आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारतीय सशस्त्र दलांना मुख्यत: तीन भागांमध्ये विभागलेले आहे. भारतीय सेना, भारतीय नौसेना आणि भारतीय वायुसेना. भारताचे राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलांचे सुप्रीम कमांडर असतात.
१३ लाख सैनिकांसमवेत भारताकडे जगातील तिसरी सर्वात मोठी सेना आहे. या भारतीय सशस्त्र दलांना निमलष्करी दलांकडून मदत मिळते. भारतीय सशस्त्र दल मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. भारतात पाच केंद्रीय सुरक्षा दल कार्यरत आहेत-
सेंट्रल रिजर्व पोलीस दल (CRPF),
सीमा सुरक्षा दल (BSF),
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP),
सेंट्रल इंडस्ट्रीयल सुरक्षा दल (CISF) आणि
सशस्त्र सीमा दल (SSB)
ही सर्व दले गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येतात.
१. सीमा सुरक्षा दल (BSF)
सीमा सुरक्षा दलाची स्थापना भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या स्थायी सुरक्षेसाठी केली गेली होती.
या दलाची प्रमुख कर्तव्ये म्हणजे सीमेवर राहणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे, सीमेवर होणारी तस्करी रोखणे तसेच सीमेवर होणारी घुसखोरी रोखणे ही आहेत.
युद्धाच्या काळामध्ये सीमा सुरक्षा दल भारतीय भूदलाचे प्रमुख सहायक दल म्हणून काम करते. सीमा सुरक्षा दल एक सशस्त्र सैन्य आहे.
आपत्तीच्या काळात सीमा सुरक्षा दल देशाच्या अंतर्गत भागात शांती स्थापन करण्यासाठी मदत करते. सध्या सीमा सुरक्षा दल अतिशय शांतीपूर्वक भारताच्या ६४७६ किमी लांब असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमांवर पाळत ठेवते आहे.
२. केंद्रीय रिजर्व पोलीस दल (CRPF)
केंद्रीय रिजर्व पोलीस दलाचे पूर्ण नाव Crowns Representative Police होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे नाव बदलून केंद्रीय रिजर्व पोलीस दल ठेवण्यात आले.
१९६५ पर्यंत भारत – पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेचे दायित्व CRPF च्या हातात होते. जे BSF तयार केल्यानंतर हस्तांतरित करण्यात आले.
CRPF चे मुख्य दायित्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची मदत करणे हे आहे.
याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती किंवा दंगलीं नियंत्रित करणे तसेच विशेष परिस्थिती मध्ये सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या ऑपरेशन मध्ये सहायक दलाच्या रुपात कार्य करणे हे आहे.
२००१ मध्ये संसदवर झालेल्या हल्ल्यामध्ये सुद्धा CRPF च्या सैनिकांनी पाच आतंकवाद्यांना कंठस्नान घातले होते.
३. आसाम रायफल्स
आसाम रायफल्सची स्थापना १८३५ मध्ये झाली होती, हे भारताचे सर्वात जुने निमलष्कर दल आहे.
आसाम रायफल्सची स्थापना केशर लेवीच्या नावाने पूर्वोत्तर प्रदेशांमध्ये वसलेल्या ब्रिटीश वस्त्यांना आणि चहाच्या बागांना आदिवासी लुटारूंपासून वाचवण्यासाठी करण्यात आली होती.
यानंतर १८८३ मध्ये याचे नाव फ्रंटियर पोलीस, १८९१ मध्ये आसाम मिलेट्री पोलीस तसेच १८९३ मध्ये ईस्ट बंगाल व आसाम मिलेट्री पोलीस ठेवण्यात आले.
१९१७ मध्ये याला सध्याचे नाव आसाम रायफल्स देण्यात आले. हे केंद्रीय सशस्त्र दल आहे.
सध्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आसाम रायफल्स मध्ये ४६ बटालियन आहेत.
आसाम रायफल्सचे मुख्य कार्य पूर्वोत्तर राज्यांमध्ये होणाऱ्या दंगलींवर नियंत्रण ठेवून तेथील रहिवाश्यांना मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करणे हे आहे.
२००२ पासून भारत – म्यानमारच्या १६४३ किमी लांब असलेल्या सीमेच्या सुरक्षेसाठी ते सदैव तत्पर असतात. याव्यतिरिक्त युद्धाच्या काळात हे दल सैन्याच्या सहायक दलाच्या रुपात काम करतो.
४. भारतीय तिबेट सीमा पोलीस (ITBP)
१९६२ मध्ये भारताच्या उत्तर सीमेवर चीनने केलेल्या आक्रमणानंतर भारतीय सैन्याला एक अश्या दलाची आवश्यकता भासली जे हिमालय पर्वत रांगेच्या दुर्गम भागांमध्ये युद्ध करू शकते.
या उद्देशाने भारत – तिबेट सीमा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली.
हे सुरक्षा दल सामान्य दलांपेक्षा वेगळे असून गनिमी युद्ध करण्यामध्येही तरबेज आहे. हे दल भारताच्या उत्तर सीमेबरोबरच सीमेवरती राहणाऱ्या लोकांची सुरक्षा देखील करते.
५. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड्स (NSG)
राष्ट्रीय सुरक्षा गार्ड्स मध्ये कमांडो तयार केले जातात. NSGचे मुख्य कार्य VIP सुरक्षा, आतंकवादी हल्ल्यांना नाकाम करणे, अपहरणाच्या घटनांवर कारवाई करणे हे असते.
इंदिरा गांधींची हत्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार घटनेनंतर NSG ची स्थापना करण्यात आली होती.
त्यामुळे देशाच्या अंतर्गत होणाऱ्या आतंकवादी घटनांना रोखले जाऊ लागले. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड्स भारतीय सैन्यासाठी आणि पोलिसांसाठी कमांडो तयार करतात.
हे कमांडो दहशतवादी हल्ले रोखण्यात तरबेज आहेत. NSG चे ब्रीदवाक्य आहे, “एक सबके लिए, सब एक के लिए”.
मुंबई हल्ल्यानंतर देशभरात चार क्षेत्रीय हब स्थापित केले गेले आहेत. हे हब मुंबई आणि चेन्नई मध्ये ३० जून २००९ पासून तसेच हैदराबाद आणि कोलकत्ता मध्ये १ जुलै २००९ पासून सक्रिय झाले आहेत.
NSG च्या सैनिकांना Black Cat या नावाने देखील ओळखले जाते कारण त्यांच्या गणवेशात काळे कपडे आणि Black Cat Insignia असते.
६. भारतीय तटरक्षक दल (ICG)
तटरक्षक दलाचे दायित्व समुद्री सीमांचे आणि त्यांच्या तटावरील क्षेत्रांचे रक्षण करणे हे असते. भारताचे समुद्र क्षेत्रफळ २८ लाख वर्ग किमी आहे.
तटरक्षक दल या सीमांवर असलेल्या प्रतिष्ठानांची आणि टर्मिनलांची सुरक्षा करतात. तटरक्षक दल समुद्री सीमांवर स्थित मत्स्य क्षेत्रांची सुरक्षा करतातच सोबत अवैध शिकार आणि तस्करी थांबवतात.
७. गृह रक्षा दल (होम गार्ड्स)
होम गार्ड्सची स्थापना १९४६ मध्ये केली गेली होती. होम गार्ड्सचे प्रमुख कार्य प्रशासनात पोलीस किंवा इतर विभागांना सहकार्य करणे हे आहे.
होमगार्ड्स एक स्वयंसेवी दल आहे, जो नैसर्गिक आपत्ती, महामारी पसरणे किंवा दंगल झाल्यावर स्थानीय पोलिसांची मदत करतो. सध्या हि संघटना केरळ सोडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
८. प्रादेशिक सेना
प्रादेशिक सेना एक स्वैच्छिक सैन्य आहे ज्यामध्ये १८ ते ४२ वर्षाचे भारतीय नागरिक भरतीच्या पात्र असतात.
प्रादेशिक सेनेचे सदस्य पूर्ण कुशल सैनिक नसतात, परंतु यांना काही काळासाठी कठीण सैन्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.
प्रादेशिक सेनेच्या स्थापनेवेळी असा विचार करण्यात आला होता की, युद्धाच्यावेळी तैनात करण्यासाठी या सैन्याचा उपयोग होऊ शकतो.
भारतीय सैन्याद्वारे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन विजय तसेच ऑपरेशन पराक्रम मध्ये प्रादेशिक सेनेने सुद्धा भाग घेतला होता.
९. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
CISF चे मुख्य कार्य केंद्र सरकारच्या औद्योगिक उपक्रमांच्या परिसराचे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा करणे हे आहे. सध्या CISF देशाच्या जवळपास ३०० उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. CISF जगातील सर्वात मोठा औद्योगिक सुरक्षा दल आहे, ज्यामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.