ज्या प्रश्नावर नवनीत राणा गडबडल्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तरी ठाऊक आहे का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हनुमान चालीसाच्या वादामुळे राजकारण अद्याप तापलेलं आहे. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना शिवसैनिकांकडून विरोध झाला. पोलिसांनीही त्यांना अटक करून १४ दिवस तुरुंगात ठेवल्यांनंतरही या दांपत्याने तुरुंगातून बाहेर पडल्यावर दिल्लीला जाऊन हनुमान चालीसाचं पठण केलं. त्यांच्या या कृतीमुळे सध्या एकच गहजब उडाला आहे.
एका वृत्त वहिनीला मुलाखत देताना नवनीत राणा यांना “हनुमानाला हनुमान हे नाव कसं पडलं?” असा प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न ऐकून त्या पुरत्या गोंधळल्या आणि हा प्रश्न त्यांना पुन्हा विचारला गेल्यावरही त्याचं उत्तर न देता काहीतरी वेगळंच म्हणून हसून वेळ मारून नेल्याचा व्हिडियो सध्या सगळीकडे चांगलाच व्हायरल होतोय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
भगवान हनुमान प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते हे आपण सगळेच जाणतो. सामर्थ्यशाली असे हनुमान रामाच्या सेवेला नेहमीच तप्तर असायचे. हनुमानाला पौराणिक दृष्ट्या किती महत्त्व आहे हे आपल्याला माहितीये. पण ज्या हनुमानाविषयी आपण लहानपणापासून ऐकलंय त्या हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव कसं मिळालं या प्रश्नाचं उत्तर नवनीत राणा यांच्याप्रमाणेच कदाचित आपल्यालाही ठाऊक नसेल. जाणून घेऊ त्याविषयी!
पाच पांडवांपैकी एक असलेला भीम हनुमानाचा भाऊ होता असे म्हटले जाते. श्रीरामांच्या हनुमानावरील प्रेमाची साक्ष पटवणारी एक कथा आहे. हनुमान एकदा सीतेला शेंदूर लावताना पाहतो. शेंदूर लावण्यामागचे कारण तिला विचारल्यावर ती ते श्रीरामांवरच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आणि त्यांचा मान राखण्यासाठी लावत असल्याचं सांगते. हे पाहिल्यावर एकदा रामाची आठवण आल्यावर हनुमानानेदेखील आपल्या अंगभर शेंदूर लावला होता. हनुमान ब्रह्मचारी होता असं म्हणतात. मात्र हनुमानाच्या घामातून त्याचा पुत्र जन्मला होता असंही म्हटलं जातं. ‘मकरध्वज’ असं त्याचं नाव होतं.
‘हनुमान’ या नावाची व्युत्पत्ती :
बजरंगबली, महावीर, पवनपुत्र अशी अनेक नावं हनुमानाला आहेत. हनुमानाच्या आईचं नाव अंजनी होतं त्यामुळे त्याला अंजनेय आणि ‘ब्रह्माण्डपुराणा’त सांगितल्याप्रमाणे त्याच्या वडिलांचं नाव केसरी होतं त्यामुळे त्याला केसरीनंदनही म्हणतात. पण ‘हनुमान’ या नावाची व्युत्पत्ती कशी झाली हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.
वैदिक साहित्यात हनुमानाचा उल्लेख आढळत नाही. डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, पार्जीटर, शिवशेखर मिश्र या अभ्यासकांचं मत आहे की हनुमंत हा शब्द तामिळ शब्दाचे संस्कृत रूप असावे. द्रविड शब्दाचं संस्कृत रूप बनवताना सुरुवातीला ‘ह’कार जोडण्याची पद्धत असते. हनुमंत हे ‘आणमंदि’ या तामिळ शब्दाचं संस्कृत रूप आहे.
‘आण’ म्हणजे वानर तर ‘मंदि’ या शब्दाचा अर्थ नर असा होतो. ‘हनुमान’ या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ म्हणजे ज्याचं मुख बिघडलेलं आहे अशी व्यक्ती! हनुमानाला तामिळ भाषेत ‘अनुमंद’ असे म्हणतात. या शब्दावरूनच ‘हनुमंत’ हा शब्द आला. पण द्राविडी भाषांचे तज्ञ असलेले विसाव्या शतकातले भाषाशास्त्री मरे इमानु यांच्या मतानुसार संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीलाच उद्देशून वापरला जातो. वानराला उद्देशून नाही.
केमिली बुल्के यांनी त्यांच्या ‘रामकथा : उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात मध्य भारतातील आदिवासी जमातीचा देव हनुमान असल्याचं म्हटलंय.
उरांव आणि मुंड या छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या आदिवासींमध्ये वानर असा अर्थ असलेली हलमान, गडी, तिग्गा, बजरंग ही गोत्रं सापडतात. बसौर, खुंगार, रेद्दी, भना, बरई या जातींमध्येदेखील वानरसूचक गोत्रं आढळतात. सिंगभूम इथले भुईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज आहोत असं म्हणतात.
‘हनुमान’ या नावामागची रोचक कथा :
हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे अंजनी या वानरीच्या पोटी झाला. अंजनीचा तो पहिलाच मुलगा असल्यामुळे आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. हनुमानाला अनेक शक्ती जन्मजातच प्राप्त झाल्या होत्या. हनुमानाला ‘हनुमान’ हे नाव पडण्यामागे एक रोचक कथा आहे.
हनुमानाची आई अंजनी हिने त्याला तो पिकलेली फळे खाऊ शकतो असे सांगितले होते. एकदा हनुमानाची आई फळं आणण्यासाठी त्याला आश्रमात सोडून गेली होती. लहानग्या हनुमानाला भूक लागली आणि त्याला चक्क सूर्यच फळ आहे असं वाटलं. सूर्य फळ आहे असा गैरसमज झाल्यामुळे आपल्याजवळ असलेल्या शक्ती वापरून सूर्याला पकडायला सूर्याच्या दिशेने हनुमानाने उड्डाण केलं.
हनुमान लहान आहे, त्याला कळत नाही असं सूर्याला वाटलं. त्यामुळे आपल्या सूर्यप्रकाशाने त्याने हनुमानाला जळू दिले नाही. सूर्यालाच जर हनुमानाने पकडलं तर पृथ्वीवरची जीवसृष्टी कशी चालेल अशी भीती इंद्रदेवाला वाटली.
इकडे हनुमान सूर्याला पकडायला गेला होता त्याच वेळी राहुला सूर्याला ग्रहण लावायचं होतं. इंद्रदेवाने आपली भूक शमवण्यासाठी राहुला सूर्य आणि चंद्र दिले होते अशी आख्यायिका आहे.
अमावस्येच्या दिवशी राहू सूर्याला गिळण्यासाठी गेलेला असताना हनुमान तिथे आला होता. हनुमानाने राहुला स्पर्श केला. हा दुसरा राहू आहे असं वाटून राहू घाबरून तिथून पळून गेला आणि इंद्राजवळ जाऊन त्याने त्याला जो दुसरा राहू वाटला होता त्याची म्हणजेच हनुमानाची तक्रार केली. हे सगळं ऐकून इंद्रदेव घाबरले आणि ते राहुला घेऊन सूर्याकडे गेले.
राहूला तिथे पाहिल्यावर हनुमानाने त्याला मारायलाच सुरुवात केली. आपलं रक्षण करा अशी राहूने इंद्रदेवाकडे याचना केली. त्यानंतर इंद्राने हनुमानाच्या हनुवटीवर वज्राने वार केला. यामुळे हनुमान बेशुद्ध होऊन एका पर्वतावर पडला. इंद्रदेवाचे वडील असलेले वायुदेव इंद्रदेवाचं हे कृत्य पाहून प्रचंड रागावले.
वायुदेवाने आपला वेग थांबवला. इथे वाराच थांबल्यामुळे सगळ्या प्राणीमात्रांची तारंबळ उडाली. आपल्याला घड श्वास का घेता येत नाहीये हे त्यांना कळेनासं झालं. एकेक करून त्यांचे प्राण जाऊ लागले. या सगळ्या परिस्थितीमुळे यक्ष, किन्नर, सूर, असूर सगळे जण ब्रह्मदेवाकडे गेले.
वायुदेवाचा राग शांत करण्यासाठी ब्रह्मदेव त्यांना वायुदेवाकडे घेऊन गेले. इकडे हनुमानाला शुद्धीवर आणून वायुदेव त्याला आपल्या कुशीत घेऊन बसला होता. वायुदेवाने मग पुन्हा वारा सुरू केला आणि सगळे प्राणीमात्र पूर्वीसारखे झाले. हनुमानाच्या हनुवटीवर वार झाल्यामुळे त्याला ‘हनुमान’ असे नाव मिळाले.
—
- हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय
- नवनीत राणा, वादग्रस्त फोटो ते शिवसेनाच्या नेत्याशी घेतलेला पंगा…
—
मग देवांनी हनुमानाला वेगवेगळे आशीर्वाद दिले. ब्रह्मदेव म्हणाला की कुठलेही शस्त्र त्याला इजा पोहोचवू शकत नाही. आपल्या तेजाचा शतांश सूर्यदेवाने त्याला दिला आणि रहस्य जाणून घेण्याचाही आशीर्वाद दिला. यमदेवाने त्याला निरोगी आणि अवध्य राहण्याचा आशीर्वाद दिला. पाश आणि पाण्यापासून त्याचं नेहमी रक्षण होईल असा आशीर्वाद वरूणदेवाने त्याला दिला. त्याचं शरीर वज्रापेक्षाही कठीण असेल असे इंद्रदेव म्हणाला. यक्षराज कुबेर, विश्वकर्मा या देवतांनीदेखील त्याला वर दिले.
देवदेवतांची मनोभावे पूजा करणारे असंख्य लोक असतात. मात्र आश्चर्य हे की अशा देवदेवतांबद्दल इतर पुष्कळ माहिती असलेल्या अनेकांना त्यांच्या नावामागच्या अशा सुरस कहाण्या बऱ्याचदा माहीत नसतात.
अशा कहाण्या जाणून घेऊन आपल्याला केवळ माहितीच नाही तर विरंगुळाही मिळतो. आपण काही अशा कहाण्या स्वतःहून शोधायला जाणार नाही. पण जर अचानक त्यांची माहिती समोर आली तर ती अवश्य ऐकूया किंवा वाचूया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.