' वॉचमन ते पुण्यातील मनसेची ताकद, राज ठाकरेंच्या या गोल्डन मॅनला आजही लोक विसरले नाहीत – InMarathi

वॉचमन ते पुण्यातील मनसेची ताकद, राज ठाकरेंच्या या गोल्डन मॅनला आजही लोक विसरले नाहीत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणात अनेक बडी नेतेमंडळी होऊन गेली आहेत, आजही आहेत. पण या नेतेमंडळींचे अगदी सच्चे, कार्यकुशल, निष्ठावंत कार्यकर्तेही त्या नेतेमंडळींइतकेच आपल्या लक्षात राहतात. बाळासाहेबांमुळे प्रभावित होऊन ‘ठाण्यातले बाळासाहेब’ अशी ओळख आपल्या कारकिर्दीत मिळवलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरच्या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुरळा उडवला. राज ठाकरेंनी शिवसेना पक्ष सोडून स्वतःचा मनसे पक्ष काढला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गेल्या बऱ्याच दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे यांची सातत्याने चर्चा आहे. राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे. पुणे मनसेची आजची अवस्था फारशी बरी नाही. पण एकेकाळी मनसेतलाच एक करारी नेता इथली खिंड अगदी शर्थीने लढवत होता.

 

raj thackrey 2 IM

 

राज ठाकरे त्यांना आपला ‘वाघ’ म्हणायचे असे हे नेते. राज ठाकरे यांना अगदी जवळ असलेले रमेश वांजळे यांचा आमदारकीपर्यंतचा प्रवास काही सहजसोपा नव्हता. अगदी सर्वसामान्यांमधल्या एक असलेल्या काही व्यक्तींच्या आयुष्याला पुढे जाऊन अनपेक्षित कलाटणी मिळते. तसंच काहीसं वांजळे यांच्याबाबतीतही घडलं. राज ठाकरेंचे गोल्डन मॅन म्हणवल्या जाणाऱ्या रमेश वांजळे यांचा अगदी वॉचमनपासून पासून पुण्यातली मनसेची ताकद होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊ.

मनसे पक्ष अगदी सुरुवातीच्या काळातच स्वतःचा दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झाला होता. राज ठाकरे या नावाची त्यावेळी जनमानसावर चांगलीच जादू झाली होती. २००९ च्या विधानसभा निवडणूकीची मनसेने कसून तयारी केली होती. याच निवडणूक त्यांनी आपले १३ उमेदवार दणक्यात निवडून आणले.

रमेश वांजळे हे त्यातलेच एक. वांजळे यांच्या एकूण प्रवासाचा आढावा घेताना वडील सरपंच असतानाही त्यांचा प्रवास अगदी एकेक पायरी वर चढत मजल दरमजल करत झाला असल्याचं लक्षात येतं. मात्र वडिलांकडून त्यांना राजकारणाचे धडे मिळाले.

 

wanjale im

वॉचमन ते सरपंच :

अहिरे या गावात वांजळे यांचं बालपण गेलं. त्यांचं कुटुंब हे गावातलं प्रतिष्ठित, चांगली परिस्थिती असलेलं कुटुंब होतं. लहानपणापासून तालमीत जायची आवड असल्यामुळे रमेश वांजळे यांनी स्वतःला अगदी तंदुरुस्त केलं.

शरीरयष्टी सुदृढ केल्यामुळेच त्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत वॉचमनची नोकरी मिळाली. वाकडच्या स्मशानभूमीत मनपा कर्मचारी म्हणूनही त्यांनी नोकरी केली. पण त्यांची ही नोकरी फार काळ टिकली नाही. त्यांनी ज्यूस विक्री केली.

जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला. कित्येक गरिबांकडून पैसे न घेता त्यांना काशीयात्रेला नेऊन आणलं. मुस्लिमांनाही अजमेरच्या यात्रेला नेलं. पण त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी देणारी गोष्ट पुढे घडणार होती. रामकृष्ण मोरे हे वांजळेंचे गुरू झाले.

मोरे यांनी सांगितल्याप्रमाणेच वांजळे अहिरे गावाच्या सरपंच पदासाठीच्या निवडणूकीत उतरले. ती निवडणूक फत्ते करून ते सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून पंचायत समितीत निवडणूक लढवली. त्या निवडणूकीत विजय प्राप्त करून ते समितीचे उपसभापती झाले. राजकारणात इतकी उत्तम सुरुवात केल्यानंतर वांजळे यांनी मागे वळून पाहीलंच नाही.

 

wanjale im 2

 

त्यानंतर जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाला तेव्हा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला पाठिंबा दिला. पहिल्यांदा निवडणूक लढवली असूनही प्रचंड मतांनी निवडून आलेली आपली पत्नी हर्षदा वांजळे हिच्या विजयाकडे पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावला. पण विधानसभा निवडणूका सुरू झाल्या तेव्हा सुरुवातीला वांजळे यांना नकार पचवावे लागले. खडकवासला मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. पण राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली.

मनसेकडून आमदारकी :

शिवसेना, भाजपाकडूनही त्यांच्या वाट्याला नकारच आला. पण अशा वेळी मनसे पक्ष त्यांचा सहारा झाला. राज ठाकरेंकडे त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर त्यांच्यावर विश्वास टाकत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली.

पुढे मनसेतलं वजनदार नाव झालेले रमेश वांजळे यांनी त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थच ठरवला असं म्हणता येईल. काही काळापूर्वी निधन झालेले गायक-संगीतकार बप्पीदा आपल्याला गोल्ड किंग म्हणून माहिती आहेत.

 

wanjale im 1

 

राजकारणातला असाच गोल्ड मॅन म्हणजे रमेश वांजळे. अंगभर सोनं घालायचा शौक असलेले वांजळे ‘गोल्ड मॅन’ म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र त्यांच्या या अंगभर सोनं घालण्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. वांजळे यांनी या टीकेचा आपल्यावर कुठल्याही प्रकारे फरक पडू दिला नाही.

वांजळे यांची राज ठाकरेंच्या प्रती इतकी दृढ निष्ठा होती की त्यांच्या अंगठीतही राज ठाकरेंची प्रतिमा होती आणि गळ्यातल्या लॉकेटमध्येही. वांजळे यांची वक्तृत्त्व शैली प्रभावी, समोरच्यावर सहज छाप पाडणारी होती. खडकवासलाचे आमदार म्हणून वांजळेच निवडून येतील असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं.

निवडणूकीत विजय मिळवून खडकवासलाचे आमदार झालेल्या वांजळेंनी हे म्हणणं खरं करून दाखवलं. मराठी माणसाचा आधारस्तंभ व्हावा या ध्येय्यानेच मनसे पक्ष राजकारणात आला.

वांजळे जितके राज ठाकरेंशी एकनिष्ठ होते तितकेच आपल्या मराठी बाण्याशीही इमान राखून होते. विधीमंडळात हिंदीतून शपथ घेणाऱ्या अबू आझमींचं माईक पोडियमच वांजळेंनी उखडून काढलं होतं या प्रसंगावरून याची साक्ष पटते.

पुण्यातल्या हवेली तालुक्यामधील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समितीचे सदस्य ते विधानसभेतील आमदार अशी २५ वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या रमेश वांजळे यांना मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या आमदारपदाचा उपभोग म्हणावा तसा घेता आला नाही.

राजकारणात अशी फार कमी मंडळी असतात जी आपल्या मोठ्या मनाच्या स्वभावासाठीही ओळखली जातात. रमेश वांजळे हे त्यातलंच एक नाव.

 

wanjale im5

२०११ च्या जून महिन्यात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आजही रमेश वांजळे यांच्या जाण्यामुळे राज ठाकरे हळहळतात. “माझा वाघ गेला.”, असं दुःख व्यक्त करतात. वांजळेंच्या पश्चात त्यांची पत्नी हर्षदा वाजले या २०११ साली खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढल्या.

वांजळेंना आदरांजली म्हणून मनसेने हर्षदा वांजळेंविरोधात उमेदवार उभा केला नाही. मात्र भाजपच्या भीमराव तपकीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

गरवारे महाविद्यालयातून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलेली वांजळे यांची मुलगी सायली वांजळे हीदेखील वडिलांप्रमाणेच राजकारणात उतरली. बुद्धिमान आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या सायली वांजळेने अगदी कमी वयातच एकामागोमाग एक निवडणूकी जिंकून राजकीय वर्तुळातील सगळ्यांना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

मनसेतले एक अतिशय महत्त्वाचे नेते म्हणून रमेश वांजळे यांचं नाव नेहमीच सन्मानाने उच्चारलं जाईल. राजकारणात यायची मनापासून इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य माणसांना वांजळेंप्रमाणेच योग्य ती संधी मिळो आणि त्या संधीचं सोनं करत त्यांच्याकडूनही वाखाणण्याजोगी कामगिरी घडो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?