' शेती म्हणजे हमखास बुडणारा धंदा, अशी हेटाळणी करणाऱ्यांचेही मन जिंकणारा कमलेश… – InMarathi

शेती म्हणजे हमखास बुडणारा धंदा, अशी हेटाळणी करणाऱ्यांचेही मन जिंकणारा कमलेश…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी ऊन, पाऊस, वाऱ्याची चिंता न करता शेतात राबत असतो म्हणून आपण विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो.

इतकं महत्वाचं काम करूनही भारतात ‘शेतकरी’ या व्यक्तीला आजही आपली ओळख निर्माण करण्यासाठी, बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी, हक्काचा फायदा कमावण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. इतकंच नाही तर, “मुलगा शेती करतो” हे ऐकल्यावर त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं सुद्धा सोपं नाहीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कमलेश नानासाहेब घुमारे या मालेगाव जवळ रहाणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणासमोर सुद्धा हे सर्व प्रश्न होते, पण त्याने या सर्व प्रश्नांसमोर हताश न होता त्यावर पर्याय शोधण्याचं ठरवलं.

 

jugaadu kamlesh im2

 

ऑटोमोबाईल क्षेत्रात इतकी प्रगती केलेल्या भारताने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या नंतर कोणताच मोठा शोध लावला नाही हे त्याला सतत खटकत होतं. परिस्थिती बदलण्यासाठी त्याने ‘जुगाडू कमलेश’ हे नाव धारण केलं.

शेतकऱ्यांचं औषध फवारणीचं काम सुसह्य करण्यासाठी त्याने एका वाहनाचा शोध लावला आणि स्वतःची एक ओळख निर्माण केली. ‘शार्क टॅंक इंडिया’ मध्ये कौतुक झालेला आपला मराठी मुलगा ‘जुगाडू कमलेश’ची काय स्टोरी आहे? जाणून घेऊयात.

‘कमलेश नानासाहेब घुमारे’कडे कोणतीही इंजिनियरिंगची पदवी नाहीये, तरीही तो लहानपणापासून विविध धातूंना एकत्र जोडतो आणि एखादी गृहपयोगी वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतो.

‘जुगाड’ करण्याच्या या त्याच्या वृत्तीमुळेच त्याला आपल्या वडिलांसाठी एक अशी सायकल तयार करावीशी वाटली ज्यामुळे त्यांना शेतात औषधांची फवारणी करतांना त्रास होणार नाही.

कमलेशने सायकलला तिसरं चाक लावून त्याला हलक्या हाताने वळवता येईल असं एक हँडल लावलं. औषधांचं पोतं ठेवता येईल असं एक कॅरीयर बसवलं आणि हे वाहन तो शेतात वापरायला लागला.

 

jugaadu kamlesh im1

 

हे काम करण्यासाठी परदेशात ‘हायटेक’ वाहन असतीलही, पण भारतातील शेतकरी ते विकत घेऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन कमलेशने ७ वर्ष मेहनत करून या वाहनाची निर्मिती केली.

२०१४ मध्ये कमलेशला ही कल्पना सर्वप्रथम सुचली होती. सायकलच्या निर्मिती प्रक्रियेत बरेच उतार-चढाव आले आणि शेवटी २०२१ मध्ये ‘जुगाडू कमलेश’ची ही सायकल पूर्णत्वास आली.

‘जुगाडू कमलेश’ याच नावाने त्याने आपलं युट्युब चॅनल तयार केलं. वस्तूंसोबत केलेले विविध ‘जुगाड’ तो या चॅनलवर अपलोड करू लागला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

पुढे ‘शार्क टॅंक’ या टीव्ही शो मध्ये तो सहभागी झाला आणि आज तो कित्येक तरुणांना आपल्या कार्यातून प्रेरणा देत आहे.

 

jugaadu kamlesh im

 

आज जरी कमलेशची सगळीकडे वाहवा होत असली तरीही त्याने एक काळ असाही बघितला आहे जेव्हा गावातील प्रत्येक जण हा त्याला ‘बिनकामी’, ‘दिशाहीन’वगैरे नावांनी हाक मारायचे.

त्याने आपलं पूर्ण लक्ष हे सायकल निर्मिती करण्याकडे केंद्रित केलं आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करत तो लोकांचा अभिप्राय घेत राहिला आणि आपल्या कामात सुधारणा करत गेला. या सर्व कामात कमलेशला त्याचा मित्र ‘नारू’ने त्याला खूप साथ दिली.

कमलेशला त्याच्या गावातील लोकांपैकी केवळ त्याचा मित्र नारू आणि त्याच्या पत्नीने साथ दिली होती.

लग्न ठरल्यावर कमलेशची मासिक कमाई काहीच नसल्याने लोक त्याच्या पत्नीला सतत या लग्नाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देत होते, पण तिला कमलेशच्या खटपटी स्वभावावर विश्वास होता. लोकांनी कितीही नावं ठेवले तरीही तिने कमलेशची साथ दिली आणि आज तेच लोक तिच्या निवडीचं कौतुक करत आहेत.

‘जुगाडू कमलेश’च्या युट्युब चॅनलचे प्रेक्षक आता ६५ लाखांवर पोहोचले होते. कमलेशकडून कित्येक इंजिनियर लोकांनी त्याने तयार केलेल्या ‘जुगाडू’ वस्तू विकत घेतल्या.

काही कंपन्यांनी कमलेशला आपल्यासोबत काम करण्याची ऑफर सुद्धा दिली. पण, गुंतवणूक करण्यासाठी पैसे उभे करणं शक्य नसल्याने गोष्टी पुढे सरकत नव्हत्या.

२०२२ च्या सुरुवातीला जेव्हा ‘शार्क टॅंक इंडिया’ची सोनी टीव्हीवर जाहिरात येण्यास सुरुवात झाली तेव्हा कमलेश आणि नारू यांनी आपल्या ‘जुगाडू सायकल प्रोजेक्ट’चं एक प्रेझेंटेशन तयार केलं आणि ते त्यांनी या सिरीयल मधील गुंतवणूकदारांसमोर सादर केलं. इथे पोहोचण्यासाठी कमलेशला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता.

 

jugaadu kamlesh im3

 

मालेगाव ते मुंबईपर्यंत ठरवलेल्या कारच्या चालकाने गाडी रद्द केली. सायकल मुंबईला कशी न्यावी? हा दुसरा प्रश्न कितीतरी वेळ या दोघांनाही कितीतरी वेळ त्रास देत होता, पण अडचणींवर मात ‘जुगाडू कमलेश’ आणि त्याची सायकल मुंबईला पोहोचली.

कमलेश आणि नारू यांनी तयार केलेली सायकल आणि त्या दोघांमधील निरागसता, शेतकऱ्यांबद्दल त्यांची तळमळ हे सर्वांना फार आवडलं.

‘शार्क टॅंक इंडिया’ मध्ये सहभागी झालेल्या ५ उद्योजकांपैकी ‘लेन्सकार्ट’चे संस्थापक पियुष बन्सल यांनी कमलेशच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

पियुष बन्सल यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक ही ४०% शेअर्सच्या मार्फत केली आणि त्यांनी कमलेशला २० लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज त्यांनी कमलेशला दिलं.

‘कमलेश नानासाहेब गवारे’ने सर्व उद्योजकांसमोर हा शब्द दिला की, तो येत्या काळात इलेक्ट्रिक सायकल तयार करेल ज्यामुळे शेताची पाहणी करतांना, औषधांची फवारणी करतांना शेतकऱ्यांना त्रास होणार नाही.

पियुष बन्सल यांच्या निर्णयाचं सोशल मीडियावर खूप स्वागत झालं. काही दिवसांपूर्वी पियुष बन्सल यांनी कमलेश आणि नारू यांना आपल्या ऑफिसमध्ये आणि राहत्या घरी बोलावून त्यांचं आदरातिथ्य केलं होतं.

नानासाहेब गवारे हे आज आपल्या मुलाच्या कामगिरीवर अत्यंत आनंदी आहेत. कापसाची शेती करत असतांना त्यांना २० लिटरचा कॅन घेऊन शेतात चालावं लागायचं. पाठदुखीच्या त्रासाने ते हैराण झाले होते, पण त्यांच्या मुलाने हे यंत्र तयार केलं आणि आपल्या वडिलांचे कष्ट त्याने कमी केले.

कमलेशने जेव्हा स्वतः शेतात काम केलं तेव्हा त्याला ही गरज प्रकर्षाने जाणवली आणि मग या सायकलचा शोध पूर्ण झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी पत्रकारांना बोलतांना सांगितलं.

 

jugaadu kamlesh im4

 

या सायकल व्यतिरिक्त, कमलेशने कमीत कमी कष्टात कापूस विणण्यासाठी, ऊस तोडण्यासाठी सुद्धा एक यंत्र तयार केलं आहे.

‘जुगाडू कमलेश’ सध्या लेन्स्कार्टचे सीईओ पियुष बन्सल यांच्या डिझायनर आणि इंजिनियर टीमसोबत दिल्लीत आपल्या संशोधनावर काम करत आहे.

“भारतीय शेतकऱ्याला कमीत कमी पैशात उपयुक्त यंत्र देता येईल” या उद्देशाने झपाटलेल्या कमलेशला यश मिळावं अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे.

“हा प्रयोग यशस्वी झाला तर मी अजून नवीन जुगाड करेल आणि करतच राहील. पैसे कमावले म्हणून थांबणार नाही.” असं कमलेशने पत्रकारांशी बोलतांना सांगितलं आहे. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते हे सिद्ध करणाऱ्या कमलेशला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?