांनी छत्रसालला मदत पाठवली. मराठ्यांनी बुंदेलखंडाकडे कूच केली. छत्रसाल कैदेतून सुटला आणि मराठा सैन्यामध्ये समाविष्ट झाला.
या संयुक्त आघाडीने जैतपुरकडे कूच केली. या मोहिमेमुळे, मोघलांना बुंदेलखंड सोडावा लागला. बुंदेलखंड परत एकदा छत्रसालच्या अधिपत्याखाली आला.
छत्रसालने एक मोठी वतनदारी बाजीरावांना दिली. डिसेंबर १७३१ मध्ये आपल्या मृत्युच्या अगोदर देखील छत्रसालने आपले काही भाग मराठ्यांच्या नावे केले.
गुजरात मोहीम
मध्य भारतात मराठी वर्चस्व वाढवण्यासाठी बाजीरावांनी गुजरातला आपले लक्ष्य बनवले. १७३० मध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एका तुकडीला गुजरातला पाठवण्यात आले.
गुजरातचा मोघल सुभेदार सरबुलंद खान याने मराठ्यांच्या समोर समर्पण केले. मराठ्यांना गुजरातचा कर वसूल करण्याचा अधिकार देण्याचं त्यानं मान्य केलं.
बाजीरावांच्या नेतृत्वाला कंटाळून शाहू महाराज्यांचा सेनापती त्रिंबकराव याने मराठ्यांविरुद्ध उठाव केला. त्याला गुजरातच्या दोन मराठा मंत्र्यांनी पाठींबा दिला.
मोघल बादशाहने मोहम्मद खान बंगाशला गुजरात परत मिळवण्यासाठी पाठवले. बंगाशने त्रिंबकराव दाभाडे आणि इतर दोन मंत्र्यांसोबत संयुक्त सेना बनवली. दाभोईच्या लढाईमध्ये त्रिंबकरावचा मृत्यू झाला.
बाजीरावांचे व्यक्तिगत जीवन
बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई होय. त्यांना तीन मुले होती. बाळाजी (नाना साहेब), रघुनाथ राव आणि जनार्दन राव! १७४० मध्ये बाजीरावांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशव्यांचे उत्तराधिकारी बनले.
बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानी होती. मस्तानी आणि बाजीराव यांचा एक मुलगा होता. तो समशेर बहादुरच्या नावाने ओळखला गेला. सहा वर्षाचा असल्यापासून त्याला काशीबाईंनी वाढवले होते.
१७६१ मध्ये मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वयाच्या २७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
–
- या मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा!
- कोण म्हणतं इतिहास केवळ माणसांनी रचला? वाचा इतिहासातील धाडसी घोड्यांबद्दल…
–
बाजीरावांचा मृत्यू
२८ एप्रिल १७४० मध्ये ३९ व्या वर्षी बाजीरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीराव आपल्या सैन्यासमवेत इंदौर शहराच्या जवळ खारगोन जिल्ह्यामध्ये होते.
बाजीरावांचे नर्मदा नदीच्या काठावर रावरखेडी नावाच्या ठिकाणावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी, एक वास्तू उभारण्यात आली आहे.
बाजीराव पेशवा यांची ही समाधी प्रसिद्ध आहे.
मराठा साम्राज्याचा या महान सेनापतीला मानाचा मुजरा!!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.