Site icon InMarathi

मोबाईल क्रांतीचा जनक असलेला हा नेता कायमच ‘घोटाळेबाज’ म्हणून ओळखला गेला

sukh ram im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नेते, अधिकारी, बडी मंडळी यांच्याभोवती नेहमीच प्रसिद्धीचं वलय असतं. मग ती सुप्रसिद्धी असो किंवा कुप्रसिध्दी! मोठ्या पदावरच्या अशा व्यक्तींची समाजातली प्रतिमा कधी चांगली असते, कधी वाईट तर कधी मिश्र. ज्यांनी समाजहिताची कामं केली आहेत त्यांना वाखाणलं जातंच. पण समाजात ज्यांची प्रतिमा डागाळलेली आहे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचीही वेळोवेळी दखल घेतली जाते. असं असताना केवळ चांगलं कामच नव्हे तर एखाद्याने केलेल्या क्रांतीचंच पूर्णतः विस्मरण होऊन केवळ त्याने केलेल्या घोटाळ्यांसाठीच ती व्यक्ती आयुष्यभर चर्चेत राहिली असेल तर?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

यापुढे आपण मोबाईलशिवाय जगण्याची कल्पनाच करून शकणार नाही. तुम्हाआम्हा सर्वांची चौथी मूलभूत गरज झालेला मोबाईल कधीकाळी भारतात नव्हता तेव्हाही माणसं जगतच होती याचं नवल वाटावं इतका आज मोबाईल आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण ज्या व्यक्तीने पहिल्यांदा मोबाईल भारतात आणला त्या व्यक्तीची आठवण तिने केलेल्या या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी कधीही न काढली जाता ती व्यक्ती कायमच तिने केलेल्या घोटाळ्यांमुळे ओळखली गेली. ते घोटाळेही अर्थात तसे मोठेच होते त्यामुळेही हे घडलं असावं.

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचं काल निधन झालं. नेहमीच आपण केलेल्या घोटाळ्यांमुळे लक्षात राहिलेल्या या नेत्याने भारतात मोबाईल क्रांती केली होती हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

 

 

सुखरामजींनी भारतात कसा मोबाईल आणला? आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नावावर कुठले कुठले घोटाळे होते? याविषयी जाणून घेऊ.

घोटाळ्यांची मालिका

आपल्या कार्यकाळात त्यांनी ५ वेळा विधानसभा निवडणूक आणि तीनदा लोकसभा निवडणूक लढवली होती. मंडीमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेले पंडित सुखराम १९६३ ते १९८४ या काळात आमदार होते. १९८४ साली ते लोकसभेवर निवडून आले आणि राज्यमंत्री झाले. त्यावेळी राजीव गांधी यांचं सरकार होतं.

 

 

१९९६ साली मंडीमधूनच पुन्हा जिंकून ते दूरसंचार मंत्री झाले. त्यावेळी पी. व्ही. नरसिंह राव यांचं सरकार असताना दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या दिल्लीतील आणि मंडीमधील घरांवर सीबीआयने छापा टाकला. त्यांच्या घरांमध्ये नोटांनी भरलेल्या सुटकेस आणि बॅग्स सापडल्या. ही सगळी रक्कम ४ करोडपेक्षाही जास्त होती. हे इतके पैसे आपल्याकडे कसे आले या प्रश्नावर सुखराम निरुत्तर झाले.

काँग्रेस नेते असलेल्या सुखराम यांना सजा देण्यात काँग्रेसच्याच नेत्यांनी मोठी भूमिका बजावली होती. पी. व्ही. नरसिंहराव आणि त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांनी हा सगळा काळा पैसा सुखराम यांचाच असल्याची कबुली सीबीआयला दिली. सीबीआयकडून अटक झाल्यानंतर सुखराम यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेस पक्षातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

 

Fwww.dnaindia.com

 

२००२ साली त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून त्यांनी एका खासगी कंपनीला कच्चा माल पुरवण्याचे कंत्राट दिले ज्यामुळे सरकारला १.६६ करोड रुपयांचं नुकसान झालं. आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी एका खासगी कंपनीला कंत्राट दिलं ज्याच्या बदल्यात त्यांनी ३ लाख रुपयांची लाच घेतली.

दूरसंचार विभागाला ३० करोड रुपयांचं केबल विकण्यासाठी त्यांनी एका कंपनीला कंत्राट दिलं ज्याच्याही बदल्यात त्यांनी पैसे घेतले. २०११ साली त्यांच्या गुन्ह्यासाठी त्यांना ५ वर्षांची शिक्षा दिली गेली. यापूर्वी २००९ साली त्यांना प्रमाणापेक्षाही अधिक संपत्ती असल्याच्या खटल्यात दोषी ठरवलं गेलं. ४.२५ करोड रुपये अवैध मार्गाने कमावल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

काँग्रेस पक्षामधून काढलं गेल्यानंतर १९९७ साली त्यांनी ‘हिमाचल विकास काँग्रेस’ची स्थापना केली. १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाशी युती केली आणि ते सरकारमध्ये सामील झाले. पंडित सुखराम यांच्यासोबत ५ आमदार मंत्री झाले.

१९९८ साली त्यांचा मुलगा अनिल शर्मा राज्यसभेवर निवडून आला. २००३ साली सुखराम मंडीतून पुन्हा विजयी झाले आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसशी पुन्हा हातमिळवणी केली. २०१७ साली ते आपल्या मुलासह भाजपात आले. मात्र त्यानंतर दोनच वर्षांत पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हा मंडीमधून भाजपाचा आमदार आहे.

 

 

…आणि मग चक्क एका मुख्यमंत्र्याला सुद्धा ‘कांद्याने रडवलं’ होतं!

पेन-किंग, करोडोंचा घोटाळा बहाद्दर आपल्याच ‘उद्योगांमुळे’ गेला रसातळाला …

भारतात मोबाईल आणण्यामागची रोचक कहाणी :

१९९३ ते १९९६ या काळात सुखराम शर्मा दूरसंचार मंत्री होते. भारतात मोबाईल आणण्यामागे एक रोचक कहाणी आहे. दूरसंचार मंत्री असताना पंडित सुखराम एकदा जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी एका कार चालकाच्या खिशात त्यांनी मोबाईल पाहीला. जपानमध्ये असं तंत्रज्ञान असू शकतं, मग भारतात का नाही असा विचार त्यांच्या मनात आला.

 

 

एका मुलाखतीत पंडित सुखराम यांनी सांगितलं की आपल्या या व्हिजनसंदर्भात त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि मोठे उद्योगपती असलेल्या धीरूभाई अंबानी यांच्याशी चर्चा केली. एक दिवस मोबाईल टेलिफोन इंडस्ट्री चांगलीच फायद्यात असेल असं ते म्हणाले.

आजच्या घडीला रिलायन्स देशातील सगळ्यात मोठी मोबाईल टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. ”मोबाईलमध्ये कॅमेराही फिट होऊ शकतो याचा अंदाज आपल्याला त्यावेळी आला नव्हता” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. ९०च्या दशकात अशा प्रकारे तंत्रज्ञानाविषयी चर्चा करण्यातही बऱ्याच अडचणी यायच्या असं ते म्हणायचे.

एकदा एका जाहीर सभेत ”तुमच्या सगळ्यांच्या खिशात मोबाईल असेल” असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या म्हणण्याला लोकांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. त्या काळी लँडलाईनसाठीही लोकांना खूप वाट बघावी लागत असे. ”आमच्याकडे लँडलाईनच नाही आणि इथे मोबाईलच्या गप्पा चालल्या आहेत” असा सवाल त्यावेळी काही जणांनी उपस्थित केला.

३१ जुलै १९९५ ला भारतात सर्वप्रथम मोबाईलवरून कॉल केला गेला. तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री पंडित सुखराम शर्मा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यात हा कॉल झाला होता. हा मोबाईल नोकियाचा होता.

 

 

आता हे समजल्यानंतर यापुढे आपल्याला भारतात मोबाईल केव्हा आणि कसा आला हे नक्कीच विसरायला होणार नाही. जपानमधल्या कार चालकाकडे मोबाईल आहे मग आपल्या देशातल्या नागरिकांकडे तो का नाही हा विचार पंडित सुखराम यांच्या मनात आल्यामुळे आणि त्यासाठी त्यांनी धडपड केल्यामुळे हे शक्य होऊ शकलं.

मनात अगदी सहज आलेला विचारही एखाद्या अभूतपूर्व क्रांतीचं निमित्त कसा ठरू शकतो हेच वरच्या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version