' ज्वालामुखीची राख आणि मानवी वस्त्यांचे अवशेष, पुण्याजवळ वसलेलं गांव – InMarathi

ज्वालामुखीची राख आणि मानवी वस्त्यांचे अवशेष, पुण्याजवळ वसलेलं गांव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘जिओमार्फोलॉजी’ या विषयाची आपल्याकडे फार कमी चर्चा होते. काही ‘स्वयंभू’ म्हणजेच निसर्गाने तयार केलेल्या रचना किंवा शिल्प यांचा अभ्यास करण्याला जिओमार्फोलॉजी हे नाव देण्यात आलं आहे.

ज्वालामुखी, भुस्खनन किंवा भूकंप घडून गेल्यानंतर तयार होणाऱ्या भौगोलिक रचना यांचा अभ्यास करणारे कित्येक लोक आज कार्यरत आहेत म्हणून हा विषय आपल्यापर्यंत पोहोचतोय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या पुण्याजवळ बोरी बुद्रुक या गावात कुकडी नदीवर अशी एक रचना आहे हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल. बोरी बुद्रुक या गावातील गावकरी हे सध्या ही रचना जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

श्री अमोल कोरडे आणि त्यांची पत्नी पुष्पा कोरडे हे दाम्पत्य या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत ज्याचं सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे. काय आहे हे पूर्ण प्रकरण? जाणून घेऊयात.

बोरी बुद्रुक हे पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर आहे. कुकडी नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव आहे. गावाच्या स्थापनेपासूनच लोकांना इथे ‘टेफ्रा’ म्हणजेच ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या खडकांचं सानिध्य लाभलं आहे.

६००० लोकवस्ती असलेलं हे गाव ‘टेफ्रा’ या निसर्गाच्या रचनेकडे सुरुवातीला एक अद्भुत गोष्ट म्हणून कुतूहलाने बघायचे. पण, आज अमोल कोरडे यांनी या गावातील व्यक्तींना ‘टेफ्रा’ काय आहे ? तो कसा तयार होतो याचं पूर्ण ज्ञान दिलं आहे.

 

bori village im 1

 

आज कोणत्याही गावकऱ्याला विचारलं की, “टेफ्रा म्हणजे काय?” तर तो लगेच सांगतो की, “टेफ्रा म्हणजे धूलिकण एकत्र येऊन तयार झालेला एक खडक आहे जो ज्वालामुखीमुळे तयार झाला, आकाशात उंच उडाला आणि पोरी बुद्रुक या गावात येऊन स्थिरावला.”

बोरी बुद्रुक मध्ये आढळलेल्या ‘टेफ्रा’वर अभ्यास करतांना संशोधकांना हे लक्षात आलं आहे की, हे खडक ‘टोबा’ या ज्वालामुखीच्या प्रकारातून तयार झाले आहेत. आश्चर्याची ही गोष्ट आहे की, हे टेफ्रा इंडोनेशिया मधून म्हणजे ३,००० किलोमीटर अंतराचा प्रवास करून महाराष्ट्रातील पुण्यात पडले आहेत.

‘टोबा’ हा जगातील सर्वात भयानक ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो. या ज्वालामुखीने आजवर तीन वेळेस आपला कहर जगाला दाखवला आहे. इंडोनेशियाच्या ज्वालामुखीचे अवशेष हे आशिया, अफ्रिका आणि युरोप मध्ये सुद्धा पोहोचले आहेत.

 

toba volcano im

 

कमालीची गोष्ट म्हणजे हा उल्कापात होऊन ७५,००० ते ८०,००० वर्ष उलटली आहेत तरीही ते अवशेष आजही त्याच अवस्थेत आहेत. भारतीय वैज्ञानिक त्यामुळे बोरी बुद्रुक या जागेला ‘हेरिटेज साईट’ म्हणून बघतात.

बोरी बुद्रुक या गावातील ‘टेफ्रा’ ही आज त्या गावाची ओळख झाली आहे. कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या या गावात एका बाजूने ‘टेफ्रा’ आहेत तर एका बाजूने स्मशान भूमी आहे. बोरी बुद्रुक गावाच्या पाण्याची तहान ही कुकडी नदीच भागवते.

बोरी बुद्रुकचे रहिवासी हे आता ‘टेफ्रा’च्या संरक्षणासाठी एकवटले आहेत. पुष्पा कोरडे या मागील दहा वर्षांपासून बोरी बुद्रुक गावाच्या सरपंच आहेत. ‘टेफ्रा’ला कोणत्याही प्रकारे वातावरणामुळे अथवा औद्योगिक वसाहतीमुळे इजा पोहोचू नये यासाठी बोरी बुद्रुक गावाचं प्रशासन सतर्क झालं आहे.

अमोल आणि पुष्पा कोरडे यांना जेव्हा याबद्दल माहिती विचारण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं, की “आमच्या गावात इतकी मोठी ऐतिहासिक ठेवण असल्याचं आम्हाला जेव्हा कळलं तेव्हापासून आम्ही ‘टेफ्रा’ची विशेष काळजी घेत आहोत. मध्यंतरी इस्राईलहून आलेल्या संशोधकांचं आम्ही स्वागत केलं होतं. हे शास्त्र शिकण्यासाठी मी स्वतः पुण्यातील डेक्कन कॉलेज मधून पदव्युत्तर ‘हेरिटेज काँजर्वेशन’चा कोर्स देखील केला आहे. त्यामुळेच मी माझ्या गावकऱ्यांना ‘जिओमार्फोलॉजी’ या विषयाची माहिती देऊ शकत आहे.”

‘टेफ्रा’च्या जवळ राहणाऱ्या दोन परिवारांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे की, त्यांनी इथे भेट देणाऱ्या, इथली माती घेऊन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती लिहून ठेवायची.

२०१६ मध्ये ज्या भागात ‘टेफ्रा’ आहेत त्या भागात खाणकाम करण्यास सुरुवात झाली होती. पण, गावकरी आणि सरपंच यांनी पुणे उच्च न्यायालयात धाव घेतली होती. माननीय न्यायालयाने ही विनंती मान्य केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना ‘टेफ्रा’चं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या सूचना दिल्या.”

पुष्पा आणि अमोल कोरडे हे दाम्पत्य गावाचं पर्यटन वाढवण्यासाठी सध्या ‘टेफ्रा’ भोवती एक संग्रहालय करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे साध्य करण्यासाठी त्यांनी शासन दरबारी अनुदान देखील मागितलं आहे. पण, त्यावर अजून कोणतंही उत्तर आलेलं नाहीये. कुकडीच्या नदीच्या पाण्याने ‘टेफ्रा’ची झीज होऊ नये यासाठी गावकरी सतत प्रयत्न करत असतात. १५ सदस्यांची एक समिती तयार करण्यात आली आहे ज्यांनी डेक्कन कॉलेज सोबत जून २०२० मध्ये एक करार केला आहे ज्याद्वारे ‘टेफ्रा’चं संयुक्तपणे संवर्धन केलं जाईल.

 

bori village im

 

१९८६ मध्ये बोरी बुद्रुक हे गाव सर्वप्रथम प्रकाशात आलं जेव्हा शिला मिश्रा यांनी सर्वप्रथम या घटनेवर अभ्यास केला आणि आपलं मत नोंदवलं. आपली माहिती जागतिक संशोधकांपर्यंत पोहोचवल्यानंतर शिला मिश्रा यांना अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि तैवान मधील संशोकांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क साधला होता.

२०१८ पासून ‘टेफ्रा’ संरक्षण आणि सुशोभीकरण हा प्रकल्प ग्रामस्थांनी हाती घेतला आहे. बोरी बुद्रुकच्या शेजारील सालवाडी या गावात देखील ‘टेफ्रा’ची माहिती देणारे फलक उभारण्यात आले आहेत. नारायणगावपासून १६ किलोमीटर अंतर असलेल्या या गावात आज ‘टेफ्रा’ हा शब्द सर्वांच्या तोंडावर आहे. बोरी बुद्रुक गावाची दखल २०१९ मध्ये ‘जियोलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने सुद्धा घेतली आहे.

जिओमार्फोलॉजीच्या संशोधकांच्या मते भारतीय पर्यटन खात्याचं धोरण बोरी बुद्रुक सारख्या ठिकाणासाठी नेहमीच उदासीन असतं. किल्ले, मंदिर यांचं संवर्धन करण्यात व्यस्त असलेल्या या खात्याने वैज्ञानिक जागांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं आहे.

बोरी बुद्रुक सारख्या ठिकाणाचं उल्लेख जर येत्या काही दिवसात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ मधून केला तर त्या गावाला अधिक लोक भेट देतील हे नक्की. असं झाल्यास, प्रशासन देखील त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबित परवानगी लगेच देतील आणि बोरी बुद्रुक हे गाव खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?