Site icon InMarathi

बाटलीत हिमालयाची हवा, तर कोणी पुरवतंय कपल्सना खोली; हटके भारतीय स्टार्टअप्स!

himalayan air bottle im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज स्वतःचं करियर घडवू पाहणाऱ्या अनेकांमध्ये दिसणारा एक गुण म्हणजे त्यांना ‘स्वतःचं’ काहीतरी सुरू करायचं असतं. काही वर्षं एका क्षेत्रात नोकरी करून आज अनेकजण स्वतःच्या नेतृत्त्वाखाली एखादा नवाच व्यवसाय, नवी कंपनी सुरू करण्याचं धाडस करताना दिसतात.

“मला उद्योजक व्हायचंय.”, असं जर एखादा तरुण काही वर्षांपूर्वी म्हणाला असता तर आपण बुचकळ्यात पडलो असतो. आपल्यातल्या बहुतेकांना ते आपल्या कल्पनेपलीकडलं काहीतरी वाटलं असतं, पण आता असं होत नाही. आजच्या घडीला जगातच नाही तर भारतातसुद्धा स्टार्टअप्सचं प्रस्थ चांगलंच पसरलंय.

 

 

स्टार्टअप्स सुरू करणारे आणि स्टार्टअप्स साठी काम करणारे अशा दोन्ही प्रकारच्या माणसांची संख्या पुष्कळ आहे. ग्राहकांच्या वर्तमानातल्या गरजा, मागण्या ओळखून आपल्या स्टार्टअपद्वारे त्यांना त्या सेवा, उत्पादनं पुरवण्याचा मानस स्टार्टअप सुरू करणाऱ्या उद्योजकांचा असतो.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक सेवासुविधांद्वारे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षून घ्यायला अशी स्टार्टअप्स तर्हेतर्हेचे फंडे आजमावतात, पण ग्राहकांच्या गरजेच्या नावाखाली अगदी भलत्याच कारणासांठी स्टार्टअप्स ग्राहकांना सेवा पुरवत असतील तर?

भारतात असेही काही चित्रविचित्र स्टार्टअप्स आहेत जे आपण विचारही करू शकणार नाही अशा सेवा लोकांना पुरवतात. यातले काही स्टार्टअप्स पाहीले तर प्रथमदर्शनी जरी ते विचित्र वाटले तरी खरंच ते लोकांसाठी उपयोगाचे ठरू शकतील का या शक्यतेचा आपण विचार करू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही स्टार्टअप्सच्या बाबतीत मात्र आपल्याला असं वाटणार नाही. कुठले स्टार्टअप्स आहेत हे? आणि ते नेमक्या कुठल्या सेवा पुरवतात? जाणून घेऊ.

१. स्वतःच्याच ‘अंत्यसंस्कारांचं’ बुकिंग –

 

 

स्वतःच्याच अंत्यसंस्कारांचं बुकिंग करता येणं हा विचारही कदाचित आपल्या डोक्यात आला नसेल. जवळच्या व्यक्तींच्या निधनानंतर आपली मानसिक स्थिती कितीही वाईट असली तरी सगळे अत्यसंस्कार आपल्याला रीतसर पार पाडावे लागतात.

अँब्युलन्सपासून पुजारी, अंत्यसंकार कुठे करायचे ते ठिकाण अशा सगळ्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात, पण ‘मोक्षशील’ ही कंपनी या सगळ्या क्रिया शांततेत पार पडाव्यात या उद्देशाने आपल्या धर्मानुसार आप्तेष्टांच्याच नाही तर स्वतःच्याही अंत्यसंस्काराचं बुकिंग करण्याची सुविधा पुरवते.

२. ‘ऑनलाईन’ श्रद्धांजली –

 

 

आप्तेष्टांच्या, मित्रमैत्रिणींच्या निधनाची जाहिरात वर्तमानपत्रात छापून आणणे याविषयी आपल्याला माहितीये, पण भारतात असेही स्टार्टअप्स आहेत ज्यांच्याद्वारे आपण आता ऑनलाईनदेखील श्रद्धांजली देऊ शकतो.

गुजरातमधील ‘श्रद्धांजली.कॉम’ या ऑनलाईन मेमोरियल पोर्टलद्वारे जवळच्या वारलेल्या नातलगांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रसिद्ध व्यक्तींनाही श्रद्धांजली देता येऊ शकते.

आपल्या जवळच्या ज्या व्यक्तींचं निधन झालंय त्यांची आठवण म्हणून युजर्स इथे त्यांच्या मेमोरियल प्रोफाईल्स, त्यांचं आयुष्य कसं होतं याविषयीची माहिती देऊ शकतात. त्यांचे फोटोज अपलोड करून त्यांच्या स्मृतीदिनाचा रिमाइंडर सेट करून वेगवेगळ्या भाषांमध्ये सांत्वनपर संदेश पोस्ट करू शकतात. शिवाय, व्हिडियोजही अपलोड करू शकतात.

या स्टार्टअपच्या एका वर्षाच्या सब्स्क्रिप्शनसाठी ९९९ रुपये इतका खर्च येतो तर ५ वर्षांच्या मेंबरशिपच्या सब्स्क्रिप्शनसाठी ३,९९९ रुपये इतकी रक्कम भरावी लागते. चेन्नईतील ‘सोलप्रिंट्स’ ही अशीच आणखी एक सेवा आहे.

३. अत्यावश्यक साधनसामुग्रीची सोय –

नव्या शहरात आलं की सुरुवातीला चांगलीच धांदल उडते. त्या शहरात आपला नीट जम बसेस्तोवर अनेक निकडीच्या गोष्टी लागणार असतात आणि त्या हळूहळू एकेक करत जमवाव्या लागतात.

भांडीकुंडी, गॅस, बिछाना अशा घरात राहायला अगदी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची सोय आधी बघावी लागते. हे सगळंच खूप शीण आणणारं असतं. बंगलोरमधल्या ‘बोरिया बिस्तर’ या स्टार्टअपने मात्र यावर नामी तोडगा काढला आहे.

हे स्टार्टअप या सगळ्या मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा एकत्रितपणे पॅकेजस्वरूपात देतं. बाउल्स, बेडशीटं, बाथरूममधल्या बादल्या अशा गोष्टी किती हव्या आहेत त्यानुसार त्या कस्टमाइझ करूनही मिळतात.

४. पाळीव प्राण्यांचे प्रोफाईल्स –

 

 

आपल्यातले अनेक जण प्राणी पाळतात. सोशल मीडियावरही लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटोज, व्हिडियोज अपलोड करत असतात. पण याच पाळीव प्राण्यांसाठी आता ‘बोनीफाईट’ या नावाचं त्यांचं स्वतःचं म्हणावं असं सोशल नेटवर्क आलेलं आहे.

फेसबुकवर जशा आपण स्वतःच्या प्रोफाईल्स तयार करतो त्याचप्रमाणे ‘बोनीफाईट’वर आपल्या पाळीव प्राण्याची प्रोफाइल तयार करणं, फोटोज अपलोड करणं, फोटोज लाईक करणं, दुसऱ्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्यांशी जोडलं जाणं, पाळीव प्राण्यांसाठी सामूहिक सोहळ्याचं आयोजन करणं अशा गोष्टी करता येऊ शकतात.

इथे काही स्पर्धा होतात ज्यात विजेत्यांना गुण न मिळता ‘हाड’ मिळतं. शिवाय, डॉग फूडवर सूट यांसारख्या सवलतीदेखील ऑनलाईन मिळतात.

५. देवस्थानांची पूजा, प्रसाद थेट ऑनलाईन –

आपण भारतीय ३३ कोटी देव आहेत असं मानतो. भारतात जवळपास १० लाख मंदिरं आणि वेगवेगळ्या देवांच्या आणि वेगवेगळ्या प्रसंगांनिमित्त १०० पेक्षा थोड्याश्याच कमी असतील इतक्या पूजा असतात.

तिरुपती, वैष्णो देवी, शिर्डीसारख्या किमान १० मंदिरांतून आपल्याला प्रसादही मिळतो. ‘ऑनलाईन प्रसाद’ या स्टार्टअप द्वारे या आणि भारतातल्या आणखी बऱ्याच देवळांमधून प्रसाद घरपोच पाठवला जातो.

एवढंच नाही, तर पूजेचं आयोजनही ऑनलाईन केलं जातं आणि मुर्त्या, रत्नं, रुद्राक्ष अशा अध्यात्मिक वस्तूदेखील विकल्या जातात.

६. सेंटेड शूज :

 

 

शरीराला दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण बाहेर जाताना पर्फ्युम मारतो, पण आपल्या पायांनाही वास येऊ नये म्हणून वेगळे शूज असतात हे तुम्हाला माहितीये? २०१४ साली लाँच झालेला ‘सेंट्रा’ हा सेंटेड शू ब्रँड ही अजब सुविधा पुरवतो.

कंपनीद्वारे बनवले गेलेले हे बूट इको फ्रेंडली कापडापासून बनवलेले असतात आणि हे सुगंधी शूज आपल्या पायांना आरामशीर वाटतील अशा रीतीने तयार केलेले असतात. या बुटांमध्ये असलेल्या आपल्या पायांना सुगंध येत रहावा असा हेतू त्यामागे असतो.

कंपनीचा असा दावा आहे, की हे शूज अनेकदा धुतल्यानंतरही त्यांचा सुगंध तसाच राहतो.

७. हिमालयाची हवा बाटलीत :

 

 

तंत्रज्ञानाने केलेली प्रगती कधीकधी आपल्याला भलत्याच प्रकारे चकित करून जाते. कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाची समस्या आपल्यासाठी नवी नाही. आतापर्यंत आपण बाटल्यांमधून शुद्ध पाणी मिळतं हे पाहिलंय, पण आता बाटल्यांमधून थेट शुद्ध हवा विकण्याची किमयाही तंत्रज्ञानाने करून दाखवली आहे.

कोल्ड प्रेस कम्प्रेशनचा वापर करून ‘प्युअर हिमालयन एअर’ हे स्टार्टअप चक्क हिमालयातल्या पर्वतांमधली आणि दऱ्याखोऱ्यांमधली शुद्ध हवा बाटल्यांमध्ये भरून घेतं. जवळपास १६० शॉट्स हवा आत घेता येईल अशी १० लिटरची एक बाटली ही कंपनी ५५० रुपयांना विकते. पैसे टाकले की आता शुद्ध हवाही मिळणार तर!

८. अविवाहित जोडप्यांच्या प्रायव्हसीसाठी खोली :

 

 

अविवाहित जोडपी पार्क सारख्या सार्वजनिक ठिकाणी पीडीए करताना दिसली तर त्यांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या जोडप्यांना पीडीए करणं घरीही शक्य नसतं. थोडक्यात, अविवाहित जोडप्यांना प्रेम करण्यासाठी हवी ती प्रायव्हसी मिळत नाही.

तमाम प्रेमी युगुलांचा हा पेच एका स्टार्टअपने सोडवलाय. दिल्लीमधला ‘स्टे अंकल’ हा स्टार्टअप या जोडप्यांसाठी चक्क खोलीची व्यवस्था करतो. “जोडप्यांना जजमेंटची नव्हे तर खोलीची आवश्यकता असते” अशी या स्टार्टअपची भूमिका आहे.

आपल्याला आश्चर्य वाटेल पण हे स्टार्टअप ४० पेक्षा अधिक शहरांमध्ये असून ६०० पेक्षा जास्त हॉटेल्स ऑन बोर्ड आहे. कोण कधी आणि कशाकरता आपली शक्कल लढवून कल्पनाही करता येणार नाही असे पर्याय समोर आणेल सांगता येत नाही.

९. देशी लग्नात जलवा थेट परदेशी पाहुण्यांचा :

 

 

‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ ही संकल्पना तशी लोकप्रिय आहे. लग्नसोहळे म्हटले की ते भारतात धुमधडाक्यात साजरे केले जातात. ‘जॉईनमायवेडिंग’ या स्टार्टअपने यासंदर्भात एक हटके कल्पना अंमलात आणली आहे.

जगभरातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना या स्टार्टअपद्वारे आता स्वतःचे पैसे मोजून भारतीय लग्नांमधली धामधूम, भव्यदिव्य सांस्कृतिक लग्नसोहळे अनुभवता येणं शक्य आहे. या स्टार्टआपच्या पोर्टलवर आगामी लग्नसोहळ्यांची यादी असते जी पाहून विदेशी प्रवासी या लग्नांमध्ये पाहुणे म्हणून येण्यासाठी बुकिंग करू शकतात.

याचे दोन फायदे होतात. एक तर आपल्याकडच्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या परंपरा त्यांना दाखवता येतात, नातेवाईकांसमोर भाव खाता येतो आणि दुसरं म्हणजे या परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या पैशांतून लग्नासाठी प्रचंड प्रमाणात झालेल्या खर्चामधले अगदी थोडे पैसे तरी आपल्याकडे पुन्हा जमा होतात.

असं म्हणतात, कुठलाही शोध सुरुवातीला बऱ्याचदा विचित्र वाटतो पण तीच गोष्ट कधी आपल्या सवयीची होते हे कळतही नाही. काय सांगावं, वरचे स्टार्टअप्स आज जरी आपल्याला विचित्र वाटत असले तरी भविष्यात त्यांचं काही वाटेनासं होऊन ते उपयुक्त ठरत आहेत असंही आपल्याला वाटू शकेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.  

Exit mobile version