अमोल मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे खरंच ‘कन्यादान’ हा विषय महत्वाचा नसतो का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ‘कन्यादाना’संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण सध्या चांगलंच तापलंय. मिटकरी एका ठिकाणी लग्नाला गेलेले असताना तिथे कन्यादानाचा विधी सुरू होता.
अन्नदान, नेत्रदान, रक्तदान ऐकलंय. कन्या हा काय दान करण्याचा विषय आहे का असं ते तिथे म्हणाले. वर आणि वधू दोघेही सुशिक्षित होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
लग्न लावणाऱ्या भटजींनी वधू-वरांना त्यांचे हात आपल्या हातात द्यायला सांगून ‘मम भार्या समर्पयामी’ असं म्हटलं. हे ऐकल्यावर याचा अर्थ “माझी बायको घेऊन जा असा होतो”, असं मिटकरींनी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अर्धवट माहितीच्या आधारे ‘कन्यादाना’च्या विधीची अशाप्रकारे मस्करी केल्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगितली जात आहे.
‘कन्यादान’ हा हिंदू धर्मातल्या लग्नविधींमधला एक महत्त्वाचा विधी समजला जातो. आपल्या लेकीची पाठवणी दुसऱ्या घरी करणारे वधूपिता आणि वधूमाता हा विधी करतात. आजही हिंदू धर्मपद्धतीप्रमाणे लग्न होतात तेव्हा ‘कन्यादान’ हा विधी होतो. पण हा विधी करण्याची खरंच आवश्यक्ता असते का? ‘कन्यादाना’चं काय महत्त्व आहे? हे आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसतं. जाणून घेऊ त्याविषयी.
वस्तूंचं दान करतात. माणसांचं दान कसं करायचं? असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. पण ‘दान’ या संकल्पनेकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघता येत नाही म्हणून आपल्याला असे प्रश्न पडतात. कुठल्याही श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या दानात त्यागभावना असते.
आपल्याला माहीत नसेल पण हिंदू धर्मात स्वतःचं दानदेखील करता येतं. मुलगी आहे तर तिचंच दान का? मग मुलाचं दान का नाही? हा भेदभाव नाही का? असे प्रश्न पडणाऱ्यांना पूर्वीच्या काळी घडणाऱ्या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर थोडी स्पष्टता येईल.
पूर्वीच्या काळी मुलाला त्याच्या वर्णानुसार तो ८ ते १६ वर्षाचा असताना गुरूगृही पाठवले जायचे. त्यावेळी मुलांनादेखील आचार्यांना ‘दान’ केलं जायचं. जेणेकरून गुरूच्या सानिध्यात राहून त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांचं भलं व्हावं.
मुलगा साधारण २० वर्षांचा झाला की त्याची सोडमुंज व्हायची आणि त्याचे गुरुजी त्याला लग्न करायला परवानगी द्यायचे. मुलीचं शिक्षण त्यावेळी तिच्या आईवडिलांच्या घरीच व्हायचं.
२० वर्षांचा मुलगा १५-१६ वर्षांच्या मुलीशी विवाह करायचा. मुलगी तशी वयाने लहान असायची त्यामुळे तिची सगळीच जबाबदारी तिच्या आईवडिलांवर असायची. आपण आपली मुलगी का देत आहोत हे वधूपिता वराला सांगायचा.
हेच ‘कन्यादान’ असायचं. त्यावेळी आईवडीलांचा आपला मुलगा आणि मुलगी दोघांवरही अधिकार असायचा आणि मुलामुलींनाही त्यात काही वावगं वाटायचं नाही. आजवर आमच्या मुलीवर आमचा अधिकार होता, यापुढे तुमचा अधिकार असेल अशी भावना वराला मुलीचं कन्यादान करताना वधूपित्याच्या मनात असायची.
आताच्या काळात वधू-वर दोघेही सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. त्यामुळे आजच्या काळात वराने आपल्या मुलीची आर्थिक जबाबदारी यापुढे घ्यावी असं सांगण्याची आवश्यक्ता वधूपित्याला नसते. कन्यादान हा विधी वडील आणि मुलीतला भावबंध अधोरेखित असतो.
आजच्या काळात जरी मुलगी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असली तरी आजही तिला मानसिक आधाराची गरज असते. बऱ्याच गोष्टी बदललेल्या असल्या तरी मानवी भावना तशाच आहेत. पित्याने आपल्या मुलीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं.
मुलगी पित्याशी, तिच्या माहेरच्या घराशी भावनिकदृष्ट्या खूप घट्ट जोडली गेलेली असते. आईवडीलांचा जीवही आपल्या लेकीतच गुंतलेला असतो. तिचं भलं व्हावं. तिचं पुढे सगळं काही सुरळीत व्हावं हीच भावना तिच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या मनात असते. त्यामुळे कन्यादानाचा विधी आजही मुलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी खूपच क्लेशदायक असतो.
कन्यादानाची ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली त्याविषयीची एक पौराणिक कथा आहे. २७ नक्षत्रांना पुराणात दक्ष प्रजापतीच्या कन्या म्हटले आहे. या २७ नक्षत्रांचा दक्ष प्रजापतीने चंद्रासोबत विवाह लावला त्यावेळी त्याने २७ नक्षत्रांचे म्हणजेच आपल्या लेकींचे कन्यादान केले होते. सृष्टीचे संचालन पुढे जाऊ शकेल आणि संस्कृतीचा विकास होईल हे हेतू त्यामागे होते.
‘विवाह’ या संकल्पनेचा व्यापक अर्थ आज आपल्याला ठाऊक नसतो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, विवाहात वराला विष्णूचा तर वधूला लक्ष्मीचा दर्जा दिला गेलेला आहे. कन्येला घरातील लक्ष्मीखेरीज अन्नपूर्णाही समजले जाते.
–
लाडक्या मुलीच्या हट्टापायी, “खिलजीने” हिंदूंसमोर गुडघे टेकले पण…
हे ५ प्रश्न मुलीने लग्नाआधी मुलाला विचारणे अत्यंत आवश्यक आहे!
–
विवाहातल्या प्रत्येक विधीमागे वधू-वर दोघांनीही नात्यात आणि कुटुंब चालवण्यात बरोबरीचा हातभार लावावा हा हेतू असतो. विष्णू रुपी वर विवाहाच्या वेळी वधूपित्याला आश्वासन देतो की तो त्यांच्या लेकीला कायम सुखात ठेवेल आणि तिच्या चांगल्यावाईट काळात तिला साथ देईल.
कन्यादानचा विधी :
हिंदू धर्मशास्त्रानुसार कन्यादान, विवाहहोम आणि सप्तपदी हे विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण होत नाहीत असं मानलं जातं. या तीन विधींपैकी ‘कन्यादान’ हा विधी पहिल्यांदा केला जातो.
या विधीच्या आधी वधूच्या आईवडिलांकडून वराची ‘मधुपर्क’ म्हणजेच शोडषोपचारे पूजा केली जाते. त्याला सोवळे नेसायला दिले जाते आणि ते नेसूनच त्याने पुढील विधीसाठी यायचे असते.
हल्ली सोवळ्याच्या ऐवजी लग्नाकरता वरासाठी जो खास पोशाख तयार करून घेतलेला असतो तो दिला जातो. धार्मिक विधींसाठी मात्र वराला सोवळेच नेसून यावे लागते. वधूचे आईवडील वधूला आपल्या शेजारी बसवतात आणि वराला आपल्या डाव्या हाताकडे किंवा समोर बसवतात.
एका पवित्र कलशामध्ये ५ रत्नं, सोनं घालून त्यात पाणी घातलं जातं. या पाण्यानेच कन्यादान केलं जातं. एक काशाचं भांडं जमिनीवर ठेवलं जातं आणि त्यावर वर, वधू आणि वधूपिता आपली ओंजळ धरतात. वधूची माता कलशातल्या पाण्याची धार वधूपित्याच्या ओंजळीत सोडते.
मग ते पाणी वराच्या, वधूच्या ओंजळीत आणि नंतर काशाच्या भांड्यात जातं. हे करत असताना वधूपिता ‘धर्मपालन व उत्तम प्रजा निर्माण करण्यासाठी या कन्येला मी तुमच्या गोत्रात समर्पण करतो.’, अशा अर्थाचा एक मंत्र म्हणतो.
त्याचबरोबरीने ‘अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांस होण्याकरता व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी अमुक नावाची अमुक गोत्रोत्पन्न, सौभाग्यकांक्षिणी, लक्ष्मीरूपी कन्या मी ह्या विष्णुरूपी वराला ब्राह्यविवाहविधीने अर्पण करतो. हिचा वराने स्वीकार करावा.’, असे अर्थ असलेले मंत्रही वधूपिता उच्चारतो.
हे म्हणून झाल्यावर दर्भ, अक्षत आणि पाणी वराच्या हातावर सोडायचं असतं. त्यावर वराने ‘ओम् स्वस्ति’ म्हणजेच ‘मान्य आहे’ असं म्हणायचं असतं. ते झालं की कन्यादानवर ज्या वस्तू किंवा धन वरदक्षिणा म्हणून देण्यात येणार असेल त्याचा मंत्रपूर्वक उच्चार वधूपित्याने करायचा असतो.
‘धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पत्नीच्या/पतीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ हे वचन वराने आणि वधूने वधूपित्याला द्यायचे असते. त्यानंतर दूध आणि तुपात भिजवलेली अक्षत एकमेकांच्या डोक्यावर टाकून ‘आमचा संसार सुखाचा होवो, आम्हांला उत्तम संतती प्राप्त होवो, उत्तम यश मिळो व हातून सतत धर्माचरण होवो’ असे वधूवरांनी म्हणायचे असते.
कन्यादान आणि मोक्षप्राप्ती :
हिंदू धर्मात कन्यादानाला ‘महादान’ म्हटलं गेलं आहे. ज्या आईवडिलांना कन्यादान करायची संधी मिळते ते खूप सौभाग्यशाली असतात असं समजलं जातं. त्यांच्याकरता याहून मोठं पुण्य आणखीन कुठलं नसतं असं मानलं जातं. हिंदू धर्मानुसार, कन्यादान केल्यामुळे वधूच्या मातापित्यांना मोक्षप्राप्ती होते आणि निधनानंतर ते स्वर्गात जातात.
दक्षिण- उत्तर भारतातल्या कन्यादानाच्या पद्धती :
उत्तर आणि दक्षिण भारतात कन्यादान वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. उत्तर भारतामधल्या काही ठिकाणी कन्येचा हात एका कलशावर ठेवला जातो. मग वधूच्या हातावर वर आपला हात ठेवतो. त्यावर फुले, गंगाजल आणि खायची पाने ठेवून मंत्रोच्चार केला जातो. मग पवित्र वस्त्राने वधू-वराचे गठबंधन केले जाते आणि मग सात फेऱ्यांचा विधी पूर्ण केला जातो.
दक्षिण भारतात आपल्या वडिलांच्या हातावर कन्या आपला हात ठेवते आणि सासऱ्यांच्या हाताखाली वर आपला हात ठेवतो. नंतर वरून पाणी सोडलं जातं ते वधूच्या हातामधून वराच्या हातापर्यंत जातं.
कन्यादानाच्या विधीचं महत्त्व कळल्यावर यापुढे आता जेव्हा आपण या विधीबद्दल विचार करू किंवा ‘कन्यादाना’चा हा विधी स्वतःच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभवू किंवा इतरांच्या बाबतीत तो होताना बघू तेव्हा आपण आधीसारखा वरवरचा विचार करणार नाही. कदाचित, आताही आपल्यातल्या काहींना हा विधी पटणार नाही. मात्र जे हा विधी करू इच्छितात त्यांची किमान खिल्ली उडवणं तरी आपण टाळू.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.