Site icon InMarathi

करायचं होतं एक झालं भलतंच, मुलापेक्षा वडिलांची लव्ह स्टोरी आहे अती फिल्मी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रणबीर-आलियाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये “मला रणबीरशी लग्न करायचंय” असं आलिया म्हणाली होती तेव्हा तिचं हे स्वप्न प्रत्यक्षात खरं होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. कदाचित, खुद्द आलियालाही तसं वाटलं नसावं.

रणबीर कपूरचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. आलियादेखील यापूर्वी तिच्या कथित प्रेमप्रकरणांसाठी चर्चेत होती. मात्र, नियतीच्या मनात या दोन्हांना एकत्र आणणं लिहिलेलंच होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

“लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात”, असं म्हटलं जातं. रणबीर-आलियाच्या बाबतीतही काहीसं असंच म्हणता येईल, पण रणबीरपेक्षाही त्याचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू सिंग याची लव्हस्टोरी आणखीनच रंजक आहे.

 

 

कितीही नाही म्हटलं तरी ‘प्रथमदर्शनी प्रेमात पडणे’ याची आजही आपल्याकडे क्रेझ आहे. आलियाच्या बाबतीत ते खरंही झालं. पण प्रेयसी किंवा प्रियकर खरंतर दुसराच आहे, त्याला किंवा तिला तुम्हाला मनवायचंय, त्यासाठी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राची किंवा मैत्रिणीची मदत घेताय आणि हे करत असताना तुम्ही त्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्याच प्रेमात पडला आहेत असं कमी लोकांच्या बाबतीत घडतं.

आयुष्य कधी कुठलं वळण घेईल हे कुणालाही सांगता येत नाही. आपला भावी जोडीदार बराच काळ आपल्या समोरच होता, आपल्यालाच तो ‘जोडीदार’ म्हणून दिसला नव्हता या भावनेचं अगदी चपखल उदाहरण ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्ह स्टोरी आहे. काय आहे त्यांची हटके लव्हस्टोरी? जाणून घेऊ.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग ही ७०च्या दशकातली अतिशय लोकप्रिय जोडी होती. एका मुलाखतीत नीतूजी म्हणाल्या होत्या की, “त्या काळात केवळ ऋषीची आणि माझी जोडीच सगळ्यात तरुण होती. बाकी सगळे मोठे मोठे कलाकार होते. कदाचित सगळ्यांच्या मनात आमच्या जोडीची हीच प्रतिमा आहे.”

कधीकधी सुरुवातीपासून एखाद्या प्रेमकहाणीची सुरुवात व्हायची नसते. पुढे व्हायची असते. पहिल्या भेटीत एकमेकांविषयी विशेष काही न वाटलेली दोन माणसं कालांतराने पुन्हा भेटली तर त्यांच्यात प्रेमाचं बीज रुजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या खऱ्या प्रेमकहाणीत नेमकं हेच घडलं. नीतू सिंग यांनी एका मुलाखतीत पूर्वी म्हटलं होतं, की ऋषी कपूर यांना त्या पहिल्यांदा ‘आर के स्टुडियो’त भेटल्या होत्या. त्यावेळी ऋषी कपूर यांचं ‘बॉबी’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यांच्या या भेटीत काहीच खास म्हणावं असं घडलं नाही.

 

 

त्यानंतर या दोघांची भेट ‘जहरीला इन्सान’च्या सेटवर आली. त्यावेळीही लगेचच त्यांना एकमेकांविषयी आकर्षण वाटलं नव्हतं. आपण प्रथमदर्शनी एकमेकांच्या प्रेमात पडलो नव्हतो अशी कबुली त्या दोघांनीही काही वर्षांनी दिली होती.

‘जहरीला इन्सान’च्या सेटवर ऋषी कपूर यांना भेटल्यावर सुरुवातीला नीतू सिंग यांना ते अजिबातच आवडले नव्हते. ते त्यांच्यावर दादागिरी करायचे, कशा ना कशावरून टाकून बोलायचे त्यामुळे ते फार मग्रूर आहेत असं नीतूजींना वाटायचं.

सुरुवातीला नीतूजी ऋषी कपूर यांच्या स्वभावामुळे त्यांचा अक्षरश: तिरस्कार करायच्या. नीतूजी तेव्हा खूपच तरुण होत्या आणि नीतूजींना ऋषी कपूर जसा त्रास द्यायचे तसा इतरांनाही द्यायचे. नीतूजींना त्यांचा मस्करी करण्याचा स्वभावही अजिबात पसंत नव्हता.

‘अमर अकबर अँथनी’च्या सेटवर तर ते नीतूजींचं काजळ पसरवायचे आणि त्यांना पुन्हा मेकअप करायला सांगायचे. मस्करीची कुस्करी व्हायची. त्यामुळे नीतूजी फार चिडायच्या. पण त्यांच्यातली हीच नोकझोक पुढे प्रेमात बदलणार होती.

नीतूजींना ऋषीजी त्रास द्यायचे हे खरं. पण, त्यांच्याचपाशी ते आपलं मनही मोकळं करायचे. या सगळ्या दरम्यान त्यांची अगदी छान मैत्री होऊ लागली.

ऋषी कपूर यांची त्यावेळी दुसरीच एक प्रेयसी होती. नीतूजींना याची कल्पना होती. ऋषीजी आपली सगळी गुपितं नीतूजींना मोकळेपणाने सांगायचे. या दोघांच्या प्रेमाचा प्रवास एका इंटरेस्टिंग नोट वर सुरू झाला.

झालं असं की, ‘जहरीला इन्सान’च्या शूटिंगदरम्यान ऋषीजींची त्यावेळेसची प्रेयसी त्यांच्यावर नाराज झाली होती. त्यांच्याच काहीतरी वाद झाला होता. तिला मनवायचं म्हणून त्यांनी टेलिग्राम लिहायला आपल्या जवळच्या मैत्रिणीची अर्थात नीतूजींची मदत घेतली.

 

 

प्रेमात केवळ आकर्षण असून उपयोगाचं नसतं. मैत्री, विश्वास, कठीण प्रसंगात एकमेकांची साथ न सोडणं अशा मजबूत पायावर खऱ्या प्रेमाचं नातं उभं असतं. ऋषीजींच्या त्यावेळेसच्या प्रेयसीबरोबरची त्यांची प्रेमाची गाडी काही पुढे सरकू शकली नाही. त्यामुळे ते फार दुःखी झाले होते.

‘जहरीला इन्सान’ च्या शूटिंगनंतर ऋषीजी युरोपला गेले होते. नेमकं तेव्हाच आपल्याला नीतूजींची ओढ वाटतेय, त्यांचा आधार वाटतोय, त्यांच्यातच आपल्याला आपली सहचारिणी दिसतेय हे त्यांच्या लक्षात आलं.

यावेळेस त्यांनी आपल्या जुन्या प्रेयसीला टेलिग्राम न लिहिता चक्क नीतूजींकरता टेलिग्राम लिहिला आणि “मला तुझ्याशिवाय चैन पडत नाहीये”, अशा भावना व्यक्त करत तो युरोपवरून काश्मीरला पाठवला. अशा प्रकारे या अतिशय देखण्या, आपल्या लाडक्या जोडीच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.

 

 

या जोडीने ‘कभी कभी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘खेल खेल में’ असे सुपरहिट सिनेमे दिले. या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. त्यांच्या डेटिंगच्या बाबतीतही एक मजेशीर तपशील आहे.

नीतूजींबद्दल त्यांच्या आईला फारच काळजी वाटायची. नीतूजींनी आपल्या करियरमध्ये प्रगती करावी, उगाच लोकांच्या चर्चेचा विषय होऊ नये असं त्यांच्या आईला वाटायचं. त्यामुळे नीतूजींनी ऋषी कपूर यांना डेट करणं त्यांना अजिबात पसंत नव्हतं.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग डिनर डेट्सला जायचे तेव्हा नीतूजींची आई चक्क नीतूजींच्या चुलत भावाला त्यांच्याबरोबर डेटला पाठवायची. असंच एकदा ते डेटवर गेले असताना ऋषीजींनी त्यांना “तू इतके चित्रपट साइन करते आहेस. लग्न कधी करणार आहेस?” .

असं विचारलं. त्यावर “मी कुणाशी लग्न करू?”, असा प्रतिप्रश्न नीतूजींनी केला. ऋषीजी म्हणाले, “माझ्याशी” आणि मग काही काळाने ते लग्नबंधनात अडकले.

 

 

नीतूजींनी फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली. लहानपणापासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नीतूजींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून निरोप घेतला. या जोडप्याला रिधिमा आणि रणबीर ही मुलं झाली. आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणूनच नीतूजींनी हा निर्णय घेतला.

२०१० साली ‘दो दुनी चार’ या चित्रपटातून त्यांनी ऋषी जींसोबतच चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. आता ऋषीजी आपल्यात नाहीत. २०१८ साली जेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं, तेव्हाही नीतूजींनी त्यांना अगदी खंबीरपणे साथ दिली. ते दोघे त्यावेळी न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले आणि या सगळ्या खडतर काळात नीतूजी त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या.

 

 

प्रेमाच्या प्रवासात कितीही वळणं आली तरी अखेरीस आपल्याला आपल्यासाठी सुयोग्य असा जोडीदार मिळतो हाच विश्वास यांची लव्हस्टोरी आपल्याला देते. आलिया-रणबीरचं वैवाहिक आयुष्यही ऋषी कपूर-नीतूजींसारखंच एकमकांच्या साथीने सुंदर बहरावं हीच सदिच्छा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version