आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जागतिक व्यापाराच्या दृष्टीने विविध उत्पादनांची आयात-निर्यात करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब. एखाद्या देशात ज्या वस्तूंच्या उत्पादनाचे साठे कमी प्रमाणात असतात त्या वस्तू देश काही ठराविक शुल्क देऊन जिथे त्या वस्तू मुबलक प्रमाणात आहेत अशा देशाकडून आयात करतो. निर्यातीच्या बाबतीत हे गणित नेमकं उलट असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जेव्हा एखाद्या देशाकडे काही उत्पादनांचे साठे मोठ्या प्रमाणावर असतात तेव्हा तो देश त्या वस्तू इतर देशांना निर्यात करून देशाकरता चांगली कमाई करतो. आपल्याकडच्या जास्तीत जास्त गोष्टींची निर्यात इतर देशांना करता येणं ही गोष्ट देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने फायदेशीर असते. पण जी उत्पादनं देशात मुबलक प्रमाणात आहेत त्यांचाच देशवासियांना तुटवडा होण्याची परिस्थिती निर्माण झाली तर?
निर्यातीतून मिळणाऱ्या फायद्याचा विचार तेव्हाच करता येणं शक्य होतं जेव्हा एखाद्या उत्पादनाची निर्यात करायला आधी देशाकडे पुरेसा साठा असतो. तो साठाच जर पुरेश्या प्रमाणात नसेल तर ते उत्पादन निर्यात करून इतर राष्ट्रांकडून आपल्या राष्ट्राकरता फायदा मिळवणे या विचाराला काहीही अर्थ राहत नाही. अशा वेळी देशाला आधी स्वतःच्या आणि देशातल्या जनतेचा विचार करावा लागतो.
गहू निर्यातीच्या बाबतीत सध्या भारताची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. जगात भारतीय गव्हाला सोन्याचा भाव आहे. आपण गहू निर्यात करू असं आश्वासन भारताने आधी दिलेलं असताना अचानक सरकारने इतक्यातच गहू निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारने असा निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊ.
गव्हाचं सर्वाधिक उत्पादन करणारं चीननंतरचं दुसरं राष्ट्र असलेल्या भारताने गहू निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे केवळ देशातल्या जनतेलाच नाही तर जगातल्या इतर राष्ट्रांनाही धक्का बसला आहे. फेब्रुवारीत युक्रेनवर झालेल्या आक्रमणानंतर जगभरात गव्हाचा जो तुटवडा निर्माण झाला होता तो भरून काढण्यासाठी मदत म्हणून भारत गव्हाचा पुरवठा करेल अशी भारताची गहू निर्यातीबाबतची आधीची भूमिका होती. एकूण जागतिक निर्यातीमधील १२% निर्यात हीच असणार होती.
या वर्षीच्या आर्थिक वर्षात गव्हाची निर्यात ७ मिलियन टन्सवरून १० मिलियन टन्सपर्यंत वाढवायची अशी आखणी भारताने केली होती.मात्र तसे काही झाले नाही. मागच्याच आठवड्यात गव्हाच्या निर्यातीला चालना देण्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण इजिप्त, तुर्की आणि आणखी ठिकाणी आपल्या प्रतिनिधींचं मंडळ पाठवणार असल्याचं भारताने म्हटलं होतं.
या वर्षीच्या उष्णतेच्या लाटेचा आपल्याच उत्पादनावर आणि खरेदीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी काळजी बऱ्याच तज्ञांनी आणि भागधारकांनी व्यक्त केली होती. त्याकडे दुर्लक्ष करून भारताने खासगी क्षेत्राला वाहत्या गंगेत हात धुवू दिले.
निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीपेक्षा (Minimum Support Price) १०% अधिक किंमत मिळत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र भारतातल्या वाढत्या महागाईने, विशेषतः खाद्यपदार्थांच्या बाबतीतील वाढत्या महागाईने भारताला आपल्या या धोरणाचा पुनर्विचार करायला भाग पाडलं.
उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय आणि यामुळे पुढल्या वर्षीच्या साठ्यावर परिणाम होऊ शकतो. युद्धाची अनिश्चितता कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. अशात महागाई केवळ वाढतच राहू शकते. मार्चमध्ये गहू सर्वाधिक म्हणजेच १४.०४ % महागले. वाढत्या महागाईमुळे आपल्याच प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला पुरेसं अन्न मिळतंय की नाही हे बघणं आधी महत्त्वाचं आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतातल्या काही भागांमध्ये गहू आणि पिठाच्या किंमती २० ते ४० टक्क्यांनी महागल्या असल्याचं वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी सोमवारी सांगितलं.
जागतिक पातळीवर किमतींमध्ये झालेली तीव्र वाढ पाहून काही शेतकरी सरकारऐवजी व्यापाऱ्यांना विक्री करत होते. या सगळ्यामुळे देशातल्या लाखो गरजू कुटुंबांना देण्यासाठी आणि संभाव्य दुष्काळ टाळण्यासाठी आपण देशवासियांसाठी राखीव ठेवलेल्या पैशांबाबत सरकारच्या मनात चिंता निर्माण झाली. पँडेमिकमुळे आधीच हे पैसे कमी झाले आहेत.
गहू निर्यातीवर बंदी घालण्याविषयी बोलताना बंगलोरच्या ‘डॉ. बी. आर. आंबेडकर स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू एनआर भानूमुर्थी म्हणाले, “महागाई, विशेषतः खाद्यपदार्थांच्या बाबतीतली आपल्या नियंत्रणापलीकडे गेलेली महागाई हे सरकारच्या दृष्टीने चिंतेचं कारण आहे. किमतीबाबतची फारच जास्त अस्थिरता स्वीकारार्ह नाही.
देशांतर्गत बाजारातल्या किंमती तशाही वाढल्याच आहेत. बंदी घातल्यामुळे या किंमती कमी होणार नाहीत मात्र किमान वर्तमान पातळ्यांवर तरी राहतील. शेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही. (निर्यातीमुळे त्यांना जेवढी कमाई करणं शक्य झालं असतं तेवढी).”
१६ मे ला जेव्हा मार्केट्स उघडले तेव्हा बंदीमुळे जागतिक पातळीवर गव्हाच्या किंमती ६ टक्क्यांनी वाढल्या. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गव्हाच्या किंमती ४-५ टक्क्यांनी कमी झाल्या. किंमतीवर झालेला असा थेट परिणाम दिसल्यानंतरही काही जणांच्या मते बंदीचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
गव्हाचं उत्पादन १११ मिलियन मेट्रिक टन्स असल्याचा अंदाज आधी वर्तवला गेला होता, मात्र सुधारित मूल्यांकनानुसार हे उत्पादन त्यापेक्षा कमीही असू शकतं. निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यामागे हे एक कारण आहे. काही तज्ञांच्या मते अतिरिक्त उत्पादनाचं चुकीचं चित्र निर्माण केलं गेलं होतं ज्यामुळे धोरणाविषयीच्या निर्णयांमध्ये चूक झाली.
सरकारने बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाब ही राज्यं वगळता ज्या ज्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गव्हाचं उत्पादन होतं तिथल्या स्थानिक बाजारांमधल्या गव्हाच्या घाऊक किंमतीमध्ये चांगलीच घट झाली आहे.
–
महागाईने दिला या राज्यांना सर्वाधिक दणका!! महाराष्ट्र कोणत्या नंबरवर आहे जाणून घ्या
यूपीवर आधी ताशेरे ओढले आता कौतुक; राज ठाकरेंच्या बदललेल्या मतांमागची कारणं
–
कोरोना, त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध अशी एकावर एक संकटं जगावर कोसळत असताना आताच्या उष्णतेच्या लाटेने देशाची आणि देशाबाहेरची एकूणच परिस्थिती आणखीनच बिकट करून ठेवली आहे असंच म्हणावं लागेल.
जगातिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक उलाढालीचं स्वरूप प्रचंड गुंतागुंतीचं असेल यात वादच नाही. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसं इतकी वैतागली आहेत की त्यांना किमान रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किंमतीमध्ये तरी घट व्हायला हवी आहे. भानुमूर्थी यांनी म्हटल्याप्रमाणे या बंदीच्या निर्णयामुळे देशाला फायदा झाला नाही तरी नुकसान मात्र होऊ नये इतकीच अपेक्षा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.