' बेरोजगार तरुणांसाठी मायकल जॅक्सनने शिव उद्योग सेनेला खरंच ४ करोड दिले होते का? – InMarathi

बेरोजगार तरुणांसाठी मायकल जॅक्सनने शिव उद्योग सेनेला खरंच ४ करोड दिले होते का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, एका व्यंगचित्रकाराने एका संघटनेची स्थापना केली..ती संघटना म्हणजे ‘शिवसेना’! प्रबोधनकारांनी ५४ वर्षांपुर्वी लावलेले हे रोपटे आज मान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनला आहे.

शिवसेनेचे सर्वेसर्वा, माननीय बाळासाहेब ठाकरे हे एक अतिशय वादळी व्यक्तिमत्व होते. जावेद मियांदाद पासून लता दिदी ,अमिताभ, सचिन, पुल अगदी शरद पवार अशा सर्वांचे मित्र असणारे आणि स्वतः उमदा व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब, यांचा आणखी एक मित्र होता जो पॉप म्युझिकचा बादशहा होता.

 

balasaheb thackrey inmarathi

 

हा किस्सा आहे याच ‘पॉप दिवा’ असलेल्या त्या एकमेव मायकल जॅक्सन चा आणि त्याच्या भारतात झालेल्या एकमेव कॉन्सर्टचा! काय होता हा किस्सा?

१९९५ साल, राज्यात शिवसेना-भाजप सरकार सत्तेत होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले राज ठाकरे यांनी ‘शिव उद्योग सेना’ स्थापन केली होती. ज्याद्वारे त्या काळातील २७ लाख बेरोजगार मराठी तरुणांना रोजगार मिळवून द्यायची एक योजना राबवण्याचे ठरले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यासाठी सगळ्यात जास्त गरज होती ती फंडिंगची, आणि मग एक सुपीक आयडियाने जन्म घेतला. ती आयडिया होती सुप्रसिद्ध पॉप गायक आणि डान्सर असलेला त्यावेळच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या मायकल जॅक्सन याचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्याची.

यातून शिव उद्योग सेनेला आर्थिक बळ तर मिळालेच असते आणि तरुणाई संघटनेकडे आकर्षित झाली असती असे दोन उद्देश या कार्यक्रमाच्या आयोजनामगे होते.

राज ठाकरे यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि ते यशस्वी देखील करून दाखवले. शिव उद्योग सेनेतर्फे १९९६ साली मुंबईत पॉप स्टार मायकल जँक्सनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पण या कार्यक्रमापूर्वी मायकल याच्याकडे एक मागणी करण्यात आली होती.

 

raj with jackson IM

 

ती म्हणजे कार्यक्रमानंतर मायकल याने शिव उद्योग सेनेला ४ कोटी रुपये देणगी म्हणून द्यायचे. अर्थात ही रक्कम मायकलसाठी मोठी नव्हती पण ती त्याने शिव उद्योग सेनेला का द्यायची? याबद्दल त्याला उत्सुकता होती.

तसे त्याने आपल्या मॅनेजरला देखील विचारले होते. यावर तेथील २७ लाख तरुणांना रोजगार देण्याच्या योजनेत त्या देणगीचा उपयोग केला जाईल असे मॅनेजरने मायकलला सांगितले. ते तरुण माझे फॅन आहेत का?

हा मायकलचा पुढचा प्रश्न होता आणि आत्ता नाहीत पण तू देणगी दिलीस तर नक्की होतील हे मॅनेजरचे स्मार्ट उत्तर होते.

ही मात्रा लागू पडली आणि मायकल भारतात, मुंबईत कार्यक्रम करण्यास तयार झाला इतकेच नाही तर भारतात आल्यावर त्याने बाळासाहेबांची भेट तर घेतलीच पण राज ठाकरेंच्या ‘शिव उद्योग सेनेला’ ४ कोटी रुपयांची देणगी देखील दिली.

मायकल जॅक्सन कॉन्सर्टसाठी मुंबईत आला आणि शिवसेनेने त्याचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते.

 

michel jackson mumbai concert IM

 

अगदी मराठमोळ्या पद्धतीने मायकल जॅक्सनचे स्वागत झाले होते. विमानतळाबाहेर मायकल जँक्सनच्या फँन्सनी तुफान गर्दी केली होती.

या उत्स्फूर्त स्वागतामुळे त्यावेळी मायकल जॅक्सनही भारावून गेला होता. मुंबईत पोहोचल्यानंतर मायकल जॅक्सनही बाळ ठाकरेंच्या घरी, मातोश्रीवर गेला. जिथे त्याने बराच वेळ घालवला. मायकल जॅक्सनने बाळासाहेब ठाकरेंच्या घरातील टॉयलेटचा वापर केला होता, जिथे त्याने केलेली स्वाक्षरी आजही पहायला मिळते.

त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जॅक्सनला त्यांचा चांदीचा तबला आणि तानपुरा भेट म्हणून दिला होता. मुंबईतील ‘ओबँरॉय’ या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मायकल जँक्सनच्या राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्यासाठी खास गाडीचीही व्यवस्था केली गेली होती.

१ नोव्हेंबर १९९६ ला मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट झाली. त्याआधी मुंबईतील वातावरण पूर्णपणे मायकल जँक्सनमय झालं होतं. अंधेरी क्रि़डा संकुलाबाहेर मायकलच्या फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. काहीजण तर तिकीट मिळवण्यासाठी रात्रभर लाईनीत उभे राहिल्याचे किस्सेही ऐकायला मिळाले होते.

या कॉन्सर्टमध्ये मायकल जँक्सन आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जबरदस्त गायलाही आणि तितक्याच एनर्जीने त्याने डान्स करत अख्ख्या स्टेजचा ताबा घेतला. मायकल जँक्सनची कॉन्सर्ट झाली आणि तो अमेरिकेत निघूनही गेला.

 

MJ IM

 

त्यानंतर इथे मुंबईत एकामागोमाग एक असे खमंग किस्से रंगू लागले. या कार्यक्रमाचे आयोजन ‘विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी’ या संस्थेकडे देण्यात आले होते. तेव्हा सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप सरकारने या कार्यक्रमावरील करमणूक शुल्क माफ केले होते. यावरून बरेच वादंग झाले.

विरोधी पक्षाने यावरून सरकारला कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला. काही जण तर या निर्णयाविरुद्ध न्यायालयात गेले होते. त्यावेळी मुंबईत झालेल्या या कार्यक्रमासाठी घेतलेला सुमारे तीन कोटी ३४ लाख रूपयांचा मनोरंजन कर विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला परत करण्यास नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

त्यावरून झालेला वाद आणि करमणूक कराचे ओझे तब्बल २५ वर्षानंतर उतरले आहे. खरेतर तब्बल १५ वर्षांनी, म्हणजे २०११ साली मुंबई उच्च न्यायालयाने करमणूक करात सवलत देण्याचा निर्णय रद्द करून, ग्राहक पंचायत व विझक्राफ्ट यांना बाजू मांडण्याची संधी देऊन फेरसुनावणीचे निर्देश दिले होते.

त्यावेळी विझक्राफ्ट ने तब्बल तीन कोटी छत्तीस लाख रुपये अनामत रक्कम म्हणून न्यायालयात भरली होती.

 

wizcraft agency IM

 

मात्र वेळेत संबंधित कागदपत्रांची पूर्तता होवू शकली नाही आणि २०१२ मध्ये मंत्रालयात लागलेल्या आगीत या केस संबंधित कागदपत्रे ही नष्ट झाली असल्याचे महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला सांगितले.

यावर २०१८ साली देखील राजस्व विभागाने सुनावणी केली होती. आता पुन्हा शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे आणि सरकार, ही कर सवलत विझक्राफ्टला देण्याचा विचार करत आहे. लवकरच होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाईल आणि कदाचित विझक्राफ्टला त्यांची करसवलतीची रक्कम परत मिळेल जी त्यांनी न्यायालयात जमा केली आहे.

दरम्यान ग्राहक पंचायतीचे असे म्हणणे आहे की मनोरंजन कर कायद्या (१९२३) नुसार पॉप म्युझिक साठी अशी कोणतीही कर सवलत नाही. तसेच त्यावेळी शिव उद्योग सेना देखील अधिकृत रित्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात रजिस्टर नव्हती.

विझक्राफ्टचा हा मुद्दा होता की म्युझिक कॉन्सर्ट कर सवलतींच्या श्रेणीमध्ये येते. त्यामुळेच ही प्रक्रिया करून विझक्राफ्टला करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा विषय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आणि या कॉन्सर्टच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

या सार्‍या गोष्टींना आता बराच काळ लोटला आहे. शिव उद्योग सेना आता अस्तित्वात नाही आणि राज ठाकरे यांनीही शिव सेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आहे.

बांद्रा येथील बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमध्ये, ज्या खाजगी रूममध्ये बाळासाहेब महत्वाच्या बैठका घ्यायचे त्या भिंतीवर बाळासाहेब आणि मायकल जॅक्सनने एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून काढलेला फोटो मात्र अजूनही तसाच आहे.

 

balasaheb with MJ IM

 

याच काय त्या दोघांच्या आठवणी आता मागे राहिलेल्या आहेत…काही घटना आणि कार्यक्रम असे असतात की त्याचं ओझं उतरता उतरत नाही, हा कॉन्सर्ट किस्सा हेच तर सांगत नाही ना??

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?