साहित्य आणि सिनेमा यांची सांगड घालणारे मराठीतले १२ उत्कृष्ट चित्रपट
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे चांगलीच हवा आहे. चंद्रमुखी ही तमाशातली कलावंतीण आणि दौलत देशमाने हा खासदार यांच्यातली प्रेमकहाणी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
अजय-अतुल यांचं अफलातून संगीत, श्रेया घोषाल- आर्या आंबेकर सारख्या उत्कृष्ट गायिकांनी गाण्यांना दिलेला आवाज आणि अमृता खानविलकरच्या दिलखेचक अदा अशी मस्त भट्टी या चित्रपटाच्या निमित्ताने जमून आलीये. या चित्रपटातल्या एकापेक्षा एक सरस गाण्यांना सोशल मीडियापासून सगळीकडेच प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलंय.
या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ही केवळ दौलत-चंद्रा यांचीच प्रेमकहाणी नसून दौलत- चंद्रा-दमयंती असा प्रेमाचा त्रिकोण आहे हे लक्षात आल्यापासून हा चित्रपट पाहायची लोकांची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला असल्याचं आपल्याला एव्हाना माहीत झालं असेलच.
गेल्या काही काळापासून पुस्तकांवरून चित्रपट, वेबसिरीज काढण्याचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. पण हे चित्र केवळ आताचंच नाही. पूर्वीपासूनच अनेक पुस्तकांवरून चित्रपट काढले गेलेले आहेत. मराठीतल्या अशा काही क्लासिक सिनेमांविषयी जाणून घेऊया जे पुस्तकांवर बेतलेले होते.
१. उत्तरायण –
बऱ्याच वर्षांपूर्वी आलेला ‘उत्तरायण’ हा तरल चित्रपट लेखक जयवंत दळवी यांच्या ‘दुर्गी’ या पुस्तकावर बेतलेला होता. तरुणपणी ताटातूट झालेल्या रघु आणि दुर्गी या प्रेमिकांना अचानक त्यांच्या उतारवयात नियतीने एकमेकांसमोर आणणं आणि त्यांच्यातले जुनेजाणते बंध पुन्हा नव्याने फुलणं असं या चित्रपटाचं भावस्पर्शी कथानक होतं.
मुख्य भूमिकेत असलेल्या शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी या ज्येष्ठ कलाकारांनी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका अगदी चोख बजावल्या होत्या.
२. श्यामची आई –
‘श्यामची आई’ हे पुस्तक माहीत नसेल असा मराठी माणूस सापडणार नाही. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या साने गुरुजींनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात श्याम हा मुलगा आणि त्याची आई यांच्यातले हृद्य नाते गुरुजींनी उलगडले आहे. या पुस्तकाचा शेवट करूण आहे. कुठल्याही संवेदनशील मनाला भिडेल अशा या पुस्तकावरून आचार्य अत्रेंनी १९५३ साली ‘श्यामची आई’ हा चित्रपट काढला होता.
३. सिंहासन –
मराठी रसिकांच्या मनात दीर्घकाळ घर केलेला हा चित्रपट. निळू फुले, श्रीराम लागू, नाना पाटेकर असे दिग्गज कलाकार असलेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटातून ७०च्या दशकातल्या राजकारणातल्या भ्रष्टाचाराचं वास्तव फार भेदकपणे प्रेक्षकांसमोर आलं होतं. हा चित्रपट त्यावेळी अतिशय गाजला होता. यातलं ‘उष:काल होता होता’ हे गाणं आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या मनावरून पुसलं गेलेलं नाही.
हा चित्रपट पत्रकार-लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर बेतलेला होता. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर सिद्धहस्त नाटककार विजय तेंडुलकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती.
४. बनगरवाडी –
‘बनगरवाडी’ हा चित्रपट लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीवर बेतलेला होता. अमोल पालेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
५. जोगवा –
मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘जोगवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. एका जोगतिणीच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या संघर्षमय जीवनाचं चित्रण या चित्रपटात केलं गेलं होतं.
आजही या चित्रपटाचं एक वेगळंच स्थान आपल्या मनात आहे. यातली गाणीही आजही आपल्या कानांत रुंजी घालतात. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राजन गवस यांच्या ‘चौंडक’ आणि ‘भंडार भोग’ आणि चारुता सागर यांच्या ‘दर्शन’ या कादंबऱ्यांवरून घेतलेला आहे.
६. लालबाग परळ –
मुंबईमधील लालबाग-परळ इथल्या ८०च्या दशकातल्या गिरणी कामगारांच्या आयुष्यावर हा चित्रपट भाष्य करतो. मराठीत हा चित्रपट आला त्याचवेळी ‘सिटी ऑफ गोल्ड’ या नावाने हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला होता. ज्येष्ठ लेखक-नाटककार-पत्रकार जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर हा चित्रपट आधारित असून या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.
७. नटरंग –
आयत्या वेळी तमाशातला ‘नाच्या’ व्हावं लागलेल्या एका व्यक्तीला स्वतःमध्ये कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणावं लागतं, कुठल्या आंतरिक संघर्षातून त्या व्यक्तीला जावं लागतं याचं दर्शन ‘नटरंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांना झालं होतं.
अतुल कुलकर्णी यांनी ‘या चित्रपटात ‘नाच्या’ची भूमिका फार उत्तमरीत्या वठवली होती. त्यावेळी तुफान गाजलेल्या या चित्रपटातल्या लावण्या आजही आपल्या मनात घर करून आहेत. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘नटरंग’ हा चित्रपट आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या कादंबरीवर बेतलेला होता.
८. शाळा –
शाळेत असताना किशोरवयात झालेल्या पहिल्यावहिल्या प्रेमाची गोष्ट आपल्याला हा चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातून केतकी माटेगावकर या अभिनेत्री-गायिकेने आपल्या दिसण्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली होती. सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला ‘शाळा’ हा चित्रपट मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित होता.
९. दुनियादारी –
काही वर्षांपूर्वी अतिशय गाजलेला हा चित्रपट. दमदार कलाकार, हिट गाणी, नायक, खलनायक, प्रेम, प्रेमभंग, एकतर्फी प्रेम असं कम्प्लिट पॅकेज म्हणजे हा चित्रपट होता. कॉलेजमधल्या तरुणांची मजामस्ती, मानसिक कोलाहल मोठ्या पडद्यावर दाखवलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं.
यातले संवादही प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिले होते. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ या कादंबरीवर बेतलेला होता.
१०. डॉ. प्रकाश बाबा आमटे –
नाना पाटेकर आणि ‘दिल चाहता है’ फेम सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांचे पुत्र प्रकाश बाबा आमटे आणि प्रकाश बाबा आमटे यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर बेतलेला आहे. समृद्धी पोरे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर आधारित आहे.
११. कच्चा लिंबू –
प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेला हा पहिलावहिला चित्रपट. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता असलेला प्रसाद ओक दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणि दिग्दर्शक असलेले रवी जाधव अभिनेत्याच्या भूमिकेत असा एक मजेशीर योग जुळून आला होता. याखेरीज सिनियर सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांनी या चित्रपटातल्या आपल्या भूमिका उत्तम वठवल्या होत्या.
–
बऱ्याच चित्रपट रसिकांना माहिती नसलेल्या “द कम्प्लिट अॅक्टर” बद्दल नक्की वाचा!
हिंदी सिनेमातील सत्याचा विपर्यास! आपल्या मनात रुजवले गेलेले घटनाक्रम वास्तवात किती वेगळे होते
–
आपल्या मतिमंद मुलाला समजून घेताना त्याच्या आईवडिलांना कशाकशातून जावं लागतं, त्यांना होणारा मानसिक त्रास याचं चित्रण फार प्रभावीपणे या चित्रपटातून केलं गेलं होतं. अंगावर शहारे आणणारा चित्रपट होता हा! हा चित्रपट जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर बेतलेला होता.
१२. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर –
मराठीतला पहिलावहिला सुपरस्टार असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चढउतारांनी भरलेल्या आयुष्यावरचा हा चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला होता. सुबोध भावेने साकारलेल्या काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांबरोबरीनेच ज्येष्ठश्रेष्ठ कलाकार आणि समीक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव केला होता.
काशिनाथ घाणेकर यांची दुसरी पत्नी कांचन घाणेकर यांची भूमिका साकारलेली अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या निरागस सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांनाच भुरळ घेतली होती. हा चित्रपट कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या ‘नाथ हा माझा’ या पुस्तकावर आधारित आहे. अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं.
हल्ली पुस्तकांवर बेतलेल्या चित्रपटांच्या निमित्ताने ती पुस्तकं वाचण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसतोय. आजच्या काळात जिथे पुस्तक वाचण्यापेक्षा चित्रपट, वेबसिरीज पाहण्याला, ऑडियोबुक्स ऐकण्याला लोक पसंती देतात तिथे चित्रपट, वेबसिरीजच्या माध्यमांतून का होईना, लोकांच्या मनात नव्याने वाचनाची गोडी निर्माण होणं हा नक्कीच सुखद बदल आहे.
याहीपुढे वेगवेगळ्या कलाकृती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात अशाच प्रकारे रूपांतरित होत राहाव्यात आणि आपल्याला मनोरंजनाची मेजवानी मिळत राहावी हीच इच्छा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.