Site icon InMarathi

इलॉन मस्क म्हणतोय त्याप्रमाणे खरंच कोका कोलामध्ये कोकेन होतं का?

elon im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘इलॉन मस्क’ – जगातील सर्वात श्रीमंत असलेली ही व्यक्ती ज्या विषयांत रुची घेते तो विषय लगेच चर्चेचा विषय होतो. मार्केटिंग टीम कडून लाखो रुपये खर्च करून सुद्धा न होऊ शकणारी एखादी गोष्ट ही ‘इलॉन मस्क’च्या एका ट्विटने होत असतांना सध्या जग बघत आहे.

 

 

मध्यंतरी ‘ट्विटर’ कंपनी विकत घेणाऱ्या इलॉन मस्क यांनी नुकतंच “मी कोका कोला कंपनी विकत घेतोय, त्यात परत कोकेनचा समावेश करा” असं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारं ट्विट केलं आणि एका नवीन वादाला सुरुवात झाली. इलॉन मस्क हे इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कोका कोलाच्या स्लोगन “रियल मॅजिक इज् सिप अवे” याची सुद्धा ट्विटरवर खिल्ली उडवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इलॉन मस्क यांच्या ट्विटला २४,००० लोकांनी रिट्विट केल्याने कोकबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे. इलॉन मस्क यांचे ट्विटरवर जवळपास ६ कोटी १६ लाख फॉलोवर्स आहेत. त्यापैकी १७,००० लोकांनी इलॉन मस्क यांच्या कोका कोला बद्दलच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

 

 

‘कोका कोला’ कंपनी विकत घेणे ही पुढची इच्छा असलेल्या इलॉन मस्कने हे ट्विट गमतीने केलं होतं की त्यांच्याकडे याबद्दल काही सबळ पुरावे आहेत ? यावर सध्या सोशल मीडियावर वाद-प्रतिवाद सुरू आहेत. याचा सरळ परिणाम हा कोका कोलाच्या शेअर्सच्या किमतीवर होतांना सध्या दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी जेव्हा रोनाल्डो या फुटबॉलपटूने एका पत्रकार परिषदेत कोकच्या बाटल्या उचलून बाजूला ठेवल्या होत्या तेव्हा सुद्धा कोकचे शेअर्स पडले होते. इलॉन मस्क यांच्या ट्विटमध्ये काही तथ्य आहे का? की, ही केवळ कोका कोलाची मार्केट किंमत करण्यासाठी त्यांनी केलेली एक चाल आहे? यावर सध्या व्यवसाय विश्लेषक अभ्यास करत आहेत.

कोका कोलाचा इतिहास काय सांगतो?

कोका कोलाचा शोध हा १८८६ मध्ये अमेरिकेतील जॉर्जिया येथे जॉन स्टीथ पेंबर्टन या व्यक्तीने आपल्या घरातील बागेत लावला होता. स्टीथ यांना अल्कोहोल विरहित शीतपेय तयार करण्याची कल्पना सुचली तेव्हा त्यांनी ‘कोका’ झाडाचे पानं, कोकेन आणि कॅफेन यांचा वापर करून कोका कोला तयार केलं होतं.

 

 

सुस्त मनुष्याला तरतरी देण्यासाठी त्या काळात कोका कोला हे ‘टॉनिक’ म्हणून दिलं जायचं.

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अब्युज’ यांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार, कोका कोला सुरुवातीला ‘ पेटंट मेडिसीन’, ‘ब्रेन टॉनिक’ अशा नावाने लोकांपर्यंत पोहोचवलं जायचं. या संस्थेने जाहीर केलेल्या एका परिपत्रकात असं लिहिलं आहे की, शीतपेयात कोकेन वापरण्याची त्या काळात कायद्याने परवानगी होती. इतर वैद्यकीय औषधांमध्ये काही प्रमाणात कोकेन वापरलं जायचं.

स्टीथ यांनी १८९२ मध्ये या शीतपेयाची माहिती, सूत्र ‘ग्रीग कॅन्डलर’ यांना विकली. ‘ग्रीग कॅन्डलर’ यांनी २९ जानेवारी १८९२ रोजी अटलांटा येथे कोका कोलाच्या मोठ्या प्रमाणावरील निर्मितीला आणि जगभरात त्याचं वितरण करण्यास त्यांनी सुरुवात केली. कोक मध्ये वापरलं जाणारं कोकेन हे कोका झाडापासून काढलं जाणारं ‘ईक्गोनाईन’ या प्रकारात मोडलं जातं.१८९४ मध्ये कोका कोला मधून बाहेर पडलेल्या पहिल्या बाटलीत ३.५ ग्राम इतकं कोकेन होतं अशी नोंद आहे.

 

 

कोका कोला हे शीतपेय पोटाच्या विकारांसाठी सुद्धा उपयुक्त आहे असा दावा त्याच्या निर्मात्यांनी केला होता. पण, अभ्यासक हे सांगतात की, कोका कोला हे कोणत्याही प्रकृतीच्या फायद्यापेक्षा त्यात असलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे लोकप्रिय आहे असं सांगतात.

कोकेनमुक्त कोक बाजारात कधी आलं?

काही वर्षांनी अमेरिकेतील लोकांनी कोका कोला मधील कोकेनच्या वापरा विरुद्ध आवाज उठवला आणि कंपनीला कोक मधील कोकेनचा वापर कमी करण्यास भाग पाडण्यात आलं. १९२९ पासून जे कोक बाजारात उपलब्ध केलं जाऊ लागलं. त्या वर्षी अमेरिकेने अल्कोहोलला अवैध घोषित केलं होतं.

कोक मधून कोकेन आणि अल्कोहोल जेव्हा निघून गेलं तेव्हा त्याला ‘सॉफ्ट ड्रिंक’ म्हणून मान्यता मिळाली. आज उपलब्ध असलेल्या कोका कोलामध्ये कोकेनचं प्रमाण अजिबात नाहीये हे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रग अब्युज’ने प्रमाणित केलं आहे.

 

entrepreneur

 

कोका कोला कंपनीने नेहमीच कोक मध्ये कोकेन नसल्याचा दावा केला आहे. १९८८ मध्ये कोका कोला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राशी बोलून आपली बाजू मांडली होती की, “कोक मध्ये कोकेन नाहीये हे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना हे वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे.”

कोका कोला आज जरी कोकेन नसल्याचा दावा करत असली तरी, एके काळी कोकमध्ये कोकेन होतं हे त्यांना मान्य आहे. कोकेन, अल्कोहोल हे जेव्हा अमेरिकेने अवैध ठरवलं तेव्हाच कंपनीने ‘कोका कोला’ला शुद्ध केल्याचं जाणकार सांगत असतात.

 

 

इलॉन मस्क यांच्या एका ट्विटमुळे ‘कोका कोला’च्या इतिहासाची माहिती कित्येक लोकांनी इंटरनेटवर शोधली आणि त्यावर आपलं मत मांडलं हे विशेष आहे. येणाऱ्या दिवसात इलॉन मस्क कोका कोला कंपनी विकत घेईल का? आणि किती किमतीत? याकडे सध्या ‘बिजनेस जगताचं लक्ष लागलेलं आहे.

इलॉन मस्क खरंच कोकमध्ये परत कोकेनचा समावेश करेल का? याकडे सर्व वैद्यकीय आणि कायदा तज्ज्ञ मंडळींचं लक्ष लागलेलं असणार हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version