“भारतीयांची ब्रेकफास्टची सवय बदलू” असं म्हणणारं केलॉग्ज आज स्वतः उपमा विकतंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ब्रेकफास्ट म्हणजेच न्याहारी करण्याला जगभरात सगळीकडेच महत्त्व आहे. शिक्षणासाठी, कामाला बाहेर पडण्यापूर्वी सकाळी भरपेट नाश्ता करून गेलं म्हणजे दुपारी उशीरापर्यंत भूक लागत नाही. सकाळी लवकर खाल्लेला आहार चांगला पचतो आणि दिवसभरासाठी बरीच ऊर्जा देतो.
पोहे, उपमा, पराठे, इडली-डोसा हे आणि असे बरेच पोटभरीचे पदार्थ नाश्त्याला खाण्याची भारतात पूर्वापार पद्धत आहे. आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला झटपट नाश्ता करायचा असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्यामुळे पॅक्ड इन्स्टंट पदार्थ, ओट्स, अंडी असे सोप्या आणि कमी वेळात बनणारे पदार्थ खाण्यावर आपला भर असतो. तरी आजही आपल्या पारंपरिक नाश्त्याच्या पदार्थांचं महत्त्व कमी झालेलं नाही.
बऱ्याच वर्षांपूर्वी केलॉग्जचे कॉर्न फ्लेक्स आल्याचं आपल्याला नक्कीच आठवत असेल. आपल्या नाश्त्याच्या पदार्थांना पर्याय म्हणून हे कॉर्न फ्लेक्स भारतात आले होते.
नेहमीच्या नाश्त्याच्या पदार्थांपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून या कॉर्न फ्लेक्सची त्यावेळी काही काळ क्रेझही होती. पण नंतर जाहिरातीच्या मानाने त्यांचा तितकासा दर्जा नाही आणि किंमतही अवाजवी आहे हे लक्षात आल्यावर अनेकांनी हे केलॉग्ज कॉर्न फ्लेक्स घेणं बंद केलं.
केलॉग्ज कंपनी भारतात आल्यांनतर या कंपनीने आपल्या या फ्लेक्स द्वारे आपण भारतीयांची ब्रेकफास्टची सवय बदलू असं विधान केल्याचं आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल. हे विधान अर्थातच खरं ठरलं नसून भारतात स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याचा केलॉग्जचा प्रयत्न पुरता फसला असल्याचं दिसून आलंच आहे.
भारतात येऊन १० वर्ष झाल्यानंतर भारतीयांच्या ब्रेकफास्टची सवय बदलू असं म्हणणाऱ्या केलॉग्ज कंपनीवर चक्क भारतीयांचाच उपमा विकण्याची वेळ आली. त्यानंतर यावर एक मिमही केलं गेलं होतं.
सध्या पुन्हा एकदा हे मिम तुफान व्हायरल होतंय. यानिमित्ताने, केलॉग्ज कंपनी भारतात आल्यानंतरचा तिचा सुरुवातीचा प्रवास, कंपनीला आलेलं अपयश आणि कंपनीने पुन्हा स्वतःची घडी बसवणं याविषयी जाणून घेऊ.
‘केलॉग्ज’ कंपनी भारतात कशी आली?
ब्रेकफास्टच्या बाबतीत केलॉग्ज हा जगभरात चांगलाच स्थिरस्थावर झालेला ब्रँड आहे. मूळच्या अमेरिकन असलेल्या या कंपनीने ८० च्या दशकात अमेरिकेतला ४०% बाजार व्यापला होता.
त्यावेळी १८ देशांमध्ये ही कंपनी होती. पण आपल्या मुख्य बाजारात आपली फार प्रगती होणार नाही हे ९० च्या दशकात कंपनीच्या लक्षात आल्यावर अमेरिकन आणि युरोपियन देशांपलीकडे त्यांनी आपला विस्तार करायचं ठरवलं.
ज्या देशांमध्ये त्यांनी आपला विस्तार केला त्यातलाच एक देश म्हणजे भारत. त्यावेळी भारताची लोकसंख्या ९५० मिलियनपेक्षा जास्त होती त्यामुळे साहजिकच भारतात त्यांना बराच मोठा ग्राहकवर्ग तयार करता येणं शक्य होतं.
यातल्या अगदी २% ग्राहकांनाही कंपनीकडे खेचून आणण्यात केलॉग्ज यशस्वी झाली असती तरी अमेरिकेतल्या त्यांच्या मिळकतीपेक्षाही जास्त पैसे त्यांना कमावता येणार होते.
१९९१ मध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे दूर केल्यामुळे केलॉग्जच्या दृष्टीने आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी भारत हा सर्वार्थानेच उत्तम पर्याय होता.
९०च्या दशकातले भारतीय गरमगरम आणि आपल्या प्रांतात नाश्त्यासाठी बनणारे पदार्थ खायचे. त्यावेळी भारतात पदार्थ झटपट तयार करून ते खाण्याची पद्धत रुळली नव्हती. पण शहरीकरणामुळे सगळ्यांचीच आयुष्य प्रचंड व्यस्त झाली, जीवनशैलीत खूप बदल झाला.
त्यामुळे आपल्या सोयीनुसार झटपट पदार्थ तयार करून ते नाश्त्याला खाण्याची गरज निर्माण झाली. आता लोकांकडे बरेच पैसेही येऊ लागले होते. शिवाय, तब्येतीच्या दृष्टीनेही लोक आधीपेक्षा जास्त जागरूक झाले होते. त्यामुळे शक्यतो चांगले, सकस पदार्थ खाणंच लोक पसंत करू लागले.
—
- सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ टाळलेत तर आरोग्याची चिंता करावी लागणार नाही!
- लैंगिक भावना काबू करण्यासाठी बनवलं गेलेलं कॉर्न फ्लेक्स आज आवडीने खाल्लं जातं…
—
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण भारतात स्वतःला प्रस्थापित करू शकू याविषयी केलॉग्ज कंपनीला आत्मविश्वास होता. भारतात ‘कॉर्न फ्लेक्स’ हा आपला मुख्य ब्रँड लॉन्च करताना केलॉग्जने त्यात आपले तब्बल ६५ मिलियन डॉलर्स गुंतवले.
भारतात स्वतःला प्रस्थापित करण्याची धडपड :
जाहिरातीचं धोरण कसं आखायचं हा आता कंपनीपुढचा मोठा प्रश्न होता. पण नेमकी इथेच त्यांनी चूक केली. १९९४ साली भारतीय बाजारात आलेल्या या कंपनीने पारंपारिक भारतीय नाश्त्याच्या पदार्थापेक्षा कॉर्न फ्लेक्स हा आरोग्याच्या दृष्टीने अधिक पोषक पर्याय असल्याचा दावा केला.
भारतीयांना त्यांचं हे म्हणणं पटलं नाही. भारतीयांना गरमागरम आणि चविष्ट पदार्थ नाश्त्याला खायला आवडतात. पण कॉर्न फ्लेक्स मात्र थंड दुधाबरोबर जास्त चांगले लागतात. केलॉग्जच्या स्थानिक प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पदार्थांपेक्षा केलॉग्ज कॉर्न फ्लेक्स दुप्पटीने महाग होते.
शिवाय, कॉर्न फ्लेक्स कुरकुरीत आहेत असं जाहिरातीत म्हटलं असलं तरी भारतीयांना नाश्त्याला गरम पदार्थ खायला आवडत असल्यामुळे त्यांनी ते गरम दुधाबरोबर खाल्यावर मऊ होऊन जायचे. त्यामुळे ते मुळात कुरकुरीत असण्याला अर्थ राहीला नाही.
या सगळ्या कारणांमुळे केलॉग्ज या ब्रँडला दिवसेंदिवस उतरती कळा लागली. न्याहारी ही राजासारखी करावी आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं करावं असं म्हटलं जातं.
आज जरी आपण इन्स्टंट, रेडी टू इट नाश्त्याच्या पर्यायांचा विचार करत असलो तरी आजही आपल्याला शक्यतो घरी पटकन बनवता येईल असा गरम आणि भरपेट नाश्ता करायला आवडतो. भारतीयांची नाश्त्याच्या बाबतीतली ही पसंती लक्षात घेण्यात केलॉग्ज कंपनी सपशेल फसली आणि त्यांनी थंड दुधात घालून चांगले लागणाऱ्या, मुळात तशा बेचव असलेल्या रेडी टू इट कॉर्न फ्लेक्सचा पर्याय भारतीयांसमोर ठेवला.
युरोपियन आणि कोरियन लोकांच्या न्याहारीच्या सवयी बदलण्यात ही कंपनी यशस्वी ठरली होती. त्यामुळे भारतातही आपण असंच यश मिळवू शकू असं त्यांना वाटलं होतं. असं काही घडलं मात्र नाही.
आता एकतर भारतातून काढता पाय घेणे किंवा स्वतःला नव्याने प्रस्थापित करणे असे दोनच पर्याय कंपनीसमोर होते. भारतात लहान मुलांना मधल्या वेळी काहीतरी खायची सवय असते हे त्यांना कळलं. त्यामुळे लहान मुलं हे त्यांचं पुढचं टार्गेट झालं.
लहान मुलं संध्याकाळी एरव्ही जे पदार्थ खातात त्यापेक्षा अधिक पोषक पदार्थ ही कंपनी मुलांना देऊ शकणार होती. केलॉग्जने आधी कॉर्न फ्लेक्स, बासमती तांदुळाचे फ्लेक्स आणि गव्हाचे फ्लेक्सच आणले होते. आपलं नवं धोरण म्हणून कंपनीने सप्टेंबर १९९६ मध्ये चाकोज आणि एप्रिल १९९७ मध्ये फ्रॉस्टीज लॉन्च केले.
गव्हापासून बनवलेल्या या चाकोजना वरून चॉकलेटचं आवरण होतं आणि फ्रॉस्टीजना साखरेचं फ्रॉस्टिंग होतं. कंपनीने केलेल्या या बदलांमुळे फ्लेक्स आधीसारखे बेचव राहीले नाहीत. ते गोडसर केले गेले. आपली उत्पादनं अधिक खपावीत म्हणून केलॉग्जने आणखीन एक शक्कल लढवली.
भारतातल्या बऱ्याच लहान मुलांमध्ये लोहाची कमतरता असते आणि केलॉग्जच्या पदार्थांमधून मुबलक प्रमाणात लोह मिळतं असं कंपनीने सांगितलं. यामुळे कंपनीच्या पदार्थांची विक्री १७ टक्क्यांनी वाढली.
बरेच भारतीय शाकाहारी असतात आणि पॅकेजेसवर कोंबड्याचं चित्र पाहून हे पॅकेजेस खरेदी करायला पटकन धजावत नाहीत हे लक्षात आल्यावर आपल्या पॅकेजेसवर प्रतिक म्हणून ठेवलेलं कोंबड्याचं चित्र कंपनीने बदललं.
हे सगळे बदल केल्यानंतर मात्र कंपनी भारतात यशस्वी झाली.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेलं धुमाकूळ घालणारं मिम :
भारतीयांची ब्रेकफास्टची सवय बदलू असं विधान कधीकाळी केलेल्या केलॉग्जवर चक्क भारतीयांचाच उपमा विकण्याची वेळ यावी यावरून भारतात येऊन केलॉग्जला १० वर्षं पूर्ण झाल्यावर एक मिम तयार केलं गेलं होतं.
या मिमच्या सुरुवातीला “भारतीयांच्या ब्रेकफास्टची सवय बदलू असं आव्हान करत केलॉग्ज भारतात आली. दहा वर्षानंतर हे घडलं”, असं म्हणत मिममध्ये खाली केलॉग्जच्या उपम्याच्या पॅकेटचा फोटो टाकला आहे.
महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे मिम ट्विट केलं. ट्विटरवर हे मिम पोस्ट करत महिंद्रा यांनी लिहिलं होतं, “केलॉग्ज इथे आहे त्याला दशकापेक्षा अधिक काळ लोटला आहे, त्यामुळे हे जुनं आहे. पण सध्या हे सगळीकडे व्हायरल होतंय.”
भावना टिकते आणि स्थानिक भागांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्यांना कुणी कधी कमी लेखू नये असंही त्यांनी म्हटलं होतं. केलॉग्जच्या मिमचा फोटो सध्या सगळीकडे चांगलाच धुमाकूळ घालतोय.
कुठल्याही ठिकाणी आपला जम बसवायचा असेल तर तिथल्या स्थानिकांची गरज आणि आवड या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष न करता या गोष्टी समजून घेणं किती महत्त्वाचं असतं हेच आपल्याला वरच्या उदाहरणातून लक्षात येतं. केलॉग्जसारख्या मोठ्या ब्रँडने अती आत्मविश्वासापायी अशी चूक करण्याचं विशेष नवल वाटतं.
खाद्यपदार्थांचं पुष्कळ वैविध्य असलेल्या आपल्या देशातले लोक खाण्याचे शौकीन आहेत. कोंड्याचा मांडा करून आहे त्यात झटपट काहीतरी तयार करणंही आपल्याला जमतं.
त्यामुळे यापुढे खाद्यपदार्थांच्या कुठल्याही परदेशी ब्रॅण्ड्सनी त्यांचा भारतात विस्तार करण्यापूर्वी आवश्यक तेवढी सगळी माहीती मिळवावी आणि केलॉग्जप्रमाणे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नये.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.