आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
“उद्योगधंदे करावे तर मारवाडी मनुष्याने” असं आपण खूपदा ऐकलेलं असतं. पण “त्यांना हे अफाट यश मिळतं कसं” हा विचार कधी केलाय का? याच प्रश्नाचं उत्तर या लेखातून तुम्हाला मिळेल.
===
लेखक : डॉ. गिरीश जाखोटिया
===
“आम्ही मारवाडी यशस्वी का होतो?”
नमस्कार मित्रांनो! प्रत्येक समाजामध्ये काही गुण व काही दोष असतात. मला नेहमी वाटत आले आहे, की विविध समाजांमधील “गुणांचा गुणाकार” (किमान बेरीज तरी) झाला तर एक प्रगल्भ, बलशाली, समाधानी व समृद्ध भारतीय समाज तयार होईल.
यास्तव मी प्रत्येक समाजाच्या गुणांकडे उत्साहाने व बारकाईने पहात असतो. या लेखाचा विषय मारवाडी समाजाच्या ‘यशदायी’ गुणांबद्दलचा व कारणांबद्दलचा आहे.
मुळात ‘मारवाडी’ (राजस्थानी) ही एक भाषा आहे. मारवाडी ही जात नाही. (जशी मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे.) माझ्या अनुभवानुसार व निरीक्षणानुसार मारवाडी लोक यशस्वी होण्यामागे पंधरा गुण व कारणे आहेत जे इथे आपण थोडक्यात पाहूयात.
आम्हा मारवाड्यांचा पहिला मोठा गुण आहे “फोकस” जो आम्ही तसूभरही ढळू देत नाही.
त्यातही उद्योजकीय वा व्यावसायिक फोकस. जिथे जाऊ तिथे सूक्ष्म नजरेने आमच्या फोकसला सलग्न गोष्टी आम्ही नकळतपणे पहात असतो. यामुळे भारंभार माहितीत डुंबण्यापेक्षा त्यातील उपयोगी सार आम्ही काढून घेतो.
आमचा दुसरा गुण आहे “सर्वांशी मैत्री”. इथे जात – धर्म – वंश – रंग इत्यादी गोष्टी गौण ठरतात. एखादा इसम मित्र होत नसेल, तर आम्ही त्याला शत्रूही होऊ देत नाही!
मैत्रीच्या नेटवर्किंग मधून ‘फोकस’ वापरीत उपयोगी संदर्भ, संबंध व संधी मिळविण्याकडे आमचा कल असतो. मुद्द्यावरून गुद्द्यावर आम्ही कधीच येत नाही. अनुत्पादक भांडणे अथवा वादविवाद आम्हाला पचनी पडत नाहीत.
इथे एक विनोद आठवतो. एक मारवाडी आपल्या मित्रासोबत गप्पा मारत असतो. एक बाहुबली येतो आणि मारवाड्याला भरपूर घाणेरड्या शिव्या देऊ लागतो. थकल्यानंतर तो बाहुबली निघून जातो.
आश्चर्याने मित्र मारवाडीस विचारतो, “तो इतक्या शिव्या देऊन गेला. प्रत्युत्तरात तू काहीच बोलला नाहीस !” यावर मारवाडी हसत बोलतो, “तो बाहुबली काही तरी देऊनच गेला ना! घेऊन काय गेला ?”
निष्कर्ष असा, की आम्ही मारवाडी शक्यतो डोकं गरम करून घेत नाही. डोकं गरम होण्याने रक्तदाब वाढतो नि मेंदू सारासार विचार करेनासा होतो.
आमचा तिसरा गुण आहे ‘अफलातून चिकाटी’. फोकस आणि चिकाटी एकत्र आले, की ध्येय साध्य होतंच. चिकाटी दाखवताना आम्ही इतरांच्या टिकेकडे दुर्लक्ष करतो.
–
हे ही वाचा – मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास!
–
‘अ’ शी बोलून मी ‘ब’ला फोन करतो नि ‘क’चा फोन नंबर घेतो. मग ‘क’ला विनंती करतो की त्याने ‘ड’कडे माझी शिफारस करावी.
आमचा चौथा गुण हा “हिशोबीपणा”चा. लहानपणापासूनच्या सरावामुळे आम्ही पटकन नफा – तोटा पाहून व्यावहारिक निर्णय घेऊ शकतो. यात पचेल एवढ्या धोक्याचाही अंतर्भाव असतो.
खर्चावर नियंत्रण ठेवण्याची तर आमची खासियत आहे. या पाचव्या सवयीमुळे मारवाडी माणूस कर्ज काढून बडेजाव करत नाही. पडत्या काळात लोकांच्या बोलण्याची तमा न बाळगता तो आपले बहुतेक खर्च एका फटक्यात कमी करतो.
स्वतः सदैव आशावादी असल्याने तो अव्याहतपणे कुटुंबियांच्या मदतीने अडचणींवर मात करीत राहतो. “मेरा भी दिन आएगा” याबद्दल त्याला पक्की खात्री असते.
सहावा गुण इथे कामी येतो – प्रचंड श्रमाची तयारी. फुकाचा मान न बाळगता तो मिळेल ते काम करतो आणि आपला कॅशफ्लो सुधारतो.
सातवं आमचं वैशिष्ट्य म्हणजे मान – अपमान समतुल्यपणे घेण्याची तयारी. यामुळे काही मुजोर सरकारी अधिकारी, तर्हेवाईक स्थानिक पुढारी, मोठ्या कंपनीचा अहंकारी अधिकारी, मोठा भागिदार व आढ्यताखोर बँकर इत्यादी मंडळींना आम्ही शांतपणे सामोरं जाऊ शकतो.
फोकस ज्ञात असल्याने आम्ही शक्यतो राजकारणात सक्रीय होत नाही. हां, राजकारण्यांना वापरावं मात्र लागतं! हे आमचं आठवं वैशिष्ट्य.
नववा आमचा गुण आहे सतत शिकण्याची तयारी. साठीतही एखादा मारवाडी नव्या उद्योगाची नवी तंत्रे शिकून आपल्या पुढच्या पिढीला मोठा आधार देतो.
विविध उत्सवांवर आम्ही प्रेम करतो, पण त्यांच्या आहारी जात नाही. उत्सवांच्या अतिरेकाने धन, ऊर्जा व वेळेची नासाडी होते आणि उद्योगावरील फोकसही ढळतो. हे दहावं वैशिष्ट्य आम्हाला सतत सतर्क ठेवतं.
आमचा अकरावा गुण हा खूप महत्त्वाचा – सांस्कृतिक लवचिकता. ज्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक धारणा, पेहराव, भाषा, रीतीरिवाज व देवतांना आम्ही सहज स्विकारतो व पूर्णपणे समरस होतो. स्थानिक समाजाचा एक हिस्सा झाल्याने स्थानिकांशी आमचे व्यवहार नीटपणे होतात.
बारावं मारवाडी वैशिष्ट्य म्हणजे विश्वासार्हता. महाराष्ट्रातील व अन्यत्रही असलेल्या राजकीय दिग्गजांचे बहुतेक वित्तीय सल्लागार व ट्रस्टी हे मारवाडी असतात.
अल्पसंख्यांक मारवाडी हे बहुसंख्यांक समाजाच्या बऱ्याच नेत्यांचे विश्वासू मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शकही होतात. चातुर्य व विश्वासार्हता, अशा दोन्ही गोष्टी इथे मारवाडी उपलब्ध करून देत असतो. अर्थात अशा राजकीय मैत्रीचा मोठा आधार असल्याने मारवाडी उद्योजकही स्थानिक उपद्रवकाऱ्यांना यशस्वीरित्या हाताळू शकतो.
मारवाडी माणसाचं तेरावं वैशिष्ट्य असतं ते सातत्याने पाय जमिनीवर ठेवण्याचं. आपली विद्वत्ता वापरत वाॅट्सपवरील ग्रुप्सवर एखादा मारवाडी कधीही राजकीय टिप्पण्या वा उपदेश करायला जात नाही.
तो बहुतांशी वादग्रस्त बाबींवर जाहीरपणे मतप्रदर्शनही करत नाही. उद्योग – व्यवसायासाठी हे आवश्यक असतं. (या विषयाची दुसरी बाजू मला ज्ञात आहे!) थोड्याशा उद्योजकीय यशाने तो हुरळूनही जात नाही नि यामुळे ‘गुरुपणा’चा तो आवही आणत नाही.
चौदावं मारवाडी वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं. पारंपारिक व्याख्येनुसार भूमिपुत्र नसल्याने व अल्पसंख्य असल्याने मारवाडी आपल्या सामाजिक व राजकीय मर्यादा नीटपणे जाणतो. याबाबतीतल्या ‘लक्ष्मणरेषा’ तो कसोशीने पाळतो. यामुळे स्थानिक बहुसंख्यांकांना बहुतांश मारवाडी हे आपलेसे वाटतात.
पंधरावा मारवाडी गुण हा “व्यावहारिक लवचिकते”चा. बाजार, ग्राहकाचे बदलणारे मूड, बदलणारे मोसम आणि बदलणारे सरकारी नियम इत्यादी गोष्टी प्रत्येक मारवाडी सतर्कतेने पहात, तपासत व अजमावत असतो.
स्थल – काल – व्यक्तीपरत्वे तो आपली व्यावहारिक लवचिकता वापरत असतो. आपलं मुलभूत अस्तित्व सांभाळतच तो नव्या स्वप्नांवर काम करीत असतो. कारण त्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं, “सिर सलामत तो पगडी पचास !”
===
हे ही वाचा – मराठी माणूस गुजराती लोकांसारखा, धंद्यात पुढे का जात नाही? वाचा काय कारणे आहेत
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.