' ‘पिकाचू’ इतकीच त्याच्या नावामागची कहाणीदेखील आहे फार इंटरेस्टिंग – InMarathi

‘पिकाचू’ इतकीच त्याच्या नावामागची कहाणीदेखील आहे फार इंटरेस्टिंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या मे महिना सुरू आहे. आता उकाड्याने हैराण करणारा हा मे महिना लहानपणी उकाडा असला तरी वर्षातून एकदा मिळणाऱ्या भल्यामोठ्या सुट्टीमुळे आपला प्रचंड लाडका असायचा.

एकदा सुट्टी लागली की टीव्हीवर टॉम अँड जेरी, नॉडी, पिंगू, पॉपॉय हे आणि आपले असे बरेच लाडके कार्टून्स बघण्याची मोकळीक मिळायची.

लहानपणी आपल्या मनावर असंच राज्य केलेलं एक कार्टून म्हणजे ‘पोकेमॉन’. पोकेमॉनमधली पात्रं, पोकेमॉनची संकप्लना या सगळ्यातच इतर कार्टून्सपेक्षा नावीन्य होतं. त्यामुळे फार पटकन हे कार्टून लोकप्रिय ठरलं होतं.

आजही ‘पोकेमॉन’ म्हटलं की अगदी पटकन आठवणारा शब्द म्हणजे ‘पिकाचू’. ‘पिकाचू’ हे पोकेमॉनमधलं एक अतिशय गोड पात्र. पिकाचू हे एक जपानी ऍनिमेटेड पात्र आहे.

 

pikachu im

 

छोट्याश्या उंदरासारख्या दिसणाऱ्या या पिकाचूचा पिवळाधम्मक रंग आपलं लक्ष वेधून घ्यायचा. त्याच्याकडे असलेल्या अद्भुत शक्तींचं आपल्याला कुतूहल आणि आकर्षण वाटायचं.

क्यूट दिसणारा हा पिकाचू अगदी खेळकर पात्र म्हणून समोर यायचा, पण आपल्या या लाडक्या पिकाचूला ‘पिकाचू’ हे नाव कसं मिळालं? जपानी भाषेत या नावाचा अर्थ काय होतो? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ठाऊक नसतील.

मुळात पिकाचूवरच्या प्रेमाने हे प्रश्नच आपल्या मनात उत्पन्न केले नसतील आणि आता एकदम हे प्रश्न वाचताना, “अरेच्चा, आपल्याला खरंच पिकाचू या शब्दाचा अर्थ माहीत नाहीये.” असा विचार मनात लख्खपणे चमकेल.

हा शब्द कसा बनला आणि त्याचा जपानी भाषेत काय अर्थ होतो ते जाणून घेऊ.

पिकाचूचं डिझाईन ‘विद्युतशक्ती’ या संकल्पनेभोवती फिरतं. या कारणामुळेच पिकाचूचा रंग पिवळाधम्मक असतो. त्याच्या शेपटीचा आकार चमकणाऱ्या बाणासारखा असतो.

 

pikachu im 1

 

पिकाचूचे टोकदार, टोकावर काळ्या रंगाचे असलेले कान, त्याचे गुलाबी गाल त्याच्याकडे असलेल्या विद्युत क्षमता दर्शवतात.

आपल्याकडे असलेल्या विद्युत शक्तीच्या साहाय्याने आपल्या शत्रूंना दुर्बल करण्याची क्षमता पिकाचूकडे असते. त्याचबरोबरीने आपल्यावर कुणी विद्युत वार केला तर त्या वारातून आलेली शक्ती आपल्याकडे वळवून आपल्याच शक्तींमध्ये वाढ करण्याची अनोखी क्षमताही पिकाचूकडे असते.

सुरुवातीला पिकाचूचा आकार गोलाकार होता आणि पिकाचू लठ्ठ होता. मात्र काही वर्षांनी त्याची कंबर बारीक करण्यात आली आणि मान आणि चेहऱ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आली. त्याच्या पाठीचा कणा आधीपेक्षा अधिक ताठ करण्यात आला. यापुढे पिकाचू असाच ठेवायचं असं केन सुगिमोरी या गेम डिझायनरने ठरवलं. मात्र ‘पोकीमॉन स्वॉर्ड अँड शिल्ड’ मध्ये पिकाचूला थोडंसं लठ्ठ दाखवलं गेलं.

पिकाचू कसा उत्क्रांत व्हायचा हे आठवतंय? पिकाचू ‘पिकाचू’ होण्याआधी लहानगा असताना त्याचं नाव ‘पिचू’ असतं. मग हा लहानगा पिचू मोठा होऊन ‘पिकाचू’ होतो. यातली एक गमतीशीर बाब अशी की पिचूला जर आपला ट्रेनर आवडला तर त्याची पटकन वाढ होऊन तो पिकाचू होतो. मग हा पिकाचू उत्क्रांत होऊन ‘रायचू’ होतो.

 

pikachu im 2

 

रायचूचा नारिंगी रंग हा पिकाचूच्या पिवळ्या रंगाच्या अगदी परस्परविरोधी असतो. पिकाचूची उंची १ फूट ४ इंच असते आणि त्याचं वजन १४ पाउंड्स म्हणजेच ६ किलो असतं. गडगडाट होऊन पिकाचू रायचू बनतो.

रायचूच्या गालांमध्ये विद्युतशक्ती धरून ठेवण्याची क्षमता पिकाचूपेक्षा अधिक असते. रायचू वगळता पिकाचूची फार मोठी म्हणावी अशी उत्क्रांती होत नाही. मात्र पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशा दोन्ही प्रकारचे पिकाचू असतात. स्त्रीलिंगी पिकाचूची शेपटी हार्ट शेपची असते.

आता पिकाचू हा शब्द कसा बनला आणि जपानी भाषेत या शब्दाचा काय अर्थ होतो हे पाहूया. पिकाचू या पात्राचं मूळ नाव ‘पिकाचू’ नव्हतं, ते ‘क्लेफेरी’ होतं हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण पिकाचूची लोकप्रियता पाहून त्याला पिकाचू हे नाव दिलं गेलं.

 

pikachu im 3

 

पिकाचू हा शब्द ‘पिका’ आणि ‘चू’ या दोन जपानी शब्दांपासून बनला आहे. जपानी भाषेत ‘पिका’ या शब्दाचा अर्थ विजेच्या कडकडाटाचा आवाज असा होतो तर ‘चू’ या शब्दाचा जपानी भाषेतला अर्थ उंदराचा आवाज असा आहे. अशा प्रकारे पिकाचू हे नाव तयार झालं. पिकाचू बऱ्याचदा ‘पिका, पिका’ असा आवाज काढायचा हे आपल्याला आठवत असेलच.

साधारणपणे माणसांच्या नावांचा नेमका अर्थ प्रत्येकवेळी माहीत नसला तरी नावांवरून त्यांच्या अर्थाचा अंदाज बांधता येऊ शकतो. नॉडी, बॉब द बिल्डर सारख्या कार्टून कॅरॅक्टर्सच्या बाबतीत हे शक्य होत असलं तरी प्रत्येकवेळी आपल्याला कार्टून कॅरॅक्टर्सच्या नावांच्या अर्थाचा अंदाज बांधता येईलच असं नाही.

नावांचे अर्थ कळले किंवा कळले नाहीत तरी आपल्या या लाडक्या कार्टून कॅरॅक्टर्सवर आपलं कायम प्रेम असणार आहे हे नक्की.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?