आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शरीर मरण पावलं तरी आत्मा अमर राहतो आणि मृत्यूनंतरही पुढे मार्गक्रमण करत राहतो असं बऱ्याच धर्मांमध्ये मानलं जातं. आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार आजही केले जातात.
वेगवेगळ्या धर्मांमध्ये मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हिंदू संस्कृतीत आपण स्मशानात जाऊन मृत व्यक्तींच्या शवाला अग्नी देतो. मुस्लिमांमध्ये शवाचं दफन केलं जातं. या प्रत्येक पद्धतीमागे त्या त्या धर्मियांची काही कारणं, हेतू असतात. त्यांचं महत्त्व लक्षात घेऊनच एका विशिष्ट प्रकारे हे अंत्यसंस्कारांचे विधी पार पाडले जातात.
शवाला अग्नी देणे किंवा त्याचं दफन करणे या अंत्यसंस्कारांच्या पद्धती आपल्याला साधारण माहीत असतात. पण इतर धर्मातल्या अंत्यसंस्काराच्या पद्धतींविषयी आपल्याला क्वचितच माहिती असते.
पारसी लोकांच्या अंत्यसंस्काराची पद्धत फारच वेगळी आहे. पारसी लोकांमध्ये ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये शवावर अंत्यसंस्कार केले जातात. शव जाळलं किंवा दफन केलं जात नाही. ते तिथे तसंच ठेवलं जातं आणि गिधाडं ते खातात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पारसी लोकांच्या या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र गेला बराच काळ बरेच पारसी लोक कोविडच्या काळात मृत्यू झालेल्या आपल्या नातेवाईकांवर आपल्याला आपल्या पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत अशी मागणी करत आहेत.
कोविड झालेल्या मृतांचं शरीर असं उघड्यावर टाकणं उचित ठरणार नाही, त्यामुळे कोविड पसरण्याचा धोका उद्भवू शकतो. कोविडमुळे निधन झालेल्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार प्रोफेशनल्स करतात.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पारसी लोकांच्या अंत्यसंस्कारांच्या या पद्धतीवरची बंदी हटवली नाही. यानिमित्ताने, पारसी लोकांची अंत्यसंस्काराची पद्धत, टॉवर ऑफ सायलेन्स आणि वेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार करता यावेत अशी काही पारसींनीच केलेली मागणी याविषयी जाणून घेऊ.
पारसी धर्म बराच प्राचीन आहे. या धर्मातल्या हजारो वर्षांपूर्वीच्या अनेक जुन्या प्रथांचं आजही पारसी लोक पालन करतात. पारसी लोकांमध्ये जी अंत्यसंस्काराची पद्धत आहे त्याला ‘दोखमेनाशिनी’ असं म्हणतात. भारतात जितके पारसी लोक आहेत त्यातले सर्वाधिक पारसी मुंबईत राहतात.
जवळपास ५५,००० पारसी लोक मुंबईत राहतात. पारसी लोकांची मुंबईत जी स्मशानभूमी आहे तिला ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ असं म्हटलं जातं. दक्षिण मुंबईतील मलबार हिलजवळ हा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आहे.
या ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये मृत व्यक्तींच्या शवावर अंत्यसंस्कार केले जायचे आणि ती प्रेतं तिथे तशीच गिधाडांना खाण्यासाठी सोडून दिली जायची.
असं केल्यामुळेच मृतात्म्यांना मुक्ती मिळते असं पारसी लोक समजतात. पण आता हा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ बंद करण्यात आला आहे.
ही बंदी घातली जाण्यामागे नेमकी काय कारणं आहेत हे जाणून घेण्याआधी जिथे हा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आहे ती डूंगरवाडी आणि ‘टॉवर ऑफ सायलेन्स’विषयी थोडक्यात जाणून घेऊ.
—
- इस्लामी आक्रमणापासून स्व-संरक्षणास भारतात आलेला “हा” समुदाय इथेच स्थायिक झाला
- दुधातील साखरेप्रमाणे भारतात सामावलेल्या पारसी समाजाचा इतिहास!
—
डूंगरवाडी आणि ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ :
दक्षिण मुंबईतील मलबार हिलजवळील डूंगरवाडीला माणसं मृत्यूसंबंधीचे विधी करायलाच जाऊ शकतात. तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी डूंगरवाडीतील ३८ एकरांपैकी एकही एकर तुम्हाला विकत घेता येत नाही. पण पारसी लोकांशी घडलेल्या बऱ्याच संवादानंतर डुंगरवाडी हे ठिकाणं जीवनोन्मुख, सुंदर आणि शांतताप्रिय असल्याचंही समजतं.
डुंगरवाडीमध्ये ३ प्रकारचे विधी केले जातात. मृत्यूशी संबंधित जी अशुद्धता असते त्याची रीतसर विल्हेवाट लावणे, आत्म्यांना मृत्यूनंतरच्या पुढच्या आयुष्यासाठी आधार देणे आणि जीवित आणि मृत यांच्यातील संबंध सुनिश्चित करणे असे ते ३ विधी.
डूंगरवाडीत ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आणि ‘बंगलीज’ असतात. सगळ्या बंगलीजमध्ये विधी करण्यासाठी संमेलन पक्ष आणि बाथरूमची सोय असते. ज्या मोठ्या बंगलीज असतात त्यांच्यात ४ दिवसांच्या अंत्यसंस्काराच्या विधींसाठी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींकरता मुक्कामासाठी आणखीही खोल्या असतात.
बंगलीज आणि ५ टॉवर्स ऑफ सायलेन्स यांना जोडणारं एक लोखंडी गेट तिथे आहे. झोराष्ट्रीयन नसलेल्या लोकांना तिथे प्रवेश निषिद्ध असतो. झोराष्ट्रियन्सचे कुठलेही विधी करता येण्यासाठी तुमची एका ठराविक पातळीपर्यंत शुद्धी झालेली असणं आवश्यक असतं.
झोराष्ट्रीयन लोकांच्या संस्कृतीत मृत्यूचा विधी अशुद्ध मानला जातो. झोराष्ट्रियन्सच्या म्हणण्यानुसार तिथे जी अशुद्धता असते त्याच्यापासून बचाव होण्यासाठी झोराष्ट्रियन नसलेल्यांकडे विधींचं संरक्षण नसतं. शवाला स्नान घालून कपडे चढवल्यानंतर अंत्यविधी करणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त दुसरं कुणीही शवाला स्पर्श करू शकत नाही.
आपल्या प्रिय व्यक्तींना अंत्यविधींनंतर खऱ्या अर्थाने अखेरचा निरोप देणं हा क्षण इतर धर्मियांप्रमाणेच पारसी धर्मातल्या लोकांसाठीही भावनिक असतो.
पूर्वी बायकांना पारसी लोकांच्या अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये सहभागी होता यायचं नाही. पण आता बऱ्याच बायकाही तिथे जातात. सगळे विधी पार पाडल्यानंतर पुढचे तीन दिवस मृत व्यक्तीचा आत्मा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ मध्येच असतो असं मानलं जातं.
मृत व्यक्तीच्या जवळची व्यक्ती त्या काळात तिथल्या एका बंगलीमध्ये थांबून प्रार्थना करते. त्यानंतरचे जे विधी असतात ते पुजारी अग्यारीमध्ये पार पाडतात. इतर धर्मांप्रमाणेच पारसी धर्मातही मृतात्म्यासाठी प्रार्थना करण्यामागचा उद्देश मृतात्म्याला शांती लाभावी हाच असतो.
‘टॉवर ऑफ सायलेन्स’ बंद केला गेल्यामागची कारणं :
टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतांचं शव गिधाडं खातात. पण सध्या गिधाडांची संख्या बरीच कमी झाली आहे. २००७ सालीच शेकड्याहूनही कमी गिधाडं राहिल्याची नोंद झाली होती.
पूर्वी ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ शांत असायचा. मात्र आता तिथे ती शांतता राहिलेली नाही. शिवाय, गिधाडं आणि इतर काही पक्षी जरी प्रेतं खात असले तरी अर्धवटच खातात, त्यामुळे प्रेतांना येणारी दुर्गंधी सर्वदूर पसरते आणि तिथल्या स्थानिकांना त्याचा त्रास होतो.
या सगळ्या व्यावहारिक समस्यांचा विचार करून ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ बंद केला गेला.
मुंबईतील पारसी लोकांपुढल्या अंत्यविधीच्या समस्या आणि मुंबईतील पारसींमधले आपापसातले मतभेद :
पारसी लोकांच्या अंत्यविधीची ही प्राचीन प्रथा पुढल्या काळात बंद होऊ शकते असं काही पारसी लोकांचं म्हणणं आहे. मात्र काही कट्टर पारसी ही परंपरागत प्रथा बदलायला राजी नाहीत. बरेच पारसी लोक आता मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शव घेऊन तब्बल ४०० किलोमीटरचा प्रवास करून सुरतला जातात.
हा पर्याय तसा सोयीचा नाही. पण बाकी कुठलाच पर्याय दिसत नसल्यामुळे मुंबईतील बऱ्याच पारसी लोकांनी या पर्यायाची निवड केली आहे. मात्र पारसी पारसींमध्येही मतभेद असल्याचं दिसून आलंय.
सनातनी आणि सुधारणावादी असे दोन गट मुंबईतल्या पारसींमध्ये पडलेत. सनातनी पारसी बदलाला विरोध करतात असं सुधारणावाद्यांचं दुःख आहे तर सुधारणावाद्यांचं जे म्हणणं आहे ते अशुभ असल्याचं सनातनी पारसी म्हणतात.
दोखमेनाशिनीची प्रथा फार प्राचीन आणि क्रूर असल्याचं सुधारणावादी पारसींचं म्हणणं आहे. काही बडी पारसी मंडळी ‘डिस्पोजल ऑफ द डेड विथ डिग्निटी-ऍक्शन ग्रुप’ (dddag) ची सदस्य आहेत.
अग्नी देणे आणि यासारख्या अंत्यसंस्कारांच्या इतर पद्धतींनुसार पारसी लोकांनाही अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
आपापल्या धर्मातल्या प्रथा, रितीरिवाजांशी लोक भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले असतात. आपल्या वाडवडिलांनी त्या प्रथांचं, रितीरिवाजांचं सांगितलेलं महत्त्व आपल्या मनात खोलवर रुजलेलं असतं.
मात्र काळानुरूप या सगळ्याच रीतींमध्ये, प्रथांमध्ये बदल केले जाणं आवश्यक आहे. अगदी अंत्यसंस्काराच्या पद्धतींनाही हे लागू होतं. अशा वेळी भावनांना मुरड घालून व्यावहारिकदृष्ट्या जे सोयीचं आहे तेच करणं योग्य ठरतं.
हिंदू धर्म तसेच मुस्लिम धर्मात ज्या पद्धतीने कर्मकांडाला महत्व असतं तसंच हे पारसी लोकांच्या अंत्यविधीचं हे महत्व आहे.
अर्थात या लेखाचा उद्देश कोणत्याही कर्मकांडावर टीका करण्याचा नाही. पण अंत्यविधीची ही पद्धत निसर्गाच्या आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे या विचारात आपल्याला टाकते हे मात्र अगदी खरं आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.