Site icon InMarathi

बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर हर्षल पटेलची भावूक पोस्ट; ‘तुझ्या सन्मानासाठी एवढंच करू शकतो’

harshal patel featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रकाशझोतात असलेल्या व्यक्तींची झगमगती बाजू लोकांच्या सतत समोर येत असते. कलाकार मंडळी आणि खेळाडूंचा नेहमीच एक मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. त्यांची कौशल्यं, कामगिरी लोकांना त्यांच्याकडे आकर्षून घेते आणि ही व्यक्तिमत्त्वं अगदी थोड्या काळात जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान मिळवतात.

मग त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरीनेच नकळत त्यांच्या खाजगी आयुष्याशीही लोक जोडले जातात. ते आपल्याच जवळचे कुणीतरी आहेत अशा भावनेने त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात.

आयपीएलच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ संघातला वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हे नाव सर्वपरिचित आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाने त्याने लोकांचं मन जिंकून घेतलंय. आयपीएलच्या २०२१ च्या सिझनमध्ये ३२ विकेट्स घेऊन हर्षल पटेल आघाडीचा विकेट घेणारा ठरला होता.

 

 

बऱ्याचदा चर्चेत असलेला हर्षल काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला. ९ एप्रिलला त्याच्या बहिणीच्या झालेल्या दुःखद निधनाची घटना याला कारणीभूत ठरली. यामुळे मॅच अर्ध्यात सोडून त्याला घरी परतावं लागलं. त्यांच्या असंख्य चाहत्यांनी या दुर्दैवी घटनेननंतर हर्षल आणि हर्षलच्या कुटुंबियांप्रीत्यर्थ शोक व्यक्त केला.

नुकतंच हर्षलने पुन्हा एकदा टीममध्ये कमबॅक केलंय. १६ तारखेला टीमतर्फे पुन्हा एकदा खेळून झाल्यानंतर हर्षलने इंस्टाग्रामवर आपल्या बहिणीसाठी लिहिलेली भावूक पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल ९ एप्रिलला वारली. विधू पाल सिंगने ती वारली असल्याचं ट्विटरवरून सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यानची मॅच बघताना ती वारली.

प्राणघातक अशा आरोग्यासंबंधीच्या अडचणींचा तिला सामना करावा लागत होता आणि त्यामुळे तिची तब्येत खालावत होती, तिच्या शारीरिक कार्यांवर त्याचा वाईट परिणाम झाला आणि त्यामुळे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते असं समजतंय. पण अनेक प्रयत्नांनंतरही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. तिच्या मृत्यूचं हे प्राथमिक कारण ठरलं.

 

 

मात्र तिच्या मृत्यूचं नेमकं कारण तिच्या कुटुंबीयांनी उघड केलेलं नाही. या सगळ्यामुळे १२ एप्रिलला आरसीबीच्या बाजूने सीएसके विरुद्धचा सामना हर्षलला खेळता आला नाही. हर्षलचं आरसीबीच्या टिममधलं स्थान सध्या खूप महत्त्वाचं आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ दु प्लेसिस याला जबरदस्त फॉर्मात असलेल्या सीएसकेच्या फलंदाजांना आवरताना नाकी नऊ आले तेव्हा संघाला हर्षलची उणीव चांगलीच भासली. हर्षलच्या पुनरागमनानंतर आरसीबीच्या टीममध्ये चांगली कामगिरी करण्याचा उत्साह नव्याने संचारला आहे.

१६ तारखेला आरसीबीच्या ११ खेळाडूंच्या संघात हर्षलने कमबॅक केलं तेव्हा आरसीबीने डीसीला हरवलं. मॅच झाल्यानंतर त्याने आपल्या बहिणीविषयी मनापासून भावना व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली. त्याचबरोबर त्याने आपल्या बहिणीसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे.

हर्षल लिहितो, “ताई तू आमच्या आयुष्यातली एक अत्यंत दयाळू आणि अतिशय आनंदी व्यक्ती होतीस. शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर हसू ठेवत अविश्वसनीय अशा अनेक अडचणींचा सामना तू आयुष्यात केलास. भारतात परतण्यापूर्वी जेव्हा मी तुझ्यासोबत रुग्णालयात होतो तेव्हा तू मला खेळावर लक्ष केंद्रित कर आणि माझी काळजी करू नकोस असं सांगितलंस. केवळ तुझ्या त्या शब्दांमुळेच मी परत येऊ शकलो आणि काल रात्री खेळपट्टीवर उतरू शकलो.

 

 

तुला स्मरणात ठेवायला आणि तुझा सन्मान करायला मी इतकंच करू शकतो. ज्या ज्या गोष्टींमुळे तुला माझा अभिमान वाटला त्या सगळ्या गोष्टी मी करत राहीन. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात क्षणोक्षणी मला तुझी आठवण येईल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या आत्म्यास शांती मिळो.”

त्याचे समवयस्क, संघातले इतर खेळाडू आणि त्याच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टखालच्या कमेंट सेक्शनमध्ये आपला शोक व्यक्त केला आहे. या सगळ्या त्रासातून गेलेल्या हर्षल आणि अर्चिताच्या कुटुंबीयांनी अर्चिता एक चांगली व्यक्ती होती असं म्हटलं आहे.

आपल्या लाडक्या खेळाडूच्या या अवघड काळात चाहत्यांनी त्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

 

 

बऱ्याचदा कठीण प्रसंग ओढावला की आपण त्याकडे कसं बघतो हे फार महत्त्वाचं असतं. हर्षलने या सगळ्याचा आपल्यावर परिणाम न होऊ देता बहिणीने आपल्या जे सांगितलंय ते लक्षात ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय ही बाब निश्चितच स्तुत्य आणि त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयीचा आदर द्विगुणित करणारी आहे.

आपला हा आवडता खेळाडू यापुढेही खेळपट्टीवर उत्तमोत्तम कामगिरी करत राहो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version