आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. राजकारण, बॉलीवूड, क्रिकेट अशा सर्व प्रमुख घडामोडींचं केंद्रबिंदू असलेल्या या शहराचं नाव मुंबादेवीच्या नावाने पडलं आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एकेकाळी केवळ कोळी बांधवांचं असलेल्या या शहरात त्यांनी आपलं एक श्रद्धास्थान म्हणून त्यांनी हे मुंबादेवीचं मंदिर बांधलं होतं. मुंबादेवी ही धन आणि ऐश्वर्याचं प्रतिक असल्याने मुंबईची इतकी आर्थिक भरभराट झाल्याचं मुंबादेवीच्या भक्तांचा विश्वास आहे. हेच कारण आहे की, आजच्या स्मार्ट जगातही कित्येक भाविक हे कोणतंही नवीन शुभकार्य करण्याआधी मुंबादेवीच्या दर्शनाला जात असतात.
मुंबादेवी या मंदिराची संकल्पना कशी अस्तित्वात आली? मुंबादेवीचा उल्लेख प्राचीन काळातही आहे का? ते जाणून घेऊयात.
एका आख्यायिकेनुसार, मुंबादेवी या अष्टभुजा असलेल्या देवीला ब्रह्माने आपल्या शक्तीने निर्माण केलं होतं. ही त्या प्राचीन काळातील गोष्ट आहे जेव्हा या भागातील लोकांना ‘मुंबारक’ नावाचा राक्षस त्रास देत होता.
या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी लोकांनी ब्रह्माजींची उपासना केली होती. ब्रह्माजी तेव्हा प्रसन्न झाले आणि त्यांनी या त्रासातून लोकांची सुटका होईल असं त्यांना आश्वासन दिलं.
आपली शक्ती वापरून त्यांनी एक देवी तिथे प्रकट केली. या देवीने ‘मुंबारक’ राक्षसाचा वध केला. ‘मुंबारकला मारणारी आई’ म्हणून ही देवी स्थानिकांच्या नेहमीच लक्षात रहावी म्हणून त्यांनी ‘मुंबादेवी’चं भव्य मंदिर बांधलं असं सांगितलं जातं.
मुंबादेवीचं मंदिर कुठे आहे?
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर या भागात असलेलं हे मंदिर १७३७ मध्ये बांधल्याची नोंद आहे. ब्रिटिश काळात मुंबादेवीचं मंदिर हे आजच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स’ स्टेशनच्या जागेवर होतं. पण, ब्रिटिशांनी या जागेवर एक भव्य इमारत बांधण्याचं ठरवलं जिथे रेल्वेचं मुख्य कार्यालय असेल आणि एक रेल्वे स्थानक सुद्धा असेल.
मुंबादेवीचं मंदिर हे त्यावेळी ‘मरीन लाईन्स पूर्व’ इथे स्थलांतरित करण्यात आलं. त्यावेळी मंदिराच्या शेजारी तीन मोठे तलाव होते. या जागेचा व्यापारासाठी योग्य वापर व्हावा या हेतूने ब्रिटिशांनी हे तलाव बुजवले आणि मग तिथे लोकांना रहाण्यासाठी जागा झाली.
पुढे मुंबई शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि या जागेचा योग्य वापर व्हायला लागला.
४०० वर्ष जुनं असलेलं मुंबादेवीचं मंदीर जेव्हा मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी स्थलांतरित झालं तेव्हापासून या शहरात येणारा प्रत्येक पर्यटक इथे भेट देऊ लागला. मुंबादेवीला आपलं मागणं, गाऱ्हाणं सांगू लागला आणि आपली इच्छापूर्ती झाली की परत एकदा मुंबादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागला. अशी या मंदिराची गर्दी वाढत गेली.
—
- ही आहेत मुंबईतील झकास ठिकाणं : ११ आणि १८ व्या ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच नसेल
- स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्ट्यान्तामुळे मुंबईकरांना रस्ताही मिळाला आणि त्यांचे आराध्य दैवतही…
—
मुंबादेवीचं मंदिर बांधण्यासाठी जागा कोणी दिली?
मुंबादेवीचं मंदिर ज्या भागावर बांधण्यात आलं आहे ती जमीन ‘पांडू शेठ’ या व्यक्तीची होती. मुंबादेवीचं मंदिर हे स्थलांतरित होणार आहे हे कळल्यावर त्याने स्वेच्छेने ही बाजारातील जागा मंदिरासाठी दिली होती.
कित्येक वर्ष पांडू शेठ आणि त्यांच्या परिवाराने या मंदिराची देखभाल केली होती. पण, जेव्हा मुंबई हायकोर्टाने या मंदिराची दखल घेतली तेव्हा त्यांनी ‘मुंबादेवी ट्रस्ट’ स्थापन करण्याचे आदेश दिले आणि आज हे ट्रस्ट या मंदिराचा पूर्ण आर्थिक व्यव्हार बघत आहे. या ट्रस्टच्या पुढाकारानेच मुंबादेवीच्या मंदिरात अन्नपूर्णा आणि जगदंबा देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.
मुंबादेवी मंदिराची देखरेख आज कशी केली जाते?
मुंबादेवीच्या मंदिरात दररोज ६ वेळेस आरती होत असते. १६ पुजारी या मंदिरात कार्यरत आहेत ज्यांच्याकडे आलटून पालटून पूजा, नैवेद्य, आरती अशा कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर सकाळी ४ पासून उघडण्यात येतं. मुंबादेवीच्या मंदिरात दर मंगळवारी सर्वाधिक गर्दी असते.
मुंबादेवी मंदिर प्रशासनाने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, “मुंबादेवीचं वाहन हे रोज बदलत असतं. दर सोमवारी मुंबादेवी ही नंदीवर स्वार असते, तर मंगळवारी हत्तीवर, बुधवारी कोंबडा, गुरुवारी गरुड, शुक्रवारी राजहंस, शनिवारी हत्ती आणि रविवारी मुंबादेवी ही सिंहावर स्वार असते.” ‘भक्तांचं मागणं पूर्ण करणारी आई’ अशी मुंबादेवीची ओळख आज मुंबई शहरात प्रचलित आहे.
बॉम्बे ते मुंबई :
मुंबादेवी मुळे या शहराचं पडलेलं ‘मुंबई’ हे शहर ब्रिटिशांच्या काळात ‘बॉम्बे’ या नावाने ओळखलं जायचं. ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर देखील कित्येक वर्ष लोक या शहराला ‘बॉम्बे’ म्हणायचे. पण, १९९५ मध्ये प्रथमच सत्तेत आलेल्या शिवसेना सरकारने एक परिपत्रक काढलं आणि सर्व भाषांमध्ये या शहराचं नाव ‘मुंबई’ असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
मुंबादेवीचा हा इतिहास वाचल्यावर तिची या शहरावर अशीच कृपा राहो अशी प्रार्थना आपण नक्कीच करू शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.