मुलगी ओझं नाहीच! : या गावाने एका अनोख्या उपक्रमातून हे सिद्धच केलंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजची स्त्री ही सुशिक्षित, अमानुष रूढींना विरोध करणारी, आपल्या हक्कांची जाणीव असणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेली स्वतंत्र स्त्री आहे असं आपण म्हणतो. ‘स्त्री सबलीकरणा’चं महत्त्व आपल्यावर बिंबलं गेलंय. पण स्त्रियांविषयीचं आपलं हे मत शहरांमध्ये राहिल्यामुळे तयार झालेलं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आजही शहर आणि गाव यांच्यात मोठी दरी आहे. देशातल्या कित्येक गावांमध्ये आजही स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं, तिचं शोषण केलं जातं. स्त्रियांवर झालेले अत्याचार, शारीरिक, लैंगिक, मानसिक छळ याविषयी बातम्या आजही आपण ऐकतो. हुंड्याची प्रथादेखील आजही काही ठिकाणी सुरू आहे. बिहार हे भारतातलं आजही मागास असलेलं राज्य. आजही बिहारमध्ये बायकांना वाईट वागणूक दिली जाते. तिथल्या बायकांमध्ये साक्षरतेचं प्रमाणही कमी आहे.
बिहारमध्ये लग्नापूर्वी मुलींकडे आर्थिक भार म्हणून पाहिलं जातं आणि लग्नानंतर कित्येक ठिकाणी आजही महिलांचं शोषण होतं. सर्वाधिक बलात्कार होणाऱ्या राज्यांमधलं बिहार हे एक राज्य. आपल्यासमोर बिहारची अशी प्रतिमा असताना याच बिहारमधल्या एका गावात खरोखर पुरोगामी म्हणता येईल अशी एक परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
गावांमध्ये आजही मुलीचा जन्म झाला की नाराजी व्यक्त केली जाते. मुलगा व्हावा या अट्टाहासापायी मुलींच्या जन्मांनंतरही मूल जन्माला घालण्यासाठी बाईवर दबाव आणला जातो. मात्र बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील धरहरा हे गाव याला सर्वार्थाने अपवाद ठरलं आहे. या गावात मुलीचा जन्म चक्क साजरा केला जातो. तिच्या स्वागतासाठी किमान दहा फळांची रोपं लावली जातात.
केवळ बिहारनेच नाही तर कुठल्या खेड्या-शहराने आदर्श घ्यावा अशी धरहरा गावातली ही परंपरा नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊ.
बिहारचे बरेचसे जिल्हे पूरग्रस्त असल्यामुळे तिथल्या नागरिकांना गरिबी आणि उपासमारीशी सामना करावा लागतो. भागलपूर जिल्हा मुख्यालयापासून वीस किलोमीटर दूर असलेलं हे धरहरा गाव हिरवाईने नटलेलं आहे. या गावात नवजात बालिकांना लक्ष्मीदेवीच्या रूपात पाहीलं जातं.
मुलगी जन्माला आली की आंब्याचं रोप लावून तिच्या जन्माचा उत्सव केला जातो. मुलगी जन्माला आली की तिच्या स्वागतासाठी या गावात किमान १० फळांची रोपं लावली जातात. इतकंच नाही, पण या मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा त्यांच्या जन्मानंतर लावलेलं आंब्याचं झाड त्यांना वारसाहक्काने दिलं जातं.
हे गाव दक्षिणेकडून गंगा नदीने तर उत्तरेकडून कोसी नदीने घेरलेलं आहे. या गावात हजारो फळझाडं आहेत.
“आज सगळं जग भ्रूण हत्या, ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन फूटप्रिंट्स अशा समस्यांमधून जातंय. अशा परिस्थितीत मुली झाल्यानंतर वृक्षारोपण करणं हा या सगळ्या कठीण समस्यांशी लढण्यावरचा आमचा साधा उपाय आहे.” असे गावकरी सांगतात.
मागास, रूढीवादी समजल्या जाणाऱ्या बिहारी समाजात मुलींकडे सहसा आर्थिक ओझं म्हणून पाहीलं जातं. हुंड्यासाठी सुनांची हत्या करणं याचं इथल्या लोकांना नवल वाटत नाही. पण धरहरा गावातल्या या मोहिमेने मात्र एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे.
मुली झाल्यानंतर इथे जे वृक्ष लावले जातात ते पुढे जाऊन या मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी उपयोगी ठरतात. अगदी लग्नाचा खर्चही त्यातून निघतो. यामुळे मुलींच्या घरच्यांवरही आर्थिक जबाबदारीचा भार येत नाही.
या गावाचे माजी प्रमुख प्रमोद सिंग यांनी १२ वर्षांपूर्वी आपली मुलगी नीति हिचा जन्म झाल्यानंतर त्या आनंदाप्रीत्यर्थ आंब्याची १० रोपं लावली होती. आता नीति शाळेत जाते आणि तिच्या शिक्षणासाठीच्या खर्चामुळे तिचे वडील किंवा कुटूंबातील इतर सदस्य वैतागत नाहीत. तिच्या जन्माच्या वेळी जी आंब्याची रोपं लावली होती ती विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च निघतो.
“स्वयंरोजगाराद्वारे महिलांना सक्षम व्हायला मदत करणाऱ्या ‘हर इनिशिएटिव्ह’ नावाच्या एनजीओशी संबंधित असणाऱ्या सुश्री गुलअफ़सान यांचं म्हणणं आहे, “या लोकांसाठी रोपं लावणं केवळ आपल्या मुलींच्या भविष्यासाठी संपत्ती जमवणं इतकंच आहे. पण यामुळे महिलांमधलं स्वत्वही जागं होतंय जी इथल्या महिलांसाठी सर्वसाधारण गोष्ट नाही.”
भागलपूर जिल्हा आंब्याच्या उत्पादनासाठी सुरुवातीपासूनच प्रसिद्ध आहे. आंब्याचं एक झाड वाढायला साधारण ४-५ वर्षं लागतात. त्यानंतर त्याची थोडीशी काळजी घेतली तर ते झाड भरपूर फळं देतं. या गावात तयार झालेल्या आंब्यांचा पुष्कळ भाग आर्थिक फायद्याच्या दृष्टीने विक्रीसाठी असतो तर थोडे आंबे लहान मुलांकरता खायला ठेवले जातात. याचा आणखी एक फायदा असा की आंब्याची झाडं जुनी झाली की त्यांची लाकडं कापून भरपूर मागणी असलेल्या स्वस्तातल्या फर्निचरची निर्मिती केली जाते.
खरंतर इथल्या लोकांना आंब्याची रोपं लावायलाच सगळ्यात जास्त आवडतात. पण त्या रोपांकडे लक्ष देणं तितकं सोपं नसतं. त्यामुळे या गावातले काही शेतकरी पपई, पेरू, लिची अशाही फळांची लागवड करतात. त्यांच्या शेतीकरता वेळ आणि पैसे कमी लागतात. ८० वर्षांचे वृद्ध असलेल्या श्री शत्रुघन सिंग यांनी धरहरामध्ये आपल्या मुली, नाती आणि गावातल्या बाकी मुलींसाठी ६०० पेक्षाही जास्त फळझाडं लावली आहेत. त्यांनी लावलेल्या झाडांमधली बरीचशी झाडं आंब्याची आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी लिचीची झाडं लावायलाही सुरुवात केली आहे.
–
बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”!
मुलगा होणार की मुलगी, हे नेमकं कसं ठरतं? वाचा यामागचं वैज्ञानिक उत्तर!
–
धरहरा गावातल्या या विलक्षण परंपरेने मुख्यमंत्री नितीश कुमार यांचंही लक्ष वेधून घेतलं. नितीश कुमार धरहरा गावात गेले होते आणि त्यांनी स्वतः झाडं लावली होती. इतकंच नाही, तर गावांमध्ये एक मुलीची शाळा येईल याचीही हमी त्यांनी दिली होती.
या प्रथेची सुरुवात एखाद्या किंवा काही मोजक्याच व्यक्तींनी केली असेल. मात्र इतरांनीही त्याचं महत्त्व ओळखलं आणि ही प्रथा वाढवली ही यातली विशेष बाब आहे. आपण एखादी मोठी चळवळ करतोय असा अविर्भाव यात नाही. इथली माणसं हे अगदी सहजपणे आणि प्रेमाने करत आलेली आहेत. या प्रथेमागचा हेतू जितका मोठा आहे तितकंच एखादा चांगला उपक्रम एकजुटीने पुढे कसा न्यायचा हेही या गावाकडून, तिथल्या नागरिकांकडून शिकण्यासारखं आहे.
धरहरा गावातल्या नागरिकांच्या या वैचारिक श्रीमंतीचा असर हळूहळू का होईना बिहारमधल्या इतर गावांमधल्या नागरिकांवरही होवो. ही अशीच उदाहरणं देशाला खऱ्या अर्थाने ‘सुजलाम् सुफलाम्’ करण्याच्या आपल्या स्वप्नाला बळकटी देतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.