Site icon InMarathi

केतकीप्रमाणे नाचक्की नको असेल तर सोशल मीडियावर पोस्ट करताना या ९ गोष्टी ध्यानात ठेवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऑर्कुट आलं होतं तेव्हा काही काळानंतर सोशल मीडियाचं प्रस्थ इतकं वाढेल असं कुणाला वाटलंही नसेल. ऑर्कुट, त्यानंतर फेसबुक सुरू झालं तेव्हा व्हर्चुअल जगाची आपल्याला नवीनवी ओळख होती.

त्याचं कुतूहल होतं म्हणून तिथे मित्र जोडणं, क्वचित काहीतरी पोस्ट करणं या गोष्टी केवळ मजा म्हणून करायचो आपण. पण सोशल मीडियावरच्या या व्हर्चुअल जगाची आणि आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची एकमेकांमध्ये कधी आणि कशी सरमिसळ झाली हे आपल्याला कळलंसुद्धा नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण काय वाचतोय, बघतोय , खातोय, आपल्याला कधीतरी सुचलेलं काहीतरी, कविता, चित्र, फोटो इथपासून ते आपल्या राजकीय मतांपर्यंत अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर आता टाकतो.

केतकी चितळेने सोशल मीडियावर शरद पवारांविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं आपण सध्या पाहतोय. अर्थात केतकी चितळेसारख्या व्यक्ती स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायला अशा गोष्टी करतात.

 

 

त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असतं. पण आपण टाकलेल्या पोस्टमधून नकळतपणे आपण लोकांना आपल्याविषयी मतं निर्माण करण्याची मुभाच देत असतो हे आपण विसरता कामा नये.

सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं मुक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण काय पोस्ट टाकतोय याचं भान राखूनच प्रत्येक जण पोस्ट टाकतो असं नाही.

पण सोशल मीडिया आपल्याला वाटतो तितका आता बिनमहत्त्वाचा राहिलेला नाही हे नक्की. यापुढे सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी या ९ गोष्टी घ्यानात ठेवायलाच हव्यात.

१. विनोदी पोस्ट करताना सावधगिरी बाळगणे –

 

 

जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रत्यक्ष भेटता आणि काहीतरी विनोद करता त्यावेळी जर तो विनोद फसला आणि समोरच्या व्यक्तीला त्यामुळे अपमानित वाटलं तर तुम्ही त्या व्यक्तीची माफी मागू शकता. पण आपला विनोद खूप मस्त आहे असं वाटून तुम्ही अविचाराने जर तुम्ही तो सोशल मीडियावर पोस्ट केलात तर कदाचित सोशल मीडियावर तुम्हाला विनोदी वाटणारी ती पोस्ट इतरांच्या दृष्टीने आक्षेपार्हही ठरू शकते.

इथला एक तोटा असा की ज्यांना ती आक्षेपार्ह वाटलीये ते तुम्हाला प्रत्यक्षात असं सांगणारही नाहीत. त्यांच्या संपर्कातल्या लोकांना, मित्रमैत्रिणींना ते तुम्ही किती असंवेदनशीलपणे पोस्ट टाकली आहे असं सांगतील.

त्यामुळे तुम्ही टाकत असलेली पोस्ट तुम्हाला स्वतःला कितीही विनोदी वाटली तरी सगळ्या बाबी विचारात घेऊन सावधगिरीनेच ती पोस्ट टाका.

२. काहीच खासगी नाही –

 

 

आपण जे काही पोस्ट करतोय ते केवळ आपल्या अकाउंटमधल्या लोकांपर्यंत मर्यादित राहतं असं आपल्याला वाटतं. पण ते पूर्णतः खरंच असेल असं नाही. सोशल मीडिया साईट्स तुमच्या पोस्ट्स ‘पब्लिक’ करू शकतात अशी बातमी अधूनमधून कानांवर पडत असते.

आपल्याला असं होताना अजून दिसलं नसलं तरी तुमच्या अकाउंटमधले लोक तुमच्या पोस्ट्सचा स्क्रिनशॉट काढून तुम्हाला कशाचाही थांगपत्ता लागू न देता अगदी सहजपणे त्या इतरांपर्यंत पोहोचवू शकतात.

त्यामुळे आपले अकाउंट्स खासगी आहेत असं वाटत असेल तर यापुढे या गोष्टी लक्षात ठेवा.

३. मित्रांच्या अकाउंट्समधले त्यांचे मित्र –

 

 

वरच्याच मुद्याला जोडून असलेला हा मुद्दा. फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईट्सना प्रोफाइल लॉक करण्याचं सेटिंग असतं ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे केवळ आपल्याच अकाउंटमधल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपल्याला जे फॉलो करतात त्यांच्यापर्यंतच आपल्या पोस्ट मर्यादित असतात असं आपल्याला वाटतं.

पण सोशल मीडिया साईट्सच्या प्रायव्हसी सेटिंग्ज सातत्याने अपडेट आणि अपग्रेड होत असतात. त्यामुळे तुमच्या पोस्ट्स अगदी सहजपणे तुमच्या मित्रांच्या मित्रांपर्यंत पोहोचणं आणि पुढे ते त्यांनी त्यांच्या संपर्कातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य होऊ शकतं.

४. बराच काळ पोस्ट्स राहतात –

 

 

सोशल मीडिया साईट्सना असलेल्या आर्काइव्ह फीचर्समुळे तुम्ही एकदा सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट पुढची कित्येक वर्षं सोशल मीडियावर राहते. कुणीही मागे जाऊन तुमच्या जुन्या पोस्ट्स शोधून काढू शकतं.

त्यामुळे काहीही पोस्ट करण्यापूर्वी आपण पोस्ट डिलीट केली नाही तर ती वर्षानुवर्षे आपल्या अकाउंटवर राहणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहीजे.

५. नोकरीवर भरती करणाऱ्यांचं सोशल मीडियावर लक्ष –

 

हा एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला नोकरीवर घेण्यापूर्वी तुमच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लक्ष ठेवलं जातं.

पदवीधर झाल्याची तारीख तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर आणि तुमच्या रिझ्युममध्ये वेगवेगळी असणं यासारखी छोटीशी वाटणारी चूकही नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्या महागात पडू शकते.

अमुक अमुक गोष्टी तुम्हाला मनापासून करायला आवडतात, त्या करण्यावर तुम्ही भर देता असं जर तुम्ही तुमच्या रिझ्युममध्ये लिहिलं असेल तर हे एम्प्लॉयर्स तुमच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्हीजीजवरून त्याविषयी अंदाज बांधत ते खरं आहे की नाही याची पडताळणी करू शकतात.

६.कंपनीच्या मालकांचं सोशल मीडियावर लक्ष –

 

 

अनेक बॉस आपण कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवरून त्यांचं मूल्यांकन करतात आणि ते किती प्रामाणिक आहेत हे तपासतात अशी आकडेवारी समोर आली आहे. कंपनीत प्रगती करण्याची तुमच्यात किती क्षमता आहे, तुम्ही किती काळ नोकरीत टिकून राहू शकता याचा अंदाज ते तुमच्या पोस्ट्सवरून बांधू शकतात.

तुम्ही नुकतीच एखादी नोकरी सोडली असेल तर त्या नोकरीविषयी, तिथले सहकारी, मालक यांच्याविषयी तुम्ही काही नकारात्मक टिप्पणी केली आहे का यावरही ते लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या गोष्टींचं तुम्ही भान ठेवलं नाहीत तर हातच्या संधीही गमवाल.

७. तुमचा लौकिक टिकवून ठेवणं महत्त्वाचं –

 

 

सोशल मीडियाद्वारे किंवा प्रत्यक्षात अनेक गोष्टींविषयी मतं मांडायला, अनेक गोष्टी करायला तुम्हाला वाव मिळतो. प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावरून तुमचे विचार कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचत असतं आणि त्यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे हे लोक ठरवतात.

तुमचा लौकिक टिकवून ठेवायचा असेल तर सोशल मीडियावर जपून मतं व्यक्त केली पाहिजेत. तुमच्या करियरच्या आणि बाकी दृष्टीनेही ते महत्त्वाचं ठरेल.

८. पोस्ट्स सहजपणे शोधता येतात –

ट्रेंडिंग विषय आणि प्रश्नांना प्रोत्साहन मिळावं यादृष्टीने लिंक्डइन, फेसबुक, ट्विटरसारख्या साईट्सनी त्यांचे सर्च फीचर्स अधिक विकसित केले आहेत.

त्यामुळे तुमच्या संपर्कात असलेले-नसलेले बहुसंख्य लोक तुमच्या पोस्ट्स अगदी सहजपणे सर्च करू शकतात. तुमची खूप मागे पडलेली एखादी पोस्टही अचानक नव्याने प्रकाशात येऊ शकते.

९. क्लाएंट्स, वेंडर्स, गुंतवणूकदार आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचंही तुमच्या सोशल मीडियावर लक्ष –

आपली मूल्यं आणि कंपनी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची मूल्यं सारखी आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी तुमचे आताचे क्लाएंट्स, गुंवतणूकदार, वेंडर्स तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियावरची तुमची पोस्ट जर त्यांना धोकादायक वाटली तर त्यांच्या मनातून तुम्ही उतरू शकता.

 

 

एरव्ही तुम्हाला सपोर्ट करणारे वेंडर्स, तुमच्यावर पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार यांची नाराजी तुम्ही ओढवून घेतलीत तर ते तुमच्याकरता या गोष्टी करणं थांबवण्यासारखे गंभीर परिणामही यामुळे होऊ शकतात. तुमचे प्रतिस्पर्धीही तुमच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल्सवर लक्ष ठेवून असतात.

त्यामुळे तुमच्या करियरमध्ये अडथळे निर्माण करतील अशा पोस्ट्स करून तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या हातात कोलीत देऊ नका.

तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या अशा पोस्ट्स तुमच्या क्लाएंट्सना दाखवून ते तुमच्यापेक्षा कसे अधिक चांगले आहेत असं चित्र त्यांच्या मनात निर्माण करू शकतात. त्यामुळे आपण सोशल मीडियावर काय पोस्ट करतोय याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्या.

सोशल मीडिया हे मुळात फार प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे उगीचच्या उगीच तिथे वेळ न घालवता दुसऱ्याला उपयोगी पडेल, आपण केलेल्या पोस्ट्समधून दुसऱ्याला अधिक माहिती मिळू शकेल, त्यांचं चांगल्या अर्थाने मनोरंजन होईल या हेतूंनी सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचा आणि दुसऱ्याचाही वेळ सत्कारणी लावण्याचा यापुढे प्रयत्न करूया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version