' डी-गॅंग ते राजकारणी नेते, भ्रष्टाचाराविरोधात अनेकांच्या मुसक्या आवळणारा मराठी ऑफिसर! – InMarathi

डी-गॅंग ते राजकारणी नेते, भ्रष्टाचाराविरोधात अनेकांच्या मुसक्या आवळणारा मराठी ऑफिसर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वीपासूनच समाजात, राजकारणात , शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या घटना घडत आलेल्या आहेत. त्यावेळी अशा घटना घडल्या की जनमानस हादरून जायचा. आदर्श म्हणावीत अशी नेतेमंडळी, अधिकारी काही प्रमाणात तरी समाजात होते.

दुर्दैवाने आज समाजात भ्रष्टाचार इतका प्रचंड बोकाळलाय की आता भ्रष्टाचारी, लबाड नेतेमंडळींचाही उदो उदो केला जातो.

डोळ्यांदेखत अगदी सरळमार्गी वाटणाऱ्या कित्येकांचे खायचे दात मात्र वेगळेच असतात. हल्ली अगदी चांगले म्हणावे असे नेते, अधिकारीही कुठल्या ना कुठल्या वादाचं लक्ष्य ठरलेले असतात.

 

corruption IM

 

लाच घेऊन अफरातफरी करणाऱ्यांचा, मोठमोठ्या गँग्सना छुप्या स्वरूपात मदत पुरवणाऱ्यांचा आणि या सगळ्यामुळे निर्ढावून गेलेल्या, आपल्या अवैध कृत्यांचं जराही शल्य न वाटणाऱ्यांचं प्रमाण आता कमालीचं वाढलेलं आहे. त्यामुळे एखादा निष्कलंक नेता, राजकारणी, अधिकारी ही गोष्टच आता अतिशय दुर्मिळ झाली आहे.

सगळ्याच स्तरांवर सध्या अशी दयनीय परिस्थिती असताना एकेकाळी मात्र जीवाची बाजी लावून भ्रष्ट्राचाराविरुद्ध आवाज उठवणारे, काहीही झालं तरी प्रामाणिकपणाची कास न सोडणारे धैर्यवान नेते, अधिकारी होते.

भ्रष्टाचाराची मुळं उघडून काढण्याची, पॉवरफुल नेतेमंडळींच्या विरोधात आवाज उठवण्याची बरीच किंमत त्यांना भोगावी लागली तरी त्यांनी कधीही कुठल्या चुकीच्या मार्गांचा अवलंब केला आहे. गोविंद राघव खैरनार हे असेच एक अधिकारी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करणाऱ्या, प्रसंगी अगदी जीवघेणे हल्ले होऊनही अंडरवर्ल्डच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा एकेकाळी फार वचक होता.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

 

gowind khairnar IM

 

खैरनारांचा जन्म नाशिकमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते उच्च विभागातील कारकून या पदावर रुजू झाले.

शासकीय सेवेत १० वर्षं काम केल्यानंतर ते बीएमसीमध्ये आले आणि तिथे नोकरी करायला त्यांनी सुरुवात केली. विभाग अधिकारीपदाची परीक्षा दिल्यावर ते १९७६ साली वॉर्ड ऑफिसर झाले. त्यानंतर अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यांवर अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करणं हा त्यांचा शिरस्ताच झाला.

महापालिकेत गेल्यानंतर तिथे प्रचंड प्रमाणावर होणारा भ्रष्टाचार पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. अशा परिस्थितीतही त्यांनी कायद्याच्या दृष्टीने जे योग्य असेल तेच मी करेन असा निश्चय केला आणि शेवटपर्यंत ते आपल्या या निश्चयावर ठाम राहीले.

वरदराजन मुदलियारच्या धंद्यावरील कारवाई :

१९७०-८०च्या दशकात वरदराजन मुदलियार हा मुंबईचा डॉन होता. लोक त्याला ‘वरद भाई’ म्हणायचे. त्याच्या दहशतीमुळे लोक त्याच्यासमोर अक्षरश: थरथर कापायचे. खैरनार जेव्हा माटुंगा विभागात होते तेव्हा त्यांनी वरद भाईच्या धंद्यावर कारवाई केली. त्यानंतर खैरनार यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले.

एकदा तर चक्क वरदराजन त्यांच्या कार्यालयात गेले आणि मी तुम्हाला मदत करेन, रिव्हॉल्वर देईल असं सांगू लागले. त्यांच्या या म्हणण्याला खैरनार अजिबात बधले नाहीत. एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच तिथे वार्ड भाईसुद्धा असताना ‘वरद भाईंशी जुळवून घ्या” असा सल्ला त्यांना देण्यात आला.

 

varadrajan IM

 

मात्र या कशाचाही खैरनारांवर परिणाम झाला नाही. सगळेच कसे एकमेकाला मिळालेले आहेत, सत्याच्या बाजूने कुणीच कसं नाही हे पाहून खैरनारांना प्रचंड क्लेश व्हायचे.

एक प्रकारे खैरनारांच्या रूपात वरद भाईसारख्या ठगाची खैरनारांसारख्या महाठगाशी गाठ पडली होती. खैरनारांची ही कणखर भूमिका सहन न झाल्यामुळे त्यांच्यावरच हल्ला करण्याचा भ्याडपणाचा मार्ग वरद भाईने अवलंबला.

१९८५ साली अचानक त्यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या पायात गोळी घुसली. या हल्ल्यामागे वरद भाई आणि त्यावेळच्या राजकारण्यांचे हात असणार हे खैरनारांनी मनोमन जाणलं.

इतकं सगळं होऊनदेखील त्या कुणाही विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. खैरनार मात्र त्यानंतरही शर्थीने लढत राहीले.

दाऊदच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाई :

१९८८ साली खैरनार उपायुक्त या पदावर पोहोचले. शरद काळे जेव्हा मुंबई महापालिका आयुक्त झाले तेव्हा मुंबईतील अतिक्रमणविरोधी कारवाईची जबाबदारी त्यांनी खैरनारांवर सोपवली. त्या दरम्यान दक्षिण मुंबईत अनधिकृत बांधकामं होण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या होत्या.

 

govind khairnar 2 IM

 

बहुसंख्य मुस्लिम असलेल्या भागांमधली अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करण्यासाठी एक उच्च पोलीस अधिकारी सामुदायिक दलदल निर्माण करतो आहे असा आरोप खैरनारांनी केला.

मात्र मुस्लिम गुंडांवर आपलं लक्ष केंद्रित करत असताना शिवसनेच्या पाठिंब्याने केल्या गेलेल्या अनधिकृत बांधकामाकडे खैरनार दुर्लक्ष करत आहेत असं पोलिसांनी म्हटलं. त्यावर “इमारतीच्या मालकाच्या धर्माशी माझं काहि देणंघेणं नाही.”, असं सडेतोड उत्तर खैरनारांनी दिलं.

दुबई स्थित डॉन दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांनी मुंबईत बांधलेल्या अनधिकृत इमारती पाडायला खैरनारांनी सुरुवात केली. त्यांनी दाऊदची ‘मेहजबीन मॅन्शन’ ही वादग्रस्त इमारतही पाडली.

खैरनारांच्या म्हणण्यानुसार मुंबईत त्यावेळी अशी एकूण ३५० अनधिकृत इमारती होत्या. गुंडांनी, विशेषतः दाऊदच्या माणसांनी त्यातल्या बऱ्याच इमारती बांधल्या होत्या. दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या व्यावसायिक भागांमध्ये त्यावेळी दाऊदच्या माणसांनी किमान १५० इमारती बांधल्या होत्या.

 

dawood inmarathi

 

बांद्रा पूर्वेच्या बॉम्बहल्ल्यात वापरलेलं RDX हे भयानक स्फोटक जतन केल्याबद्दल अटक झालेल्या मजिद खान ने ५० इमारती बांधल्या होत्या. बाकी १५० इमारती उत्तर-पश्चिम मुंबईतील वर्सोव्यासारख्या उपनगरांमध्ये विखुरलेल्या होत्या.

शरद पवारांवर केलेली टीका :

अनधिकृत धंदे करणाऱ्या फेरीवाल्यांचा त्यावेळी मुंबईत चांगलाच सुळसुळाट झाला होता. त्यांच्याविरोधात कारवाई करायची कुणाची टाप नव्हती. अशा परिस्थितीत खैरनार हिंमतीने पुढे सरसावले आणि त्यांनी या फेरीवाल्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. पण जेव्हा ही कारवाई जोरदार होऊ लागली तेव्हा खैरनारांना पोलिसांचं बळ उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली जाऊ लागली.

यामागे राजकारण असावं असा अंदाज खैरनारांनी बांधला. हे सगळं पाहून त्यांना प्रचंड त्रास झाला, मनात चीड उत्पन्न झाली. अशा मनस्थितीत असतानाच त्यांनी शरद पवारांवर चांगलीच टीका केली.

पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मीडियात याविषयीच्या चर्चांना उधाण आलं. एकूण राजकारणावरच याचा परिणाम झाला. विधानसभेतही विरोधक हल्ले करू लागले.

 

sharad pawar IM

 

या सगळ्याचा परिणाम असा झाला की १९९५ साली सेना-भाजपा सत्तेवर आले पण खैरनारांना मात्र निलंबित केलं गेलं. १९९६ ते २००० पर्यंत खैरनार निलंबितच राहिले. पण त्यानंतर पुन्हा त्यांना पालिकेच्या सेवेत घेतलं गेलं. त्यांच्यापाशी केवळ ६ महिन्यांचा अवधी होता. पण इतक्या कमी काळातही त्यांनी आपल्याकडून शक्य होतील तितकी अनधिकृत बांधकामं नेस्तनाभूत केली.

आजूबाजूची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक वाईट झाल्यामुळे मन विषण्ण झालेल्या खैरनारांनी २०१३ साली लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “तेव्हा मी केवळ शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. आजची परिस्थिती तर खूपच खराब झाली आहे. सारी व्यवस्थाच सडत चालली आहे. कुणा एका पक्षाचे नव्हे, तर सगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही कमी-अधिक प्रमाणात याला जबाबदार आहेत.”

आण्णा हजारेंविषयीचा धक्कादायक अनुभव :

निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा अभाव जाणवू लागलाय असं वाटत असताना खैरनारांना आण्णा हजारेंकडे पाहून आशा वाटत होती. पण आण्णा हजारेंची लोकांसमोर असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्षातले ते यातली तफावत त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला.

ते अनेकदा राळेगणसिध्दीला जाऊन अण्णांशी बऱ्याच विषयांवर बोलायचे. पण अण्णा हजारेंकडे ३-३ जीपगाड्या आहेत अशी माहिती अण्णांच्याच एका मेकॅनिकने खैरनारांना दिली.

आपण एक उपायुक्त असूनही स्वतःची गाडी आपल्याजवळ नसताना आण्णा हजारेंसारख्या सैनात साधे वाहनचालक असलेल्या व्यक्तीकडे ३-३ जीपगाड्या कशा असा खैरनारांना प्रश्न पडला आणि तेव्हापासून त्यांना एकावर एक धक्के बसायला सुरुवात झाली.

आण्णा ज्या देवळात राहत होते त्याच्या बांधकामासाठी त्यांनी १० हजार रुपये दिले. बाकीचे पैसे गावकऱ्यांच्या मेहनतीचे होते. मात्र देवळावर आण्णा हजारेंचा हक्क. आण्णा हजारेंनी उपोषणाचंही नाटकच केलं असल्याचं त्यांना समजलं.

 

Anna-Hazare-inmarathi
thewirehindi.com

 

उपोषण सुरू असताना ते मध्येच उठून पडद्यामागे जाऊन एक ज्यूस पितात ज्यामुळे त्यांना पुढचा बराच काळ भूक लागत नाही अशी माहिती एका जवळच्या माणसाने त्यांना दिली. आपण केलेल्या आंदोलनाचं, मांडलेल्या विषयांचं सगळं श्रेय स्वतःकडेच कसं घेता येईल हे आण्णांनी पाहीलं.

ज्यांनी ज्यांनी यानंतर अण्णांना विरोध केला तो सगळा विरोध त्यांनी झटकून टाकला. आण्णा हजारे खोटारडे असल्याचं खैरनारांना उमगलं.

गोविंद खैरनारांना आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या हल्ल्यांना, आरोपांना, धमक्यांना सामोरं जावं लागलं. पण या सगळ्यामुळे घाबरून जाऊन ते कधीच मागे हटले नाहीत. भ्रष्टाचाराविरोधातली आपली मशाल त्यांनी सदैव पेटती ठेवली.

 

govind khairnar 3 IM

 

गोविंद खैरनार आणि त्यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निर्भय अधिकाऱ्यांच्या कर्तृत्त्वासाठी, अतुलनीय संघर्षासाठी त्यांना सलाम! भविष्यातही असे अनेक गोविंद खैरनार आपल्यातून घडोत हीच इच्छा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?