मालमत्ता खरेदीमधील ‘फसवणूक’ टाळण्यासाठी ही कागदपत्रं आवर्जून तपासा!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मागील काही वर्षांपासून घर विकत घेणं, गृहकर्ज मिळवणं हे आधीपेक्षा सोपं झालं आहे, गृहकर्जावरील व्याज कमी होत आहे हे आपण सातत्याने बघत आहोत.
शहर, उपनगर यांचा झपाट्याने विस्तार होत आहे, बांधकाम व्यवसायिक हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज नवीन ऑफर्स घेऊन येत आहेत. पण, या सर्वात एक गोष्ट आपण विसरत आहोत की, कित्येक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक देखील होत आहे.
बिल्डर मंडळी हे बांधकाम सुरू करताना एका वास्तूचा प्लॅन दाखवत असतात आणि हस्तांतरण होतांना तयार झालेली वास्तू ही दुसरीच असते. काही प्रकल्प तर अर्ध्यावर येऊन देखील कायद्याची एखादी पूर्तता केल्याने बंद देखील पडत आहेत.
अशा वेळी, ग्राहक म्हणून आपण कोणती सतर्कता दाखवली पाहिजे? आपलं घर विकत घेतांना आपण भविष्याची सुरक्षितता म्हणून कोणते कागदपत्रं स्वतःच्या ताब्यात घेतले पाहिजेत? ते जाणून घेऊयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१. विक्री करारनामा म्हणजेच ‘सेल डीड’:
तुम्ही विकत घेत असलेल्या मालमत्तेचा मालकी हक्क इथून पुढे तुमच्या नावे असेल हे सांगणारं पत्र म्हणजे ‘विक्री करारनामा.’ तुमचं घर विकत घेतांना हे ‘सेल डीड’ फार महत्वाचं कागदपत्र ठरतं. काही बांधकाम व्यवसायिक हा करार करण्यास उशीर किंवा टाळाटाळ करत असतात.
घर विकत घेणाऱ्या व्यक्तीने आधी हा करार तयार करून त्याची राज्य शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत वेबसाईटवर त्याची नोंदणी करावी. ही नोंदणी झाल्याशिवाय कितीही पैसे दिलेले असले तरीही ती वास्तू तुमची नाहीये हे लक्षात घ्यावं आणि हे कागदपत्र त्वरित हस्तगत करावं.
२. मूळ मालमत्ता करारनामा:
तुमच्या घराचं बांधकाम ज्या जमिनीवर झालं आहे त्या जमिनीवर एखादं कायदेशीर प्रकरण सुरू आहे का ? तुमच्या बिल्डरने जमीन मालकाकडून जमीन विकत घेत असतांना पारदर्शक व्यवहार केला आहे का ? याची माहिती देणारं पत्र म्हणजे ‘मूळ मालमत्ता करारनामा’. तुम्ही विकत घेतलेली वास्तू पुढे विकायची असल्यास ‘मूळ मालमत्ता करारनामा’ची शहानिशा होत असते.
–
मार्च एन्ड…; पोलिसमामा ला बघून यू-टर्न घेण्यापेक्षा ट्रॅफिकचे ‘खरे’ नियम वाचा आणि दंड भरणं टाळा!
तुमच्याविरुद्ध खोटा FIR दाखल झाला तर काय कराल? घाबरण्यापेक्षा हे वाचा…
–
तुमच्या बिल्डरने ज्या व्यक्ती कडून जमीन विकत घेतली होती तो या मालमत्तेचा मूळ मालक होता का ? याची माहिती ‘मूळ मालमत्ता करारनामा’ मध्ये असते. जमीन अस्तित्वात आल्यापासून आजच्या जमिनीच्या मालकाची माहिती सांगणाऱ्या या पत्राची मागणी करण्याचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला असतो.
३. बिल्डिंगचा प्लॅन:
पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये काही प्रकरण अशी देखील बाहेर आली आहेत ज्यामध्ये बिल्डरने जागा विकत घेतली, बांधकाम सुरू केलं, फ्लॅट विकल्या गेले आणि नंतर कळलं की, बिल्डिंगच्या प्लॅनला मान्यता घेतली गेली नाहीये. अशा बिल्डिंग हस्तांतरित झाल्यानंतर त्याचा सर्व मनस्ताप हा ग्राहकांना भोगावा लागत असतो.
बिल्डिंगचा प्लॅन पास करून घेण्यासाठी तुमच्या बिल्डरने खालील कागदपत्र संबंधित सरकारी कार्यालयाला दिली आहेत की नाही हे नक्की तपासून घ्या:
– जागा बिल्डरच्या नावावर झाल्याचा करारनामा
– शहर नियोजन (टाऊन प्लॅन) किंवा ग्रामपंचायतने केलेल्या सर्वेक्षणाची आकृती / अहवाल
– जागेवरील टॅक्स भरल्याच्या पावत्या
– जागेच्या मूळ मालकाचं ना-हरकत प्रमाणपत्र
– मालमत्ता तपशिलाची माहिती
– जागेची सिव्हिल आकृती
४. जागा वापरात होणाऱ्या बदलाचं प्रमाणपत्र :
भारतातील मोठ्या प्रमाणावरील जमीन ही शेतीला पूरक असते. कोणत्याही जमिनीवर बांधकाम करण्यासाठी ती जमीन नापीक आहे, तिथे कोणतीही शेती केली जाऊ शकत नाही या आशयाचं ‘एन-ए’ प्रमाणपत्र हे संबंधित तहसीलदार कार्यालयातून प्राप्त करणं हे प्रत्येक बिल्डरसाठी बंधनकारक असतं. हे प्रमाणपत्र उपलब्ध आहे की नाही ? याची खात्री करून घेतली पाहिजे आणि शक्य असल्यास त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवली पाहिजे.
५. अधिभार प्रमाणपत्र:
आपण जर एखादी आधी विक्री झालेली मालमत्ता विकत घेणार असाल ज्यावर आधीचं गृहकर्ज सुरू आहे, तर मालकी हक्क बदलल्याचं, गृहकर्ज आपल्या नावे झाल्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या मालमत्तेवरील पुढील प्रत्येक कायदेशीर व्यवहारासाठी हे प्रमाणपत्र आपण हस्तगत केलं पाहिजे.
६. पॉवर ऑफ एटर्नि:
आपल्या वतीने जर कोणती इतर व्यक्ती मालमत्तेच्या संबंधित आर्थिक व्यवहार करणार असेल त्या व्यक्तीला ‘पॉवर ऑफ एटर्नि’ देणं आवश्यक असतं. त्याबरोबरच, तुम्ही विकत घेत असलेल्या मालमत्तेचा व्यवहार करण्यासाठी तुम्हाला भेटलेली व्यक्ती ही जर मूळ मालक नसेल तर त्या व्यक्तीकडे ‘पॉवर ऑफ एटर्नि’ आहे का ? हे तपासलं पाहिजे.
७. कर पावत्या:
तुम्ही विकत घेत असलेल्या जागेवर सरकार कडून आकारण्यात आलेला कर भरला आहे की नाही हे तपासलं पाहिजे. महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतच्या संकेत स्थळावर मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक टाकल्यास ही पावती आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. जर वास्तू जुनी असेल तर त्यावरील पाणीपट्टी, लाईट बिल भरलेलं आहे की नाही हे तपासून घेतलं पाहिजे.
८. ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’:
घर विकत घेतांना हे प्रमापत्र सर्वाधिक महत्वाचं मानलं जातं. तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट विकत घेत आहात ती बिल्डिंग प्लॅन नुसार बांधण्यात आली आहे की नाही ते कम्प्लिशन सर्टिफिकेट वरून निर्धारित होत असतं. बिल्डिंग सोबत मान्य करण्यात आलेल्या इतर सोयी जसं की गार्डन, स्विमिंग पूल किंवा सोसायटी हॉल सारख्या अतिरिक्त गोष्टी बांधून देण्याची वचनपूर्तता बिल्डरने केली आहे की नाही ? हे तपासण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असतं.
घर विकत घेतांना वरील ८ कागदपत्रांची खात्री करून घेतल्यास आपण पुढे उदभवू शकणाऱ्या समस्या नक्कीच टाळू शकतो. आपण पुढील आयुष्य ज्या घरात राहण्याचा विचार करत आहोत त्याच्या किंमत आणि मोल याकडे बघून इतका अभ्यास करणं हे सार्थ आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.