Site icon InMarathi

वयाच्या ११ व्या वर्षापासून युद्धभूमीत गर्जणारा पंजाबचा वाघ : महाराजा रणजीत सिंह!

maharaja-ranjit-singh-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

आपल्या देशाचा इतिहास हा जेवढा मोठा आहे तो तेव्हढाच प्रगल्भ देखील आहे. आपल्या देशाचा कानाकोपरा हा इतिहासातील शूर वीरांची साक्ष देतो. असे महावीर ज्यांच्या शौर्याच्या गाथा भारतातच नाही तर संपूर्ण जगात गायिल्या जातात. ज्यांनी त्यांच्या राज्यात महान कामगिरी बजावली, मग ते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा चक्रवर्ती सम्राट अशोक. महाराजा रणजीत सिंह हे देखील त्यापैकीच एक…

महाराजा रणजीत सिंह यांच्याबद्दल आपल्या मराठी लोकांना फारशी माहिती नाही. त्यांचे शौर्य आणि कर्तुत्व अगाध आहे. अगदी लहान वयातच हाती आलेलं साम्राज्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कसं उत्तमरीत्या संभाळलं ते खरंच जाणून घेण्यासारखं आहे. आज आम्ही तुमच्यासमोर त्यांच्या कारकीर्दीचा संक्षिप्त आढावा मांडत आहोत, जो त्यांची महती वर्णण्यास पुरेसा ठरेल.

महाराजा रणजीत सिंह हे शीख साम्राज्याचे राजा होते. ते शेर-ए पंजाबच्या नावाने खुप प्रसिद्ध आहेत. ते एक असे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या पंजाब राज्याला सशक्त तर बनवलेच त्यासोबतच ते जिवंत असे पर्यंत त्यांनी इंग्रजांना आपल्या राज्याच्या जवळपास फिरकूही दिले नाही.

रणजीत सिंह यांचा जन्म १३ नोव्हेंबर १७८० रोजी गुंजारवाला येथे झाला होता. त्यांचे वडील महासिंह सुकरचकिया साम्राज्याचे सरदार होते. रणजीत सिंहांच्या आईचे नाव राजकौर होते. लहान असतानाच त्यांना देवीचा रोग झाला होता, त्यामुळे त्यांना डाव्या डोळ्याने दिसत नव्हते.

त्यांच्या शिक्षणाची कोणतीच व्यवस्था न झाल्याने ते अशिक्षितच राहिले.

पण तरी रणजीत सिंह हे घोड्याची स्वारी करणे, तलवार चालवणे तसेच युद्ध करण्याच्या विद्येमध्ये निपुण होते. ११ वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमेवर जाण्यास सुरुवात केली होती.

 

nationalviews.com

१३ वर्षाचे असताना पहिल्यांदा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हशमत खा याने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रणजीत सिंहानी आपला बचाव करताना त्यालाच ठार केले.

१७९२ मध्ये त्यांचे वडील महासिंह यांचा मृत्यू झाला आणि छोट्या वयातच ते सैन्याचे सरदार झाले. १६ वर्षाचे असताना त्यांचा विवाह महतबा कौर या कन्येशी झाला. त्यांची सासू सदाकौर हिच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी रामगादिया राज्यावर आक्रमण केले, परंतु ते त्यामध्ये पराभूत झाले. १७ वर्षाचे असताना त्यांनी सर्व कारभार स्वत:च्या हाती घेतला.

ई.१७९८ मध्ये अफगाणिस्तानचा शासक जमानशाहने लाहोरवर आक्रमण केले आणि खूप सहजरीत्या विजय मिळवला परंतु त्याचा सावत्र भाऊ महमूद याच्या विरोधामुळे जमानशाहला तातडीने काबुलला परतावे लागले. परत येताना त्याची काही तोफे झेलम नदीमध्ये पडली.

रणजीत सिंहानी ही तोफे सुरक्षित काबुलला पाठवली. यावर जमानशाह खूप प्रसन्न झाला आणि त्याने रणजीत सिंहांना लाहोरवर शासन करण्याची परवानगी दिली. शेवटी रणजीत सिंहानी लाहोरवर आक्रमण केले आणि ७ जुलै १७९९ मध्ये लाहोरवर विजय प्राप्त केला.

 

topyaps.com

लगेचच रणजीत सिंहांनी पंजाबच्या अनेक प्रांतांमध्ये आपली विजयीपताका फडकावली. १८०३ मध्ये त्यांनी अकालगढ, १८०४ मध्ये कसूर तसेच झंगवर, १८०५ मध्ये अमृतसरवर विजय संपादित केला.

अमृतसरच्या विजयामुळे पंजाबची धार्मिक तसेच अध्यात्मिक राजधानी रणजीत सिंहांच्या ताब्यात आली. १८०९ मध्ये त्यांनी गुजरात देखील आपल्या साम्राज्यात सामावून घेतले.

रणजीत सिंह सतलजच्या पलीकडे असलेल्या प्रदेशांवर सुद्धा अधिकार गाजवण्यास उत्सुक होते. १८०६ मध्ये २०,००० सैनिकांसमवेत त्यांनी सतलज नदी पार केली आणि दोलाघी गावावर विजय मिळवला.

पटियाला नरेश साहिब सिंह याने रणजीत सिंहांची मध्यस्थी स्वीकार करून त्यांना खूप सारे धनद्रव्य भेट दिले. परत येताना त्यांनी लुधियानावर सुद्धा विजय मिळवला. १८०७ मध्ये पुन्हा सतलज पार करून त्यांनी नारायणगढ, जीरा बदनी, फिरोजपुर इत्यादी प्रदेशांवर आपले आधिपत्य प्रस्थापित केले.

रणजीत सिंहाच्या या विजयी घौडदौडीला घाबरून सतलज पलीकडील शीख राजवटींनी ब्रिटिशांकडून संरक्षण मागितले. यावर गवर्नर जनरल लॉर्ड मिंटो याने सर चार्ल्स मेटकाफ याला रणजीत सिंहाशी करार करण्यासाठी पाठवले.

पहिल्यांदा रणजीत सिंह करारासाठी तयार झाले नाहीत, परंतु जेव्हा लॉर्ड मिंटो याने सैनिक तुकडी पाठवून धमकी दिली तेव्हा मात्र प्रजेसाठी नाईलाजाने त्यांना झुकावेच लागले. अखेर  २५ एप्रिल १८०९ मध्ये रणजीत सिंहानी ब्रिटिशांशी करार केला, हाच अमृतसर करार म्हणून ओळखला जातो.

 

topyaps.com

जेव्हा १८०९ मध्ये अमरसिंह थापाने कांगडावर आक्रमण केले, तेव्हा कांगडाचे शासक संचारचंद्रच्या विनंतीखातर रणजीत सिंहानी एक विशाल सेना कांगडा राज्यात पाठवली. शिखांच्या प्रचंड सेनेला बघून अमरसिंह थापा पळून गेला. आणि १८०९ मध्ये कांगडा दुर्ग रणजीत सिंहांच्या ताब्यात गेला.

१८१८ मध्ये रणजीत सिंहानी मिश्र दिवानचंद आणि खड्गसिंहला मुल्तानवर विजय मिळवण्यासाठी पाठवले. तथापि, मुल्तान शासक मुजफ्फर खा याने शीख सैन्याला वीरासारखा लढा दिला, परंतु त्याला पराजय पत्करावा लागला आणि अखेर मुलतान देखील शिखांच्या अधिपत्याखाली आले.

रणजीत सिंहानी अतिशय चातुर्याने १८३१ मध्ये कटकवर विजय मिळवला. तत्कालीन कटकचा गवर्नर जहादांद याला एक लाख रुपयाची रक्कम देऊन त्यांनी जास्त कष्ट न घेता कटक आपल्या ताब्यात घेतले.

१८१९ मध्ये रणजीत सिंहानी मिश्र दिवानचंद याच्या नेतृत्वाखाली विशाल सेना काश्मीरवर विजय मिळवण्यासाठी पाठवली. काश्मीरमध्ये अफगाण शासक जब्बार खा याने शीख सेनेशी लढा दिला, परंतु त्याला पराजयाचे तोंड पाहावे लागले.

काश्मीरच्या विजयानंतर १८२०-२१ मध्ये रणजीत सिंहानी डेरागाजी खा, इस्माइलखा आणि बन्नू हे प्रांत देखील हस्तगत केले.

 

sikh-heritage.co.uk

१८२३ मध्ये रणजीत सिंहानी पेशावरवर विजय मिळवण्यासाठी एक विशाल सेना पाठवली. शिखांनी जहांगीर आणि नौशहराच्या लढायांमध्ये पठाणांना हरवले आणि पेशावरवर शीख पताका फडकावली. १८३४ मध्ये पेशावर पूर्णपणे शीख साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आले.

१८३६ मध्ये शीख सेनापती जोरावर सिंह याने लद्दाखवर आक्रमण केले आणि लद्दाखी सेनेला हरवून लद्दाखवर अधिकार प्रस्थापित केला. मात्र त्यानंतर ३ वर्षांतच म्हणजे १८३९ साली या रणजीत सिंह नामक महान योद्ध्या काळाच्या पडद्याआड गेला.

शीख साम्राज्याचा या महान संस्थापकास मनाचा मुजरा!

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version