आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कामानिमित्त, प्रवासानिमित्त बाहेर पडणारे आपण हमखास जवळ बाळगत असलेली एक गोष्ट म्हणजे पाण्याची बाटली. उन्हाळ्यात साधं पाणी प्यायला नकोसं वाटतं म्हणून बरेचजण फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात, पण साध्या बाटलीत हे थंड पाणी भरून घेतलं आणि बाहेर पडलं तर काही वेळाने ते थंड राहत नाही. यावरचा तोडगा म्हणून हल्ली आपल्यातले बरेच जण थर्मासच्या बाटल्या जवळ बाळगतात.
थर्मासची बाटली वापरण्याचा मुख्य फायदा म्हणजे यात गरम पाणी ठेवलं तर ते गरमच राहतं आणि थंड ठेवलेलं पाणी थंड, पण आपण सर्रासपणे ज्यांना ‘थर्मास’च्या बाटल्या म्हणतो तेच त्या बाटलीचं खरं नाव असेल का असा प्रश्न आपल्याला कदाचित आजवर पडलाही नसेल.
कोलगेट हा टूथपेस्टचा एक ब्रॅंड आहे, तरी आपल्यातल्या बऱ्याच जणांना टूथपेस्टलाच कोलगेट म्हणायची सवय असते किंवा झेरॉक्स हे खरंतर कंपनीचं नाव आहे, तरी आपण फोटोकॉपीला हमखास झेरॉक्स काढली असं म्हणतो. सर्फ हे एका वॉशिंग पावडरचं नाव असलं तरी वॉशिंग पावडरलाच सर्फ म्हणायची अनेकांना सवय असते.
आपल्यातल्या बहुतेकांना हे माहिती नसेल पण पाणी गरम किंवा थंड ठेवणाऱ्या त्या बाटलीलाही ‘थर्मास’ची बाटली म्हणण्याची अशीच चूक आपण करत आलोय.
‘थर्मास’ हे बाटलीचं नाव नसून त्या बाटलीच्या कंपनीचं नाव आहे. या बाटलीचा शोध कुणी आणि कसा लावला? आणि या बाटलीचं खरं नाव काय? हे थोडक्यात जाणून घेऊ.
या बाटलीच्या शोधामागे एक रंजक इतिहास आहे. इंग्लिश शास्त्रज्ञ जेम्स देवार याने १८९२ साली या बाटलीचा शोध लावला.
पाण्याची वाफ होते तशीच वाफेची साठवणूक केल्यावर त्याचंही द्रवात रूपांतर होतं हे आपल्याला माहितीये. देवार हा शास्त्रज्ञ किती तापमानाच्या खाली वाफ आणली म्हणजे तिचं द्रवात रूपांतर होईल हे जाणून घेण्यासाठी वाफेच्या गुणधर्मांचा अभ्यास करत होता.
त्याने एका मोठ्या काचेच्या बाटलीच्या आत त्याहून लहान अशी दुसरी बाटली ठेवली आणि त्या दोन्ही बाटल्यांच्या मधली हवा बाहेर काढली. हे करत असताना त्याने त्यातलं तापमान तसंच राहावं यासाठी पार्शिअल व्हॅक्युम तयार केला. त्यात रासायनिक प्रयोग केला.
या शोधाला त्याने ‘व्हॅक्युम इन्स्युलेशन’ असं नाव दिलं आणि व्हॅक्युमच्या बाटल्या तयार केल्या. आता आपण ज्या व्हॅक्युमच्या बाटल्या वापरतो ती याच बाटल्यांची सुधारित आवृत्ती आहे.
‘बर्गर अँड अस्चेनब्रेनर’ या जर्मन कंपनीने व्यावसायिक हेतूंकरता त्या बाटलीत आवश्यक ते बदल केले आणि १९०४ साली ‘थर्मस GmBH’ ची निर्मिती केली. ‘थर्मस’ हे नाव एका स्पर्धेतून मिळालं.
जर्मनीतील ‘मुनिच’ इथल्या एका रहिवाशाने ‘उष्णता’ असा अर्थ असलेल्या ‘थर्म’ या ग्रीक शब्दावरून ‘थर्मस’ हा शब्द मिळवला आणि स्पर्धेत पाठवून दिला. १९०५ मध्ये ‘ए. ई. गटमन’ या ब्रिटिश कंपनीला ‘युनायटेड किंगडम वितरण हक्क’ दिले गेले.
—
- फोक्सवॅगन या जगप्रसिद्ध कार कंपनीच्या स्थापनेची पडद्यामागील कथा…
- शेवटी बायकोला होणारा त्रास समजला नवऱ्याला, आणि त्याने लावला हा शोध…
—
त्याच्या पुढल्या वर्षी गटमनने ‘थर्मस’ या नावाची इंग्लंडमध्ये ट्रेडमार्क म्हणून नोंद केली. १९०७ पर्यंत संपूर्ण युनायटेड किंगडममध्ये आणि जगातल्या बाकी देशांमध्येही या कंपनीने ‘थर्मस’ या नावावर शिक्कामोर्तब केलं.
त्याचवर्षी, न्यू यॉर्क मधल्या ब्रुकलीन येथे विलियम वॉकर याने जर्मन कंपनीकडून पेटंट मिळवून ‘अमेरिकन थर्मस बॉटल कंपनी’ची स्थापना केली आणि कंपनीचा अमेरिकेतला व्यवसाय हाती घेतला.
या अमेरिकन कंपनीने आपल्या फायद्यासाठी एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली. या व्हॅक्युमच्या बाटल्या ‘थर्मस’ या नावानेच लोकप्रिय करायला तिने सुरुवात केली.
१९१० पर्यंत ‘थर्मस’ हा शब्द सगळीकडे प्रचलित होऊन कंपनीच्या व्हॅक्युमच्या बाटल्यांकरता ‘थर्मस’ हा शब्द विशेषण म्हणून नव्हे, तर नाव म्हणूनच वापरला जाऊ लागल्याचा दावा कंपनी आपल्या कॅटलॉगमध्ये करू शकली. या नावाची लोकप्रियता पुढेही वाढतच राहिली.
१९३५ पासून कंपनीने व्यापार आणि जाहिरात क्षेत्रातले ‘थर्मस’ या नावाचे अनधिकृत संदर्भ शोधण्यासाठी क्लिपिंग सेवा कार्यरत केली. मात्र तरीदेखील सर्वसामान्य माणसांकडून ‘थर्मस’ या शब्दाचा वापर सुरूच राहिला.
काही काही शब्दकोशांमध्येसुद्धा हा शब्द दिसू लागला. थर्मसने या सगळ्याविरुद्ध निषेध नोंदवायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कंपनीने बरेच चढउतार पाहूनही ही अमेरिकेतली एक आघाडीची आणि लोक्रप्रिय कंपनी राहिली.
१९८०च्या दशकाच्या शेवटी १९८९ साली थर्मस ही कंपनी ‘निप्पॉन सांसो कॉर्प.’ या जपानी कंपनीला १३४ मिलियन डॉलर्सना विकली गेली. या जपानी कंपनीने मग सगळा कारभार आपल्या हाती घेतला. ‘थर्मस’ या कंपनीच्या अधिपत्याखाली बाकी कंपन्या काम करू लागल्या.
थर्मस कंपनी अशाच प्रकारे बाटली आणि टिफिन बॉक्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे, तर आतून काचेच्या असलेल्या आणि त्यात असलेल्या पाण्याचं तापमान आहे तसंच ठेवणाऱ्या या बाटलीचं नाव खरं नाव आहे ‘व्हॅक्युम फ्लास्क’. याला नुसतंच ‘फ्लास्क’ असंदेखील म्हटलं जातं.
ज्याला आपण थर्मास म्हणतो त्याचं खरं नाव आपल्याला आता कळलं असलं, तरी आपण त्याला ‘व्हॅक्युम फ्लास्क’ वगैरे म्हणायच्या फंदात पडणार नाही.
कुठल्याही वस्तूला एखाद्या नावाने संबोधणं आपल्या अंगवळणी पडलं, की जरी त्या वस्तूचं ते खरं नाव नसलं आणि त्या वस्तूचं खरं नाव आपल्या लक्षात आणून दिलं गेलं तरी आपल्याला काही आपली ती सवय सोडता येत नाही. यानंतर आपण स्वतः किंवा दुसरं कुणी ‘थर्मास’ची बाटली असं म्हणेल तेव्हा आपल्याला गंमत मात्र वाटेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.