Site icon InMarathi

वयाच्या ४ थ्या वर्षी ६५ किमी धावणारा बुधिया सिंग कुठे आहे? जाणून घ्या

budhiya final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी त्याच्या इतकं महत्व भारतात कोणत्याच खेळाला नाहीये ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेट खेळाडू हा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळत नसला तरीही तो रणजी क्रिकेट, आयपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळून आपला उदरनिर्वाह व्यवस्थितपणे करत असतो.

हेच जेव्हा आपण धावपटू, बॅडमिंटनपटू किंवा कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, या खेळाडूंकडून त्यांची निवड समिती, आपण सगळेच नेहमी केवळ पदकांची अपेक्षा करत असतो. इतर खेळातील खेळाडूंनी पदक जिंकली तरीही ते एक दोन जाहिरातीत दिसतात, त्यांना एखादा पुरस्कार मिळतो बस्स.

 

 

‘बुधिया सिंग’ हा असाच एक धावपटू आहे ज्याने २००६ मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी ६५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून विश्वविक्रम केला होता. खूप कौतुक झाली, चर्चा झाली. पण, आज तो भुवनेश्वरचा बुधिया सिंग कुठे आहे ? हे कोणालाच माहीत नाहीये. एके काळी पुढचा ‘मिल्खा सिंग’ म्हणून कौतुक झालेला बुधिया सिंग आज कुठे आहे? कसा आहे? तो सध्या काय करतो? हे जाणून घेऊयात.

बुधिया सिंगचा जन्म २००२ मध्ये ओरिसा मधील भरतपूर येथे झाला होता. दोन वर्षांचा असतांना बुधिया सिंगच्या वडिलांचं निधन झालं होतं. बुधियाची आई मोलकरीण म्हणून काम करून त्याची आणि त्याच्या तीन बहिणींचा सांभाळ करायची. लहानपणापासूनच बुधियाला खेळत रहाण्याची, पळण्याची प्रचंड आवड होती. त्याची ही आवड ही बिरंची दास या व्यक्तीच्या नजरेस पडली आणि त्यांनी बुधियाला प्रशिक्षण देऊन एक व्यवसायिक धावपटू करण्याचा निर्णय घेतला.

 

 

बिरंची दास यांनी बुधिया सिंगला प्रशिक्षण देण्यासाठी तो राहत असलेल्या झोपडपट्टीच्या जवळच्या जागेची निवड केली. विनामूल्य सुरू असलेल्या या प्रशिक्षणात बिरंची दास यांना बुधिया सिंग मध्ये भावी धावपटू दिसला. सातत्याने सरावासाठी येणारा बुधिया सिंग हा एके दिवशी धावण्यासाठी आला नाही तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने दुसऱ्या दिवशी एक शिक्षा सुनावली. “मैदानाला चक्कर मारत रहा” अशी ती शिक्षा होती. बुधिया सिंगने ती शिक्षा मान्य केली आणि तो सलग ५ तास त्या मैदानावर धावत होता.

बिरंची दास यांना बुधिया सिंगच्या वयाच्या मानाने त्याच्यात असलेल्या सहनशक्ती, स्टॅमिनाचं खूप कौतुक वाटलं. त्यांनी मनोमन ठरवलं की, बुधिया सिंगला आपण पुढच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवायचं. ती संधी लवकरच चालून आली. २ मे २००६ रोजी होणाऱ्या ‘ओरिसा मॅरेथॉन’ची जाहिरात त्यांनी बघितली आणि ते बुधियाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भवनेश्वरला घेऊन गेले.

 

 

मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या स्पर्धकांपैकी बुधिया सिंग हा वयाने, उंचीने सर्वात लहान होता. आयोजक हे त्याच्या स्पर्धेतील कामगिरीबद्दल, मॅरेथॉन पूर्ण करण्याबद्दल साशंक होते. पण, बुधिया सिंगने त्या दिवशी सर्वांनाच चकित केलं.

भुवनेश्वर ते पुरी या दोन शहरातील ६५ किलोमीटर हे अंतर त्याने न थकता, न थांबता ७ तास आणि दोन मिनिटात पूर्ण केलं. कोणत्याही उच्च संस्थेचं प्रशिक्षण, ठरवून दिलेला आहार नसतांनाही बुधिया सिंगने करून दाखवलेल्या या कामगिरीबद्दल त्याचं सर्वदूर कौतुक झालं. त्यानंतर बुधिया सिंगने एकूण ४८ मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि त्या सर्व स्पर्धा त्याने पूर्ण केल्या.

बुधिया सिंगचं नाव एक उत्कृष्ट धावपटू म्हणून इतकं प्रसिद्ध झालं की, ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली.

भारत सरकारने बुधिया सिंगला क्रीडा जगतातील सर्वोच्च पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित केलं. बुधिया सिंगने वयाच्या १५व्या वर्षी केलेल्या या कामगिरीची माहिती देणारा ‘बुधिया सिंग – बॉर्न टू रन’ हा सिनेमा सुद्धा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. एकीकडे यशाची शिखरं गाठत असतांना या सर्वांना त्यावेळी ब्रेक लागला जेव्हा २०१७ मध्ये त्यांचे प्रशिक्षक बिरंची दास यांची अज्ञात इसमाने गोळ्या घालून हत्या केली आणि तिथून त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.

२०१७ नंतर बुधिया सिंग हा कोणत्याच स्पर्धेत भाग का घेत नाही ? हा एक गूढ प्रश्न आहे. २०१६ नंतर त्यांनी कोणत्याच स्पर्धेत भाग घेतल्याची कुठेच नोंद नाहीये. ओरिसा मधील काही पत्रकार हे जेव्हा बुधिया सिंगला शोधत त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या आईने सांगितलं की, ” बुधिया सिंगने इतकी चांगली कामगिरी करूनही ओरिसा राज्य सरकारने त्यांची कोणतीही आर्थिक मदत केली नाही.”

 

 

ओरिसाच्या पत्रकारांनी जेव्हा बुधिया सिंगची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की, “मी मागच्या ५ वर्षांपासून भुवनेश्वर येथील स्पोर्ट्स हॉस्टेल मध्ये रहात आहे. मला असं सांगण्यात आलं होतं की, इथे राहिलो तर मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. पण, असं काहीच झालं नाही. मी ओरिसा सरकारकडे मागितलेली आर्थिक मदत देखील नाकारण्यात आली. माझे पहिले प्रशिक्षक बिरंची दास यांच्या निधनानंतर मी कित्येक वर्ष विना प्रशिक्षक होतो. मागच्या वर्षी मला डीएव्ही स्कुल मधील ‘आनंद चंद्र दास’ यांच्या रूपाने नवीन प्रशिक्षक मिळाले.”

२० वर्षांचा बुधिया सिंग आज २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. भुवनेश्वर स्पोर्ट्स हॉस्टेल मधून निघून ते आता आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. बिरंची दास यांची इच्छा होती की, बुधिया सिंगने ऑलम्पिकमध्ये सहभागी व्हावं आणि भारतासाठी पदक जिंकावं.

बुधिया सिंग यांचा क्रीडा संघर्ष जरी कमी झाला असला तरीही वैयक्तिक आर्थिक संघर्ष अजूनही सुरूच आहे. ट्विटरवर त्यांनी एक अकाउंट उघडलं आहे ज्यामध्ये त्यांनी लोकांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे. “माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. कृपया मदत करा” या आशयाची एक लिंक तिथे देण्यात आली आहे. आजवर इथे केवळ ७९,७०४ रुपये इतकी मदत बुधिया सिंगला मिळाली आहे.

 

 

भारतीय क्रिकेटपटू सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत संघर्ष करतात. पण, त्यांचा संघर्ष हा प्रगतीसाठी असतो. बुधिया सिंग सारख्या कित्येक खेळाडूंचा संघर्ष हा त्यांच्या अस्तित्वासाठी असतो. मैदानावर आणि मैदानाबाहेर असा दोन्ही ठिकाणी ते केवळ लढत असतात. बुधिया सिंग ऑलम्पिक पदक जिंकून आपल्या आयुष्यासोबत सुरू असलेली स्पर्धा जिंकेल अशी आशा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version