' नांदा सौख्य भरे, एक असं गाव जिथे बिबटे आणि माणसं एकत्र जगतात – InMarathi

नांदा सौख्य भरे, एक असं गाव जिथे बिबटे आणि माणसं एकत्र जगतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खूपदा आपण वन्य प्राणी नागरी वस्तीत घुसले अशा आशयाच्या बातम्या वाचतो. पाहतो. पिकांचे नुकसान, क्वचित जीवितहानी करणाऱ्या या प्राण्यांचे नागरी वस्तीतील दर्शन हे भयावह वाटणारेच आहे.

अशाही परिस्थितीत महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे साप अगदी कुटुंबासमवेत मुक्तपणे संचार करतात. आजवर एकही साप चावलेली घटना झालेली नाही. हे मागे एकदा तुम्ही वाचले आहेच. करणीमातेच्या मंदिरात उंदीर मोकळेपणाने बागडत असतात हे सर्वश्रुत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याच प्रमाणे जर तुम्हाला असं कुणी सांगितलं की इथे बिबट्या नांदतो तर विश्वास बसेल तुमचा? तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. होय ही खरी गोष्ट आहे.

राजस्थान आपल्याला राजांची भूमी म्हणून माहिती आहे. कडवे लढवय्ये रजपूत राजे, पद्मिनीचा जोहार, राणा प्रतापाने अकबराशी केलेलं हळदी घाटातील युद्ध, थरचे वाळवंट या गोष्टी आजही प्रसिद्ध आहेत, पण याच राजस्थान मध्ये अजून एक आश्चर्यकारक गोष्ट आहे इथे बिबटे पाळणारे एक गाव आहे.

कधीकाळी राजस्थान हा बिबट्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. इतक्या संख्येत तिथे बिबटे होते. अरवली पर्वतांच्या रांगातून हे बिबटे विश्रांती घेताना ही आढळत. रस्त्यावरून भटकत. थोडक्यात आपल्याकडे जसे कुत्रे आरामात हिंडतात तसे इथे बिबटे होते.

 

bera village im

 

राजस्थानमध्ये पाली जिल्ह्यातील एक छोटेसे गाव बेडा. बेडा या गावाची ओळखच बिबट्यांचे गाव अशी आहे. हे फार मोठे नाही छोटेसेच गाव आहे.

इथे बिबटे आणि गावकरी यांच्यात एक अनोखा भावनेचा बंध आहे. ना ते गावकऱ्याना त्रास देतात, न गावकरी बिबट्यांना. बिनघोरपणे बिबटे गावात फिरतात. लोकही आपापले व्यवहार करत असतात.

ना बिबटे, न माणूस एकमेकांना इजा करतात. या गावात राबडी समाजाचे लोक राहतात. त्यांची अशी धारणा आहे की हे बिबटे म्हणजे साक्षात भगवान शंकरांशी संबंधित आहेत.

 

tiger im

 

शिव शंकर साधना करताना जे व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे आसन म्हणून घेतात ते या बिबट्याचे असते म्हणून त्याला हे लोक पूजनीय मानतात. येथील लोक मेंढ्या गाई गुरे पाळतात. हे त्यांचे पशुधन आहे. क्वचित प्रसंगी बिबट्या यातील एखादे पशुधन उचलून नेतो.

एकदा एका मेंढपाळाची बोकड आणि काही मेंढरे मांजरासारख्या दिसणाऱ्या प्राण्याने नेली. अर्थातच तो बिबट्या होता, पण ते नेताना त्याने त्या मेंढपाळाला अजिबात इजा केली नाही.

भुकेल्या पोटी एखादे मेंढरू किंवा इतर काही पशुधन जर बिबट्याने नेले तर गावकरी त्यासाठी दु:ख करत नाहीत. त्यांना खात्री असते आज एक मेंढरू नेलं तरी नंतर देव आपल्याला अजूनही दुप्पटीने परत देईल.

आजवर अशी एकही घटना घडलेली नाही ज्यात बिबट्याने पशुधन नेताना कोणत्याही माणसाला जखमी केले आहे त्याची शिकार केली आहे.अशी घटना झाली असेलही कदाचित पण ती दुर्मिळच.

१९९४ ते २०१९ या कालखंडात संपूर्ण देशात ४८३७ बिबट्यांची शिकार केली गेली असे भारतीय वन्य जीव संरक्षण संघटनेने सांगितले. ही शिकार एकतर त्याच्या कातडीसाठी झाली होती किंवा हल्ला करेल या भीतीपोटी झाली होती.

 

leopard inmarathi

 

२०१७ साली बिबट्याच्या संरक्षणासाठी प्रकल्प राबवणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य होते. राजस्थानातील बऱ्याच भागात मांजर सदृश्य प्राणी मोठ्या प्रमाणावर सापडला होता. आणि विशेष म्हणजे हे बिबटे संरक्षित आणि असंरक्षित भागात पण सापडले होते. मात्र याला अपवाद होते थरचे वाळवंट.

बेडा येथे पशुधन हे बिबट्याच्या शिकारीसाठी किंवा त्याच्यासाठी खाद्य म्हणूनच पाळले जाते. समजा जरी बिबट्याने एखादा बोकड किंवा गाय मारली तर वन विभाग त्यांना नुकसान भरपाई म्हणून ४००० ते १५००० रुपये देतो. हे लोक त्यावर समाधानी असतात.

२०१७ मध्ये केलेल्या गणनेनुसार संपूर्ण भारतात ४ हजार बिबटे होते. त्यातील ५०७ राजस्थानातील होते. जवाई बांधाजवळ बिबट्यासाठी संरक्षक विभाग राखीव ठेवला आहे. या भागात बिबट्या दिसण्याची ९९ टक्के शक्यता असते. यामुळे इकडे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे.

 

leopard im

 

बेडा, पाली येथे बिबटे जास्त प्रमाणात सापडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्याशी लोकांची असलेली धार्मिक भावना ही खूप मोठी आहे. वन विभाग या बिबट्यांची खूप चांगल्या रीतीने काळजी घेतो.

केवळ पर्यटकांना बिबट्या दिसावा म्हणून काही हॉटेल मालक शिकारीसाठी प्राणी भक्ष्य म्हणून ठेवतात आणि त्यासाठी आलेल्या बिबट्यांना पकडून ठेवतात. वन विभागाने असे पकडून ठेवलेल्या बिबट्यांची सुटका केली. त्यातील बरेच बिबटे हे नर बिबटे होते. ज्यांचे वय ३ ते ४ वर्षे होते. असे नर बिबटे दुसऱ्या नराला आपल्या प्रदेशात टिकू देत नाहीत हे ही बिबटे कमी होण्याचे कारण होते.

एखाद्या घरापाशी जर नर बिबट्या सापडला, तर ती वन विभागाला सूचना दिली जाते. वन विभाग त्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. या गावातील मोठे लोक बिबट्याला आपल्या मुलासारखेच समजतात. त्याच मायेने त्यांचे जतन करण्याचा प्रयत्न करतात.

कधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.

एरवी माणसाने बेसुमार हत्या करून कितीतरी जंगली प्राण्यांच्या जाती नामशेष करण्याच्या टोकावर आणल्या आहेत, पण बेडा येथील ग्रामस्थांच्या श्रद्धेने,समाधानी वृत्तीने बिबटे नामशेष होण्यापासून वाचले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?