आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू धर्म जरी एकच असला तरी राज्यनिहाय धर्मातील प्रथांचं पालन हे आपल्याला नेहमीच आढळून येतं. जसं महाराष्ट्रात मकरसंक्रांती साजरी केली जाते, तर दक्षिणेत पोंगल आणि पूर्वेकडे बैसाखी. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात आणि हिंदू धर्मात एकमेकांना भेटवस्तू देण्याची पद्धत मात्र सगळीकडे सारखीच असल्याचं लक्षात येतं.
कोणतंही शुभ कार्य असल्यावर प्रथम गणेशाला वंदन करणे आणि कोणत्याही रोख स्वरूपात दिल्या जाणाऱ्या पाकिटावर १ रुपयाचं नाणं लावलेलं असणं या दोन प्रथा संपूर्ण भारतात पाळल्या जातात असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
आजच्या ऑनलाईन पेमेंटच्या जगात प्रेझेंट पाकिटावर लावलेलं नाणं हे १ रुपयांचंच का असतं? त्यामागे काय लॉजिक किंवा काय शास्त्र असतं? हे प्रश्न पडणं सहाजिकच आहे. या प्रथेची सुरुवात कुठून झाली? आणि त्याचं महत्व काय आहे? हे जाणून घेऊयात.
‘शगुन’ म्हणून भेट दिल्या जाणाऱ्या या पाकिटावर १ रुपयाचं नाणं चिकटवण म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात म्हणून मानलं जातं. आपल्या भारताने जगाला दिलेल्या शून्यापासून जरी गणनेची सुरुवात होत असली तरी शून्य हा मानसिकदृष्ट्या नकारात्मक आकडा मानला जातो. “असा काय शून्यात बघत बसला आहेस ?” हे वाक्य या मानसिकतेमुळेच प्रचलित झालं असावं. असो.
आपण एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भेटवस्तू म्हणून दिलेल्या पाकिटात काय आहे? हे जेव्हा यजमान बघेल तेव्हा त्या गणनेची सुरुवात शून्यापासून न होता १ पासून व्हावी हे या प्रथेमागचं कारण मानलं जातं.
—
- ”ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” : भक्तांच्या आवाहनामागचा इतिहास फार कमी लोकांना माहितीये!
- ‘दुर्योधनाची’ पूजा केली जाते अशी एक नव्हे, दोन मंदिरे आहेत, जाणून घ्या.
—
१ रुपयाचं नाणं हे समोरच्या व्यक्तीला दिलेलं एक छोटं कर्ज असतं असं सुद्धा काही लोक मानतात. आपण जवळची समजणाऱ्या व्यक्तीने आपल्याला ते कर्ज देण्यासाठी परत भेटावं ही भावना यामागे असते असं सांगितलं जातं.
‘शगुन’च्या पाकिटावर लावलेला एक रुपया देण्याच्या निमित्ताने त्या दोन व्यक्ती पुन्हा भेटतील आणि त्यांच्यातील मैत्रीचा धागा अजून पक्का होईल ही भावना सुद्धा ही प्रथा सुरू करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असावी असं म्हटलं जातं.
हेच कारण असावं की, पाकिटशिवाय एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून दिली जाणारी रक्कम ही रुपये ५०१, १०१ किंवा ५१ अशी असते. तो वरचा १ रुपया म्हणजे “आपण परत भेटू” हे सांगणारा असतो असं म्हणतात.
ज्यांनी खेड्यातील किंवा निमशहरी भागातील लग्नकार्याला उपस्थिती लावली असेल त्यांनी हे भेट रक्कम देण्याचे आकडे माईकवरून जाहीरपणे सांगितल्याचं सुद्धा ऐकलं असेल.
१ रुपयाचं नाणं देण्याचं अजून एक कारण हे मानलं जातं की, नाणं हे धातूपासून तयार केलं जातं आणि धातू हे पृथ्वीपासून मिळतात. हिंदू धर्मात पृथ्वीला आई मानलं जातं आणि म्हणून त्याकडे ‘आईचा आशीर्वाद’ म्हणून देखील बघितलं जातं.
धनत्रयोदशीच्या दिवशी धातूने तयार केलेलं लक्ष्मीचं नाणं विकत घेण्याची प्रथा ही याच विचाराने लोकप्रिय झाली असावी. लक्ष्मीचं नाणं हे आपल्या घरी सुख, समृद्धी घेऊन येईल ही यामागची सदिच्छा असते.
प्राचीन काळात ‘दक्षिणा’ म्हणून दिले जाणारी नाणी ही आजच्या सारखी स्टीलची नसून तांब्याने, चांदीने किंवा सोन्याने तयार केलेली असायची.
ही पद्धत बदलत गेली आणि आपण सध्या महाग असलेली तांब्या ऐवजी स्टीलच्या नाणं देण्यात धन्यता मानायला लागलो आणि म्हणून १ रुपयाचं नाणं देऊ लागलो.
आपल्या प्रिय व्यक्तींना भेट स्वरुपात दिली जाणारी रक्कम ही विभागली जाऊ नये म्हणून देखील रुपये १०१, २०१, ५०१ ही रक्कम ठरवली गेली असंही सांगितलं जातं.
भेट किंवा आहेर स्वरुपात दिली जाणारी कोणतीही रक्कम ही दोन भागात पूर्णांकात विभागली जाऊ शकत नाही तसंच आपल्यातील प्रेम हे विभागलं जाऊ नये हे ही यामागची भावना असल्याचं काही लोक मानतात.
‘शगुन’च्या पाकिटावर लावलं जाणारं १ रुपयाचं नाणं ही एक ‘गुंतवणूक’ असल्याचं देखील मानलं जातं. तुमच्या प्रिय व्यक्तींना तुम्ही दिलेला तो अतिरिक्त रुपया ही तुमच्यातील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत रहावेत यासाठी केलेली एक गुंतवणूक असते.
समोरच्या व्यक्तीने हा अतिरिक्त रुपया हा कुठेतरी गुंतवावावा किंवा दान करावा आणि त्याच्या हातून सत्कर्म व्हावं ही देणाऱ्याची इच्छा असते.
आपल्या प्रियजनांना भेट देण्याचं कारण कोणतंही असो. तो आनंदी रहावा आणि त्याच्या दिशेने येणाऱ्या सुखात नेहमीच वाढ व्हावी ही या १ रुपया लावण्यामागचा विचार असतो असं आपण मानू शकतो.
इतरवेळी “१ रुपयात काय येतं ?” असं सहज बोलून जाणारे आपण त्याचं वरील महत्व वाचून त्याबद्दल अधिक कृतज्ञ राहणार हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.