' दलितच राष्ट्रपती का? – InMarathi

दलितच राष्ट्रपती का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून बिहार राज्याचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केले आणि एका दगडात अनेक पक्षी मारले. त्यांनी संघ प्रणित सरकार दलित विरोधी नाही, फक्त ब्राह्मण चेहऱ्याव्यतिरिक्त जातीचे इतरही चेहरे असल्याचे दाखविले, विरोधी पक्षांना तिखट विरोध करावयास जागा ठेवली नाही, पर्यायी उमेदवार शोधावयास विरोधकांच्या नाकी नऊ आणले.

विरोधी पक्षांकडून दलितच चेहरा असावे असा उमेदवार शोधावयास गेल्यास सुशिलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, मिरा कुमार यापलीकडे उमेदवार नव्हते, तसे बारामतीच्या साहेबांना आग्रह केला होता पण त्यांनी भविष्य काळ पाहता हाताने कुऱ्हाड मारून घ्यावयाचे टाळले.

एकुण रालोआच्या १०,९८,९०३ पैकी जवळपास ६ लाख मतदानाची जुळवाजुळव झाली आहे. घटक पक्ष व काही विरोधी पक्ष सोबत घेवून मजबूत विजय मिळविण्यासाठी प्रयत्न आहे, त्यामुळे रामनाथ कोविंद हे नक्कीच निवडून येतील यात शंका नाही.

ramnath-kovind-marathipizza02
navbharattimes.indiatimes.com

राष्ट्रपती पद हे तसे शोभेचे पद आहे, त्यास पंतप्रधान पदासारखे वलय नाही. पण या पदासाठी बिगर राजकारणी असावा असे मानक आहे. त्यामूळे पूर्वी ए.पी.जे. अब्दुल कलाम हे रालोआचे राष्ट्रपती होऊन गेले. यावेळी अमिताभ बच्चन, रतन,टाटा, विजय भाटकर अशा मंडळींचेही नाव आले, पण बहुमत असलेल्या भाजपा सरकारने ती आशा फोल ठरवत राजकिय पार्श्वभूमी असलेले भाजपाचे अनुसुचित जाती मोर्चा चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली. सर्वाधिक डिझायरेबल उमेदवार लालकृष्ण आडवाणी यांना गुरु दक्षिणा देण्यात मोदी कमी पडले आणि त्यांना खडा बाजूला काढून टाकावा तसे केले आहे. साहजिकच नरेंद्र मोदींनी भन्नाट चाल खेळून पक्षांतर्गतही चेकमेट करुन आपली एकाधिकारशाही मजबूत केली आहे.

कॉंग्रेसने मा.लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणुन घोषित केले आहे. दलित विरुद्ध दलित अशी सरळ लढत राष्ट्रपती पदासाठी होणार हे निश्चितच आहे. जणू काय या वेळी अनुसुचित जातीसाठी राष्ट्रपती पद आरक्षित आहे. भाजपाने हिंदूत्ववादी चेहऱ्यावर दलितांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोविंद यांना उमेदवारी दिली, पण मग कॉंग्रेसने मीरा कुमार हा दलितच चेहरा उभा करून,  सरळ अतिशय टोकाचे जातिय राजकारण केल्याचे दिसून आले. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा किमान पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्षांनी विचार करणे गरजेचे होते. तुम्ही जातिवादी तर आम्हीही कमी नाही हे कॉंग्रेसने दाखवून दिले आहे.

MEIRA_KUMAR-marathipizza
patrika.com

दलित व्यतिरिक्त दोन्ही उमेदवारांची वेगळी ओळख आहे, पण म्हणतात ना कितीही केले तरी जात जातच नाही, त्याचा प्रत्यय येत आहे. रामनाथ कोविंद यांना दिल्ली उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायलयात प्रदिर्घ वकिलीचा अनुभव आहे. दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणुन राहिले आहे. ते आंबेडकर विद्यापीठ लखनऊ व भारतीय व्यवस्थापन संस्था, कोलकाता (IIM-Kolkata) यांच्या व्यवस्थापन मंडळावर होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दलित शोषित, मागासलेल्या वर्गासाठी, महिलांसाठी मोफत वकिलीची सेवा दिल्ली येथे ते  देतात.

दुसरीकडे मिरा कुमार या माजी लोकसभेच्या अध्यक्ष राहिल्या आहे. त्या माजी पंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या. त्या वकिलीच्या पदवीधर आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकळात सामाजिक न्याय व सक्षमिकरण खात्याच्या त्या मंत्री होत्या. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात महिला लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

असे स्वताः ची वेगळी ओळख व कार्य असुनही या उमेदवारांकडे फक्त दलित म्हणुन बघणे कितपत योग्य आहे.?

===

लेखक : सुनील सिंग राजपूत

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?