Site icon InMarathi

ज्युनियर बच्चनचा कडक अभिनय, उत्तम कथानक यासाठी बघायलाच हवा असा उकृष्ट सिनेमा..

dasvi final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : -ईशान पांडुरंग घमंडे

===

‘अभिषेक बच्चन हा चांगला अभिनेता नाही’ असं विधान करणं कदाचित फारच धाडसाचं ठरेल. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी अभिषेकची होणारी तुलना त्याला कमी ठरवते यात कुठलीही शंका नाही. अमिताभ यांनी अभिनयाचा एक वेगळाच दर्जा प्रस्थापित केलाय, त्यांच्याभोवतीचं वलय निराळंच आहे.

त्यामुळे त्यांच्याशी तुलना करायची ठरवली, तर ‘तो तितकासा चांगला नाही’ असं म्हणता येऊ शकतं. मात्र अभिषेकचं क्रिकेटर रोहन गावस्कर किंवा अर्जुन तेंडुलकर सारखं नाही. या दोघांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्यांची केवळ वडिलांशी तुलना झाली, म्हणून त्यांचा टिकाव लागला नाही किंवा त्यामुळेच त्यांना कमी दर्जाचं मानलं गेलं असं नाहीये.

 

 

एक खेळाडू म्हणून त्यांची प्रतिभा फारशी प्रभावशाली नव्हती हेच सत्य आहे. बॉलिवूडमधील उदाहरण द्यायचं झालं, तर तुषार कपूर हे नाव अगदी आवर्जून घेता येईल. जितेंद्रचा मनुलगा असला, तरी प्रतिभेच्या बाबतीत तो तितकासा उजवा नाही. म्हणून त्याचा उल्लेख एक चांगला अभिनेता म्हणून करता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अभिषेकची बाब मात्र तशी नाही. त्याच्या दर्जेदार अभिनयाची झलक त्याच्या बऱ्याच कामांमधून पाहायला मिळते. मी पाहिलेल्या काही चित्रपटांपैकी ‘गुरु’, ‘दम मारो दम’, ‘ल्युडो’ अशा काही सिनेमांचा उल्लेख नक्कीच करावासा वाटतो. अभिषेकच्या अप्रतिम अभिनयाचं दर्शन घडवणारा ‘दसवी’ नावाचा असाच एक चित्रपट नुकताच पाहिला. नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलेला हा सिनेमा, एकदा तरी नक्की पाहावा असा आहे.

 

पिंक चित्रपटामध्ये बिग बी नी चेहऱ्यावर घातलेल्या विशिष्ट मास्कचं रहस्य!

फिल्म इंडस्ट्रीमधील ‘बाप’ लोकांनी दिले सुपरहिट सिनेमे, त्यांची ‘मुलं’ मात्र सुपरफ्लॉप!!

एका राज्याचा मुख्यमंत्री असणारा गंगाराम चौधरी याला एका मोठ्या घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक होते. अंतरिम मुख्यमंत्री म्हणून आपल्या पत्नीला खुर्चीवर बसवण्याचा निर्णय चौधरी घेतो आणि एका नाट्याची सुरुवात होते.

तुरुंगात (?) बसून सरकारचा रिमोटकंट्रोल बनलेल्या अभिषेककडे पाहताना ‘चारा घोटाळ्यात सापडलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांची’ आठवण येऊन गेल्याखेरीज राहत नाही. मात्र जसाजसा सिनेमा पुढे सरकतो, तसं हे लक्षात येतं की पडद्यावर दाखवली जाणारी ही कथा त्या वास्तवातील पती-पत्नी असणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारी कहाणी नाही.

 

 

एरवी पतीसमोर ‘ब्र’ सुद्धा उच्चारू न शकणारी गंगारामची पत्नी योगायोगाने राजकारणाच्या नाल्यात पडते आणि तिथे पोहायला शिकते. पुढे नाट्य आणखी नवनवीन वळणं घेत जातं हे वेगळं सांगायला नकोच. गंगाराम चौधरी या नेत्याच्या भूमिकेला अभिषेकने योग्य न्याय दिलाय आणि आपल्या उत्तम अभिनयाची छाप पाडली आहे.

यामी गौतम आणि निम्रत कौर या दोघींच्या रूपात सौंदर्याची सुद्धा पेरणी सिनेमात उत्तमरीत्या केलेली आहे. अभिषेकने उंचावलेला अभिनयाचा दर्जा कमी पडणार नाही याची काळजीदेखील या दोघींनी घेतली आहे. या कामात त्या दोघींना हातभार लावण्यासाठी अरुण खुशवा सुद्धा सिनेमात आहे. उंचीने कमी असणारा अरुण एक चांगला अभिनेता आहे, यात वादच नाही. घंटीची भूमिका साकारताना, आपलं नाणं सुद्धा खणखणीत ‘वाजेल’ असा उत्तम अभिनय त्यानेही केला आहे.

 

 

कथानक पुढे जात असताना, विनोदी शैलीचा सुद्धा यात पुरेपूर वापर आढळतो. जेमतेम आठवी पास असलेला ‘अंगठेबहाद्दर’ गंगाराम चौधरी जेव्हा ‘दहावीची’ परीक्षा देण्याचा निर्णय घेतो, तेव्हा चित्रपटाची कथा खास वेग पकडते. इतिहास, गणित, हिंदी, विज्ञान या विषयांचा ‘राजकीय’ पद्धतीने त्याने केलेला अभ्यास, अभिषेकच्या अभिनयाची आणि तुषार जलोटा याच्या दिग्दर्शनाची चुणूक दाखवल्याशिवाय राहत नाही.

या प्रवासात अगदी योग्य ठिकाणी यामी आणि निम्रतच्या अभिनयाचा खास स्वाद घालणारा एखादा मसाल्याचा तुकडा मिसळायला लेखक आणि दिग्दर्शक विसरलेले नाहीत.

एकीकडे चौधरी तुरुंगात बसून दहावीची तयारी करत असताना, बाहेर सुरु असणारं राजकारण कथानकात आणखी रंजक आणतं. राजकारणात उतरल्यावर भलेभलेही बदलतात आणि रंग बदलणाऱ्या सरड्याची शिकवणी घेऊन अगदी लोणच्यातील लिंबाप्रमाणे राजकारणात मुरून जातात, ते कसे हे पाहायचं असेल, समजून घ्यायचं तर गंगाराम यांची पत्नी ‘बिम्मो’ हे पात्र बघितलं पाहिजे.

 

 

मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून धड मिरवू सुद्धा न शकणारी बिम्मो राजकारणात मात्र इतकी तरबेज आणि धूर्त होऊन जाते की काही विचारायची सोय नाही. दहावीचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय गंगाराम का आणि कसा घेतो, त्याचे बिम्मोवर आणि राज्याच्या राजकारणावर काय काय परिणाम होतात, हे बघणं मोठं औत्सुक्याचं ठरतं.

 

 

काहीवेळा अगदी नकळतपणे कथानकाची पकड काहीशी ढिली पडतेय असं भासतं, मात्र अभिषेकच्या अभिनयामुळे ती पुन्हा घट्ट होऊन जाते. इथून पुढे ‘टिपिकल बॉलिवूड मसाला’ पाहायला मिळणार की काय, असं मनात येऊन जावं अशाप्रकारे रंगवेलले काही प्रसंग ही ढिली पडलेली पकड विसरायला भाग पाडतात. कारण आपण केलेला विचार आणि प्रत्यक्षात पुढे गेलेलं कथानक यात काहीवेळा ‘त्या टिपिकल मसाल्याची’ उणीव असते. म्हणूनच कथानक वेगळी छाप सोडतं.

भारतीय राजकारणी आणि त्यांचं अपुरं शिक्षण या विषयावर विनोदी आणि नाट्यमय पद्धतीने भाष्य करणारा हा चित्रपट शेवटी सामाजिक संदेश देतो, हे वेगळं सांगण्याची गरज नसावी. ‘राजकारणी सुशिक्षित आणि ‘सुज्ञ’ असावा लागतो, हे पटवून देणारा एक चित्रपट’ असं ‘दसवी’चं वर्णन केलं तरी ते फारसं अयोग्य ठरणार नाही.

 

 

शेवटाकडे आल्यावर, सामाजिक संदेश देत असताना हा चित्रपट काहीसा अवास्तव, मिथ्या वाटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक चांगलं कथानक, उत्तम अभिनय आणि योग्य दिग्दर्शन यांच्या जोरावर ही कमतरता (या अशा काहीशा अवास्तव शेवटाला कमतरता म्हणावं का? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने सिनेमा बघून ठरवावं) पुसली जाते यातही काही शंका नाही.

एकुणात काय, तर ज्युनिअर बच्चनसह सगळ्याच कलाकारांचा अभिनय आणि एक चांगलं कथानक यासाठी बघायलाच हवा असा सिनेमा म्हणजे ‘दसवी’!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version