आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदी सिनेमात किंवा सध्याच्या ओटीटी मध्ये दिसणारी गुन्हेगार पात्र लेखकांना कशी सुचत असतील? हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमीच पडत असतो. बहुतांश लोक सरळ मार्गाने वागत असणाऱ्या या समाजातील काही लोक विकृत मनोवृत्तीने वागणारे का दाखवले जातात? याबद्दल आश्चर्य वाटणं हे स्वाभाविक आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जर आपण आपला इतिहास लक्षपूर्वक वाचला तर लक्षात येतं की, भारताच्या इतिहासात जसे शूर सेनानी, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत तसेच ‘ठग बेहराम’ सारखे काही गुन्हेगार – ‘सिरीयल किलर’ सुद्धा होऊन गेले आहेत जे की आज पडद्यावर दिसणाऱ्या विकृत पात्रांमागची प्रेरणा असू शकतात.
१७ व्या शतकात या गुन्हेगाराने आपली अशी दहशत लोकांमध्ये पसरवली होती की, त्याचं नाव ऐकून सुद्धा लोकांचा थरकाप व्हायचा. मध्यप्रदेश मधील जबलपूर येथे जन्मलेला ठग बेहराम हा त्या काळात पैशांसाठी लोकांचा अक्षरशः रुमालाने गळा कापायचा हे आज सांगूनही खरं वाटणार नाही.
इंग्रजांच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या भारतीय जनतेत ठग बेहरामची दहशत ही अतिरिक्त डोकेदुखी होऊन बसली होती. इतकंच नाही तर काही इंग्रज अधिकारीसुद्धा ठग बेहरामच्या अत्याचाराला बळी पडले होते.
कोणताही कुख्यात गुन्हेगार हा दगड, चाकू, पिस्तुल यांच्या सहाय्याने लोकांचा जीव घेतल्याचं आपण ऐकत आलो आहोत. पण, ठग बेहराम या माणसाने केवळ हातरुमाल वापरून ९३१ लोकांना ठार मारलं हे ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठग बेहरामच्या दुष्कृत्यांची ओळख ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सुद्धा घेतली होती.
कोण होता हा ठग बेहराम? तो का गुन्हेगार का झाला होता? इंग्रजांनी त्याच्या गुन्ह्यांवर अंकुश कसा लावला? हे कुतूहल आणि सतर्कता म्हणून जाणून घेऊयात.
१७६५ मध्ये जबलपूर येथे जन्म झालेला हा चोर लहानपणी ‘बुराम’ या नावाने ओळखला जायचा. सईद आमिर अली या त्याच्यापेक्षा २५ वर्षाने मोठ्या दरोडेखोराच्या तो संपर्कात आला आणि या चुकीच्या संगतीमुळे तो गुन्हेगार बनत गेला अशी माहिती उपलब्ध आहे.
–
- स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१
- १८५७च्या तब्बल १० वर्ष आधी इंग्रजांना आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकाची थक्क करणारी कहाणी
–
सईद आमिर अली या गुन्हेगाराने बेहरामला त्याच्या वयाच्या दहाव्या वर्षी पिस्तुल चालवणं शिकवलं आणि त्याच्या मनात या जगाबद्दल एक उत्सुकता निर्माण केली. ही उत्सुकता वयानुसार वाढत गेली आणि वयाच्या २५ व्या वर्षी तो एक अट्टल गुन्हेगार झाला. बेहरामच्या नावाच्या आधी ‘ठग’ हा शब्द लागला. लोकांना फसवणे, त्यांचे पैसे लुबाडणे आणि नंतर त्यांचा जीव घेणे हा त्याचा नित्यक्रम झाला होता.
‘बंटी और बबली’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे बेहरामच्या दुष्कृत्यात ‘डॉली’ नावाची एक मुलगी सुद्धा त्याची साथ द्यायची. पण नंतर पैसे वाटपामुळे दोघांमध्ये वाद झाले आणि ते विभक्त झाले.
ठग बेहरामच्या प्रत्येक गुन्ह्यांमध्ये एक साम्य होतं की, तो नेहमी पिवळ्या रंगाचा रुमाल वापरायचा. आपल्या रुमालात तो एक नाणं ठेवायचा आणि तो रुमाल तो सामान्य माणसाच्या गळ्याभोवती आवळून त्यांना जीवे मारायचा.
ठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची. श्रीमंत व्यापारी, पर्यटक, यात्रेकरू लोक हे यांचं लक्ष्य असायचे. स्त्रिया, देवभक्त, कुष्ठरोगी लोकांना ते कधीच त्रास द्यायचे नाहीत.
ठग बेहराम आणि त्यांच्या टोळीची माहिती इंग्लंडपर्यंत पोहोचली होती. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांनी ५ पोलीस अधिकाऱ्यांना जबलपूर येथे चौकशीसाठी पाठवलं होतं. पण, ठग बेहरामची टोळी तोपर्यंत इतकी शक्तिशाली झाली होती की त्यांनी या पाचही पोलीस अधिकाऱ्यांचा खात्मा केला होता. ब्रिटिश या घटनेने इतके हादरून गेले होते की, त्यांनी ठग बेहरामचा बंदोबस्त करण्यासाठी विलियम हेनरी स्लिमन या सैनिकाला भारतात पाठवलं होतं.
१८२२ या वर्षी ‘स्लिमन’ला मध्यप्रदेश मधील नरसिंहपूर ‘मॅजिस्ट्रेट’ पदावर बसवण्यात आलं होतं. त्याने या पदावर असतांना ठग बेहरामने पूर्ण मध्यप्रदेश पालथा घातला होता, पण त्याला ठग बेहराम किंवा त्याच्या टोळीचा कोणताही सुगावा लागत नव्हता.
एकदा स्लिमनला सईद आमिर अली आणि ठग बेहराम यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली होती. पण, पोलीस ताफा तिथे पोहोचेपर्यंत ही टोळी तिथून निसटली होती. त्या जागेवर असलेल्या सईद आमिर अलीची आई आणि इतर नातेवाईक होते ज्यांना पोलिसांनी अटक केली होती.
१८३२ पर्यंत पोलीस आणि ठग बेहराम यांच्यात अशीच चकमक सुरू राहिली. शेवटी सईद आमिर अली याने आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा जीव वाचवण्यासाठी ठग बेहरामच्या ठिकाणांची माहिती इंग्रजांना दिली. १८३८ पर्यंत ठग बेहराम तरीसुद्धा पोलिसांना चकवत होता. पण, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो वयाच्या ७३ व्या वर्षी तो पोलिसांना शरण गेला.
ठग बेहरामने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि सांगितलं की, त्याने स्वतः १५० लोकांचा खून केला आहे आणि त्यांच्या टोळीने मिळून पिवळ्या रुमालाने एकूण ९३१ लोकांची हत्या केली आहे.
१८४० मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांची या प्रकरणावरील चौकशी पूर्ण झाली आणि त्यांनी ठग बेहराम आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावली. जबलपूर येथे बेहरामला झाडाला लटकून फाशी देण्यात आली. स्लिमनने आपला बदला पूर्ण केला आणि त्याने बेहरामच्या साथीदारांची सुधारणा केंद्रात रवानगी केली.
स्लिमन हा जरी इंग्रज अधिकारी असला तरी भारतीय लोकांमध्ये तो ठग बेहरामला मारण्यामुळे तो लोकप्रिय झाला होता. मध्यप्रदेश मधील स्लिमंदाबाद या गावाचं नाव हे स्लिमनच्या नावाने देण्यात आलं आहे.
ठग बेहराम आणि त्याची टोळी ही कालिमाताचे भक्त होते आणि म्हणून ते लोकांचा बळी द्यायचे असं माईक डॅश यांनी लिहिलेल्या ‘ठग – द स्टोरी ऑफ इंडिया’ज् मर्डरस कल्ट’ या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. पण, ठग बेहरामने स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या या कृत्यांना दिलेला धार्मिक रंग हा लोकांना तेव्हाही पटला नव्हता आणि आजही पटणार नाही.
२०१८ मध्ये रिलीज झालेला आमिर खानचा ‘ठग्स् ऑफ हिंदुस्तान’ हा ठग बेहराम या निर्दयी मनुष्याच्या आयुष्यावर बेतलेला असल्याचं काही जाणकारांचं मत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.