' तानसेनचा जन्म हिंदू घरातला, पण तो मोठा झाला मुस्लिम म्हणून; असं कशामुळे? – InMarathi

तानसेनचा जन्म हिंदू घरातला, पण तो मोठा झाला मुस्लिम म्हणून; असं कशामुळे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कलाकारांना धर्म नसतो असं म्हणतात. त्यांची कला हाच त्यांचा धर्म असतो, पण काही कलाकारांनी इतिहासात आपली अशी काही छाप सोडली आहे की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही आपल्या मनात कुतूहल निर्माण होतं आणि आपण त्याची माहिती शोधून काढतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अकबराच्या दरबारातील ‘रत्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तानसेन बद्दल अशीच एक चकित करणारी माहिती इतिहास अभ्यासकांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे.

नावावरून आणि आजवर ऐकलेल्या कथांवरून ‘तानसेन’ ही व्यक्ती मुस्लिम धर्मीय असावी असा बहुतांश लोकांचा अंदाज आहे, पण आपल्या गायन कलेने आणि उर्दूच्या अस्खलित उच्चाराने अकबर राजा आणि दरबाराला प्रभावित करणारा हा गायक हिंदू धर्मात जन्माला आलेला होता अशी माहिती एका इतिहास अभ्यासकाने लिहून ठेवलेली आहे.

 

tansen im

 

कोण होते ‘तानसेन’चे पालक ? तो लहानाचा मोठा मुस्लिम घराण्यात कसकाय झाला ? हे केवळ एक कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.

‘तानसेन’चा जन्म हा १४९३ मध्ये मध्यप्रदेश मधील एका ब्राम्हण घरात झाला होता. त्याचं खरं नाव ‘रामतनू पांडे’ असं होतं. त्याच्या वडिलांचं नाव मुकुंदराम पांडे असं होतं.

मुकुंदराम पांडे हे एक कवी आणि संगीतकार होते. काही काळ त्यांनी वाराणसीच्या मंदिरात प्रवचनकार म्हणून काम केलं होतं. तानसेनने गाण्याचं शिक्षण आपल्या वडिलांकडून घेतलं होतं.

रामतनू हा मुकुंदराम पांडे यांचा एकुलता एक सुपुत्र होता. त्याच्या जन्माची एक कथा आहे. मुकुंद पांडे हे ग्वाल्हेरच्या ‘मोहम्मद गाऊस’ यांच्या गायकीचे चाहते होते.

व्यक्ती म्हणून देखील मुकुंदराम मोहम्मद गौस यांचा खूप आदर करायचे. एका भेटीत मुकुंदराम यांनी गौस यांना आपल्याला आपत्य नसल्याची खंत व्यक्त केली होती आणि अशी विनंती केली होती की, “आपणही आम्हाला मुलगा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.”

मोहम्मद गौस यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि मुकुंदराम यांना मुलगा झाला. मुकुंदराम पांडे हे ५ वर्षांचा झाल्यावर आपल्या मुलाला मोहम्मद गौस यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी घेऊन आले होते.

 

tansen im

 

भेटी दरम्यान, आपल्या मुलाने सुद्धा शास्त्रीय गायक व्हावं अशी इच्छा मुकुंदराम यांनी मोहम्मद गौसकडे व्यक्त केली. मोहम्मद गौस हे तेव्हा विड्याचं पान खात होते.

शिष्य म्हणून नेमणूक करण्याच्या हेतूने मोहम्मद गौस यांनी आपल्या तोंडातील लाळ बोटाने काढली आणि ती त्यांनी रामतनू पांडेच्या तोंडामध्ये ठेवली.

मुकुंदराम पांडे या ब्राम्हण व्यक्तीला हा प्रसंग बघवला नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अशी घोषणा केली की, “आता हा मुलगा आमच्या धर्मात राहिलेला नाहीये. आजपासून आपणच याचा सांभाळ करा.”

मोहम्मद गौस यांनी त्या दिवसापासून रामतनू पांडे याचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांनी रामतनूचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ केला.

रामतनूसाठी त्यांनी ग्वाल्हेरमधील सर्वात चांगल्या शिक्षकांना पाचारण केलं. या दरम्यान, मोहम्मद गौस यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या रामतनू पांडेने इस्लाम धर्म स्वीकारल्याची डॉक्टर अब्दुल हलीम आणि सैय्यद आबीद अली या इतिहासकारांनी नोंद केली आहे.

संगीत शिक्षण घेत असतांना तानसेनने काही वर्ष आदिलशाहच्या दरबारात गाणं सादर केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने राजा रामचंद्र यांच्या दरबारात गायन कला सादर करण्यास सुरुवात केली.

 

tansen im2

 

‘रेवा’ राज्याचा राजा ‘रामचंद्र सिंग’च्या दरबारात रामतनू गायन कला सादर करायचा. रामतनूच्या गाण्याला खरी ओळख ही या दरबारातून मिळाली.

राजा रामचंद्र सिंग यांना संगीताची विशेष आवड असल्याने त्यांनी आपल्या राज्यात संगीत शिक्षणाची एक संस्था देखील सुरू केली होती.

ग्वाल्हेर हे मान सिंग तोमर, नायक बख्शु, सुलतान आदिलशाह सुरी, हजरत मोहम्मद गौस या सर्व गायकांमुळे देशाचं प्रमुख ‘संगीत केंद्र’ म्हणून त्या काळात नावारूपाला आलं होतं.

रामचंद्र सिंग राजाच्या दरबारात झालेल्या एक गायनाच्या कार्यक्रमात मुघल राजा अकबर हजर होते. संगीताची आवड आणि जाण असलेल्या अकबर राजाला रामतनूची गायकी खूप आवडली होती. त्या कार्यक्रमानंतर अकबर हा नेहमीच राजा रामचंद्र सिंग यांना निरोप पाठवायचा आणि रामतनू पांडे यांना आपल्या दरबारात गाणं गाण्यासाठी बोलवायचा.

एक वेळ अशी आली, की अकबर राजाने ‘रामचंद्र सिंग’ राजाला अशी मागणी केली की, रामतनूने नेहमीसाठी मुघल राजाच्या दरबारात ‘तानसेन’ म्हणून रुजू व्हावं आणि दरबाराला नियमितपणे मंत्रमुग्ध करावं. अकबरच्या दरबारात एकूण १८ गायक होते ज्यापैकी ११ हे ग्वाल्हेरचे होते.

रामतनू पांडे यांची अकबराने जेव्हा दरबारात गायक म्हणून नेमणूक केली त्यावेळी त्यांचं वय ६० वर्ष होतं. अकबरच्या दरबारात जाण्यासाठी त्यांची मानसिक तयारी नव्हती.

त्यांनी ही गोष्ट रामचंद्र सिंग यांना बोलून दाखवली होती, पण तेव्हा राजाने रामतनू यांना हे समजावून सांगितलं की, “अकबरच्या दरबारात तुम्हाला अधिक लोकांसमोर आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळेल. तुम्ही नजराणा घेऊन अकबराच्या दरबारात उद्या जाणार आहात हा आमचा आदेश आहे.”

 

tansen im3

 

१५६२ मध्ये ‘हिंदी शास्त्रीय संगीत’चे जनक मानल्या जाणाऱ्या रामतनू पांडे यांनी अकबराच्या दरबारात पहिल्यांदा आपली कला सादर केली.

‘तानसेन’ म्हणून इथून पुढे ओळखले जाऊ लागलेले हे गायक एक उत्कृष्ट वादक, संगीतकार सुद्धा होते. उत्तर भारतात वाद्य आणि गायनकलेची प्रशंसा करणे हे लोक तानसेन यांच्यामुळेच शिकले असा आपला इतिहास सांगतो.

तानसेन यांचं संगीत हे संत स्वामी हरिदास आणि मोहम्मद घाऊस यांच्या शिकवणीचं मिश्रण असल्याचं जाणकारांना जाणवतं. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच गाणं गाण्यास सुरुवात केलेल्या तानसेन यांचं ‘ध्रुपद गायकी’ हे वैशिष्ठय होतं.

‘मोहम्मद गौस’ यांच्याकडे बरीच वर्ष राहून संगीत शिक्षण घेतल्याने त्यांच्यावर, त्यांच्या भाषेवर मुस्लिम धर्माचे सुद्धा संस्कार झाल्याचं जाणवतं.

भक्ती संगीत हे जेव्हा संस्कृत भाषेतून हिंदी भाषेकडे जात होतं तेव्हा तानसेन यांनी आपले शब्द, साजेशी चाल देऊन संगीत क्षेत्राला आपलं मोलाचं योगदान दिलं होतं.

‘ब्रजभाषा’ मध्ये तयार केलेलले श्रीकृष्ण आणि शंकराचे गाणे हे लोकांना भारतीय संगीतात रुची घेण्यास भाग पाडणारे होते. त्यांनी तयार केलेले नवीन ‘राग’ आणि ‘गणेश स्तोत्र’, ‘संगीत सारा’ या विषयावर लिहिलेले पुस्तकं यामुळे तानसेन हे दोन्ही धर्मात तितकेच लोकप्रिय होते.

तानसेन यांच्या सुफी संगीताच्या अभ्यासामुळे अकबरने त्यांना आपल्या दरबारातील ‘मियाँ’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.

तानसेन यांनी हिंदी भक्ती संगीतासोबतच ‘सुफी’ प्रकारच्या गाण्यावर सुद्धा प्रभुत्व मिळवलं होतं. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये एकोपा राखण्यासाठी तानसेन यांच्यासारखे ‘रत्न’ अकबर राजाने आपल्या दरबारात एकत्रित केले होते असंही सांगितलं जातं.

१५८६ मध्ये तानसेन यांचा दिल्ली येथे मृत्यू झाल्याची एका इतिहासकाराने नोंद करून ठेवली आहे. मुस्लिम धर्माच्या पद्धतीने त्यांचा दफनविधी हा त्यांचे ग्वाल्हेर येथील त्यांचे गुरू ‘मोहम्मद घाऊस’ यांच्या घराच्या आवारात झाला होता.

तानसेन यांच्या योगदानाचा गौरव म्हणूनच दरवर्षी डिसेंबर महिन्यात ग्वाल्हेर येथे ‘तानसेन समारोह’चं आयोजन करण्यात येतं.

तानसेन सारख्या कलाकारांमुळे आपल्या देशाची विविधतेत दिसणारी एकता ही अजूनच सुंदर वाटते. आपल्या कलेवर जर नितांत श्रद्धा असेल तर तो कलाकार कोणत्याही धर्माचा असो, मायबाप श्रोते हे त्याचं कौतुक करतातच हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?