' जोडप्याच्या बेडरूममधले ते किळसवाणे प्रसंग समोर आणणारा ‘लाईव्ह’ घटस्फोट खटला! – InMarathi

जोडप्याच्या बेडरूममधले ते किळसवाणे प्रसंग समोर आणणारा ‘लाईव्ह’ घटस्फोट खटला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्ली सेलिब्रिटींच्या अफेअर्सची, लग्नांची जितकी चर्चा होते तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त चर्चा होते ती त्यांच्या ब्रेकअप्स आणि घटस्फोटांची. केवळ परदेशातलेच सेलिब्रिटीज नाहीत तर आपल्याही देशातल्या सेलेब्सच्या बाबतीत, अगदी मराठी कलाकार जोडप्यांच्या बाबतीतही आपल्याला हे दुर्दैवाने पाहायला मिळतं.

ब्रेकअप्सचं कुणालाही काही वाटेनासं झालंय. मात्र, सेलिब्रिटींचे घटस्फोट म्हटले की त्यांनी एकमेकांवर झाडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, अनेक अफवा अशा सगळ्याच बातम्या बराच काळ लोकांच्या चर्चेचा विषय असतात.

 

celebrities divorce IM

 

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.

त्यात जर ही जोडपी सार्वजनिक व्यासपीठांवरून एकमेकांवर टीका करत असतील, उघडपणे एकमेकांचा तिरस्कार करत असतील तर या सगळ्या अत्यंत नाट्यमय वाटाव्या अशा प्रकारांकडे पाहून लोकांना केवळ आश्चर्य वाटतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जॉनी डेप आणि अंबर हर्ड या हॉलिवूडच्या सेलिब्रिटी जोडप्याचा घटस्फोट २०१७ साली झाला होता. तेव्हाही या बातमीने लोकांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलं होतं. पण इतकी वर्षं होऊनदेखील हा खटला संपायचं नाव घेत नाहीये. या दोघांकडूनही एकमेकांवर अत्यंत हीन दर्जाचे खळबळजनक आरोप केले जात आहेत.

 

johnny depp amber heard IM

 

हा खटला सध्या जगभरात लाइव्ह दाखवला जातोय आणि वैश्विक चर्चेचा विषय झालाय. जॉनी डेप आणि अंबर हर्डने घटस्फोट घेण्यामागे नेमकं काय करणं होतं? हे सगळं प्रकरण नेमकं कसं चिघळत गेलं? आणि हा खटला लाईव्ह का दाखवला जातोय? याविषयी जाणून घेऊ.

प्रेमाची टाइमलाईन आणि अवघ्या १५ महिन्यांचा संसार :

२००९ साली जॉनी आणि अंबर ‘द रम डायरी’च्या सेटवर पहिल्यांदा भेटले ज्यात त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यावेळी जॉनी डेप वनेसा पॅरॅडिस हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्या दोघांना लिली रोस आणि जॉन ख्रिस्तोफर नावाची दोन मुलं होती.

२०१२ साली वनेसापासून वेगळं झाल्यानंतर २०१३ साली जॉनीच्या ‘द लोनर रेंजर’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात जॉनीसोबत अंबरही सहभागी झाली होती. २०१४ च्या मार्चमध्ये जॉनीने अंबरसोबत आपला साखरपुडा झाल्याचं सांगितलं होतं.

पुढल्या काही महिन्यांनंतर एका कार्यक्रमात जॉनीने आपल्या या होणाऱ्या बायकोचं भरभरून कौतुक केलं होतं. ३ फेब्रुवारी २०१५ला या दोघांनी लग्नगाठ बांधली.

यानंतर २०१५ सालच्या उन्हाळ्यात अंबरच्या आणि जॉनीच्या पिस्टोल आणि बू नावाच्या यॉर्कशायर टेरीज प्रजातीच्या दोन कुत्र्यांची अंबरने ऑस्ट्रेलियामध्ये बेकायदेशीररित्या तस्करी केल्याचा गुन्हा तिच्यावर दाखल झाला.

 

johnny depp and heard IM

 

त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मेरी क्लेअरशी बोलताना अंबरने जॉनीच्या मुलांची सावत्र आई होण्याचा अनुभव किती विलक्षण आहे हे सांगितलं.

या अनुभवाने आपल्या आयुष्यात नवे रंग भरले असून त्यामुळे ती खूप खुश असल्याचं म्हणाली होती. २०१६ सालच्या जानेवारी महिन्यात एका आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना जॉनी डेपने आपल्याला झेलल्याबद्दल अंबरचे मोठ्यांदा ओरडून आभार मानले होते.

अंबर ज्या तस्करीच्या आरोपाखाली दोषी ठरली होती त्यासंदर्भतला जॉनी आणि अंबरचा एक व्हिडियो एप्रिल २०१६ मध्ये आला होता. या व्हिडियोत या प्रकरणाबद्दल त्या दोघांनी क्वीन्सलँड कोर्टाची माफी मागितली होती.

घटस्फोटाचं कारण :

जॉनी डेपच्या आईच्या मृत्यूनंतर अवघ्या काहीच दिवसांत संसाराला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंबरने मे २३, २०१६ ला अनपेक्षितपणे जॉनीकडून आपल्याला घटस्फोट हवा असल्याचा अर्ज दाखल केला. तिला घटस्फोट हवा असण्यामागे घरगुती हिंसा हे कारण असल्याचं तिने सांगितलं.

जॉनी आणि अंबर एकत्र राहत असताना तो आपल्यावर हिंसा करायचा असा आरोप अंबरने केला. २०१५ साली डिसेंबर महिन्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान आपलं आयुष्य खरोखर धोक्यात असल्याची तिला भीती वाटली होती असंही ती म्हणाली होती.

 

amber heard IM

 

जॉनी स्वतः या सगळ्यावर काहीच बोलला नव्हता. मात्र जॉनीच्या वतीने त्याचा प्रतिनिधी म्हणाला होता, “लग्नाचा अल्पकाळ आणि त्याच्या आईचं इतक्यातच झालेलं दुःखद निधन या दोन बाबी पाहता जॉनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या कुठल्याही चुकीच्या अश्लील गोष्टी, गॉसिप, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांविषयी काहीही बोलणार नाही. या अल्पकाळच्या लग्नाचं प्रकरण पटकन मिटावं अशी आशा आहे.”

जॉनीच्या बचावात त्याचं कुटुंब पुढे आलं. जॉनीची वकिलीण लॉरा वासर हिने जॉनीवर गैरवर्तन केल्याचा आरोप करून अंबर आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतेय असं म्हणणं मांडलं.

अंबरने घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीला मीडियाकडून तिची जी अपकीर्ती झाली त्यामुळेच तिने तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेशासाठी अर्ज दाखल केलाय आणि आर्थिक मागण्या केल्या आहेत असंही जॉनीची वकील म्हणाली.

तर अंबरच्या वकिलाने अंबर ही घरगुती हिंसेची बळी ठरली असून ती पैशांसाठी काहीही करत नाहीये असं म्हटलं. घटस्फोटाचं हे सगळं प्रकरण सुरू असताना जॉनी सातासमुद्रापार त्याच्या ‘हॉलिवूड व्हॅम्पायर्स’ या बॅण्डबरोबर होता. अखेरीस, २०१७ साली या दोघांचा घटस्फोट झाला.

पुढे चिघळलेलं प्रकरण :

घटस्फोट होऊन वर्षं लोटली तरी हे प्रकरण आणि जॉनी आणि अंबरचा एकमेकांवरचा राग शांत होण्याचं नाव घेत नाहीये. २०१८ साली अंबर हर्डने घरगुती हिंसेच्या संदर्भात एक खुलं पत्रं लिहिलं होतं. त्यात तिने जॉनीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र पत्राचा रोख जॉनीकडेच होता.

जॉनीच्या हे लक्षात आलं आणि त्याने अंबरवर मानहानीचा खटला दाखल केला. या दोघांच्या घटस्फोटाचा खटला दोघांनी एकमेकांवर केलेल्या नव्या खळबळजनक आरोप-प्रत्यारोपांसहित पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आहे.

 

johnny depp amber heard divorce IM

 

घटस्फोटाचा हा असा एकमेव खटला आहे जो सध्या पुन्हा नव्याने सुरू होऊन जगभरात लाईव्ह दाखवला जातोय. अमेरिकेतील वर्जीनिया येथे हा खटला सुरू आहे. आपल्याला कल्पनाही करवणार नाही इतक्या खालच्या दर्जाचे आरोप यात केले गेले आहेत.

एकीकडे अंबर जॉनीने आपल्याला मारहाण करणं थांबवावं म्हणून आपण काहीच करू शकलो नाही असं म्हणतेय. तर आपण अंबरला कधीच मारलं नसल्याचं, आपल्या आजवरच्या आयुष्यात आपण कुठल्याच महिलेला मारलं नसल्याचं जॉनी म्हणतोय. अं

बरने आपल्यावर घरगुती हिंसेचा खोटा आरोप केल्यामुळे आपल्या करियरला उतरती कळा लागली असल्याचं जॉनीचं म्हणणं आहे. अंबर आणि जॉनीने एकमेकांवर बरेच सनसनाटी आरोप केले आहेत.

१. जॉनीवर लैंगिक शोषणाचा आरोप :

अंबरचा मानसिक, शारीरिक छळ झाला असल्याचा दावा तिच्या वकिलाने केला असल्याचं समजतंय. समोर आलेल्या वृत्तानुसार, २०१५ साली जेव्हा हे जोडपं ऑस्ट्रेलियात सुट्टीनिमित्त मजा करायला गेलं होतं तेव्हा तिथे जॉनीने अंबरचं लैंगिक शोषण केलं होतं.

२. अंबरवर शारीरिक छळ केल्याचा आरोप :

अंबरने जॉनीवर वोडक्याची बाटली फेकली होती आणि त्यामुळे जॉनीचं मधलं बोट तुटलं होतं असा आरोप जॉनीने अंबरवर केला होता. त्यानंतर जॉनीला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. इतका की, ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपटाच्या ५व्या सिझनमध्ये त्याचं बोट खरं दिसावं म्हणून निर्मात्याला CGI च्या मदतीने ते स्क्रीनवर दाखवावं लागलं होतं असं वृत्त समोर आलं आहे.

अंबरने आपल्या गालावर मुक्का मारल्यामुळे आपल्या गालाच्या हाडावर दुखापत झाली असल्याचा आरोप जॉनीने केला आहे. हताश झाल्यावर, रागावल्यावर अंबर हिंसा करायची, आम्ही दोघं नात्यात असताना जेव्हा जेव्हा मी तिच्यासोबत असायचो तेव्हा नेहमी ती प्यायलेली असायची असे आरोप जॉनीने अंबरवर केले आहेत.

 

johnny depp abuse IM

३. पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल जॉनीने उच्चारले होते अपशब्द :

अंबरच्या वकिलाने डेप आणि त्याचा मित्र बरूच यांच्यातले चॅट्स बाहेर आणले होते. या चॅट्समध्ये जॉनी आपल्या आधीच्या बायकोबद्दल म्हणजेच अंबरबद्दल फार शेलक्या भाषेत बोललाय.

“हर्डचं सडकं प्रेत होंडा सिलिकच्या ट्रकमध्ये असेल याची मला खात्री आहे.” इतक्या गलिच्छ शब्दात जॉनी अंबर हर्डविषयी बोलला होता. जॉनीचा मित्र बरूच याने जॉनी असं बोलल्याचं कोर्टात कबूल केलं असल्याचं समजतंय. मात्र तो आपल्या मित्राचा बचावही करताना दिसला होता.

४. अंबरवर जॉनीच्या बिछान्यावर विष्ठा केल्याचा आरोप :

 

johnny depp couple IM

 

एकदा आपल्या आधीच्या पत्नीने आपल्या बिछान्यावर विष्ठा केली होती असा आरोप जॉनीने केला आहे. जॉनी डेपने कोर्टात सांगितलं की २०१६ साली अंबरच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान त्यांच्यात भांडण झालं होतं. त्यानंतर जॉनीला हे लग्न मोडायचं होतं आणि त्या दोघांच्या असलेल्या घरातून आपलं सामान घेऊन निघून जायचं होतं.

एंटरटेनमेंट विकलीच्या वृत्तानुसार, अंबर त्यावेळी २-३ दिवसांसाठी बाहेर गेली होती. त्यामुळे जॉनी त्या घरी सामान आणायला जाणार होता. मात्र सुरक्षा रक्षकाने तिथे जाण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये असं सांगून तिथे जायला जॉनीला मनाई केली.

जॉनीला खासकरून महत्त्वाचं सामान घ्यायचं होतं. पण सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवलं आणि एक फोटो दाखवला ज्यात जॉनीच्या बिछान्याच्या एका बाजूला एका व्यक्तीची विष्ठा होती.

जॉनीला ही कृती फारच विचित्र वाटली आणि यावर हसण्यापलीकडे काय प्रतिक्रिया द्यावी हे त्याला कळलं नाही.

५. अंबरवर थ्रीसमचा आरोप :

या दोघांच्या चिघळलेल्या प्रकरणात अचानक चक्क एलॉन मस्कने उडी घेतली आहे. अंबरचं आणि एलॉन मस्कचं अफेअर सुरू होतं असा आरोप जॉनीने केला.

२०१६ साली जेव्हा जॉनी डेप ऑस्ट्रेलियाला शूटिंगसाठी गेला होता तेव्हा एलॉन मस्कने त्याच्या फ्लॅटमध्ये अंबर आणि मॉडेल-अभिनेत्री असलेल्या कारा डेलेविंजने बरोबर थ्रीसम केला होता असा आरोप जॉनी डेपने केला होता. एलॉन मस्कने ही वृत्तं निराधार असल्याचं म्हटलं आहे.

 

johhny amber and elon IM

 

जॉनीने अंबरविरोधात ५० मिलियन डॉलर्सचा खटला दाखल केला आहे. त्याबदल्यात अंबरने जॉनीविरोधात १०० मिलीयन डॉलर्सचा खटला दाखल केला आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चाललेल्या या प्रकरणाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

कलाकाराची कला बघून सामान्य माणूस नेहमी भारावून जातो. पण तो कलाकार म्हणून कसा आहे आणि माणूस म्हणून कसा आहे यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो. कलाकाराभोवती कुठलेही वाद नसल्याची, व्यक्तिगत आयुष्यातही तो चांगला माणूस असल्याची फार कमी उदाहरणं पहायला मिळतात.

जॉनी डेप, अंबर हर्ड यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत उत्तमोत्तम चित्रपट दिले. हेवा वाटावा असं यश मिळवलं. मात्र आपल्या व्यक्तिगत आयुष्याची पुरती राखरांगोळी करून घेऊन आपलं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणलं हेच खरं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?