' बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”! – InMarathi

बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शंभर कौरव भावंडांविषयी आपण लहानपणापासूनच ऐकलेलं असतं. महाभारतातील हे शंभर कौरव, एकाच पित्याची ही एवढी सगळी मुलं, हे आजच्या जीवनात प्रत्यक्षात असू शकतं का? असाही प्रश्न अनेकदा अनेकांना पडलेला असेल.

मात्र आजच्या काळातही असाच एक पिता आहे, ज्याला थोडीथोडकी नव्हे, तर जवळपास शंभर मुलं आहेत. या मुलांचा पिता एकच असला, तरी माता मात्र अनेक आहेत. एवढंच नाही, तर आपल्या मुलांचा पिता कुणी भलताच आहे, हेदेखील या मातांना ठाऊक नाही.

‘अवर फादर’ नावाची एक डॉक्युमेंट्री नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ही एका सत्य आणि भयावह घटनेवर आधारित आहे. ही डॉक्युमेंट्री बघायची इच्छा असल्यास नक्कीच बघा.

 

our father IM

 

मात्र या डॉक्टरच्या सत्य आयुष्याबद्दल जाणून घेणं सुद्धा तितकंच रंजक आहे. आज त्याचविषयी जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा…

स्पर्म डोनेशन आणि सरोगसीसारख्या विषयांवर भाष्य करणारे ‘विकी डोनर’ आणि ‘मला आई व्हायचंय’ हे चित्रपट तुम्ही पाहिले असतील. मूल होत नसल्याने हतबल आणि अगतिक झालेले पालक फर्टिलिटी डॉक्टरकडे जाण्याचा मार्ग स्वीकारतात. त्यांची पालक होण्याची इच्छा पूर्ण करणारा हा डॉक्टर म्हणजे त्यांच्यासाठी देवदूत असतो.

याच देवदूताने जर चुकीचं कृत्य केलं, विश्वासघात केला, तर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे इंडियाना परिसरातील डोनाल्ड क्लाईन नावाच्या या अमानवी वृत्तीच्या माणसाची कहाणी!

 

donald cline IM

 

स्पर्म बँकमधून आलेला, संपूर्ण वैद्यकीय तपासणी झालेला एखाद्या स्पर्म डोनरचा स्पर्म वापरून एखाद्या जोडप्याची पालक बनण्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम फर्टिलिटी डॉक्टर करत असतो.

सावत्र भावंडांची संख्या वाढू नये यासाठी, एका डोनरचा वापर तीनपेक्षा अधिकवेळा करत नाही, असं म्हणणाऱ्या या डॉक्टरने प्रत्यक्षात डोनरचा नव्हे, तर स्वतःचा स्पर्म वापरण्याचा किळसवाणा प्रकार चालवला होता.

स्पर्म अंडाशयात सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली, की हॉस्पिटलमधील एखाद्या खोलीत हस्तमैथुन सुरु करायचं, हे वागणं क्लाईनसाठी नित्याचं झालं होतं. हा हैवान एवढ्यावरच थांबला नाही.

पुरुष पिता होण्यासाठी सक्षम असला, तरी काहीवेळा नैसर्गिक प्रक्रियेतून मूल होत नाही. अशावेळी फर्टिलिटी डॉक्टरच्या आधाराने इतर प्रक्रियांचा आधार घेऊन स्पर्म अंडाशयात सोडावे लागतात. अशाही स्थितीत वडिलांचा स्पर्म न वापरता स्वतःचा स्पर्म वापरण्याचं अमानुष कृत्य या माणसाने केलं होतं.

 

fertility IM

दहा वर्षं सुरु होता हा प्रकार…

१९७९ साली क्लाईनने आपला स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सुरु केला. जवळपास १० वर्षं त्याने त्याचं हे अमानवी कृत्य सुरूच ठेवलं. आपल्या या गैरकृत्याबद्दल कुणालाही कळणार नाही, अशी त्याची खात्री होती. मात्र ऐंशीच्या दशकाअखेरीस डीएनए टेस्ट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्यामुळे अधिकाधिक डेटा उपलब्ध होऊ लागला.

फर्टिलिटी डॉक्टरची मदत घेऊन जन्माला आलेल्या मुलांविषयी माहिती काढणं सोपं होऊ लागलं. कारण, नात्यांचं जाळं आणि त्याविषयीची माहिती अधिकाधिक प्रमाणावर उपलब्ध होऊ लागली. जेकॉब बॅलार्ड या तरुणीला ती ‘डोनर बेबी’ असल्याचं ठाऊक होतं.

आपला पिता कोण आहे, हे जाणून घ्यावं अशी इच्छा तिला झाली आणि तिने तिला जन्माला घालणारा डॉक्टर, डोनाल्ड क्लाईन याचं क्लिनिक गाठलं. ही माहिती उघड करणं शक्य नसल्याचं क्लाईनने सांगितल्यावर तिने डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला, आणि इथूनच सारं बिंग फुटायला सुरुवात झाली.

आकडा वाढतच गेला…

बॅलार्ड हिच्याकडे जी माहिती होती, त्यानुसार एका स्पर्म डोनरचा वापर ३ पेक्षा अधिक वेळा करण्यात आला नव्हता. म्हणजेच तिच्या अंदाजानुसार तिची २ ते ३ सावत्र भावंडं असण्याची शक्यता तिने गृहीत धरली होती. मात्र समोर आलेली माहिती धक्का देणारी ठरली. तिची १-२ नव्हे तर चक्क ७ सावत्र भावंडं निघाली.

 

donald cline 2 IM

ही माहिती कळल्यावर ती चक्रावून गेली. तिने अधिक खोलात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की क्लाईन नावाच्या एका स्त्रीशी या सगळ्यांचा डीएनए जुळत असून, ही स्त्री डोनाल्ड क्लाईनच्या नात्यातील होती.

तिने क्लाईन कुटुंबाशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करून, अखेर तिने डोनाल्डच्या मुलाच्या मदतीने, डोनाल्ड क्लाईन याला भेटण्याचं ठरवलं. सगळीच मुलं एकत्र समोर उभी होती त्यामुळे क्लाईनला सत्य मान्य करावं लागलं.

असं असूनही त्याने अर्धच सत्य मान्य केलं. ज्या स्त्रियांना मूल हवंच होतं, आणि इतर पर्याय उपलब्ध नव्हता त्यांची मदत म्हणून हे केल्याचं क्लाईनने म्हटलं.
हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरत होती.

मीडियामध्ये सुद्धा याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. अशावेळी या दबावात येऊन, अशी पंधरा मुलं त्याच्या स्पर्ममुळे जन्माला आली असतील असं त्याने मान्य केलं.

सत्य मात्र त्याहून अधिक भेदक होतं. २०१९ साली एका मासिकात या नराधमाविषयी माहिती छापून आली. हा लेख छापून येईपर्यंत त्याच्या मुलांची संख्या पन्नाशी ओलांडून गेली होती.

 

donald cline 3 IM

 

पुढे याविषयावर डॉक्युमेंट्री बनवण्याचं काम सुरु झालं. ही डॉक्युमेंट्री पूर्ण होईपर्यंत २०२२ च्या वर्षात त्याच्या या अनैतिक कृत्यातून जन्माला आलेल्या आणि शोध लागलेल्या मुलांचा आकडा ९४ असल्याचं उघड झालं आहे.

काय सांगावं, कदाचित येत्या काळात हा आकडा आणखी वाढला तरी अनेकांना यात आश्चर्य वाटणार नाही.

शिक्षा मात्र फार नाही…

डोनाल्ड क्लाईन याची वागणूक, त्याने अगतिक व्यक्तींचा घेतलेला गैरफायदा ही वागणूक खरं तर फारच वाईट होती. कुठल्याही वैद्यकीय टॅप्सनिला सामोरं न जाता त्याने त्याचे स्पर्म दिल्यामुळे, जन्माला आलेल्या मुलांना त्याचे आजार आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांची काहीही चूक नसताना असं आयुष्य जगणं त्यांच्या वाट्याला आलं.

क्लाईनचं हे कृत्य बलात्कार ठरू शकलं नाही. त्याला शिक्षा झाली, ती केवळ पालकांना अंधारात ठेवण्याबद्दल आणि खोटं बोलण्याबद्दल! अवघ्या ५०० डॉलर्सचा दंड भरून हा माणूस नामानिराळा झाला. कारण त्याच्यावर करण्यात आलेली दुसरी कारवाई होती, ती म्हणजे त्याचं लायसन्स रद्द करणं.

मेडिकल प्रॅक्टिस बंद करून, निवृत्त झालेल्या क्लाईनच्या आयुष्यात यामुळे काहीच फरक पडला नाही. क्लाईनच्या बायोलॉजिकल मुलांना मात्र न्याय मिळाला नाही.

हा असा अन्याय आणखी कुणावरही होऊ नये याची काळजी मात्र त्यांनी घेतली. त्यांनी एक बिल मांडलं आणि ते पास करून घेतलं. या कायद्याअंतर्गत, फर्टिलिटी विषयक नियम अधिक सक्षम करण्यात आले.

 

fertility sperm IM

असं का केलं असावं?

डोनाल्ड क्लाईन याने हे असं कृत्य का केलं असावं याविषयी अनेक मतमतांतरं आहेत. काहींच्या मते हा एक ख्रिश्चन डाव होता. जितकी अधिकाधिक मुलं जन्माला घालणं शक्य असेल, ज्या पद्धतीने शक्य असेल, तितकी मुलं जन्माला घालावी अशी एक चळवळ मध्यंतरी ख्रिश्चन धर्मात पाहायला मिळाली.

हा त्याच चळवळीचा एक भाग असल्याचं काहींचं मत आहे. काहींच्या मते, ही त्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा होती. स्वतःचा खास वंश अधिक वाढावा यासाठी त्याने हे केलं असावं. निळे डोळे, फिकट तपकिरी केस असणारा क्लाईन आर्य वंशीय असल्याने हा वंश वाढवण्याचा त्याचा डाव होता असं या लोकांचं मत आहे.

काहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.

या भयावह वास्तवाचा सामना केलेल्या त्याच्या मुलांना न्यायही मिळालेला नाही. जगात असंही काही घडू शकतं याचं उदाहरण म्हणून ही केस पाहिली जाऊ शकते असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?