Site icon InMarathi

कुतुबमिनार जाऊच द्या, या राजकुमारी साहिबा म्हणताहेत “ताजमहालची जमीन माझीच…!”

taj mahal diya kumari IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धार्मिक स्थळांवरून भोंगे उतरवण्याचा वाद गेले काही दिवस सुरू होता. तशात एका हिंदूत्ववादी संघटनेने ‘कुतुब मिनार’ हे खरंतर मुळात ‘विष्णू स्तंभ’ नावाचं हिंदू मंदिर होतं असा इतक्यातच दावा केला आहे.

शाह जहानने आपली पत्नी मुमताज हिच्यावरील प्रेमाखातर ‘ताज महाल’ बांधल्याची कथा आपण वर्षानुवर्षे ऐकत आलेलो आहोत. मात्र ‘ताजमहाज’-‘तेजोमहाल’ हा वादही आता आपल्यासाठी नवा राहिलेला नाही.

 

 

या वादाने पुन्हा डोकं वर काढलंय. इतिहासकार पी एन ओक यांनी ‘ताज महाल’ या आपल्या पुस्तकात ताज महाल हे मुळात शंकराचं मंदिर असून ‘तेजो महाल’ असा त्याचा उल्लेख केला आहे.

२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये भाजपाचे खासदार विनय कटियार यांनीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ताज महालला ‘तेजोमहाल’ घोषित करा अशी मागणी केली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पी एन ओक यांच्याबरोबर काम केलेल्या लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी सरकारने सत्य समोर आणण्यासाठी तिथे तज्ञांचं पथक पाठवावं अशी मागणी केली होती. ताज महालात हिंदू देवतांच्या मूर्ती असू शकतात असा वाद सध्या सुरू आहे.

या वादात इतक्यातच भाजपाच्या खासदार असलेल्या दिया कुमारी यांनी उडी घेतलीये. ताजमहालाची जागा ही मुळात आपल्याच घराण्याची असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. काय आहे हे सगळं वृत्त? जाणून घेऊ.

 

 

भाजपाच्या खासदार आणि जयपूर राजघराण्याच्या माजी राजकुमारी असलेल्या दिया कुमारी यांनी ‘ताज महाला’च्या जागी पूर्वी आपल्या घराण्याचा महाल होता असा दावा नुकताच केला आहे. यासंबंधीचे दस्तावेज आपल्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

भाजपाचे अयोध्येतील मीडिया इन-चार्ज असलेल्या रजनीश सिंग यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने बऱ्याच काळापासून बंद असलेल्या ताज महालातील २२ खोल्या उघडून त्यांचं सर्वेक्षण केलं जावं अशी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयामधील लखनऊ बेंच येथे दाखल केली आहे.

आपल्या याचिकेत त्यांनी ताज महालाला मंदिर बनवण्याची माझी मागणी नाही. मात्र समाजात एकोपा राहावा या दृष्टीने सत्य काय आहे ते समोर आणलं जावं असं म्हटलं आहे. हा वाद संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बंद असलेल्या खोल्यांची तपासणी करणे असं त्यांचं म्हणणं आहे.

४ मे ला ही याचिका दाखल केली गेल्यानंतरच दिया कुमारी यांनी हा दावा केला आहे. मुघल शासक शहा जहान यांनी दिया यांच्या घराण्याकडून ही जमीन घेतली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

यासंदर्भात त्या म्हणतात, “या जागेच्या बदल्यात रक्कम दिली गेली होती, पण ती किती होती, ती स्वीकारली गेली होती की नव्हती हे मी सांगू शकत नाही. कारण, ‘पोथीखान्या’मध्ये असलेल्या नोंदींचा मी अभ्यास केलेला नाही. पण ही जागा मुळात आमच्या घराण्याची होती आणि शाह जहानने ती घेतली.”

 

 

दिया कुमारी पुढे म्हणाल्या, “त्यावेळी न्यायव्यवस्था नसल्यामुळे कुठलंही आवाहन करता येऊ शकलं नाही. नोंदींची तपासणी केल्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील.” रजनीश सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेला पाठिंबा देत त्या म्हणाल्या, “हे स्मारक उभारलं जाण्यापूर्वी तिथे काय होतं याची तपासणी केली गेली पाहिजे. ‘मकबरा’च्या जागी मुळात काय होतं हे जाणून घेण्याचा लोकांना हक्क आहे.”

दिया कुमारींविषयी :

मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक असलेल्या मान सिंग यांचं जयपूर राजघराणं होतं. पूर्वी आमेर या नावाने ओळखलं जाणारं हे घराणं नंतर जयपूर या नावाने ओळखलं जाऊ लागलं. दिया कुमारी यांचा या राजघराण्याशी संबंध आहे. याच घराण्यात माजी सम्राट असलेल्या सवाई भवानी सिंग यांचा जन्म झाला होता.

पद्मिनी देवी हे त्यांच्या पत्नीचं नाव. दिया कुमारी या त्यांची एकुलती एक मुलगी. दिया कुमारी यांनी १९९७ मध्ये राजघराण्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेल्या नरेंद्र सिंग यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या प्रेमविवाहामुळे त्या चांगल्याच चर्चेत राहिल्या.

 

 

मात्र लग्नाला २१ वर्षं झाल्यानंतर २०१८ मध्ये या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यांना तीन मुलं आहेत. दिया कुमारींचे वडील भवानी सिंग यांचं २०११ साली निधन झाल्यानंतर दिया कुमारींचा मुलगा पद्मनाभ सिंग यांना पुढचा वारसदार म्हणून घोषित केलं गेलं.

आपली आजी राजमाता गायत्री देवी यांच्या पावलावर पाऊल ठेवत दिया कुमारी राजकारणात आल्या. भाजपाच्या नेत्या दिया कुमारी या आधी सवाई माधोपूर मधून एमएलए झाल्या. २०१९ च्या निवडणुकीत त्या ५,५१, ९१६ मतं मिळवून विजयी झाल्या होत्या. सध्या त्या राजसमंद येथून लोकसभेच्या खासदार आहेत.

पूर्वीच्या काळी असलेल्या या जयपूर राजघराण्याच्या वतीनेही कोर्टात याचिका दाखल केली जाईल का अशी विचारणा झाल्यावर आपण सध्या यात लक्ष घालत असून यासंदर्भात काय पावलं उचलायची ते ठरवू असं दिया कुमारी यांनी म्हटलं आहे.

प्रभू रामचंद्रांची वंशज असल्याचा दावा :

यापूर्वी दिया कुमारी यांनी आपल्या घराण्यातले सदस्य प्रभू रामचंद्रांचे वंशज असल्याचा दावा केला होता. जयपूर घराण्याचे माजी सम्राट असलेले भवानी सिंग हे प्रभू रामचंद्रांचे पुत्र कुश यांचे ३०९वे वंशज असल्याचं म्हटलं जातं.

दिया कुमारींकडे यासंदर्भातले पुरावे असून अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला गती मिळायला मदत व्हावी म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाला पुरवण्याची दिया कुमारी यांची इच्छा असल्याचं वृत्त समोर आलं होतं.

 

 

काहीतरी लपवून ठेवलं जातं तेव्हा ते नेमकं का लपवून ठेवलं गेलंय याविषयी कुतूहल उत्पन्न होणं सहाजिक असतं. निस्सीम प्रेमाचं प्रतीकअसलेला हा ताजमहाल आता त्याच्याविषयीच्या वादांनीच अधिक ओळखला जाऊ लागलाय.

ताजमहालातल्या त्या २२ बंद खोल्याचा तपास घेतला जाईल का? तपास केल्यावर तिथे खरंच हिंदू देवतांच्या मूर्ती आढळल्या तर? आणि तपासच केला गेला नाही तर अजून किती काळ हा वाद असाच लटकत राहणार?

दिया कुमारींचा दावा खरा आहे का? या प्रश्नांच्या उत्तरांची संयमाने वाट पाहण्याखेरीज जनतेकडे पर्याय नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version