Site icon InMarathi

‘माही भाई’ म्हणायला कचरणारा रॉबिन ‘एका’ भेटीतच बनला धोनीचा जिगरीदोस्त..

robin final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रॉबिन उथप्पा हे क्रिकेटमधील एक असं नाव आहे, असा खेळाडू आहे, जो त्याला आज त्याच्या कारकीर्दीत मिळाली आहे त्याहून जास्त प्रसिद्धी, यश, कीर्ती, मानमरातब यासाठी पात्र होता, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

२००७ च्या टी-२० विश्वचषकात बॉलआऊट दरम्यान यष्ट्यांचा वेध घेतल्यावर त्याने केलेलं सेलिब्रेशन, त्याचा आनंद आजही अनेकांना आठवत असेल. खरं तर त्याच काळात रॉबिनच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली होती.

 

 

भारतीय संघासाठी फार मोठी कारकीर्द न घडवू शकलेला रॉबिन, आजही देशांतर्गत क्रिकेट अणि आयपीएलमधून आपल्या दर्जेदार कामगिरीचं दर्शन घडवतोय. आज चेन्नईच्या संघात असलेला रॉबिन उथप्पा, धोनीचा खास मित्र सुद्धा आहे बरं का! ही मैत्री नेमकी कशी आहे, किती घट्ट आहे, याविषयी रॉबिनने मध्यंतरी खुलासा केला होता. रॉबी आणि माहीच्या या मैत्रीबद्दल आज थोडं जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्याला ‘माही भाई’ कसं म्हणणार…

आयपीएलमध्ये विविध संघांसाठी खेळलेला रॉबिन उथप्पा, २०२० पासून धोनीच्या चेन्नई संघाचा भाग आहे. आज चेन्नईची कमान रवींद्र जडेजा सांभाळत असला, तरी रॉबिनने ती पिवळी जर्सी घातली तेव्हा माहीच चेन्नईचं नेतृत्व करत होता. गेली ३ वर्षं चेन्नईसोबत असणारा रॉबिन मात्र असं म्हणतो, की माझ्या या चांगल्या मित्राला मी ‘माही भाई’ म्हणू शकत नाही.

 

 

रवीचंद्रन अश्विनच्या युट्युब चॅनलवर धोनीविषयीच्या आठवणी सांगताना रॉबिनने ही गोष्ट स्पष्ट केली आहे. त्याचं म्हणणं आहे, की खरंतर त्याने धोनीला माही भाई म्हणावं, अशी स्वतः धोनीने सुद्धा अपेक्षा केली नव्हती. धोनीपेक्षा अनुभवाने आणि वयाने लहान असणारे खेळाडू त्याला असं संबोधत असल्यामुळे, रॉबिनने सुद्धा त्याला तशीच हाक मारावी, हे माहीलाच मान्य नव्हतं.

आजूबाजूला सगळेच जण त्याला ‘माही भाई’ म्हणत असल्याने “मीही तुला याच नावाने हाक मारू का?” असा प्रश्न रॉबिनने केला होता. यावर, “मला तू एमएस किंवा नुसतंच ‘माही’ म्हणालास तरी चालेल” असं उत्तर देऊन माहीने त्यांची मैत्री अधिक दृढ केली. एक माणूस म्हणून माही किती विनयशील आणि चांगला आहे, एक उत्तम मित्र आहे हे त्याच्या या वागण्यातून सहज लक्षात येतं असंही नमूद करायला रॉबिन विसरला नाही.

अशी जमली या दोघांची गट्टी

२००६ साली रॉबिनने भारतीय संघात स्थान मिळवलं, मात्र माही आणि रॉबी या दोन मित्रांची पहिली भेट झाली ती २००४ साली झालेल्या चॅलेंजर ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत. तिथे ओळख आणि मैत्री झाली आणि पुढे रॉबिनला भारतीय संघासोबत दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू लागल्यावर ही मैत्री फुलत गेली. २००४ साली चॅलेंजर स्पर्धेत श्रीधरन श्रीराम या कॉमन मित्रामुळे रॉबी आणि माहीची भेट झाली. ही छोटीशी भेट होती, मात्र या भेटीचं पुढे खास मैत्रीत रूपांतर झालं.

 

 

पुढे २००६ साली रॉबिनने सुद्धा भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि २००८ पर्यंत हे दोन्ही मित्र सोबतीने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत होते. २०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.

आधी भारतीय संघासाठी निळ्या जर्सीमध्ये एकत्र दिसणारे मित्र आता आयपीएलमधील चेन्नई संघाची पिवळी जर्सी घालून एकत्र खेळताना दिसतात. जवळपास १२-१३ वर्षानंतर माहीसोबत एकत्र खेळण्याची संधी मिळाली म्हणून रॉबिन खुश आहे.

बाईकवाली सुस्साट मैत्री…

माही बाईक्सचा चाहता आहे, त्याच्याकडे अनेक बाईक्स आहेत हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचं बाईक्सवरील हे प्रेमही रॉबी आणि त्याच्या मैत्रीला खतपाणी घालणारं ठरलं. रॉबिनही त्यावेळी गाड्यांचा दिवाना झाला होता. बाईक्स आणि कार्स विषयी नवनवीन माहिती मिळवणं त्याला आवडू लागलं होतं. गाड्यांवरील हे प्रेम आणि खाण्याची आवड हा त्यांच्या मैत्रीचा सामान धागा ठरला. मैत्री बाईक्ससारखीच सुस्साट वेगाने पुढे गेली आणि अधिकाधिक घट्ट होत गेली.

 

 

विनोदी स्वभावाचा राजा माणूस

भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ गळ्यात पडण्याआधीपासूनच माही एकदम झकास माणूस असल्याची आठवण रॉबिनने या शोमध्ये सांगितली आहे. स्वभावाने मितभाषी असणारा माही, जे बोलतो ते मात्र फारच विनोदी आणि थट्टेखोर पद्धतीचं बोलणं असतं. थट्टामस्करी करणं आणि वातावरण हलकंफुलकं ठेवणं हा माहीचा स्वभावधर्म आहे, असं कर्नाटकचा फलंदाज रॉबिन म्हणतो.

जवळच्या मित्रांची सतत थट्टा करत राहणं माहीला खूप आवडतं. तो नेहमीच असं करताना दिसतो. मात्र यामुळे कुणी दुखावला जातोय असं वाटलं, तर ही मस्करी माही थांबवतो. मस्करीची कुस्करी होऊ नये याचं भान माहीला असतं. असं आपल्या या मित्राबद्दल रॉबिन सांगतो.

 

या मॅचच्या यशामुळे धोनीचं नशीब पालटलं आणि तो संघाचा कर्णधार झाला!

एकेकाळी होता प्रत्येक गोलंदाजांचा कर्दनकाळ, आज काढतोय पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे…

माहीभोवती तो कर्णधार होण्याआधीपासूनच एक निराळं वलय आहे. त्याची दोस्ती-यारी, त्याच्यातला निराळा स्पार्क तेव्हापासूनच जाणवायचा. माही ज्यावेळी बोलायचं, त्यावेळी सगळे शांतपणे ऐकून घ्यायचे. त्याचं बोलणं कुणी ऐकलं नाही असं कधीही घडायचं नाही. अशी आठवण सुद्धा रॉबिनने सांगितली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version