आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे की नाही यावर नेहमीच चर्चा सुरू असते. आपल्या सर्वांना जोडणारी हिंदी ही भाषा जरी कागदोपत्री अजूनही आपली राष्ट्र भाषा नसली तरी हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी, लोकप्रिय आणि परदेशातील भारतीयांना जोडणारी एक कडी आहे हे निर्विवाद सत्य आहे.
सध्या हिंदी ही सरकारी कामात वापरली जाणारी ‘अधिकृत’ भाषा आहे. त्याला ‘राष्ट्र भाषा’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संसदेत ७० वर्षांपासून विचाराधीन आहे.
नुकताच सोशल मीडियाने अजय देवगण आणि ‘मख्खी’ या दक्षिणेतील सिनेमातील प्रसिद्ध कलाकार सुदीप यांच्यातील हिंदी भाषेवरून झालेलं ट्विटरवाद अनुभवला आहे. “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हती आणि नाहीये” अशा आशयाचा ट्विट टॉलीवुडच्या या अभिनेत्याने केलं होतं.
या ट्विटला उत्तर म्हणून अजय देवगणने ‘संदीप’ला प्रतिप्रश्न केला होता की, “जर हिंदी ही राष्ट्र भाषा नाहीये तर मग दक्षिणेतील सिनेमा हिंदीमध्ये डब का केला जातो ?” या रास्त प्रश्नावर जास्त वाद न वाढवता संदीप किच्चाने अजय देवगणची माफी मागितली आणि हे ट्विटर युद्ध थांबलं.
सोशल मीडियावरसुद्धा हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही ? यावर चांगलीच चर्चा रंगली होती. एक वर्ग हिंदीची महती सांगत होता, तर दक्षिणेतील काही महाभाग हे हिंदीवर टीका करत होते. हिंदीपेक्षा तेलगू ही भाषा जगभरात सर्वाधिक लोक बोलतात असा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता.
–
साऊथच्या सिनेमांचा बोलबाला; या मराठमोळ्या कलाकारांचा आहे तितकाच मोठा वाटा!
साऊथ-इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली दक्षिणेकडची नाहीच, वाचा मूळ गोष्ट!
–
काही दक्षिणेतील लोकांनी आपल्या उत्तरात तामिळनाडू, कर्नाटक मधील चिकपेट सारख्या रेल्वे स्थानकाचे फोटो अपलोड केले होते ज्यामध्ये हिंदीमधून लिहिलेल्या स्थानकांच्या नावावर काळ्या रेषा मारुन ती नावं खोडण्यात आली आहेत. दक्षिणेकडील लोकांच्या प्रतिक्रीया वाचून ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली की, हिंदीचं नाव ऐकलं की, दक्षिणेतील लोकांच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते.
समस्त भारतीयांनी ‘पुष्पा’ हे पात्र डोक्यावर घ्यावं, त्यातील गाणे गुणगुणावेत आणि दक्षिणेतील लोकांनी मात्र हिंदी भाषेचं नाव ऐकलं तरी तोंड वाकडं करावं यामागचं कारण काय आहे ? जाणून घेऊयात.
का होतोय हिंदीला विरोध?
भारतातील बहुतांश लोक बोलत असलेल्या हिंदीचा विरोध दक्षिणेकडचे लोक १९४८ पासून करत आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार सीएन अन्नादुराई यांनी लोकसभेत भाषण करतांना हिंदी भाषेचा कडाडून विरोध केला होता. आपल्या भाषणात त्यांनी हे सांगितलं होतं की, “हिंदीचा अतिवापर हा दक्षिण भारतात रहाणाऱ्या उत्तर भारतीय लोकांना होऊ शकतो.
आम्ही जर हिंदी बोललो तर काही वर्षांनी आमच्या मातृभाषेला धोका असेल. जर बहुतांश बोलली जाणारी हिंदी जर राष्ट्रभाषा असली पाहिजे तर आपण आपण आपला राष्ट्रीय प्राणी हा वाघाच्या ऐवजी उंदीर ठेवला पाहिजे. त्याप्रमाणेच आपला राष्ट्रीय पक्षी हा मोर नसून ‘गाय’ असला पाहिजे.”
तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्र्याने संसदेत मांडलेला हा विचार हा दक्षिणेकडील प्रत्येक राज्याने आजही तंतोतंत पाळला आहे. आपण हिंदी बोललो, तर आपली भाषा, आपलं महत्व, अस्तित्व संपेल असा विचार सर्व राजकीय नेत्यांकडून लोकांच्या मनावर बिंबवण्यात आला. सर्वसमावेशक असलेल्या महाराष्ट्राच्या अगदी विरोधात असलेला हा विचार दक्षिण भारतीय लोकांची संकुचित मनोवृत्ती दर्शवतो.
१९६५ मध्ये हिंदीला ‘राज भाषा’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. पण, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सीएन अन्नादुराई यांनी पुन्हा आंदोलन करून या घोषणेचा विरोध केला. ‘तामिळ अस्मिता रक्षण’ या नावाने झालेल्या या आंदोलनात कित्येक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. जवळपास ५०० लोक या दंगलीत जखमी झाले होते.
१९६७ मध्ये जेव्हा तामिळनाडूमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांनी ‘आकाशवाणी’चं नाव बदलून ‘तामिळनाडू वनोली’ व्हावं अशी मागणी केली आणि हिंदीबद्दल असलेला त्यांचा राग व्यक्त केला.
याच सरकारने दक्षिण भारतातील शाळांमध्ये हिंदी शिकवलं जावं असा प्रस्ताव ठेवला होता. पण, या विचाराच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं. दोन वर्षानंतर सरकार लोकांसमोर झुकलं आणि त्यांनी हा प्रस्ताव गुंडाळला.
दक्षिण भारतातील हिंदीबद्दलचा विरोध हा भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री लाल बहाद्दूर शास्त्री यांनी रेडिओवर भाषण करून “प्रत्येक राज्याला आपल्या भाषेत व्यव्हार करण्याचं स्वातंत्र्य असेल” अशी घोषणा केली त्यावेळी शांत झाला.
दोन राज्य एकमेकांशी इंग्रजीत व्यव्हार करतील आणि केंद्र सरकारसोबत व्यव्हार करतांना स्थानिक भाषा आणि त्याचा इंग्रजी अनुवाद हे अनिवार्य असेल असंही शास्त्रीजींनी सांगितलं होतं.
आज भारतातील २३% लोकांची मातृभाषा ही हिंदी आहे. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नडा या सर्वांची ही आकडेवारी १९% इतकी आहे. पण, ही आकडेवारी देखील दक्षिणेकडील राज्यांना मान्य नाहीये.
आज कर्नाटकची राजधानी असलेल्या प्रगत शहर बँगलोरमध्ये सुद्धा कित्येक लोक हिंदी बोलता येत असूनही हिंदीत बोलत नाहीत. केंद्र सरकारची आर्थिक मदत घेऊन हे राज्य प्रगत झाले; पण, केंद्र सरकार पुरस्कार करत असलेल्या हिंदी भाषेचा वापर करायचा म्हंटलं की, त्यांना ती सक्ती वाटते हे आश्चर्यकारक आहे.
दक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे. आम्ही पण दुसऱ्या राज्यात गेलो तर तिथली भाषा शिकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो.”
हिंदीचा विरोध हा इतकी वर्ष तामिळनाडू राज्यात सर्वाधिक बघायला मिळायचा. पण सध्या हिंदी न बोलण्याचे प्रकार हे कर्नाटक राज्यात देखील बघायला मिळत आहेत हे दुःखद आहे.
जर प्रत्येक व्यक्ती केवळ आपल्या मातृभाषेत बोलू लागला आणि त्याला जर इंग्रजी भाषा येत नसेल तर तो इतर राज्यांसोबत, इतर देशांसोबत आपले व्यवसायिक संबंध कसे प्रस्थापित करेल ? इतका साधा प्रश्न दक्षिण भारतीय लोकांना पडत नाही हे एक मोठं आश्चर्य आहे.
मल्याळम लोकांमध्ये सुद्धा त्यांच्या भाषेबद्दल प्रचंड कडवटपणा आहे. हे चूक नसलं तरीही आपण एका देशाचे भाग आहोत याचं जर तिथल्या लोकांनी भान ठेवलं तर तिथे कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या लोकांची गैरसोय कमी होईल.
‘हिंदी दिवस’च्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “हिंदी हा इंग्रजीला पर्याय असावा” असं एक वक्तव्य केलं होतं. हे सांगताना त्यांनी राम मनोहर लोहिया यांच्या ‘लोकांची भाषा’ असलेल्या हिंदीच्या आग्रहाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. पण यातील तथ्य न जाणून घेता हिंदी सिनेमांमध्ये खलनायकाचं पात्र साकारणारे प्रकाश राज यांनी या वक्तव्याचा निषेध केला. डीएमके नेता स्टॅलिन, सिद्दरामय्या आणि इतर सर्व दक्षिणेतील ट्विटरवर अमित शाह यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात आला.
कमल हसन यांनी सुद्धा एक व्हिडिओ तयार करून आपला विरोध केला आणि त्यांनी आपलं राष्ट्रगीत हे बंगाली भाषेत असल्याचा देखील त्यांनी दाखला दिला.
दक्षिण भारतीय लोकांचा विरोध हा हिंदी भाषेपेक्षा उत्तर भारतीय लोकांचा आहे हे त्यांच्या बोलण्यातून कित्येकदा स्पष्ट झालं आहे. आपल्या भाषेचा अभिमान जागृत ठेवतच दक्षिणेकडील राजकीय नेत्यांनी ‘स्थानिक राजकीय’ पक्षाची सत्ता कायम ठेवली असंही राजकीय विश्लेषक सांगतात.
हिंदी लोक येतील आणि आपल्यावर राज्य करतील ही भीती जोपर्यंत दक्षिण भारतीय लोकांच्या मनातून निघून जाणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणं अशक्य आहे सध्यातरी असंच म्हणावं लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.