Site icon InMarathi

या गावातली लोकं एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करतात : वाचा विचित्र कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सगळेच सध्या असह्य उकाड्याने पुरते हैराण झालोय. मुंबई-पुण्यातच इतका भयानक उन्हाळा असताना विदर्भ-मराठवाड्यातल्या तापमानाची तर कल्पनाच करायला नको अशी परिस्थिती आहे. पाणी टंचाई, दुष्काळ या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यात उन्हाळ्यात महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिकच भेडसावते.

या परिस्थितीशी झुंज द्यायला त्या त्या गावांतले गावकरी काही ना काही मार्ग शोधतात. पण महाराष्ट्रातल्या एका गावात पाणी टंचाईच्या समस्येवरचा उपाय म्हणून चक्क ‘बहुपत्नीकत्त्वा’ (Polygamy) ची अमानुष प्रथा आजच्या काळातही सुरू आहे.

 

 

‘पॉलिगॅमी’ म्हणजेच ‘बहुपत्नीकत्त्व’ याचा अर्थ एका पुरुषाने दोन किंवा त्याहून अधिक स्त्रियांशी विवाह करणे. ‘बहुपत्नीकत्त्वा’च्या या प्रथेचे दाखले आपल्याला पुराणात आणि इतिहासात मिळतात.

आपल्या समाजात आजही मुस्लिम पुरुष दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करतात. पण मुस्लिम समाज वगळता ‘हिंदू विवाह कायद्या’अंतर्गत ‘बहुपत्नीकत्त्वा’ची ही प्रथा आपल्याकडे बेकायदेशीर आहे. भारतात ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असं असूनदेखील आजही समाजात वेगवेगळ्या कारणांसाठी एक पत्नी असतानाही काही पुरुष लपूनछपून दुसरा विवाह करतात. पण एखाद्या गावात पाणीटंचाईची समस्या आहे म्हणून तिथल्या पुरुषांनी एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करणे यातला नेमका संबंध काय असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडेल.

महाराष्ट्रातल्या ‘डेंगनमल’ या गावातल्या पुरुषांनी असं करण्यामागे काय कारण आहे? जाणून घेऊ.

 

 

महाराष्ट्रात पूर्वीपासूनच दुष्काळाची समस्या आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाणही महाराष्ट्रातच असल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये दुष्काळाच्या घटनांमध्ये महाराष्ट्रात ७ पटींनी वाढ झाली आहे तर वारंवार येणाऱ्या पुराच्या घटनांमध्ये ६ पटींनी वाढ झाली आहे.

ऊर्जा, पर्यावरण आणि जल यांवरच्या परिषदेच्या अभ्यासातून असं समोर आलंय की, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या ८० टक्क्यांपेक्षा वर जिल्ह्यांतील (७८.८१ मिलीयन लोकांची घरं) लोक दुष्काळ आणि तत्सम घटनांच्या बाबतीत भावनिकदृष्ट्या फारच हळवे झाले होते आणि १०.२३ मिलीयन लोकांना दरवर्षी पुराच्या तीव्र घटनांचा सामना करावा लागला.

‘डेंगनमल’ हे पश्चिम महाराष्ट्रातलं, मुंबईपासून १८५ किलोमीटर दूर असलेलं एक छोटं गाव आहे. हे गाव खडकाळ प्रदेशात वसलेलं असून या गावात ५०० माणसं राहतात. या गावातल्या घरांमध्ये पाण्याच्या पाइपलाईनचे कनेक्शन्स नाहीत आणि कडक उन्हाळ्यात तिथे दुष्काळ असतो.

India Today

 

नदीवरचं भातसा धरण आणि विहीर हाच या गावातला पाण्याचा स्रोत आहे. पण हे धरण आणि विहीर इतकं लांब आहे की तिथे जाऊन येण्यात तब्बल १२ तास मोडतात. हा प्रवास खूप कष्टाचा असतो. त्यामुळे घरातली कामं करायला वेळ मिळत नाही.

एकापेक्षा अधिक बायकांशी लग्न करणं हे या गावातल्या पुरुषांसाठी नवं नाही. या गावातले बरेच पुरुष शेतकरी आहेत. दिवसाचा पूर्ण वेळ पुरुष शेतात काम करत असल्यामुळे घरच्या कामांची, पोराबाळांचा सांभाळ करण्याची सगळी जबाबदारी बाईवरच पडते.

 

 

इतकं दूर जाऊन पाणी आणण्यातच बाईचा सगळा वेळ गेला तर बाकीच्या गोष्टी कशा करणार असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो.

यावरचा तोडगा म्हणून तिथले पुरुष केवळ दूरवर जाऊन पाणी आणण्यासाठी म्हणून आपल्या बायकोव्यतिरिक्त एक किंवा अधिक स्त्रियांशी लग्न करतात. या स्त्रीला ‘पाणी बाई’ असं म्हटलं जातं.

‘पाणी बायकां’विषयी :

आपल्याला हे जाणून घेताना आश्चर्य आणि वाईट वाटेल पण केवळ समाजात आपल्याकडे सन्मानाने पाहिलं जावं म्हणून बायका ‘पाणी बायका’ व्हायला राजी होतात.

आधीच्या काळाच्या तुलनेत आपल्या समाजात आज विधवांच्या पुनर्विवाहाचं समाधनकारक चित्र आहे असं आपण म्हणतो. पण अशा सुधारणांना जरी सुरुवात झाली असली तरी आजही समाजातल्या बऱ्याच विधवांना आशेचा किरण दिसत नाही.

डेंगनमल गावातल्या अशा विधवा स्त्रिया, ज्यांच्या कुटुंबीयांची मुलीच्या लग्नाकरता हुंडा भरायची ऐपत नसते अशा कुटुंबातल्या अविवाहित स्त्रिया, मुलांचा सांभाळ करणारी एकटी आई अशा स्त्रिया पुराणमतवादी ग्रामीण समाजात केवळ आपल्याला आदर मिळावा म्हणून असा विवाह करायला तयार होतात.

त्या पुरुषाची दुसरी पत्नी म्हणून त्या ‘पाणी बाई’चा आपल्या या नवऱ्यावर कायदेशीररित्या कुठलाही हक्क नसतो. त्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाहीत. आपल्या या नवऱ्याच्या बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. घरगुती घडामोडींमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत नसते.

या बायकांसाठी राहायला वेगळ्या खोलीची आणि बाथरूमची सोय असते. पुरुषाची पहिली कायदेशीर बायको घरची सगळी जबाबदारी सांभाळत असताना या ‘पाणी बाई’ला मात्र घरासाठी पाणी आणायला कोसो दूर उन्हातान्हाचं भटकत जावं लागतं.

 

 

आपली राहण्याखाण्याची सोय होतेय आणि कुटुंब आपला स्वीकार करतंय हे इतकंच त्यांच्यासाठी पुरेसं असतं. आपल्या या परिस्थितीचा आपल्याला काही फायदा होतोय की नाही हा विचारही दुर्दैवाने या बायकांच्या मनाला शिवत नाही.

नवऱ्याची दुसरी पत्नी असलेल्या या ‘पाणी बाई’चं जेव्हा वय होतं आणि दुरून पाणी आणणं तिला जमेनासं होतं तेव्हा नवरा दुसऱ्या बायकोपेक्षा वयाने लहान असलेल्या बाईशी तिसरा विवाह करतो.

मग या नव्या ‘पाणी बाई’ला पुन्हा डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायला जावं लागतं. थोडक्यात, केवळ घरासाठी पाणी आणण्यासाठी या बायकांचा वापर करून घेतला जातो.

काय करतात या ‘पाणी बायका’?

या बायकांचं आयुष्य अतिशय कष्टप्रद असतं. ४० डिग्री सेल्सियस आणि त्याहूनही अधिक तापमानाच्या रखरखीत उन्हात डोक्यावर ऍल्युमिनियमचे हंडे ठेवून या ‘पाणी बायकां’चा जथ्था धरणाकडे जातो. विशेषतः उन्हाळ्यात सकाळी उजाडल्यावर डोक्यावर रिकामे हंडे घेऊन त्या बाहेर पडतात.

 

 

शेतातून, चिखलातून, उंचसखल अशा डोंगराळ प्रदेशातून वाट काढत काढत त्या नदीपाशी पाणी आणायला जातात. त्यांच्याकडच्या एका हंड्यात साधारण १५ लिटर पाणी मावतं आणि असे साधारण दोन हंडे या बायका आपल्या डोक्यावर घेतात. पावसाळ्यात त्यांची परिस्थिती तुलनेने थोडी सुसह्य असते. कारण, तेव्हा विहीर पाण्याने भरते.

डेंगनमल गावापासून ३ किलोमीटर अंतरावर नदीवर आणखी एक धरण आहे. या धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतं. पण पाईपद्वारे इथलं पाणी मुंबईला पोहोचवलं जातं आणि गावकरता काहीच पाणी उरत नाही. या गावात सगळ्यात मोठं कुटुंब असलेल्या सखाराम भगत यांनी तीनदा लग्न केलं आहे.

त्यांची दुसरी आणि तिसरी बायको घरात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी आणण्याची तजवीज करतात. भगत हे जवळच्याच एका गावात दिवसा शेतमजुरी करतात. भगत यांच्या तिन्ही पत्नी त्यांच्यासोबत एकाच घरात राहतात. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पत्नीसाठी स्वतंत्र खोल्यांची आणि स्वयंपाकघरांची व्यवस्था केलेली आहे.

‘कलिंगाटीव्ही’शी बोलताना भगत म्हणाले, “घराकरता पाणी आणण्यासाठी मला कुणाचीतरी आवश्यक्ता होती आणि पुनर्विवाह करणे हा एकमेव पर्याय होता.” ते म्हणाले, “माझी पहिली बायको मुलांचं बघण्यात व्यस्त होती. जेव्हा माझी दुसरी बायको आजारी पडली आणि तिला पाणी आणायला जाणं शक्य होईनासं झालं तेव्हा मी तिसरं लग्न केलं.” ‘बहुपत्नीकत्त्वा’ची प्रथा बेकायदेशीर असली तरी डेंगनमल गावातल्या लोकांनी या कायद्याचं उल्लंघन केल्याचं दिसतं.

आपल्याच राज्यातल्या एका गावातल्या काही स्त्रिया शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतकं खडतर आयुष्य जगतात आणि हे आपल्याला माहीतही नव्हतं ही बाब सुन्न करणारी आहे.

 

 

डेंगनमल गावातल्या नागरिकांची पाणी टंचाईची समस्या लवकरात लवकर दूर व्हावी आणि जरी ती इतक्यात दूर झाली नाही तरी या अशा अमानुष प्रथेऐवजी काहीतरी वेगळा, माणसांचं शोषण होणार नाही असा तोडगा यावर निघावा आणि लवकरात लवकर या जाचातून डेंगनमलमधल्या अनेक बायकांची सुटका व्हावी हीच प्रार्थना!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version