Site icon InMarathi

माय (मराठी) – वृद्धाश्रमात….आपण सगळ्यांनी मिळून तिला वाचवायलाच हवं!

marathi-school-marathipizza00

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मराठी शाळा→ विद्यार्थ्यांचा दुष्काळ→ लवकरच शाळेचा वाळवंट होईल ●

माझ्या माय मराठीची अवस्था खूप नाजूक झाली आहे ती मरायला टेकली आहे. ती बीमार आहे म्हणून तिला टाकून देऊ नका तिचा काहीतरी इलाज करा.

कालपरवाच आमची धुणी-भांडी करणारी बाई म्हणत होती की,

माझ्या मुलाला मी इंग्रजी शाळेत टाकणार.

तिची महिन्याची कमाई ५००० रूपये असेल पण तिला असेच वाटते की इंग्रजी शाळेत शिकल्यानेच तिच्या मुलाचे भविष्य चांगले होईल. मी तिला खूप समजावलं की, पुढच्या शिक्षणाचा खर्च तुला झेपावणार नाही तसेच मुलाचा अभ्यास कोण करून घेणार? पण तिने तिचा अट्टहास कायम ठेवला. पालकांचा कल दिवसेंदिवस दिवस इंग्रजी माध्यमाकडे वाढतो आहे.

justdial.com

मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस खूपच नाजूक होत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास २०३० पर्यंत मराठी शाळा पूर्णतः बंद पडतील. यावर सरकारला काही ठोस पावले उचलावी लागतील तसेच पालकामध्ये परत एकदा मराठी शाळाबाबत विश्वासहर्ता निर्माण करावी लागेल.

१५ जून ला शाळा चालू होतात. शेतकरी जसा ह्या दिवसात मान्सून ची वाट पाहतो अगदी तशाच प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांची वाट पाहतोय. मराठी शाळेतील शिक्षक १ महिना पूर्वी पासून विद्यार्थ्यांच्या शोधात गावोगाव वणवण भटकत आहे. पट आणि उपस्थितीची गणिते रोज मांडतोय. पटाची उपस्थिती वाढविण्यासाठी टी.सी. ला ५००, १००० किंवा २००० रू मोजत आहे. आश्वासनाचा खजिना पालकासमोर ठेवत आहे. हॉस्टेल वाल्यांनी विद्यार्थी द्यावे म्हणून पैसे पार्ट्या देत आहेत.

आजघडीला मराठी शाळांची खूपच बिकट अवस्था झाली आहे. पालकांना पण माय मराठीतून शिक्षण घेणे म्हणजे मुलांना वाया घालणे असे वाटू लागले आहे. माय मराठी नकोशी झाली आहे कारण माय मराठी कडे गेल्यास पैसा नाही म्हणून लोकांचा बाप इंग्रजी जाण्याकडे कल वाढू लागला आहे कारण बापाकडे गेल्यास खूप पैसे मिळतील.

karnatakatravel.blogspot.in

आज ज्या मुलांनी मराठी माध्यमात शिक्षण घेतले त्यांनी वयपरत्वे इंग्रजी भाषा ही चांगल्या प्रकारे अवगत केली. आज ते चांगल्या नोकरीवर आहेत. सुजाण पालकांनो जरा आकडेवारी लक्षात घ्या मग ठरवा. महाराष्ट्रातील जेवढे उच्च अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, साहित्यिक, नेते, नट इ. यशस्वी व्यक्ती पैकी ९५ टक्के व्यक्ती ह्या मातृभाषा मराठी मधून शिक्षण घेऊनच आज जीवनात यशस्वी आहेत, पण आज दुर्दैवाने हेच लोकं आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याचा अट्टहास धरतात. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या आपल्या मुलाला दोन चार इंग्रजी कविता आणि २०-३० इंग्रजी शब्द बोलला कि पालकांना चंद्रावर गेल्यासारखं वाटतं. पण नंतर तो जेव्हा ५ वीच्या पुढे जातो तेव्हा त्याचा अभ्यास कोण घेणार? निदान शिक्षकाची गुणवत्ता हवी योग्य पणे शिकवण्याची. पुन्हा जेव्हा मुले मोठ्या वर्गात जातात आणि नंतर अभ्यासासंबधी प्रश्न विचारतात तेव्हा पालकांना उत्तर देता येत नाही तेव्हा याच पालकांची फजिती होते.

मी इंग्रजीचा विरोधक नक्कीच नाही. पण मराठीचा समर्थक आहे. इंग्रजी भाषा ही आजची गरज आहे. पण शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवे कारण मातृभाषेतच प्रत्येक शब्दाच्या संज्ञा स्पष्ट करून सांगता येतात तसेच संज्ञा आकलन करणे सोपे जाते. आज चीन, जपान, अमेरिका, इ. प्रगत राष्ट्र त्यांच्या मातृभाषेत/राजभाषेत शिक्षण, व्यवहार, कार्यालयीन कामकाज करूनच प्रगत झाले आहेत.  आपल्या देशात तीन भाषा शिकाव्या लागतात. मराठीत बोलायचं व प्राथमिक शिक्षण मराठीत घ्यायचं, दुसर्‍या राज्यात व्यवहार करण्यासाठी  हिंदीत बोलायचं आणि कार्यालयीन कामकाज व उच्च शिक्षण इंग्रजीतून करायचे. मग आपला घंट्याचा विकास होईल. तिन्ही भाषा शिकण्याच्या नादात धड एकही भाषा नीट येत नाही.  प्राथमिक शिक्षण पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मातृभाषेतच शिक्षण असायला हवे तरच आपला विकास होईल.

mid-day.com

 

मराठी शाळांच्या अधोगतीची कारणे

मराठी शाळांच्या अधोगतीला शिक्षण विभाग, शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, शिक्षक, पालक, इ. सर्व घटक जबाबदार आहेत.

१. सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन शाळा वाटल्या. त्यामुळे गल्लोगल्ली शाळा झाल्या. त्यामुळेच विद्यार्थ्यांची ओढाओढी सुरू झाली.

२. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अगदी खेडोपाडी सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या आहेत. चढाओढीत यांनी फिस सुद्धा कमी ठेवली आहे.५००० रू पासून १ लाख रूपयापर्यंत विकल्प उपलब्ध आहेत. तालुक्याच्या ठिकाणी किमान ४० ते ५० इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. मग मराठी शाळेत कोण येणार?

३. शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार इतका बळावला आहे की, शालेय तपासणी फक्त नावाला उरलीय. शिक्षकांना पक्क कळाले आहे की पैसे द्या आणि पट वाढवून घ्या. तपासणी अधिकारी पटसंख्या, भौतिक सुविधा, गुणवत्ता, खिचडी या सर्व अहवालावर पैसे खाऊन चांगला अहवाल सादर करतात.

४. मराठी शाळेतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागतात. निवडणूक ड्युटी, जणगणना तसेच लेखी काम इतके असते की शिकवायला वेळच नसतो. तसेच अध्यापनातील अद्यावतपणाचा अभाव, कामचुकारपणा इ. मुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली निव्वळ टाईम पास चालू असतो. कधी संयोजक व्यवस्थित प्रशिक्षण देत नाही तर कधी शिक्षक दुर्लक्ष करतो.

५. मराठी शाळेतील अभ्यासक्रम हा खूपच जुनाट व अद्ययावतपणाचा अभाव असलेला आहे. कौशल्यावर आधारित नाही. तुलनेने सी बी एस ई पैटर्न उजवा आहे.

६. शिक्षणाचे खाजगीकरण संस्था संचालकांनी केला आहे, भरमसाठ डोनेशन घेऊन गुणवत्ताहीन शिक्षकांचा भरणा केल्याने शिक्षणाचा दर्जा खालावला आहे.

७. पालकांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेतल्याने आपल्या मुलांची गुणवत्ता वाढेल हा गैरसमज मनामध्ये झाला आहे.

८. गल्ली बोळाने शाळा झाल्या आहेत. शासनाने वर्गाला प्राथमिक ३० व माध्यमिक ३५ मुलांची अट घातली आहे. गेल्यावर्षी पर्यंत शिक्षकांनी बोगस टी सी लावून पट भरती केले, तसेच अधिकाऱ्यांना पैसे खाऊ घालून अवैध पगार उचलला पण आता प्रत्येक विद्यार्थ्याला आधार कार्ड ची सक्ती केल्यामुळे हज़ारो शिक्षक अतिरिक्त होतील. त्यांचे समायोजन होणे अशक्य आहे कारण तितक्या जागा उपलब्ध नाहीत, परिणामी शासनाला त्या सर्व शिक्षकाना घरी बसुन पगार द्यावा लागेल. आधिच कर्जबाजारी सरकार वरुन हा विनाकारण भुर्दण्ड…!

याला सर्व जण जबाबदार आहेत. शिक्षक,पालक, संस्थाचालक, अधिकारी,सरकार, इ…. कृपया मराठी शाळांना वाचवा, आपल्या माय मराठीला वाचवा. 

धन्यवाद…

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Exit mobile version